माणूस आणि पुस्तक
माणसं पुस्तकांसारखी असतात. कितीही वेळा भेटा, जवळ ठेवा, परंतु एकदा त्यांच्याशी संवाद सुरू झाला की कुणाचं कोणतं नवं रुप उलगडेल हे नाही सांगता येत. पुस्तके अशीच तर असतात. एक पुस्तक दुसऱ्यांदा हातात घेणे ही तशी दुर्मिळ गोष्ट. पण ज्यांनी असं केलंय त्यांना हे भावेल की, कधी कधी आधी वाचलेलं पुस्तक 'ते' हे नव्हतंच की काय असं वाटावं इथपर्यंत त्या नवेपणाची प्रचिती जाऊन पोहोचते. उरलेल्यांनी माणसांच्या बाबतीत मात्र हे शंभर टक्के अनुभवलं असेल. अगदी जवळचं उदाहरण घेऊ- आई. तुमच्यापैकी किती जण 'मला माझी आई पूर्ण कळाली' असा छातीठोकपणे दावा करु शकतील? अगदी बोटावर मोजण्याइतके.