पचनसंस्थेतील वायूनिर्मिती

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
3 Jan 2022 - 9:06 am

सर्व सभासदांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! सर्वांना उत्तम आरोग्य लाभो.
………………………………………………………………………………….

अन्न ही आपली जगण्यासाठीची प्राथमिक गरज. आपण जे अन्न खातो ते जसेच्या तसे शरीर पोषणासाठी वापरता येत नाही. प्रथम त्याचे पचन करून ते सुलभ स्वरूपात आणावे लागते, जेणेकरून ते पेशींपर्यंत पोचते. त्या महत्त्वाच्या कामासाठी आपली पचनसंस्था कार्यरत असते. त्या संस्थेचे प्रमुख भाग म्हणजे तोंड, अन्ननलिका, जठर, लहान आणि मोठी आतडी. आपल्या खाण्याच्या क्रियेबरोबर काही प्रमाणात हवा सुद्धा पोटात जाते. तसेच अन्नपचनाच्या दीर्घ प्रक्रियेत आतड्यांमध्ये काही वायू तयार होतात. साधारणपणे प्रौढांच्या पचनसंस्थेत रोज ७०० मिली. वायू तयार होतो आणि कोणत्याही वेळेस त्यातील सुमारे १०० ते २०० मिलिलिटर वायू तिथे अस्तित्वात असतो. वायूच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार तो फार साठून न राहता शरीराबाहेर पडतो. त्याचे बाहेर पडण्याचे दोन मार्ग म्हणजे तोंड आणि गुदद्वार. अशाप्रकारे शरीरातून जे वायू उत्सर्जन होते ते मुळातून समजून घेण्यासाठी हा मर्यादित लेख.

पोटातील वायूनिर्मितीची कारणे
:
पचनसंस्थेत वायू तयार होण्याचे दोन स्त्रोत असे आहेत:
१. तोंडातून जठरात गिळली गेलेली हवा आणि
२. मोठ्या आतड्यांमध्ये अन्नपचनपदार्थांवर सूक्ष्मजंतूंच्या झालेल्या प्रक्रियेतून निर्माण होणारे वायू.

वरील पहिल्या प्रकारे जी हवा जठरात जाते तो बाहेर टाकण्याचा प्रमुख मार्ग म्हणजेच ढेकर देणे. याउलट आतड्यांमध्ये तयार झालेले वायू बाहेर टाकण्याचा नैसर्गिक मार्ग म्हणजे पाद सुटणे.
आता या दोन प्रक्रियांविषयी स्वतंत्रपणे सविस्तर समजून घेऊ.

ढेकरनिर्मिती
आपण तोंड उघडले की काही प्रमाणात हवा आत शिरतेच. पण ती जर मोठ्या प्रमाणात ‘गिळली’ गेली तर ती जठरात जाऊन बसते. असे होण्यासाठी खालील घटक कारणीभूत ठरतात :
१. भरभर खाणे व पिणे
२. च्युईंगम चघळणे
३. धूम्रपान
४. फसफसणाऱ्या शीतपेयांचे सेवन (बिअर, इ.)
यातील १ ते ३ मध्ये ढेकर आली असता त्यातून मुख्यत्वे नायट्रोजन व ऑक्सिजन बाहेर पडतात. पण चौथ्या कारणाचे बाबतीत बाहेर पडणारा मुख्य वायू हा कार्बन-डाय-ऑक्‍साईड असतो. गिळलेल्या हवेपैकी बरीचशी हवा ढेकरेच्या स्वरूपात बाहेर निघून जाते. परंतु थोड्या प्रमाणात जठरातील ती हवा पुढे आतड्यांमध्ये सरकते.

ok

पादनिर्मिती
जेवणानंतर जठर विस्तारते आणि लहान आतडी उत्तेजित होतात. त्यामुळे जठरात उरलेला वायू पुढे सरकतो. लहान आतड्यात अन्नाचे पचन व शोषण होते. परंतु अन्नातील अर्धवट किंवा न पचलेले घटक पुढे मोठ्या आतड्यात शिरतात. इथे अनेक उपयुक्त सूक्ष्मजंतूंचे वास्तव्य असते. या जंतूंच्या एन्झाइम्सची या अन्नघटकांवर रासायनिक प्रक्रिया होते. त्यातून काही प्रकारचे वायू तयार होतात. त्यांमध्ये मुख्यत्वे हायड्रोजन, कार्बन डाय-ऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड आणि मिथेन या वायूंचा समावेश होतो. हायड्रोजन सल्फाइड व अन्य काही सल्फरयुक्त पदार्थांमुळे या वायुस दुर्गंधी येते.

इथले काही सूक्ष्मजंतू हायड्रोजन व कार्बन-डाय ऑक्‍साईड हे वायू वापरुन टाकतात. त्यामुळे वायूसाठा काहीसा कमी होतो. या सर्व दीर्घ प्रक्रियेनंतर जो काही वायू उरतो तो सगळा गुदद्वारामार्गे पादरूपात बाहेर पडतो. या वायूचे दर 24 तासातले प्रमाण हे जेवणातील अन्नघटकांच्या प्रकारावर अवलंबून असते. निरोगी अवस्थेत ते साधारणपणे 200 ते 700 मिलिलिटर या दरम्यान राहते. इतका वायू बाहेर पडण्यासाठी 24 तासात सुमारे 14 ते 18 वेळेस पाद सोडला जातो.

आतड्यातील वायूनिर्मितीचे प्रमाण अन्नघटकांच्या प्रकारावर अवलंबून असते. असे अन्नघटक आणि त्यातील विशिष्ट रासायनिक पदार्थ यांचा आता विचार करू. समतोल आहारात पोळी/भाकरी, भात, भाज्या, डाळी, उसळी, तेल, दूध, तूप, अंडी आणि मांसाहार यांचा समावेश असतो. या सगळ्यामधून आपल्याला मुख्यत्वे कर्बोदके, मेद आणि प्रथिने ही मूलभूत पोषणद्रव्ये मिळतात. यातील काही ठराविक प्रकारच्या द्रव्यांपासून अधिक वायूनिर्मिती होते. त्याची काही उदाहरणे आता पाहू.

अधिक वायूनिर्मितीस उत्तेजन देणारे विविध अन्नपदार्थ आणि त्यातील संबंधित रसायने अशी आहेत :
१. बटाटा, मका व गहू : यातील कर्बोदके (Starches) ‘जड’ प्रकारची असतात.

२. कडधान्ये (चवळी, वाटाणा इत्यादी) : यात stachyose व raffinose ही जड कर्बोदके असतात. कडधान्यांना भिजवून मोड आणताना त्या भांड्यातील पहिले पाणी फेकून दिले असता ही बऱ्यापैकी निघून जातात. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये ही साध्या कडधान्यांपेक्षा कमी वायूनिर्मिती करतात.
३. विविध प्रकारचे बीन्स : यातले काही तंतुमय पदार्थ पचत नाहीत. तसेच त्यांच्यात अन्य एक रसायन असते जे आपल्या आतड्यातील कर्बोदक पचविणाऱ्या एंझाइमला विरोध करते.

