परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ८

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
5 Jul 2010 - 10:00 pm

image006

Reprinted with permission from EnlightenNext magazine,
© 2005 EnlightenNext, Inc. All rights reserved. www.enlightennext.org
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - १
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - २
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ३
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ४
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ५
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ६
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ७

सुसानबाई काहीही म्हणत असल्यातरी हे ही खरे आहे की या अनुभवांवर वाचन केल्यावर हे जाणवत रहाते की भौतिक शास्त्रात या अनुभवांचे स्पष्टीकरण देण्यासाठी बरेच प्रयोग चाललेले आहेत. उदा. बर्‍याच डॉक्टरांनी आणि परिचारीकांनी नमूद केले आहे की बर्‍याच की कित्येक रूग्णांना ते बेशुध्दावस्थेत असताना, किंवा त्यांचा मेंदू मेंदू मृत्यू पावला असताना काही गोष्टी सांगता येत होत्या. उदा. एका रुग्णाने ज्या परिचारिकेने तो बेशूध्द असताना त्याची दाताची कवळी काढली होती तिला बरोबर ओळखले होते आणि ती तिने कुठे ठेवली होती हेही बरोबर सांगितले. एकीने तर म्हणे शरीराच्या बाहेर जाउन त्या रुग्णालयाच्या तिसर्‍या मजल्यावरच्या पायर्‍यांवर ठेवलेल्या टेनिसच्या बुटांचे बरोबर वर्णन केले. पण सगळ्यात नाट्यमय घटअना आहे ती म्हणजे एरिझोना प्रांतातल्या एका पाम रेनॉल्डस्‍ नावाच्या स्त्रिची. तिला मृत्यूपासून वाचवण्यासाठी त्यांना तिच्या मेंदूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी मेंदूला जिथे जोडली जाते तेथील एक गाठ काढायची होती. त्यासाठी त्यांनी तिच्या शरीराचे तापमान उणे साठ अंश फॅरनाईट पर्यंत खाली उतरवले. त्यामुळे तिचे ह्रदय गोठले आणि तिचा श्वासोश्वास थांबला. मग त्यांनी तिच्या शरीरातील आणि मेंदूतील (म्हणजे मेंदूच्या बाजूचे) सर्व रक्त काढून घेतले. तिचा EEG आता एक सरळ रेषा होती. तिचा मेंदू आता तिच्या कानात ठेवलेल्या आवाज करणार्‍या यंत्राला कुठलाही प्रतिसाद देत नव्हता. खरंतर ती आता मृतच होती. पण आश्चर्य म्हणजे या दुखण्यातून बरं झाल्यावर डॉक्टरांना असे आढळले की तिला NDE चा अनुभव आला होता आणि एवढेच नाही तर त्या शस्त्रक्रियेच्या वेळी कुठली उपकरणे वापरली ते शल्यविशारद काय चर्चा करत होते हे तिने अगदी सविस्तरपणे सांगितले होते.

NDE चे आत्तापर्यंतचे संशोधन हे तसे विशेष महत्वाचे मानले न गेल्यामुळे या सर्व गोष्टींना पुरावा म्हणून तिसर्‍याच व्यक्तिंची साक्ष काढण्यात आली नाही हे दुर्दैव. पण या अनुभवावरूनच वैज्ञानिक क्षेत्राला यावर संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली हे निश्चित. या प्रकरणानंतर मात्र असल्या अनुभवांचा पूर्ण दस्त करण्यात येऊ लागला. विशेषत: ह्रदयरोगविभाग, जेथे बरेच मृत्यू होत असतात, ही त्यांची प्रयोगशाळा झाली. श्री. पीटर फेनविक म्हणतात “संशोधकांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की मृत्यूनंतरचे अनुभव का येतात.... आपण जर शास्त्रियदृष्ट्या हे सिध्द करू शकलो की मृत्यूनंतरचे हे अनुभव बेशुध्दावस्थेत, जेव्हा मेंदू काम करत नसतो, त्याचवेळेस येतात तर आपण असे म्हणू शकतो की चेतना ही मेंदूशिवाय वेगळी राहू शकते. ( या वाक्याचे महत्व लक्षात घ्या) आणि असे म्हणणे फार महत्वाचे आहे”. श्री. फेनविक आणि त्यांच्या सहाय्यकांचे जरी असे म्हणणे असले की याच्यावर अजून बर्‍याच संशोधनाची आवश्यकता आहे, तरी जी काही माहीती बर्‍याच इस्पितळातून जमा झाली आहे त्यावरून असे वाटते की मन हे निश्चितच अभौतिक आहे. या सगळ्या अभ्यासातून काही मुलभूत माहीती जमा झाली तर मात्र आत्मा/चित्त आणि मेंदू यांच्या संबंधाविषयी बरेच प्रश्न निर्माण होतील.

