गजानन
निसर्ग बरसला
सुखाचा पाऊस,
आनंदाचा कंद
घरी आला.
भक्तीचा उत्सव
आनंदले रोम
गणपतीचा सण
आला आला.
सुखकर्ता आला
विघ्नहर्ता आला,
आयुष्याचा कर्ता
घरी आला.
वर्षभर ज्याची
पाहतो मी वाट,
तो दु:खहर्ता
घरी आला.
फुलला पारिजात
उंचबळे सुवास,
सुगंधाचा दाता
घरी आला.
विद्येचा ईश्वर
ज्ञानाचा दाता
बुद्धीचा विधाता
घरी आला.
--- अभय बापट