४. शीतपेयातील गोड पदार्थ : अशा बऱ्याच पेयांत ‘साखरमुक्त’ या नावाखाली अन्य गोड पदार्थ घातलेले असतात उदाहरणार्थ : xylitol, mannitol, sorbitol. ही रसायने आतड्यातील जंतूसाठी मोठे ‘खाद्य’ ठरतात.
५. दूध व दुग्धजन्य पदार्थ : यातील Lactose या शर्करेचे पचन आशियाई वंशात प्रौढपणी बर्‍यापैकी कमी असते.

पचनसंस्थेमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या वायूंचे उत्सर्जन ढेकर व पाद यांच्यातर्फे होते हे आपण पाहिले. कधीकधी जेवणानंतर २-३ ढेकरा येणे हे नैसर्गिक आहे. एक प्रकारे ते पोट भरल्याचेही लक्षण असते. तीच गोष्ट ठराविक प्रमाणातील पादालाही लागू होते. मात्र जेव्हा काही कारणांमुळे पचनसंस्थेत बिघाड होतो तेव्हा वायूनिर्मिती आणि त्यांचे उत्सर्जन खूप प्रमाणात होते. अशी काही महत्त्वाची कारणे किंवा आजार आता थोडक्यात पाहू.

अतिरिक्त ढेकर
दिवसाकाठी वारंवार ढेकर येणे हे खालील आजारांचे/ बिघाडांचे लक्षण असू शकते :
१. जठरदाह किंवा पेप्टिक अल्सर : यामध्ये ढेकरांच्या जोडीने मळमळ, छातीत जळजळ आणि अपचन ही लक्षणे दिसतात.
२. पित्ताशयाचे आजार
३. काही गोळ्यांचे दुष्परिणाम : यामध्ये मधुमेह उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर दिली जाणारी गोळी metformin हिचा समावेश आहे.

पाद उत्सर्जन समस्या

गुदद्वारातून वायु सुटत राहणे हे नैसर्गिक आहे. काही व्यक्तींमध्ये इतरांच्या तुलनेत वायूनिर्मिती जास्त होते. नक्की किती मर्यादेच्या पुढे अतिरिक्त वायूनिर्मिती म्हणायची याची ठोस व्याख्या नाही. आतड्यांच्या काही आजारांमध्ये वायू उत्सर्जन नीट न झाल्यामुळे संबंधित रुग्णास वारंवार पोट फुगल्याची भावना होत राहते. अशा आजारांमध्ये आतड्यांच्या हालचालींचे बिघाड(IBS), पचनात बिघाड करणारे काही ऑटोइम्युन आजार, दुग्धशर्करेचे अपचन आणि काही जंतुसंसर्ग यांचा समावेश होतो. वैद्यकात वापरल्या जाणाऱ्या काही औषधांमुळे (ibuprofen, statins) सुद्धा अशा वायुसमस्या निर्माण होतात. अशा विविध आजारांमध्ये सुटणाऱ्या पादास बर्‍यापैकी दुर्गंधी असते.

जेव्हा ढेकर अथवा पाद यांचे प्रमाण त्या व्यक्तीस सहन होण्यापलीकडे असेल तेव्हा वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. पचनसंस्थेसंबंधी अन्य जी लक्षणे दिसत असतील त्यानुसार डॉक्टर योग्य त्या तपासण्या सुचवतात. त्यानुसार योग्य ते निदान आणि उपचार करता येतात. संबंधित आजारांवरील विस्तृत विवेचन हे स्वतंत्र विषय असून या लेखाच्या व्याप्तीबाहेरचे आहेत.

सामाजिक संकेत व मनोरंजन
ढेकर व पाद या दोन्ही क्रियांदरम्यान विविध छटांचे आवाज येतात. त्यामुळे त्या लक्षवेधी ठरतात. एखाद्या समूहात त्यांच्या आवाजा/वासानुसार ज्या काही प्रतिक्षिप्त क्रिया उमटतात त्यातून संबंधितास लाजल्यासारखे व नकोसे वाटते. त्यामुळे समूहात असताना या नैसर्गिक क्रियांची ऊर्मी दाबण्याकडे कल राहतो. वेळप्रसंगी त्यात यशस्वी होण्यासाठी बरीच कसरत करावी लागते.

त्यातल्या त्यात ढेकर हे प्रकरण काहीसे समूहमान्य असते. पोटभर जेवणानंतर आलेली ढेकर हे तृप्तीचे लक्षण मानले जाते. लहान मुलांच्या जडणघडणीत या क्रियांच्या आवाजांचा चेष्टा आणि मनोरंजनासाठी भरपूर वापर केला जातो. साहित्यक्षेत्रात या क्रियेला विनोद, म्हणी आणि वाक्प्रचारांमध्ये बर्‍यापैकी स्थान मिळालेले आहे.
समाजात काही जणांनी या क्रियांची भीड आणि संकोच कमी व्हावा यासाठी काही मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केलेले दिसतात. याचे काही मजेशीर किस्से जालावर वाचण्यास उपलब्ध आहेत. अधून-मधून मोठ्यात मोठी ढेकर काढण्याच्या स्पर्धा घेतल्या जाता.त त्यात त्या आवाजाची तीव्रता उपकरणाद्वारे मोजली जाते. आतापर्यंत अशा मोठ्या आवाजाच्या तीव्रतेचा जागतिक विक्रम ११० डेसिबल या तीव्रतेचा असून त्याची गिनीज बुकात नोंद झालेली आहे !

आणि हे एक भलतेच.... 😉

2019 मध्ये सुरतमध्ये मोठ्याने पादण्याची स्पर्धा आयोजित केली होती. त्यासाठी आधी ६० जणांनी नाव नोंदवले होते. परंतु आयत्या वेळेस अनेकांनी लाजून माघार घेतल्याने शेवटी फक्त तीन स्पर्धक उरले ! एकंदरीत ही स्पर्धा म्हणजे फुसका बार निघाली. तरीदेखील संबंधित संयोजक आशावादी असून भविष्यात त्यांचा अशा स्पर्धा पुन्हा घेण्याचा मानस आहे.

आपल्या पचनसंस्थेत दररोज वायूनिर्मिती होते. एका प्रमाणाबाहेर तो वायू साठू लागला की त्याचे ढेकर व पाद अशा दोन्ही प्रकारे उत्सर्जन होते. त्यातून आपल्याला मोकळेपणाची भावना येते. अशा या दोन प्रक्रियांविषयी काही मूलभूत माहिती इथे लिहिली. समाजात या नैसर्गिक क्रियांबद्दल चारचौघात बोलणे हे काहीसे निषिद्ध मानले जाते. परंतु त्याच बरोबर या क्रियांचा उपयोग करमणूक आणि मनोरंजनासाठीही काही क्षेत्रात केलेला आढळतो.

नेहमीप्रमाणेच उत्साही चर्चेचे स्वागत आहे.
......................................................................................................................................................................

आरोग्यलेख

प्रतिक्रिया

आंद्रे वडापाव's picture

3 Jan 2022 - 9:46 am | आंद्रे वडापाव

लेख छानच !

पोटात वायु निर्माण होणे आणि डोकेदुखी यांचा परस्पर संबंध असु शकतो का ?

पोटात ऍसिडिटी > पोटात गॅस होणे > डोकेदुखी ?? असंही असते का ?

पोटात पॉसिटीव्ह प्रेशर प्रमाणेच , निगेटिव्ह प्रेशर ( सरासरी पेक्षा कमी गॅस असणे ) समस्या असू शकते का ?