मग मन जर मेंदूत नसेल तर कुठे असेल ? पारंपारिक द्वैतवादी, म्हणजे देकार्तपासून त्यांचे म्हणणे आहे की मन म्हणजे एक अजडद्रव्य असून ते मेंदू आणि शरीराबरोबर कुठ्ल्यातरी गूढ तत्वाने बांधले गेले आहे. हे तत्व काय आहे यावरूनच मन-शरीर या संबंधी वाद चालू झाले आहेत. पण विज्ञानाने हे वाद आता फार तर्कशुध्द आणि समजण्याइतपत सोप्पे केले आहेत.

श्री. रुपर्ट शेलड्रेक यांनी या बाबतीत अजून एक वेगळेच मत मांडले आहे. ते म्हणतात मन आणि हे आयुष्य या संधर्भात अभ्यासासाठी “क्षेत्र” (field) ही संकल्पना फारच उपयोगी पडेल. ही संकल्पना आपल्याला चांगलीच माहीती आहे. ही मायकेल फॅरेडेने प्रथम विद्यूतचुंबकीय आणि गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्रासंधर्भात मांडली होती. या कल्पनेने बर्‍याच गोष्टींकडे याच दृष्टिकोनातून बघितले जाते. सर कार्ल पॉपर यांनी म्हटल्याप्रमाणे “मॉडर्न पदार्थविज्ञानामुळे आपल्या भौतिक ज्ञानामधे बरीच भर पडली असली तरी हेही समजले आहे की आता जडद्रव्य हा मुलभूत सिध्दांत रहिला नाही. पण क्षेत्र आणि शक्ती हे मात्र मुलभूत आहेत. हे जर खरं असेल तर मेंदूकडे या कल्पनेतून बघायला काय हरकत आहे ? म्हणजे बघा, जसे एखाद्या वस्तूभोवतालचे क्षेत्र हे त्या वस्तूमधे कोंडून रहात नाही, त्याप्रमाणे ज्या क्षेत्रावर मेंदूचे काम अवलंबून असते, ते त्या मेंदूत कोंडून रहात असेल असे कशावरून ?

हा सिध्दांत जर आपण खुल्यामनाने स्विकारला तर शेल्ड्रेकच्या मते आपण बर्‍याच प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकू. उदा. चित्ताचे मेंदूवरचे अवलंबित्व आणि त्याने स्वत: केलेल्या प्रयोगांची उत्तरे. त्याने परचित्तज्ञानावर बरेच प्रयोग केलेले आपणा सर्वांना माहिती असतीलच. या प्रयोगात त्याने आपले चित्त आपला मेंदू सोडू शकतो हे सिध्द करण्याचा बराच प्रयत्न केला आहे. ज्या प्रमाणे तुमच्या सेलफोनमधल्या वायरलेस सर्किटमधला एखादा भाग तुम्ही बदलला तर त्या सेलफोनच्या भोवतालचे क्षेत्र बदलेल का नाही ? तसेच मेंदूत काही उलथापालथ झाली तर त्या भोवतालचे क्षेत्र बदलेल का नाही? त्याच प्रमाणे काही बाह्य घडामोडींमुळेही हा बदल होणे शक्य आहे असे कोणी प्रतिपादन केले तर ?

विल्यम्स्‍ जेम्स नावाच्या शास्त्रज्ञाने अजून एक सिध्दांत मांडला. तो म्हणाला की मेंदू हे एक प्रकारचे चित्ताचे आदान प्रदान करण्याचे यंत्र आहे. हे यंत्र ज्यांना मृत्यूनंतरचे अनुभव येतात त्यांच्या बाबतीत कशा प्रकाराने काम करते? कारण त्यावेळेस तर मेंदूचे काहिच कार्य चालु नसते. एक ह्रदयरोगतज्ञ आणि NDEचे संशोधक श्री. पीम व्हॅन लोमेल यांनी एक कल्पना मांडली आहे, ती विचार करण्यासरखी आहे. आपल्या चित्ताचे किंवा चैतन्याच्या माहितीचे आणि आठवणिंचे क्षेत्र आपल्या भोवती विद्यूत/चुंबकीय क्षेत्राप्रमाणे पसरलेले असते. मात्र हे क्षेत्र फक्त आपल्या जागत्या चैतन्याला, आपल्या मेंदूच्या आणि इतर पेशींमार्फत उपलब्ध होत असते. जेव्हा मेंदू मृतवत होतो तेव्हाही ही क्षेत्रे आपल्या भोवताली उपललब्ध असतात. त्यामुळे ज्यांचा मेंदू मृतवत होतो ते जेव्हा हळूहळू शुध्दिवर येऊ लागतात त्यावेळी हि क्षेत्रे त्यांना माहितीसाठी उपलब्ध होतात. त्यामुळे या लोकांना स्वत:ची ओळख, आजूबाजूची माहिती, लक्ष देणे, आणि भावना इ.ची माहिती होत असते. पण त्याची प्रत्यक्ष जाणीव ही मेंदू पूर्वस्थितीला आल्यानंतरच होते. म्हणून हे लोक शुध्दीत आल्यावर या सगळ्या आठवणी सांगतात.”

अर्थात या अशा कल्पनांना सध्याच्या वैज्ञानिक जगतात थारा मिळणे जरा कठीणच वाटते आहे. त्यामुळेच की काय शेल्ड्रेकसारख्या लोकांनी आता कर्मठ शास्त्रज्ञांना पटवायचा नाद सोडून जनसामान्यांना या विषयाचे (para psychology) शिक्षण द्यायला सुरवात केली आहे. त्यासाठी त्याने इंटरनेट आणि पुस्तकांचा वापर सुरू केला आहे आणि त्यांना खात्री आहे की एक दिवस जनसामान्यांना या विषयात रस निर्माण होईल आणि तेच शास्त्रज्ञांवर हा विषय गंभीरपणे घेण्यासाठी दबाव टाकतील.

Institute of Noetic Sciences चे प्रमूख श्री. रॅडीन म्हणतात “ पुराव्यांची आमच्याकडे कमी नाही. परंतू नुसत्या पुराव्याने काय होणार? आम्ही आता सैध्दांतिक मांडणी केली पाहिजे.” रॅडीन १९८० सालापासून या क्षेत्रात काम करत आहेत आणि त्यांनी त्यांच्या संशोधनावर आधारित एक पुस्तकपण लिहिले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे “The conscious Universe: The scientific Truth of Psychic Phenimena”. या पुस्तकात त्यांनी अभ्यासलेल्या सर्व अतिंद्रीय अनुभवांचे सविस्तर वर्णणे आणि विश्लेषणे आहेत. यात त्यांनी असे सिध्द करण्याचा प्रयत्न केला आहे की माणसाचे चैतन्य/चित्त/मन याची कार्यसीमा मेंदूच आहे असे मानायचे काही कारण नाही.

मन-जडद्रव्य यांच्यातील परस्पर संबंध किंवा अन्योन्यक्रियांच्या अभ्यासादरम्यान शस्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की माणसे इलेक्ट्रॉनिक नंबर जनरेटर्सवर नुसत्या इच्छेने प्रभाव टाकू शकतात. ( भिमाने इच्छेने फासे बदलले हे खोटे मानायचे आता कारण नाही :-). दुरदृष्टी च्या संशोधनात, ज्याचा खर्च CIA ने उचलला होता/आहे, काही माणसांनी दुरवरच्या स्थानाचे वर्णन केले आहे. ( संजय उवाच ?) अर्थात याची संख्या लाखात एक अशी आहे हेही नमुद केले पाहिजे. सध्या वादग्रस्त ठरलेल्या दाव्याच्या – म्हणजे प्रार्थनेने दुरून एखाद्याला बरे करणे याच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की त्याने सेकंडरी इन्फेक्शन कमी झालेले आहे तसेच नैसर्गिक प्रसूतीला मदतच होते. या संशोधनाला अमेरिकी सिनेटने ५० लाख डॉलार्सची मदत जाहीर केली होती हेही इथे नमूद केले पाहिजे. ( याचे कारण दुसरेच असण्याची शक्यता नाकारता येत नाही).

अतिंद्रीय शक्तिंच्या अभ्यासाला आणि तो करणार्‍यांना विज्ञानाकडून फार कठोर टीका सहन करायला लागली आहे. त्यांच्या संशोधन करायच्या पध्दतींवर, त्यांनी अभ्यास केलेल्या नमुन्यांची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे तो अभ्यास विश्वसनीय नाही पासून तो नि:पक्षपाती नाही असे विविध आरोप त्यात करण्यात आलेले आहेत. म्हणून मी मुद्दामच रॅडीनला विचारले की त्याच्या संशोधनाचा असा कुठला भाग आहे ज्याने तो अतिंद्रीय शक्तींचे अस्तित्व आहे असे ठामपणे प्रतिपादन करू शकतो ? आणि टीकाकार त्याचे खंडन करू शकणार नाहीत ? त्यावर त्याचे उत्तर होते
“विज्ञानामधे असा एकही सिध्दांत नाही की त्याचे आपण खंडन केलेले नाही. टीका तर झालेलीच आहे”. असे म्हणत त्याने परचित्तज्ञानाबद्दल सांगितले. आपल्याला सर्वांना केव्हाना केव्हातरी लोकांच्या मनातले आपण ओळखले असे वाटतेच. फोन उचलायच्या अगोदर आपल्याला उगाचच असे वाटते की हा फोन अमुक अमुक व्यक्तिचाच असेल आणि तो त्याचाच असतो. आपण एखाद्याला इ-मेलने एखादा प्रश्न विचारावा म्हणून आपला लॅपटॉप उघडावा तर त्याच्या कडून त्याच विषयावर इ-मेल आलेला असतो. यावर टीकाकारांचे ठराविक उत्तर असते “ तो निव्वळ एक योगायोग आहे” पण या वरचे संशोधन आता असे सांगू पहाते आहे की योगायोगाच्या पलिकडे यात काहितरी दडलेले आहे.

