हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ३: अग्न्या व बुंगाछीना गावामधील ट्रेक

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
6 Dec 2021 - 5:10 pm

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती

२७ ऑक्टोबर! रात्री खूप लवकर झोपल्यामुळे पहाटे लवकर जाग आली. भयंकर थंडी आहे! पण पहाटेचं वातावरण आणि पहाटेचं आकाशही बघण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे कुडकुडत बाहेर आलो! आकाशामध्ये जबरदस्त नजारे आहेत. अष्टमीचा चंद्र डोक्यावर असल्यामुळे तारे काहीसे कमी दिसत आहेत. काही वेळ दुर्बिणीतून आकाश दर्शन केलं. पहाटेची वेळ असूनही प्रत्येक घरामध्ये लोक उठलेले दिसत आहेत. सत्गडच्या मुक्कामाचा दुसरा दिवस! पण आज मुक्काम हलवून दुस-या गावात जायचं आहे. नंतर परत सत्गडला यायचं असल्यामुळे थोडंच सामान सोबत घ्यायचं आहे. सगळे उठून रेडी होण्याच्या आधी कसबसं सकाळचं टॉर्चर- टास्क उरकून छोटा ट्रेक करण्यासाठी निघालो.

उताराच्या रस्त्यावरून सत्गड मस्त दिसतंय. थोडं खाली आल्यावर महामार्ग दिसतो. भरभर खाली उतरून धारचुला साईडला फिरायला निघालो. नजारे नितांत सुंदर! ह्या भागामध्ये हा महामार्ग खूप चांगल्या स्थितीत आहे. अधून मधून मिलिट्रीची वाहनं दिसतात. घाट असल्यामुळे सतत वळणाचा रस्ता आहे. सत्गड गावातली रस्त्यालगतची घरं लागली आणि काही अंतराने मोठा उतार सुरू झाला. आणि तिथून दूरवरची हिमाच्छादित शिखरांची रांग डोकावली! अहा हा! सकाळच्या सूर्य किरणांमध्ये चमकणारी शिखरं! आत्ता व्हिजिबिलिटी खूपच चांगली आहे, त्यामुळे अगदी २००- २५० किमी दूर अंतरावरची शिखरं स्पष्ट दिसत आहेत! ऊन्हामध्ये चालल्यामुळे मस्त फ्रेश वाटतंय. थोडा वेळ तिथे थांबून व फोटो घेऊन परत आलो. सत्गडचा छोटाच पण सुंदर ट्रेक करून वर आलो. येताना परत एकदा वाट चुकलो!

सगळे जण हळु हळु रेडी होत आहेत. थोडा वेळ अदूसोबत क्रिकेट खेळलो. तिला इथलं वातावरण खूप आवडलंय. मस्त डोंगराचा परिसर, झाडं, मोकळं अंगण, भेटायला भरपूर लोक आणि लहान मुलं, शिवाय गायी- म्हशी, शेळ्या, कोंबड्या, कुत्रे, मांजरं! ती इथे येतानाच ठरवून आलीय की, ती आमच्यासोबत परत पुण्याकडे येणार नाहीय. दोन महिने तरी मावशीकडे नंतर थांबेल आणि मगच येईल! तीसुद्धा इथे खूप एंजॉय करतेय. आता बॅटने बॉल छान मारते आणि कॅचही मस्त घेतेय! तिच्यासोबत खाली उतरलो आणि रस्त्यावर येऊन थांबलो. यथावकाश सगळे जण खाली उतरले. निघताना दर वेळी अदू न चुकता 'गणपत्ती बाप्पा मोरया' म्हणते! काही जण बसने तर आम्ही एका ओळखीच्यांच्या कारने पिथौरागढ़ला गेलो. तिथे थोडा वेळ मार्केटमध्ये थांबलो. काही वेळ शॉपिंग सुरू होतं. आत्तापर्यंत इथल्या डोंगरांच्या, रस्त्यांच्या व द-यांच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेतला आहे, इथे वेगळं सौंदर्य दिसतंय! अगदी चालतं बोलतं आणि जवळून जाणारं नैसर्गिक सौंदर्य! पण अरेरे! त्या सौंदर्याचा फोटो घेता येत नाही! ते फक्त अनुभवता येतंय व मनात साठवून घेता येतंय!