कुमार१'s picture

3 Jan 2022 - 9:55 am | कुमार१

पोटात ऍसिडिटी > पोटात गॅस होणे > डोकेदुखी ??

ऍसिडिटी > पोटात गॅस होणे हे साधारण निगडीत असते. त्याला dyspepsia म्हणतात.
त्यातून होणारी डोकेदुखी व्यक्तीसापेक्ष आहे. काहींना होते.

कुमार१'s picture

3 Jan 2022 - 10:05 am | कुमार१

आतड्यांमध्ये निर्माण होणाऱ्या वायूचे सरासरी प्रमाण जरी 700ml असले तरी हे खूप व्यक्ती आणि आहारसापेक्ष आहे. १०००ml पर्यंत सुद्धा निर्मिती होऊ शकते. तसेच किती प्रमाणावर त्याला ‘जास्त’ म्हणायचे याबाबत बिलकुल एकवाक्यता नाही.

तसेच दैनंदिन जीवनात वायू प्रमाणाची व्यक्तिगणिक मोजणी करणे शक्य नसते. मोजणी ही केवळ शास्त्रीय प्रयोगांदरम्यान स्वयंसेवकांवर केली जाते.
वायुनिर्मिती ‘कमी’ होत/वाटत असेल, तर माझ्या मते ती काही आरोग्य समस्या नाही.

अक्षय देपोलकर's picture

3 Jan 2022 - 10:31 am | अक्षय देपोलकर

माहिती चांगली दिलेय...

पोटात वायू तयार होऊन छातीत दुखणे वगैरे शक्यता असतात का??

कुमार१'s picture

3 Jan 2022 - 11:22 am | कुमार१

जर वायू साठल्याने जठर प्रमाणाबाहेर फुगले तर त्याचा दाब श्वासपटलावर पडू शकतो.
त्यामुळे संबंधित व्यक्तीस श्वास कोंडल्याची भावना होऊ शकते.

अक्षय देपोलकर's picture

3 Jan 2022 - 11:26 am | अक्षय देपोलकर

शंका निरसन केल्याबद्दल

योगी९००'s picture

3 Jan 2022 - 10:44 am | योगी९००

छान माहिती... आवाज करून गॅस सोडला तर वास का येत नाही ?

परदेशात काही ठिकाणी ढेकर देणे हे कमी प्रतिष्ठेचे मानले जाते पण पादणे चालते. चालते म्हणजे त्याबाबत त्या लोकांना काही वाटत नाही किंवा संकोच बाळगत नाहीत. पण तोच माणूस ढेकर दिली तर कावराबावरा होतो किंवा शक्यतो ढेकर येऊ नये असे प्रयत्न करतो. आपल्याकडे मात्र जेवताना काही जण मोठ्याने ढेकर देतात व त्यांना त्याचे कौतूक वाटते.

कुमार१'s picture

3 Jan 2022 - 12:27 pm | कुमार१

आवाज करून गॅस सोडला तर वास का येत नाही ?

पादाचा आवाज आणि वास यांचे प्रमाण एकमेकांशी व्यस्त असते असा एक समज आहे. परंतु तो दरवेळेस खरा नाही.

या दोन्ही गोष्टींचा कार्यकारणभाव समजून घेऊ :
१. वास : जेव्हा त्या वायूमध्ये हायड्रोजन सल्फाइड आणि अन्य सल्फरयुक्त संयुगांचे प्रमाण जास्त असते त्यानुसार वासाची तीव्रता वाढते.

२. आवाज : हा गुदद्वाराचे भागात असलेल्या एका नियंत्रक स्नायूच्या (sphincter) कार्यावर अवलंबून असतो. त्यानुसार वायू सुटण्याची गति आणि परिणामी आवाज ठरतो.

कर्नलतपस्वी's picture

3 Jan 2022 - 1:45 pm | कर्नलतपस्वी

पिडें पिडें मते भिन्नः
पिडें पिडें अते(आतडी) भिन्नः
म्हणून.....

चार मैल चालणे
तीन ठाव भरणे
सुखेनैव घोरणे
मध्यरात्री

चाल चाल करी
उदरी जल भरी
नलगे वटी सुखसारक
थांबले रडणे उदराचे

लवकर उठणे
चालत रहाणे
थांबेल वाढणे
उदराचे

चालत रहाणे
नाम हरी जपणे
टळेल भरणे
हाँस्पिटल चे बिल
सुरक्षित होईल
तन मन धन

बरेच वेळा पोटात गँस होतो छातीत दुखते परीणामी डाँक्टरचे बील, छातीत दुखते पोटात गँस झाला आसेल म्हणून कानाडोळा केला तर ते जी़वावर बेतू शकते. सामान्य माणसानी काय करावे?
आजीच्या बटव्यातील हवाबाण हरडे,हिगंगुळ गोळी आशा गँस निसाःरणा करता उपयोगी पडतात.
छान सखोल माहिती बद्दल धन्यवाद याच बरोबर गँस होण्याचे मुख्य कारण बद्धकोष्ठ यावर प्रकाश टाकल्यास चांगले होईल म्हणजे ibs टाळता येऊ शकेल का नाम तिसरा

कुमार१'s picture

3 Jan 2022 - 2:03 pm | कुमार१

छान काव्यमय प्र.

बद्धकोष्ठता हे एक मोठे प्रकरण आहे. त्यामध्ये दोन प्रक्रियांचा अंतर्भाव असू शकतो:
१. शौच कडक असणे
२. शौच उत्सर्जन प्रक्रियेतील बिघाड : हा आतड्यांच्या कार्यक्षमतेशी निगडीत असतो.

त्याची आहाराशी संबंधित प्रमुख कारणे अशी आहेत:
जेवणात तंतुमय पदार्थ आणि पाणी पिण्याचे प्रमाण कमी असणे, चहा-कॉफीचे अतिरिक्त सेवन.

IBS हे एक स्वतंत्र प्रकरण असून भविष्यात त्याबद्दल विचार करू.

प्रकाश घाटपांडे's picture

3 Jan 2022 - 5:47 pm | प्रकाश घाटपांडे

IBS हे एक स्वतंत्र प्रकरण असून भविष्यात त्याबद्दल विचार करू.

जरुर लेख सवडीने लिहा.मी त्याचा बळी आहे. त्यावर मतभिन्नता आहेत तसेच त्याचे वेगवेगळे टाईप असल्याने रुग्णाचा गोंधळ होतो.

सिरुसेरि's picture

3 Jan 2022 - 2:19 pm | सिरुसेरि

माहितीपुर्ण लेख

जेवणातले / खाण्यातले अती शिजवलेले पदार्थ वाढले आहेत.

कुमार१'s picture

3 Jan 2022 - 6:19 pm | कुमार१

जेवणातले / खाण्यातले अती शिजवलेले पदार्थ वाढले आहेत.

>>>
अति शिजवलेल्या पदार्थांचा आणि वायूनिर्मितीचा तसा संबंध नाही. त्यांच्यामुळे अन्य काही चयापचयाचे आजार (मधुमेह वगैरे) त वाढले आहेत ते बरोबर.

कच्चे आणि शिजवलेलेचा वायूनिर्मितीशी संबंध कडधान्यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होईल :
१. कच्ची असल्यास पचायला सर्वात जड
२. मोड आणून कच्ची खाल्ल्यास वरच्यापेक्षा बरी
३. मोड आणून शिजवून खाल्ल्यास पचायला सोपी.

वरील क्रमाने वायूनिर्मिती कमी होत जाते

कंजूस's picture

3 Jan 2022 - 7:57 pm | कंजूस

कारण ती पचत नाहीत हा अनुभव आहे.

सक्रिय कोळश्याच्या (activated charcoal) गोळ्या खालल्याने पादवायु कमी होतो.

सुबोध खरे's picture

3 Jan 2022 - 8:00 pm | सुबोध खरे

१०० टक्के लोकांना पादवायु सुटतो.

कारण शरीर १०० % वात शोषून घेत नाही. थोडा फार तरी वायू गुदद्वारामार्गे बाहेर पडतोच.

त्याबद्दल संकोच वाटण्याचे कारण नाही.

लठ्ठ लोकांच्या गुदद्वाराजवळ अतिरिक्त चरबी असल्याने वायू बाहेर पडण्याचा मार्ग निमुळता असल्याने त्याचा आवाज जास्त येतो.

वरिष्ठ नागरिकांमध्ये वाताचे प्रमाण जास्त का?

वरील स्थिती (गुदद्वाराजवळ अतिरिक्त चरबी) वय वाढल्यावार झाल्याने वरिष्ठ नागरिकांमध्ये आवाज होऊन येणाऱ्या वाताचे प्रमाण जास्त असते.

याशिवाय वय वाढल्याने शरीरात पाचकरस कमी तयार होतात त्यामुळे मोठ्या आकाराच्या द्विदल धान्यात असलेल्या डाय सॅकराईडचे पचन होत नाही आणि हे डाय सॅकराईड न पचता मोठ्या आतड्यात पोचतात, तेथे त्यावर जिवाणूंची प्रक्रिया होऊन अतिरिक्त वात तयार होतो.

( म्हणून पादऱ्याला पावट्याचे निमित्त हि म्हण आलेली आहे)

याशिवाय बऱ्याचशा वरिष्ठ नागरिकांच्या दातांच्या तक्रारी असतात त्यामुळे ते घास नीट न चावता गिळतात. अशा मोठ्या घासांच्या मध्य भागी इगोइन्दरच कमी असलेले पाचकरस पोचत नाहीत मग असे न पचलेले अन्न मोठ्या आतड्यात पोचल्यावर त्यावर जिवाणूंची प्रक्रिया होऊन अतिरिक्त वात तयार होतो.

तेंव्हा आपल्याला अतिरिक्त वाताची तक्रार असेल तर १) आपल्या गरजे पेक्षा जास्त न जेवणे, मोठी द्विदल धान्ये कमी/ न खाणे, जेवताना घास नीट चावूनच खाणे आणि जेवण झाल्यावर शतपावली करणे आणि रोज सकाळ संध्याकाळ चालणे या उपायांनी आतड्याचे चलनवलन जास्त होऊन वात बाहेर पडतो आणि पोट फुगण्यामुळे होणारा त्रास बराच कमी होतो.

यातील काहीच करायचे नसेल तर आपल्या वात सुटण्याचा न्यूनगंड न बाळगणे.

मटकी आणि पावटा ही दोन कडधान्य बरीच वातकारक आहेत. काही वर्षांपूर्वी मी खडीवाले वैद्य यांचा एक लेख वाचला होता. त्यात त्यांनी असे म्हटले होते की, मटकी हे मुळात श्रमजीवीचे खाद्य आहे; बुद्धीजीवीने त्याच्या नादी न लागलेले बरे !

या दोन्ही कडधान्यांचा हा गुणधर्म एका पारंपरिक काव्यात कसा गुंफला आहे ते पहा :

अटकुबाई मटकुबाई
पावट्याचं खाणं
अर्धी रात्र झाली नाही
ढुंगण गाई गाणं

मदनबाण's picture

3 Jan 2022 - 10:00 pm | मदनबाण

परंतु त्याच बरोबर या क्रियांचा उपयोग करमणूक आणि मनोरंजनासाठीही काही क्षेत्रात केलेला आढळतो.

धाग्याचे विषय आणि मंथन वाचल्यावर पहिल्यांदा डोक्यात थ्री इडियट्स मधील साइलेंसर [ चतुर रामालिंगम ] त्याची पादण्याची ताकद संस्कृत मध्ये खालील प्रमाणे सांगतो ते आठवले ! :)))

उत्तमम दधददात पादम,
मध्यम पादम थुचुक थुचुक,
घनिष्ठः थुड़थुडी पादम,
सुरसुरी प्राण घातकम...

म्याव म्याव सेना त्यांच्या कुंथनपत्रातुन पादरे पावटे या विशेष वचनाचा वापर करुन स्वतःच्या आणि इतरांच्या राजकिय पाद निर्मीतीवर टिप्पणी करत असते.
आमच्या कॉलनीत... च्याऊ म्याऊ खवा खाऊ, आठ आण्याचे चणे खाऊ ,पादत पादत घरी जाऊ ! असे एक गीत एक लहान पोट्टा गातं असे !
युट्युबवर पादण्यावर अनेक प्रॅन्क व्हिडियो आहेत... :)))
दुसर्‍याच्या पादण्याच्या अत्यंत दुर्गंधी वायु ने श्वास घेण्यास शक्य होत नसेल तर नाकातले केस जळले असा शब्दप्रयोग करतात... भयानक गर्दीच्या वेळी कसारा लोकल मध्ये असे वासाचे अणुबॉब्म पडतात... डब्यातले लोक मग, साले लोग क्या ख्या के आते है समझता नही, पेहले इधर पंखे का हवा लगता नय और ये *सडी के लोग यहा ट्रेन के डिब्बे में पादने चले आते है. अशी आणि अनेक वाक्य लोक श्वास घेण्याच्या प्रयत्नात रागा रागात बोलताना तुम्हाला ऐकायला सहज मिळु शकतील. :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pucho Na Yaar Kya Hua... :- Zamaane Ko Dikhana Hai

एक गोष्ट सांगायची राहुनच गेली, लोकसत्ता मध्ये तैमुर ने शी केली टाईप बातम्या येतच असतात... अशीच एक बातमी !
टीव्ही स्टारने ‘पाद’ विकून एका आठवड्यात कमावले ३८ लाख रुपये; प्रक्रियेबद्दल स्वत: व्हिडिओ पोस्ट करून सांगितलं

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pucho Na Yaar Kya Hua... :- Zamaane Ko Dikhana Hai

Trump's picture

3 Jan 2022 - 10:58 pm | Trump

धन्यवाद, ह्या अनमोल माहितीबद्दल. जग खुप गेले आहे. ;(

कुमार१'s picture

5 Jan 2022 - 2:38 pm | कुमार१

स्वतःची तब्येत बिघडणार नाही असे काहीतरी उद्योगधंदे करावेत !
तिचे उत्पादन विकत घेणारे पण भारीच !

टीपीके's picture

3 Jan 2022 - 11:11 pm | टीपीके

उत्तमो ढमढामो पादो
टारा टुरी च मध्यामा
फुस्कुली नामे राणी
तस्य घाण न जायते

नगरी's picture

4 Jan 2022 - 4:06 am | नगरी

थोडक्यात पण छान , पण IBS चा full form काय?

कुमार१'s picture

4 Jan 2022 - 8:33 am | कुमार१

IBS चा full form Irritable bowel syndrome

याबाबत एकदा डॉक्टर सांगत होते हा सिंन्ड्रोम अतिविचार, मनातील भीतीशी निगडित आहे.