रॅडीनच्या म्हणण्यानुसार याला पुरावा म्हणून देता येतील “गॅझफिल्ड प्रयोग”
काय आहेत हे प्रयोग ?

जयंत कुलकर्णी.
भाग ८ समाप्त.
पुढे चालू.......

धर्मइतिहासविज्ञानशिक्षणविचारआस्वादसमीक्षालेखबातमीअनुभवसंदर्भवादभाषांतर

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

6 Jul 2010 - 2:49 am | अरुण मनोहर

एक खूप माहितीपूर्ण आणि अप्रतिम लेखमालीका दिल्यासाठी जयंतरावांचे अभिनंदन. असेच वेगळ्या विषयांचे अभ्यासपूर्ण लेखन आणखी येऊ द्या.

युयुत्सु's picture

6 Jul 2010 - 8:08 am | युयुत्सु

+१

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

शिल्पा ब's picture

6 Jul 2010 - 7:13 am | शिल्पा ब

थोडक्यात काय तर इच्छाशक्ती...आणि क्षेत्र ज्याला म्हंटले आहे ते इंग्रजीत ऑरा म्हणतात ते असावे...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

मीनल's picture

6 Jul 2010 - 7:25 am | मीनल

ते योगायोगाच्या पलिकडे `दडवलेले` आहे त्याचा शोध मानव सारखाच घेत असतो.

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

6 Jul 2010 - 4:19 pm | प्रकाश घाटपांडे

फोन उचलायच्या अगोदर आपल्याला उगाचच असे वाटते की हा फोन अमुक अमुक व्यक्तिचाच असेल आणि तो त्याचाच असतो.

कालच मोबाईल वर फोन घेतला व तो चुलतभावाचाच असणार असे वाटले व नेमके तसेच घडले.
फोन येण्याची शक्यता होती. पण ती तीनचार दिवसात कधीतरी. योगायोगाची गंमत वाटली. असे योगायोग अनेकांच्या वाट्याला येतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

राजेश घासकडवी's picture

6 Jul 2010 - 5:22 pm | राजेश घासकडवी

पहिले सहाएक भाग शास्त्रीय माहिती अतिशय सोप्या भाषेत देणारी सुंदर लेखमाला अशी गूढ होत चाललेली, 'चित्त म्हणजे मेंदूचा ऑरा' वगैरेसारखी विधानं करायला लागली हे पाहून वाईट वाटलं. विज्ञानाच्या कक्षेबाहेरच्या प्रयत्नांचा हा केवळ आढावा असेल अशी आशा करतो.

-६० फॅरनहीट पर्यंत संपूर्ण शरीर गोठवून पुन्हा जिवंत करता येतं हे अविश्वसनीय वाटतं. यासंबंधी अजून वाचायला आवडेल.

जयंत कुलकर्णी's picture

6 Jul 2010 - 7:36 pm | जयंत कुलकर्णी

या शास्त्राच्या कक्षेत आणि कक्षेच्या बाहेर जे काही चाललेय त्याचा हा लेख म्हणजे आढावा आहे. यात उल्लेख केलेल्या ज्या काही बाबी आहेत त्या संधर्भात नेट्वर शोधले तर सगळी माहीती उपलब्ध आहे. या बाबतीत १०० फुले उमलू द्या हेच धोरण योग्य आहे. असे माझे मत आहे......

जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

बट्ट्याबोळ's picture

7 Jul 2010 - 2:08 am | बट्ट्याबोळ

छान !!
जयंतकाका ... फारच सुरेख लेखमाला आहे ... एका दिवसात सगळे लेख वाचले.

काका, पुण्यातल्या प.वि.वर्तकांनी दुरवरच्या स्थानाचे वर्णन करण्याचे प्रयोग केले आहेत. ते त्यांच्या दाव्यांना वैज्ञानिक स्पष्टीकरणे देतात.

"पतंजली योग- विज्ञाननिष्ठ निरुपण" या पुस्तकात अधिक माहीती मिळेल.

तुमची त्यांच्या प्रयोगांवर प्रतिक्रिया वाचायला अवडेल.

बट्ट्या!!