आज जायचं आहे बुंगाछीना आणि अग्न्या ह्या गावांना. हे माझ्या बायकोच्या वडिलांचं होमटाऊन आहे. बुंगाछीना रस्त्यालगत असलेलं गाव आणि तिथून थोडं खाली उतरून अग्न्या गाव. पिथौरागढ़पासून अंतर फक्त २७ किमी. परंतु बसला दिड तास लागला. वाटेत काही ठिकाणी मध्ये पडलेल्या पावसामुळे रस्ता छोटा झालेला आहे. अनेक डोंगर ओलांडत आणि दरीला लागून हा रस्ता जातोय. सगळीकडे अप्रतिम नजारे! इथे प्रत्येक सेकंदाला सुंदर नजारे सुरूच आहेत. बुंगाछीनाला पोहचेपर्यंत दुपार होऊन गेली. तिथून मग वाटेत ओळखीच्या लोकांना भेटत अग्न्या गावाला पोहचलो. हाही सत्गडसारखा छोटा पण सुंदर ट्रेकच आहे. फक्त रस्त्यावरून खाली अर्धा किलोमीटर उतरून जायचं. अगदी सोपी नयनरम्य पायवाट! इथे खूप दिवसांनी सगळे येत असल्यामुळे अगदी गळाभेटी झाल्या. भोटू कुत्र्याने माझीही गळाभेट घेतली आणि दोन्ही पाय उंचावून मला आशीर्वाद दिले! छोटसं अगदी उतारावरच्या शेतांच्या बाजूला वसलेलं गाव. काही वेळ छान भेटी झाल्या. चहाचे राउंडसही झाले. इथे राहणारे प्रदीपदादा त्यांच्या शेतात घेऊन गेले. तिकडेही मस्त ट्रेकच झाला. अरुंद अशा पायवाटेने खाली खाली उतरत गेलो. काही ठिकाणी पाय घसरण्याची भिती होती, पण मस्त वाटलं. तिथे एक झरा व त्यावरचा एक पूलही होता. खूपच आल्हाददायक वातावरण आहे इथलं! एका अर्थाने सगळं स्वप्नवत! बोलता बोलता प्रदीपजी बोलले की ते रनिंग करतात, इकडे फिरतात. त्यांच्यासोबत बोलून सकाळी फिरायला जायचं ठरलं. उरलेला दिवस कौटुंबिक भेटी, गप्पा, गावातल्या गोष्टी ह्यांच्यात गेला. अधून मधून घराच्या थोडं बाजूला येऊन अक्षरश: सर्वोत्तम अशा वॉलपेपरहून सुंदर आणि ख-या दृश्यासमोर शांत बसलो आणि तिथे असण्याचा अनुभव घेतला.

दुस-या दिवशी म्हणजे २८ ला सकाळी प्रदीपजींसोबत निघालो. इथे जवळच एक डोंगरावर मंदिर आहे. तिकडे जाऊ असं ते बोलले. काल आलो तो उतार आता सुंदर चढ आहे. पहाटेची थंडी असली तरी चढून जाताना हळु हळु ऊब येत गेली. बुंगाछीना गावातून त्या मंदिराकडे जाणारा रस्ता मिळाला. जसा जसा रस्ता वर चढला, तसा आजूबाजूचा परिसर दिसायला लागला. काही अंतरावरून तर दूरवर डोंगराच्या मागे लपलेली बर्फाच्छादित शिखरंही दिसली! आणि सकाळच्या लाल ऊन्हामध्ये तीही लाल दिसत आहेत. अद्भुत! मंदिराजवळ गेल्यावर तर खूप मोठी हिमशिखर रांग दिसली! आणि आजूबाजूला दूरदूरची गावं व लांबचे रस्ते दिसत आहेत! थोडा वेळ मंदिराजवळ बसून त्या नजा-यांचा आस्वाद घेतला! तिथे आम्ही उभे असतानाच प्रदीपजी एकदम बोलले की, ते पाहा, समोर कोल्हे दिसत आहेत! समोरच्या झाडीमध्ये दोन कोल्हे पळताना दिसले! नंतर एक कोल्हा तर आमच्याकडेच बघत होता खूप वेळ. त्याचा व्हिडिओ घेतला, पण नेमका कॅमेरा ऑन झाला नाही. आणि थोड्या वेळाने परत आम्ही ज्या रस्त्याने वर आलो होतो, त्या रस्त्यावर एक कोल्हा दिसला. त्याचा मात्र फोटो घेता आला. इथे झाडी घनदाट आहे आणि मोठे डोंगर आहेत. त्यामुळे अनेक वन्य श्वापदांचा वावर असतो. वाघसुद्धा इकडे ब-यापैकी दिसतो. उतरताना सूर्य आणखी वर आल्यामुळे शिखर अजून स्पष्ट दिसत आहेत!