Nitin Palkar's picture

5 Jan 2022 - 7:19 pm | Nitin Palkar

अनेक शारीरिक आजारांचे मूळ 'मानसिक अस्वास्थ्य' हे असू शकते, असे आधुनिक संशोधनाने सिद्ध झाले आहे.

कंजूस's picture

4 Jan 2022 - 5:48 am | कंजूस

सभेमध्ये जायला कोण घाबरतो?
-
पंडित नसलेला,
आणि
पादणारा पंडित.

पाद पुराणाचे विविधांगी किस्से ऐकून मजा वाटली.
अगदी आपल्या आजोबा पणजोबांच्या काळापासून हे एक मजेदार कोडे मुलांना घालायचे :

अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर
मध्ये बसला ससा
हात नाही पाय नाही
फटकन उडतो कसा !

ओळखा काय ??? अर्थात **

Bhakti's picture

4 Jan 2022 - 9:52 am | Bhakti

मटकी आणि पावटा ही दोन कडधान्य बरीच वातकारक आहेत.
पावटा बाबत माहिती होते.मटकीबाबत आताच समजले.मग ती शिजवूनच खावी का?आहारात मटकी,मुगाचे प्रमाण जास्त आहे.मूग याला अपवाद आहे का?

कुमार१'s picture

4 Jan 2022 - 10:19 am | कुमार१

मूग याला अपवाद आहे का?

होय,
मटकीच्या तुलनेत मूग बराच सौम्य प्रकार आहे.
एकंदरीत मोड आणून खाल्लेले केव्हाही चांगले.
त्यातून ब जीवनसत्त्वांचा स्त्रोतही निर्माण होतो.

कुमार१'s picture

4 Jan 2022 - 10:23 am | कुमार१

एकंदरीत प्रथिनयुक्त पदार्थ शिजवून खाल्लेले केव्हाही चांगले.

प्रथिने गुंतागुंतीची असतात. त्यांना उष्णता दिली की त्यांचे सुलभीकरण (denaturation) होते. अशा सुलभीकरण झालेल्या घटकांवर आपली पाचक एंजाइम्स सहज क्रिया करतात.

तर्कवादी's picture

4 Jan 2022 - 1:40 pm | तर्कवादी

मूग , मटकी यांपेक्षाही माझा आवडता कडधान्य मसूर आहे. पोषण मुल्याबाबत माहित नाही. पण अगदी काही तासांत छान भिजतो मग उसळ करुन चपातीसोबत खाता येते किंवा भिजलेला मसूर तवा किंवा मायक्रोवेव मधे थोडे तेल, मीठ व लाल तिखट टाकून भाजून कुरकुरीत केले तर चवीला मस्त लागतो शिवाय वाताचा त्रास वगैरे काही अनुभव नाही.
डॉक्टर, मसूरच्या पोषण मुल्याबंदल कृपया मार्गदर्शन करु शकाल काय ?

तर्कवादी's picture

4 Jan 2022 - 1:43 pm | तर्कवादी

मूग , मटकी यांपेक्षाही माझा आवडता कडधान्य मसूर आहे. पोषण मुल्याबाबत माहित नाही. पण अगदी काही तासांत छान भिजतो मग उसळ करुन चपातीसोबत खाता येते किंवा भिजलेला मसूर तवा किंवा मायक्रोवेव मधे थोडे तेल, मीठ व लाल तिखट टाकून भाजून कुरकुरीत केले तर चवीला मस्त लागतो शिवाय वाताचा त्रास वगैरे काही अनुभव नाही.
डॉक्टर, मसूरच्या पोषण मुल्याबंदल कृपया मार्गदर्शन करु शकाल काय ?

कुमार१'s picture

4 Jan 2022 - 2:11 pm | कुमार१

मसूर हे उत्तम पोषण खाद्य आहे
त्यात चांगल्यापैकी प्रथिने, पोटॅशियम, लोह, मॅंगेनीज आणि तंतुमय पदार्थ आहेत.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद डॉक्टर.

आयुर्वेद काय सांगतो ते माहिती नाही.
परंतु मटकी आणि मूग इ कडधान्ये पचण्यासाठी हलकी असून त्यात २३-२४ टक्के उत्तम दर्जाची प्रथिने असतात.

त्यात stachyose आणि raffinose हि वात निर्माण करणारी oligosacchrides पावटा वाल राजमा चवळी सारख्या मोठ्या कडधान्यापेक्षा कितीतरी कमी असतात.

यामुळेच मटकी किंवा मूग यामुळे वात होतो यात तथ्य नाही

मटकी किंवा मूग भिजवून त्यांना मोड आणल्यास त्यातील stachyose आणि raffinose हि वात निर्माण करणारी oligosacchrides जवळ जवळ नगण्य होतात.

त्यामुळे हि कडधान्ये वरिष्ठ नागरिक आणि आजारी माणसांना देण्यास नक्कीच उत्तम आहेत.

मटकी या कडधान्याचे बाजरी सारखे कोरडवाहू प्रदेशात उत्पादन होऊ शकते परंतु बाजरी सारखेच श्रमिकांचे अन्न असल्याने त्याला प्रतिष्ठा मिळाली नाही. धनगर लोकांचे अन्न म्हणजे बाजरी ची भाकरी आणि मटकी मुगाचे कोरड्यास हे खरं तर अतिशय पौष्टिक आहे.

मिसळीसारख्या श्रमिकांच्या अन्नाचा एक घटक असलेली मटकी यामुळेच प्रतिष्ठा पावली नाही.

टर्मीनेटर's picture

4 Jan 2022 - 3:17 pm | टर्मीनेटर

मटकी आणि मूग ही कडधान्ये माझ्या विशेष आवडीची.
मटकीची ओली (रस्सा वाली) आणि परतून एकदम कडक (क्रिस्पी) अशा दोन्ही उसळी मला आवडतात. पण मिसळीत मात्र मटकी (तिच्या अंगभूत थोड्याशा गोडसर चवीमुळे) आवडत नाही, तिथे वाटाणाच पाहिजे 😀
मुगाची आमटी आवडते आणि आई भरपूर लसूण आणि आमसूल (कोकम) घालून बनवते, त्यामागे कदाचित गॅस आणि ऍसिडिटी होऊ नये हे कारण असावे.
पण कुठलेही कडधान्य (किंवा सर्वसामान्यपणे पचनास जड समजले जाणारे काहीही) खाल्ले तरी पचनाचा त्रास मला तरी सहसा जाणवत नाही. अर्थात ह्या ना त्या कारणाने रोज एखाद दोन पेग किंवा बियरच्या रूपात काही प्रमाणात अल्कोहोल पोटात जाते हे कारण त्यामागे असावे का?
(चार पाच दिवसात जर अल्प प्रमाणात का होईना मद्यपान केले नसल्यास मात्र मला थोडाफार बद्धकोष्ठाचा त्रास होत असल्याचा अनुभव आहे त्यासाठी विचारतोय.)

कुमार१'s picture

4 Jan 2022 - 3:24 pm | कुमार१

काही प्रमाणात अल्कोहोल पोटात जाते हे कारण त्यामागे असावे का?

