खुळ्या सांजवेळा खुळा तोच गहिवर कुणी रोज त्याला कसे सावरे ??
कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. मनाची किती हाय! स्थित्यंतरे ..
उन्हासोबतीने असे चालते की जणू सावलीशी न नाते जुळे
झुगारून देई जुन्या रीतभाती मिठी मारते वादळाला खुळे
फिरे धुंद, संदिग्ध पण सोवळेसे, थव्यातून फिरती जशी पाखरे
कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. मनाची किती हाय! स्थित्यंतरे ..
दिवे लागणीची जशी वेळ येते दिसे अंगणी सांजवातीपरी
जणू होत स्मरणे विरागी स्वरांनी फिरे अंतराळी जशी सावरी
तमा ना कुणाची कशाची मनाला, जसे मन म्हणे ते तसे वावरे
कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. मनाची किती हाय! स्थित्यंतरे ..
निळ्या सावळ्याशा दिगंतावरी ते नवा खेळ खेळे दिशांसोबती
कधी पूर्व तर अन् कधी पश्चिमेला मिती शोधते आपुल्या भोवती
कधी एकटे तर कधी संगतीने गवसती कशी त्यास गत्यंतरे ??
कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. मनाची किती हाय! स्थित्यंतरे ..
-प्राजू
प्रतिक्रिया
22 Nov 2016 - 2:10 pm | सानझरी
मनाची किती हाय! स्थित्यंतरे..
किती सुंदर कविता.. वाह!!
22 Nov 2016 - 2:47 pm | चांदणे संदीप
अप्रतिम!
Sandy
22 Nov 2016 - 3:31 pm | ज्ञानोबाचे पैजार
अप्रतिम,
फारच आवडली
पैजारबुवा,
22 Nov 2016 - 3:40 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
तै __/\__!
22 Nov 2016 - 4:44 pm | Bhagyashri sati...
मस्त!
22 Nov 2016 - 5:35 pm | कवि मानव
बऱ्याच दिवसांनी मनापासून आवडलेली कविता
खूप छान नाद आहे कवितेतला ... शुभेच्छा !!
22 Nov 2016 - 7:49 pm | पाटीलभाऊ
आवडली.
22 Nov 2016 - 8:27 pm | अत्रुप्त आत्मा
केवळ अप्रतिम!
इतकी अप्रतिम की वाचता वाचता एक सहज चाल मनात आली , आणी पुढे त्याच चालीत म्हणूनंही पाहिली.
22 Nov 2016 - 8:36 pm | यशोधरा
सुरेख गं प्राजू. काही काही कल्पना खूप आवडल्या.
22 Nov 2016 - 11:13 pm | शार्दुल_हातोळकर
मराठी साहित्याला समृद्ध बनवणारी कविता !!
23 Nov 2016 - 2:23 am | स्वाती दिनेश
सुरेख कविता प्राजु. आवडली.
स्वाती
23 Nov 2016 - 2:54 am | पिलीयन रायडर
किती सहज शब्द आलेत! कुठेही कविता जुळवावी लागली असेल असं वाटतच नाही. झरझर शब्द स्वतःच येउन कवितेत बसलेत असं वाटतंय!!
23 Nov 2016 - 2:05 pm | किसन शिंदे
अतिशय सुरेख आहे कविता.
26 Nov 2016 - 4:14 pm | पद्मश्री चित्रे
सुरेख , बोलकी कविता..
2 Dec 2016 - 4:51 pm | विशाल कुलकर्णी
जियो प्राजु ! किती दिवसांनी वाचली तुझी कविता. आवडेश.
2 Dec 2016 - 5:22 pm | मितान
सुरेख कविता !
किती दिसांनी गं !
2 Dec 2016 - 9:10 pm | पैसा
अगदी लयबद्ध कविता!
5 Dec 2016 - 5:04 pm | रातराणी
अप्रतिम!
14 Dec 2016 - 9:00 pm | एक एकटा एकटाच
सुरेख
कवितेच्या लांब ओळींमधे लय चांगली पकडलीय
17 Jan 2017 - 1:36 pm | देशप्रेमी
मनाच्या विविध अवस्थांचे अतिशय सुंदर वर्णन..
कविता आवडली!!
12 May 2017 - 5:21 am | सत्यजित...
मनाची किती हाय! स्थित्यंतरे...
व्वाह्...क्या बात है! अतिशय सुरेख,ओघवती कविता!
खूप-खूप आवडली!