माझी एक गोची होते
वृत्तबद्ध लिहिताना
माझी एक गोची होते
यमक जुळवू जावे तर
अलगद काही निसटून जाते
माझी कविता "जुळत" नाही
टोटलच बघा लागत नाही
(अन जुळलीच बेटी चुकून तर..)
कमावलेली कृत्रिमता
हट्टीपणे हटत नाही
कवितेचे झटपट वर्ग
कुठे कोणी घेतं का?
असल्यास जरा सांगा मला
प्रतिभा विकत मिळते का?
(एक कोडं सुटत नाही ...)
भावना इतक्या तरल कशा?
शब्द इतके रुक्ष कसे ?
मग त्याची कविता वाचता वाचता
डोळ्यात पाणी येतेच कसे?