नाही, त्याचा काही संबंध नाही.
वायूनिर्मिती ही बऱ्यापैकी व्यक्तीसापेक्ष बाब आहे. तसेच प्रत्येकाच्या शरीरातील पाचक द्रव्यांची अनुकूलता हाही एक भाग असतो.

वास्तविक अतिरिक्त मद्यपान हे बद्धकोष्ठ होण्याचे एक कारण आहे.

टर्मीनेटर's picture

4 Jan 2022 - 3:43 pm | टर्मीनेटर

वास्तविक अतिरिक्त मद्यपान हे बद्धकोष्ठ होण्याचे एक कारण आहे.

अच्छा! म्हणजे थोड्याफार प्रमाणात केल्यास ते उपयुक्त ठरत असावे असा (सोयीस्कर) निष्कर्ष काढण्यासाठी वाव आहे तर मला 😀

जोक अपार्ट, पण हा माझा स्वानुभव आहे त्यामुळे

तसेच प्रत्येकाच्या शरीरातील पाचक द्रव्यांची अनुकूलता हाही एक भाग असतो.

हेच बरोबर असावे.
धन्यवाद.

सुबोध खरे's picture

4 Jan 2022 - 10:30 am | सुबोध खरे

The level of sucrose, raffinose and stachyose in different cultivars of mung beans was found to be in the range from 0.84 to 1.71%, 0.62 to 1.05% and 1.75 to 3.57% respectively. The total level of sucrose, raffinose and stachyose was ranged between 3.48 to 5.37%. The processing methods like soaking and germination reduced oligosaccharide content considerably. Soaking for 12 hr led to the decrease in sucrose by 29 to 70%, raffinose by 19 to 74% and stachyose by 28 to 57% respectively. Compared with soaking, soaking followed germination appeared to be more efficient on the reduction of oligosaccharide content. Germination for 48 hr decreased raffinose and stachyose contents considerably, while sucrose increased by 25-52%.
https://www.semanticscholar.org/paper/RAFFINOSE%2C-STACHYOSE-AND-SUCROSE...

कुमार१'s picture

4 Jan 2022 - 10:54 am | कुमार१

मुगाबाबत सहमत आहे. परंतु मटकी त्यापेक्षा पचायला कठीण आहे हा व्यक्तिगत आणि बऱ्याच कुटुंबांचा अनुभव आहे.
काही संशोधने पाहीली असता अशी माहिती मिळाली :
मटकी पचनायोग्य होण्यासाठी ती ६० तास भिजवून ठेवा असे दिलेले दिसते. मात्र दैनंदिन जीवनात प्रत्येकाला इतके करणे जमेलच असे नाही.
मटकीच्या पचनाचे दोन भाग आहेत:
१. जड कर्बोदके : ही भिजवून पाणी फेकून दिल्याने जातात हे बरोबर.

२. प्रथिने : मटकीत निसर्गता एक असे द्रव्य आहे जे आपल्या स्वादुपिंडातील एका एंजाइमला विरोध करते. ते नाहीसे होण्यासाठी मटकीला पुरेशी उष्णता देणे आवश्यक असते. परंतु तरीही ते पूर्णपणे जात नाही.

माहितीसाठी धन्यवाद!
रच्याकने माझा महाविद्यालयात प्रोजेक्ट Biochemical studies of germinating Cowpea असा होता.तेव्हा इतका नीट नव्हता झाला.पण germination प्रक्रिया अभ्यासासाठी चांगली आहे.

माहितीसाठी धन्यवाद!
रच्याकने माझा महाविद्यालयात प्रोजेक्ट Biochemical studies of germinating Cowpea असा होता.तेव्हा इतका नीट नव्हता झाला.पण germination प्रक्रिया अभ्यासासाठी चांगली आहे.

कुमार१'s picture

4 Jan 2022 - 7:24 pm | कुमार१

germination प्रक्रिया अभ्यासासाठी चांगली आहे.

>>
लाख मोलाचे बोललात ! वनस्पतींची नवनिर्माणक्षमता म्हणजे काय ते त्यातून समजते.
आपल्याला जसा मूल जन्माला घातल्याचा आनंद मिळतो तसा वनस्पतींनाही तो मिळत असावा :))

मुगांना सणसणीत मोड आणणे हे माझे आवडीचे काम आहे. असे मोड आणले की त्यातले वाटीभर मी आमच्या शेजारच्या बाईंना देतो. त्या ते बघूनच इतक्या खूष होतात की काही विचारू नका.

चवळीला छान मोड आणायला मात्र ती ग्रामीण प्रजातीची लागते. तशी सहसा महानगरांमध्ये मिळत नाही. कर्नाटकात काही ठिकाणी ती फारच सुंदर मिळते. त्याला ते अलसंदी म्हणतात.

तशा मोड आलेल्या अलसंदीची उसळ अप्रतिम लागते.

Bhakti's picture

4 Jan 2022 - 7:35 pm | Bhakti

हो ना भरपूर मोड आणणे ही एक कलाच म्हणावं लागेल.मला तर भटकंतीला थोडे मोड आले तरी उसळ करायची घाई होते.आता ४८-६० तास वाट पाहणार ;)

Bhakti's picture

4 Jan 2022 - 7:36 pm | Bhakti

*भटकंतीला वाचावे

Bhakti's picture

4 Jan 2022 - 7:40 pm | Bhakti

जाऊ दे बाई ,हे autocorrect ना 😂

तुषार काळभोर's picture

4 Jan 2022 - 9:31 pm | तुषार काळभोर

चार वेळा वाचून पण कळेना, भटकंतीला मोड कसे येतात !!

Bhakti's picture

4 Jan 2022 - 10:04 pm | Bhakti

😂
ध चा म तेव्हा आणि आता autocorrect गोंधळ करतो.

तुषार काळभोर's picture

4 Jan 2022 - 10:57 am | तुषार काळभोर

पालेभाज्या जास्त, कडधाने मोड आणून शिजवलेली (मूग कच्चे), मैदा-बेसन-तळलेले पदार्थ अतिशय कमी, जेवल्यावर अर्धा-एक किमी चालणे, एकूण शारिरीक हालचाल चांगली होईल असे जीवनमान याने दोन्ही दिशेने होणारे वायूचे उत्सर्जन खूप कमी होते.
शाळेत असताना कोणी नुसते फुटाणे खाताना दिसला तरी सगळे त्याच्याकडे रागाने बघायचे, कारण थोड्या वेळाने वास येणार आहे, हे नक्की असायचे !

कुमार१'s picture

4 Jan 2022 - 11:49 am | कुमार१

**कोणी नुसते फुटाणे खाताना दिसला तरी सगळे त्याच्याकडे रागाने बघायचे, कारण थोड्या वेळाने वास येणार आहे, हे नक्की असायचे !
>>>
यातील "थोड्या वेळाने" हा शालेय समज म्हणून ठीक आहे. अन्न खाल्ल्यापासून मोठ्या आतड्यात पोहोचेपर्यंत काही तास जावे लागतात आणि तिथे वायूनिर्मिती होते

:))

फुटाणे आणि बत्तासे आणि चणे कुरमुरे घेऊन पतंग उडवायला संध्याकाळी टेकडीवर, माळावर जाणे (फिदिफिदी हसणेही )एवढ्या दोनच करमणुकी होत्या आमच्या लहानपणी. आणि फुटाणे खाणारा सतत फुटाणेच खायचा. त्यामुळे निर्मितीत अडचण आणि टैम ल्याग नसायचा.

