कविता माझी

तुझ्या आठवणीत...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
1 Nov 2016 - 2:47 pm

तुझ्या आठवणीत...

बहरलेल्या वेलीवर
एक कळी खोळंबली
तुझ्या आठवणीत ति
अजून नाही उमलली

गाभाऱ्यातील ज्योत
मंदपणे तेवली
तुझ्या आठवणीत
हळूच लवलवली

आभाळातील चांदणी
रात्रभर गुरफटली
तुझ्या आठवणीत
पहाटे ति चमचमली

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

स्मरशील का?

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
31 Oct 2016 - 11:25 am

स्मरशील का?

सदोदित आईच्या कुशीत
कधी माझ्या कुशीत शिरशील का?

सदोदित आईच्या मागे मागे
कधी माझ्या मागे फिरशील का?

सारे हट्ट आईला सांगतोस
कधी कधी मला मागशील का?

साऱ्या गुजगोष्टी आईला सांगतोस
कधी कधी मला सांगशील का?

पोटासाठी दूरदेशी मी
कधीतरी मला स्मरशील का?

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

क्षणाचे सोबती....

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
29 Oct 2016 - 8:28 am

क्षणाचे सोबती....

कशाला हवेत नगारे नौबती
आपण सारे क्षणाचे सोबती

जुळुनी येती जेव्हा प्रेमाची नाती
कशाला हवीत रक्ताची नाती

नुसतेच फोफावती वृक्ष सारे
भगवंताच्या माथी तृणाचीच पाती

वृथा तळपती सूर्याची किरणे
तिमिरात तळपती समईच्याच ज्योती

रोवून दाव एकतरी निशाण
जगात आहेत मोजकेच जगज्जेती

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

स्वप्नातले कोंकण

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
28 Oct 2016 - 8:32 am

स्वप्नातले कोंकण

साधेच घर माझे , छोटेसे अंगण
त्यात अवतरले, सारे वृक्षगण

अंगणात माझ्या, तुळशी वृंदावन
माथ्यावर दूर्वा, दुडदुडतो गजानन

अंगणात माझ्या, कर्दळीचे पान
घालतो मांडव, संतुष्ट होई सत्यनारायण

नारळ सुपारी डुले, आहे त्यास मान
नैवेद्याला सजते, केळीचे पान

परसदारी फुलती फुले, दारी आंब्याचे तोरण
शंकरास वाहते, बेलाचे पान

स्वप्न माझे साधे, सदाहरित कोंकण
त्यात असावे घरकुल माझे छान

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

दिवाळी (कविता)

शार्दुल_हातोळकर's picture
शार्दुल_हातोळकर in जे न देखे रवी...
27 Oct 2016 - 10:50 pm

लोपला अंधार सारा, माखली तेजात नगरी
उजळले सारेच रस्ते, वाहती आनंदलहरी

लागले लाखो दिवेही, जाळण्या काळोख सारा
धुंद तो आला सुगंध, कुठुनसा घेऊन वारा

शोभतो आकाशकंदिल, टांगला उंचावरी
टाकला दारी सडाही, बांधले तोरण दारी

होई ते अभ्यंगस्नान, लावुनी उटने सुगंधी
तप्त ते पाणी पहाटे, चढविते न्यारीच धुंदी

बोचरी थंडी गुलाबी, फुलविते रोमांच अंगी
रांगोळी दारामधे ती, रंगुनी साऱ्याच रंगी

रोषणाई हा खरोखर, प्राण या दिपोत्सवाचा
शुभशकुनी सोनकिरणे, नाश करिती दानवांचा

कविता माझीकविता

विश्वस्ता...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
27 Oct 2016 - 8:17 am

विश्वस्ता...

जगावेगळा आहे मी फिरस्ता
चोखाळतो मी अनोळखी रस्ता

लावतो मलम मी परोपरी
घाव घालणे हा तुझा शिरस्ता

राहतो हजर प्रत्येक समारंभास
बांधतो वेदनेचा नेहमी बस्ता

केला गुन्हा, केली प्रीत तुजवरी
आयुष्यात काढल्या अनेक खस्ता

झालो चरणी लीन नियतीच्या
आता तुझाच आहे भरवसा विश्वस्ता

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

एका वर्सात

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in जे न देखे रवी...
27 Oct 2016 - 7:16 am

एका वर्षाच्या बाद अकोल्यात येऊन रायलो परवाच्या दिवशी,
अजून बी तसाच अशीन का माला गाव जसा व्हता मांगल्या वर्षी ?

अजून बी पिकवित लोक सकाळी फिराले जात असतीन काय?
दिवसभर मंग धूळ्ला खायाले तयार होत असतीन काय?
च्या प्याले कप देतात, का अजूनही वापरतात बशी?
अजून बी तसाच अशीन का माला गाव जसा व्हता मांगल्या वर्षी ?

अजून बी दुपारच्या जेवनाले मंग वांग्यावर तर्री असते काय?
गरमागरम वरणभातावर तुपाची धार खरी असते काय?
इंजेक्शनवालं दुध देत नाहीत ना आपल्या म्हशी?
अजून बी तसाच अशीन का माला गाव जसा व्हता मांगल्या वर्षी ?

कविता माझीसंस्कृती

!!!...अर्थ-हीन चरित्र…!!!

अर्थहीन's picture
अर्थहीन in जे न देखे रवी...
26 Oct 2016 - 2:24 pm

!!!...अर्थ-हीन चरित्र…!!!

बक्कळ कोरड्या नदीतला,
आयुष्याचा हा शेवटचा थेंब… बाष्पी-भवनाने वाफ होण्याआधी…
दहा मिनटात… एक अर्थहीन आत्म-चरित्र
खरडावं म्हणतोय…

खरंतर, जन्मलो त्या दिवशीच भयानक रडलो होतो.
आई बाप हसत होते, मी जन्मलो म्हणून
अन मी रडत होतो,
या जन्मात जन्मायच्या ‘फक्त एक-क्षण-आधी’,
गेल्या जन्मात मेलो म्हणून …

कविता माझीकविता

शैशव...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
26 Oct 2016 - 8:19 am

शैशव...

जे सुख लाभले शैशवास
पुन्हा ना लाभे मानवास
अन्न वस्त्र अन निवारा
ह्याचाच लागे ध्यास

कोठे हरवले ते निरागस
बालपण अन विश्वास
जसेजसे वाढू लागलो
वाढू लागला अविश्वास

जन्मताच काय तो घेतला
एक मोकळा श्वास
आता मात्र घुसमटतोय
प्रत्येक श्वास प्रत्येक श्वास

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

वाट हरवून गेली...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
25 Oct 2016 - 8:23 am

वाट हरवून गेली...

अशीच ती माझ्या समोरून गेली
जणू नभात वीज चमकून गेली

मिळता नजर डोळे दिपवून गेली
उधळीत गंध उडता पदर सावरून गेली

जाता मागे मागे मने जुळवून गेली
कळलेच नाही कधी वाट हरवून गेली

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक