आमच्या अतरंगी स्वभावामुळ अन आमच्या अजब गजब कारनाम्यां मुळ, आमी लवकरच कॉलेज कॅम्पसमध्ये फेमस झालो होतो. मित्र ही आता लय वाढले होते.
राहुल्या, दिसाले एक्दम शांत, पण एकदा सुप्तगुण नाई, त मंग तो अमरावतीकर कसला? टपरीवर पोट्याचा गोळका असला, की आमी तिघ तिथं पोहचाच. मग काय बिनकामाच्या गप्पा मारत, एक, एक कटिंग चा कदी होऊन जाचा समाजातच नसे. हळूहळू आमच्या दोस्त्याच्या डोक्यात प्रकाश पळाले लागला.
"अबे!! लेका, हे त फुकटे, कधी चहाले पैसे काढत नाई." झाल आता खरी मजा.
आमी टपरीवर आलो, कि यायले चा पाजाचा नाई, अस पोट्टे ठरवूनच असायचे. पण हा राहुल्या, काय बाताड्या हाणे काय माहीत, अन पुढच्या वर, काय मंतर टाके, की ऑटोमॅटिक त्याचा कडून, कदी तीन चहाचे पैसे दिले जाय, हे पुढच्या ले समाजातच नसे. आता त, राहुल्यावर पोट्टे बेट लावले लागले, की अमुक एकाद्या दोस्ताले, आज कटून दाखव बर, अन मग तेच पोट्टे, त्या दोस्ताले पण सांगे, की भाऊ, हा राहुल्या, तुले आज गंडवणारं हाय. तरी पण राहुल्या, काय त जांगडबुत्ता लावे, काय माहित? अन चहा त काटेच. राहुल्याची त दहशहत झाली होती.
तीन चार, दिवस जोडून सुट्ट्या आल्या, की आमी, प्यासेंजर ट्रेन न अकोला ते बडनेरा, अन मंग अमरावतीले पयाचं. ट्रेनचा प्रवास कराले कारण म्हणजे, एक त कॉलेजजवळ स्टेशन, अन दुसर म्हणजे प्यासेंजरच तिकीट, फक्त तेरा रुपय. एकदा, असेच, म्या अन राहुल्या न, बडनेरा ते अकोला जासाठी प्यासेंजर पकडली. काही काड्या करणार नाई, त मंग आमी अमरावतीकर कसले? आज आम्ही दोघंही बहाद्दरांन ट्रेनच तिकीट काढल नव्हत.
कायच्यासाठी ह्या सगळ्या उचापत्या? काय घरून, तेरा रुपये द्यायची पण ऐपत नोती काय? कदाचित ते वयचं आमाले, आमी काय डेरिंग करू शकतो किं काय काय नवीन अनुभव गाठशी बांधू शकतो, म्हूणन आंमच्याकडून, हे असले धंदे करून घेत होत. मूर्तिजापूर स्टेशनपर्यंत सगळं लय मजेत चालल होत. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आमी कव्हर केलं होत . बस, आता अजून अकोला याले चाळीस मिनिटच बाकी होते. पण चुकीच्या मार्गावर लागलेल्या, आमाले, देव असा कसा सोडीन? अद्दल त घडलीच पायजे ना , यांची खोड त मोडलीच पायजे. झाल, देवाने आता आमाले चांगला धडा द्याचा ठरवल. त्याच बोगी मदे, थोड्या दूर काळाकोट घातलेला टीसी, त्याचा कडे माई अन राहुल्याची नजर गेली. दोघाले ही घाम सुटला.
"आता रे बाबू? काय कराच?" काईच सुचून नॊत रायल. ट्रेन पण लय जोरात धावत होती
"आता बे अन्या ,काय कराच बे?" दोघांची पंढरी घाबरली.
काळ्या कोटातला टीसी, आमच्याच दिशेन अजूनच जवळ येऊन रायला होता. आमी दोघ उलट्या दिशेनं टॉयलेट जवळ गेलो. पण टॉयलेट, आधीच पॅक, आमच्यासारखे अजून बिनतिकिटं फुकटे तिकडे लपून बसले होते.