कोल्हा

मंदिर बघून येताना प्रदीपजींनी आणखी वेगळी वाट दाखवली. पहिले मुख्य रस्त्याने बुंगाछीना गावाची बाजारपेठ ओलांडून पुढे गेलो. तिथे रस्त्याला उतार लागला तेव्हा परत शिखरांनी दर्शन दिलं! त्यानंतर प्रदीपजी रस्ता सोडून आतमध्ये वळले. आणि तिथून मस्त पायवाट मिळाली. डोंगरात अशा असंख्य पायवाटा आहेत. सोपीच वाट आहे ही. कुठे दरी जवळून जात नाही किंवा तीव्र चढही नाही. आणि पाय वाट असली तरी दगडांवर पक्की बांधलेली आहे. शेतांमधून- डोंगरातून जाणा-या वाटेचा आनंद घेतला. मनसोक्त फोटो घेतले. हळु हळु ही वाट रस्त्यापासून आत आली आणि डोंग़राकडे वळाली. मध्ये मध्ये छोटी मंदिरं लागत आहेत! इतका शुद्ध निसर्ग आणि इतका आनंद खरंच 'असह्य' वाटतोय! गप्पा मारत फिरत गेलो. काही ठिकाणी दव पडल्यामुळे वाट ओलसर आहे. कुठे कुठे चिखलही आहे. असं करत दूरवर फिरून थेट अग्न्या गावामध्ये उतरलो. मस्त साडेपाच किमी ट्रेक झाला! पण एसी ऑन असल्यामुळे काहीच थकवा वाटत नाहीय! नंतरच्या दिवसात मस्त गप्पा झाल्या. शेतामध्ये फिरणंही झालं आणि गावात वाघ येत असल्याचे अनेक किस्सेही कानावर आले! त्याबद्दल पुढच्या भागामध्ये सविस्तर बोलेन.

पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ४: गूंजीच्या दिशेने प्रयाण...

माझे हिमालय भ्रमंती, ध्यान, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग व इतर विषयांवरचे लेख इथे उपलब्ध: www.niranjan-vichar.blogspot.com

प्रवासभूगोलअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

7 Dec 2021 - 7:24 pm | मुक्त विहारि

......इथे राहणारे प्रदीपदादा त्यांच्या शेतात घेऊन गेले.....

शेताचे फोटो आहेत का?

तिथे काय काय पिकते?

डोंगर उतार असल्याने, चहाचे मळे आहेत का? किंवा कुणी लागवड करायचा प्रयोग केला आहे का?

तुम्ही म्हणता तशी थंडी असेल तर, अक्रोड, पिस्ते, बदाम आणि केशर, यांच्या लागवडीचा प्रयोग कुणी केला आहे?

सध्या तरी शेती हीच ध्यानधारणा असल्याने, प्रश्र्न भरपूर आहेत...

चौथा कोनाडा's picture

8 Dec 2021 - 12:32 pm | चौथा कोनाडा

सुंदर मालिका आहे. आटोपशीर लेखन आणि सोबत तेव्हढेच सुंदर प्रचि म्हणजे कुमाऊँ भ्रमंतीची मेजवानीच. मजा येत आहे !
दरवेळी गणपती बाप्पा मोरया" म्हणणारी निरागस अदू खुप गोडुली आहे
💖

सिरुसेरि's picture

9 Dec 2021 - 2:12 pm | सिरुसेरि

छान लेखन आणी फोटो .

मार्गी's picture

10 Dec 2021 - 12:12 pm | मार्गी

वाचल्याबद्दल व प्रतिक्रियांबद्दल खूप खूप धन्यवाद! :) @ मुक्त विहारी जी, तिथे बरीचशी पिकं- फळं आपल्यासारखी आहेत. गहू- तांदूळ, बटाटा वगैरे आहेत. शिवाय पेरू, केळी अशी झाडंही दिसत होती. काही ठिकाणी संत्र आहे. जास्त उंचीच्या ठिकाणी सफरचंद आहे. चहाचंही झाड थोड्या प्रमाणात दिसलं. बाकी "उस नजर से" बघत नव्हतो, त्यामुळे तसं फार लक्षात आलं नाही. :)

मुक्त विहारि's picture

10 Dec 2021 - 7:19 pm | मुक्त विहारि

सहमत आहे ....

मला जमीन दिसली की पिकेच दिसतात ... त्यामुळे, आजकाल घरचे, त्यांच्या बरोबर मला नेत नाहीत..

आमचा "अर्जून" झाला आहे...