विषयच गंभीर नसायचा.

बाकी चणे फुटाण्यांची दुकाने जाऊन तिथे मेडिकलची आली '७५ नंतर. वास काढणारे फुटाणेच गोळ्यांपेक्षा बरे नाहीत का?

टर्मीनेटर's picture

4 Jan 2022 - 2:23 pm | टर्मीनेटर

भारीच आहे लेख 😀
माझी बायको काय वाट्टेल ते रिसर्च पेपर्स वाचत असते. मध्ये असंच काहीसे वाचून तीने सांगितले होते की जोडप्यातील एकाच्या पादण्यातुन जो वायू बाहेर पडतो तो जोडीदाराचे आयुष्य वाढवण्यास कारणीभूत ठरत असतो 😀
आणि गंमत म्हणजे तो रिसर्च पेपर युकेतल्या एका नामांकित युनिव्हर्सीटीने प्रकाशित केला होता!
लोकं संशोधनासाठी काय काय विषय निवडतील आणि वाचणारे काय काय वाचतील ह्याचा काही नेम नाही 😀

हे वैज्ञानिकरीत्या कसे ठरवतात हे जाणून घ्यायचे आहे.

ते जाणून घेण्याची उत्सुकता मलाही आहे 😀

तर्कवादी's picture

4 Jan 2022 - 3:48 pm | तर्कवादी

मला वाटते एकाने वायू सोडल्यावर दुसर्‍याला श्वास रोखून धरावा लागत असल्याने अनायसे प्राणायम होत असावा :)

तार्किकदृष्ट्या हे बरोबर वाटतंय 😀 😀 😀

कुमार१'s picture

4 Jan 2022 - 4:16 pm | कुमार१

**लोकं संशोधनासाठी काय काय विषय निवडतील
>>
धन्य हो,. आयुष्यमान भव !

तर्कवादी's picture

4 Jan 2022 - 4:34 pm | तर्कवादी

म्हणून तर मी 'तर्कवादी' आहे :)

कर्नलतपस्वी's picture

4 Jan 2022 - 4:32 pm | कर्नलतपस्वी

खुदकन हसवल्या बद्द्ल धन्यवाद.

काहिही हं श्री

तर्कवादी's picture

4 Jan 2022 - 4:36 pm | तर्कवादी

योग्य नाव धारण केलयं

धन्यवाद..
खूप दिवस विचार करुन नाव घेतलंय ...

खुदकन हसवल्या बद्द्ल धन्यवाद.

काहिही हं श्री
कोण पादले कसे ठरवायचे
अदा मादा
कोण कोण पादा
दामाजीचा घोडा पादा

चौकस२१२'s picture

4 Jan 2022 - 3:59 pm | चौकस२१२

या सगळ्यात
१) तिखट आणि २) मसाला
तेल कमी घातलं तरी या दोन गोष्टी जास्त असतील तर त्याचा काय परिणाम होतो ?

कुमार१'s picture

4 Jan 2022 - 6:11 pm | कुमार१

तिखट आणि मसाला हे irritant प्रकारचे पदार्थ आहेत. ज्यांना जठराम्लता अधिक्याचा त्रास आहे त्यांच्या बाबतीत तो अशा पदार्थांनी वाढू शकतो. संबंधितांनी या पदार्थांचा अतिरेक टाळावा.
.......
जेव्हा आहारात पचायला जड असणाऱ्या प्रथिनांचे पदार्थ असतात तेव्हा त्याच्या जोडीने माफक प्रमाणात तेल व तूप हे जरूर खावे. त्यामुळे पचनसंस्थेत विविध हॉर्मोन्स स्त्रवून प्रथिनांचे पचन चांगले होते.

जेव्हा आहारात पचायला जड असणाऱ्या प्रथिनांचे पदार्थ असतात तेव्हा त्याच्या जोडीने माफक प्रमाणात तेल व तूप हे जरूर खावे. त्यामुळे पचनसंस्थेत विविध हॉर्मोन्स स्त्रवून प्रथिनांचे पचन चांगले होते.
काहीशा अशाच माहितीतून छ.शिवाजी महाराजांच्या काळात मावळ्यांसाठी मसालेदार प्रथिनयुक्त मिसळ निर्माण झाली, हे किचन कल्लाकार या कार्यक्रमातील सुप्रसिद्ध शेफ ताई यांनी सांगितले आहे. 😃

कुमार१'s picture

4 Jan 2022 - 7:06 pm | कुमार१

किचन कल्लाकार या कार्यक्रमातील

याबद्दल काहीच माहीत नव्हते. धन्यवाद!
रोचक प्रकरण दिसतय

मराठी पदार्थ,इनग्रेडिन्ट याविषयी खुप छान टीप्स देतात त्या ताई (नेमक नाव आठवत नाहीये :))! नक्की पहा.

कुमार१'s picture

4 Jan 2022 - 7:26 pm | कुमार१

टीव्ही का ओटीटीवर ?

टीव्हीवर झी मराठी बुध.गुरू ९.३० आणि zee5 ओटीटीवर .

तर्कवादी's picture

4 Jan 2022 - 7:34 pm | तर्कवादी

काहीशा अशाच माहितीतून छ.शिवाजी महाराजांच्या काळात मावळ्यांसाठी मसालेदार प्रथिनयुक्त मिसळ निर्माण झाली

त्याकाळी फरसाण महाराष्ट्रात उपलब्ध असायचे का ?

नाही सांगितलं याविषयी.

रंगीला रतन's picture

4 Jan 2022 - 7:40 pm | रंगीला रतन

सुरतेवर छापा मारून परत येताना मावळ्यांनी तिथून आणली असेल गोण्या भरून :=)

Bhakti's picture

4 Jan 2022 - 7:43 pm | Bhakti

&#128513

तर्कवादी's picture

4 Jan 2022 - 7:48 pm | तर्कवादी

हो... हे शक्य आहे खरं.. तीच खरी लूट ठरली असेल मग..:)

प्रसाद गोडबोले's picture

4 Jan 2022 - 11:33 pm | प्रसाद गोडबोले

गर्वाने पादा !

हे पहा आमच्या आवडत्या फाऊंडिंग फादरने अर्थात बेंजामिन फ्रंकलिनने लिहिलेला लेख: फार्ट प्राऊडली

https://en.wikipedia.org/wiki/Fart_Proudly

=))))

कुमार१'s picture

5 Jan 2022 - 7:28 am | कुमार१

छान !
तो लेख अभिमानाने वाचण्यात येईल :)

वर फुटाण्यावरून मनोरंजक चर्चा झाली आहे. त्यातील एक मुद्दा घेतो.

डाळींमध्ये बघता हरभरा आणि उडीद डाळी या वायुनिर्मितीच्या बाबतीत शिरोमणी म्हणता येतील. या डाळिंपासून केलेले काही पदार्थ खाताना त्याच्या जोडीने चांगले मेद पदार्थ आपण आहारात घेतो. याची दोन सुंदर उदाहरणे देतो:

१. इडली किंवा मेदुवडा यांच्याबरोबर नारळाची चटणी
२. पुरणपोळी बरोबर तूप किंवा दूध

ह्या दोन्ही उदा.मध्ये आपल्याला जड प्रथिना बरोबर चांगला मेद पदार्थ असा सुरेख संयोग झालेला दिसतो. त्यामुळे पचन सुलभ होते.