"आता बे लेका " बिनाटिकिट प्रवास करणाऱ्यले, दोन वर्ष जेल, असं कुठं तरी वाचलं होत. तेच आता डोयापुढं दिसत होत. टीसी जवळयेईपर्यंत, काई तरी जुगाड करणं जरुरी होत. दोघंही रडकुंडीला आलो होतो. अन आमी कुठ चुकलो, हे कदाचित, देवान आमाले प्रक्टिकल लाईव्ह एक्झाम्पल देऊन जवळून दाखिवल होत. परंत अख्या जन्मात, हे दोघ अशी चूक करणार नाई, अशी खात्री देवाले पटली असणं, अन म्हणूनच टीसी जवळ याच्या आदी, ट्रेन बोरगावमंजू ले थांबली. दोघेही उजव्या बाजून उड्या मारणार, त दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरून एक भरधाव एक्सप्रेस जात होती. आता लास्ट उपाय, टीसी ज्या गेटच्या एक्दम जवळ उभा, तेथूनच नो दो ग्यारा व्हायचं होत. दोघांन एक्दम हिम्मत लावून, धपाधप उड्या मारल्या रे मारल्या, अन ट्रेन स्टेशनवरून सुटली.
“मरता मरता वाचलो रे बावा आज” अस म्हणत आमी दोघ, त्या जाणाऱ्या ट्रेन कड थोड्या वेळ पाहतच होतो. संकट टळल होत, अन अद्दल पण घडली होती.तेथून चालत रोडवर येऊन, आमी रेती घेऊन जाणाऱ्या एक ट्रॅक्टर, त्या भाऊले "ओ दादा अकोल्याले सोडणार का हो?” विचारल.
" आठ, आठ रुपय प्रत्येकी लागन" तो बोलला. दोघेही हो म्हणत रेतीच्या ट्रॅक्टर मदे चढलो. झाला त्या प्रकारावर, दोघेहि विचार करत होतो. आता हे असले धंदे, करायचे नाही रे बावा. म्हणून दोघांनी कानाले खडा लावला.ट्रॅक्टर तीस मिनटात आमाले घेऊन अकोल्यात आला.
DDLJ ,दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे, आजही हा सिनेमा कुठल्याही चॅनेलवर लागला, की आमी तिघही अकोल्याच्या त्या थेटर मदे पोहचतो. आता शाहरुखखान हा माया अजून एक आवडीचा हिरो, हे मन्या अन राहुल्या ले समजलं होत. मंग काय शाहरुखखानच गुणगान माया पुढं करून, राहुल्या अन मन्यान शर्यत लावली. शर्यत कायची? ह्यां दोघान मले चण्याच्या झाडांवर चढवल. तू शाहरुखसाठी काय करू शकतो? , तू शाहरुखचा किती मोठा फॅन? दाखव बर प्रूव्ह करून? झालना मले चॅलेंज? ठरल पिच्चर पायताना, जर का मी अक्ख्या थेटर मध्ये सीटवरून उठून नाचलो नाई, त पाय मंग. मन्या अन राहुल्याचा, मले मामा बनविण्याचा प्लॅन तैयार झाला होता. फक्त आता तो कधी अन कसा मार्गी लागण, याचीच वाट ते दोघे पाहत होते.
आला तो दिवस पण आला. लोकानी आधीच थियेटर डोक्यावर घेतल असताना "मेहंदी लगा के रखना,डोली सजा के रखना" हे गाणं लागताच, कमीत कमी वीस पंचेवीस पोट्टे, सिनेमाच्या पडद्या जवळ नाचतांना दिसले, राहुल्या, अन मन्याले, काई काही समाजाच्या आधीच, मी त्या गर्दीत कदी पोहचलो, अन कदी नाचलो, मले पण समजलच नाई. ना कुणाची पर्वा ,ना कुणाची शरम ,ते म्याटावाणी वागणं, तो क्षण माया ,राहुल्या अन मन्याच्या आयुष्यात कायमच घर करून गेला. "एक बार वक्त से लमाहा गिरा कही, एक बार वक्त से लमाहा गिरा कही, वाह दास्तां बनी, लमहा कही नही" असच काही.
क्रमशः