इथे मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते.
या प्रकारच्या खाद्य सवयी परंपरेने शतकानुशतके चालू आहेत. याउलट
प्रथिने, मेद हे आधुनिक वैज्ञानिक संशोधन तसे अलीकडील 1-2 शतकामधील आहे.

काही हजार वर्षांपूर्वी जेव्हा आपल्या पूर्वजांनी असे सुरेख खाद्यसंगम आहारात योजिले त्याचे मला कौतुक वाटते. ते अनुभवजन्य पारंपरिक ज्ञान पाहून आपण थक्क होतो.

कंजूस's picture

5 Jan 2022 - 12:24 pm | कंजूस

हा लेख बाजूलाच आहे हो! आणखी तुरी,पावटे,चवळी यांच्याही येणारेत बहुतेक.

Nitin Palkar's picture

5 Jan 2022 - 7:35 pm | Nitin Palkar

पादण्यासारख्या विषयावर एवढा माहितीपूर्ण लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन आणि कौतुकही. लेख नेहमी प्रमाणे अतिशय छान झाला आहे.

चामुंडराय's picture

5 Jan 2022 - 8:06 pm | चामुंडराय

कुमारेक सर, तुमच्या लेखांचे वैद्यकीय आणि इतर विषय नेहमी हटके, वेगळे असतात त्यामुळे सामान्यज्ञानात तर भर पडतेच परंतु त्या बरोबरीने मनोरंजन देखील होते.

सध्या microbiota चा खूप बोलबाला आहे आणि त्याबद्दल नवनवी माहिती उपलब्ध होते आहे. काहींनी तर microbiota ला शरीराचा एक अवयवच समजले जावे असा आग्रह धरला आहे. तुम्ही तुमच्या लेखात उल्लेख केला आहेच परंतु ह्या विषयावर स्वतंत्र लेख लिहावा ही विनंती.

Microbiota चे प्रतिकार शक्ती साठी महत्वाचे योगदान असते असे कळल्यामुळे सध्याच्या वूहानच्या चिनी विषाणूच्या साथी मध्ये ह्या लेखाचा मिपाकरांना खूपच फायदा होईल असे वाटते.

कुमार१'s picture

5 Jan 2022 - 8:57 pm | कुमार१

चर्चेत सहभागी होऊन अभ्यासपूर्ण योगदान देणाऱ्या वरील सर्वांचे मनापासून आभार !

आपल्या दैनंदिन जीवनातील हा महत्त्वाचा विषय बरेच दिवस मनात घोळत होता. अखेर यंदा त्याचा योग आला.

microbiota चा खूप बोलबाला आहे

होय, हा खूप महत्त्वाचा आणि रंजक विषय आहे.
मानवी शरीरात सुमारे (१ कोटी) कोटी एवढे सूक्ष्मजंतू वास्तव्य करत असतात !

तूर्त हा विषय प्रतीक्षा यादीत ठेवत आहे.
सवडीने बघू

कुमार१'s picture

7 Jan 2022 - 8:52 pm | कुमार१

तुम्हाला दोन दिवसांपूर्वी व्यनी केला आहे
तो पहावा

डॉक्टर साहेब, व्यनि आत्ताच वाचला.
तुमची सूचना मान्य आहे (नाखुषीने).

वरती म्हटल्या प्रमाणे microbiota बद्दल लिहावे हि विनंती.

Nitin Palkar's picture

10 Jan 2022 - 11:56 am | Nitin Palkar

पदण्याच्या संदर्भातील एक मनोरंजक बातमी....
A reality star who says she made $200K from selling her farts in Mason jars is pivoting to selling them as NFTs
https://www.insider.com/reality-star-made-200k-fart-jars-selling-them-as...

कुमार१'s picture

10 Jan 2022 - 12:34 pm | कुमार१

भारीच आहे :))

कुमार१'s picture

14 Jan 2022 - 6:23 am | कुमार१

या विषयाशी संबंधित माझा वैद्यकीय शिक्षणा दरम्यानचा एक अविस्मरणीय अनुभव :

एका रुग्णाचे पोट बरेच टम्म फुगले होते. पोटात खूप वायू साठलेला आहे हे निदान डॉक्टरांनी केले. आम्ही विद्यार्थ्यांनी त्याच्या पोटावर विशिष्ट पद्धतीने बोटावर बोट ठेवून टिचकी मारून त्याचा अभ्यास केला.

नंतर आमच्या प्राध्यापकांनी त्या रुग्णावर एक सोपा प्रयोग आमच्या देखत केला. त्याच्या गुदद्वारातून एक रबरी नळी आत घालण्यात आली. तिकडे बाजूला घमेल्याएवढ्या आकाराच्या भांड्यात पाणी घेतले होते. जशी ती नळी पाण्यात बुडवली गेली तसा त्याच्या पोटातून बाहेर पडलेला वायू छानपैकी पाण्यात बुडबुड्यांच्या रूपाने भसाभस बाहेर पडला.

जवळजवळ ५ मिनिटे तो बाहेर निघत होता !

सुधीर कांदळकर's picture

22 Jan 2022 - 11:46 am | सुधीर कांदळकर

छोट्यांना रोज २ ते ३ वेळां १ ते २ चमचे ग्राईप वॉटर वायुसारक म्हणून पाजावयास सांगत. अजूनही वुडवर्ड्सची जाहिरात चित्रवाणीवर येते. यात बाळशोपा आणि बडीशेप यातली तेले असत. (ऑइल ऑफ अ‍ॅनिसी आणि ऑईल ऑफ अ‍ॅनिथी). हे वैद्यकीय दृष्ट्या बरोबर आहे का.

२. आमच्या निरोगी चि. ला तर ग्राईप वॉटरबरोबर कार्मिसाईड नावाचे औषध त्यायला सांगितले होते. त्यात पोटॅशिअम क्लोराईड असे. सोडियम डिप्लीशन वगैरे होईल या शंकेने मी ते बंद केले. हे खरोखरच शास्त्रीय/वैद्यकीय दृष्ट्या उपयुक्त आहे काय?

३. जंगलातील अनुभव वाचतांना लेखकाला एकदा बाँबस्फोटांसारखे आवाज ऐकू आले. स्थानिक सोबत्याने लेखकाला ते आवाज हत्तींच्या पादण्याचे म्हणून सांगितले. लेखक जिम कॉर्बेट की जॉन अँडरसन की मारुती चितमपल्ली ते आठवत नाही.

कुमार१'s picture

22 Jan 2022 - 12:53 pm | कुमार१

१. ग्राईप वॉटर मधील बडीशेप तेलाबद्दल पारंपरिक भारतीय आणि युरोपीय औषधशास्त्रांमध्ये पुरावे आहेत. विकिपीडियावर 1878 चा एक संदर्भ आहे पण तो उघडत नाही. आमच्या औषधशास्त्राच्या पुस्तकात बडीशेपचा वातहारक गुणधर्म दिलेला होता.
२. बाळशोपाबद्दल काही कल्पना नाही.

३. Carmicide मध्ये मुख्यत्वे Sodium Citrate & Citric Acid हे घटक दिसत आहेत. त्यांचा खरा गुणधर्म लघवी अल्कलाइन करणे हा आहे. वातहारक म्हणून कितपत उपयुक्त आहेत याचा संदर्भ मला तरी मिळाला नाही.