Reprinted with permission from EnlightenNext magazine,
© 2005 EnlightenNext, Inc. All rights reserved. www.enlightennext.org
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - १
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - २
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ३
“मेंदुत घडणार्या भौतिक घटना काल्पनिक अनुभवांना कसा जन्म देतात हा खरा अवघड प्रश्न आहे. उदा. मेंदूत घडणार्या रासायनिक क्रिया, इलेक्ट्रॉन्सच्या हालचाली इ.इ. यामुळे आपल्याला जे अनुभव येतात ते का ? त्याचे कार्यकारण काय ? या प्रश्नाच्या तुलनेत मज्जातंतूच्या जाळ्याचे काम कसे चालते, आपण लक्ष देतो म्हणजे काय करतो, किंवा झोपणे आणि जागे असणे म्हणजे काय हे प्रश्न सोपे आहेत. या सोप्या प्रश्नांवर बरेच काम झाले आहे.पण या कामामुळे मुळ अवघड प्रश्नाच्या उत्तराच्या जवळ आपण आलो आहोत असे म्हणणे जरा धाडसाचेच ठरेल. आणि “चैतन्य” म्हणजे काय याचा अर्थ ““मेंदुत घडणार्या भौतिक घटना काल्पनिक अनुभवांना कसा जन्म देतात” याचे उत्तर मिळाल्याशिवाय, कसा सांगणार ?
जे कॉलेजमधे तत्वज्ञान शिकले आहेत, त्यांना हा अवघड प्रश्न म्हणजेच शॉफेनहरने मांडलेला शरीर-मनाच्या संबंधित “The World Knot”ची सुधारीत आवृत्ती आहे हे लक्षात येइलच. पण ज्यांना याची कल्पना नाही त्यांच्यासाठी हे सोपे करुन सांगायचा प्रयत्न करतो. जेव्हा आपण गुलाबाचे फुल बघतो तेव्हा आपण त्याचा रंग डोळ्याने बघतो, नाकाने त्याचा वास घेतो, स्पर्शाने त्याला काटे आहेत हे ओळखतो. हे सर्व आपला मेंदू आपल्या ज्ञानेंद्रियाद्वारे करतो. पण त्याच वेळी आपण त्या फुलाच्या सौंदर्याचा आनंद आपण कसा घेऊ शकतो हे गुढ आहे. म्हणजे आपली भौतिक जाणीव आणि आपली अंतर्मनातील अशी जी खास जाणीव - आनंद (ज्याला आपण कल्पना म्हणतो कारण आपण ती दाखवू शकत नाही) या दोन्हीतील अंतर काय आहे आणि का आहे हा खरा प्रश्न आहे. रेने डेकार्तने शरीर आणि मन या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे सिध्द केल्यापासून भौतिक जाणीव आणि वरती लिहीलेली अंतर्मनातील जाणीव या दोन्ही एकामेकांशी कसा संबंध कसे ठेवतात, हा ही एक संशोधनाचा विषय आहे.
वरच्या उदाहरणात त्या फुलाचे अस्तित्व आपल्या मनात आपण दाखवू शकत नाही अशा काल्पनिक जाणीवा ( आनंद, राग इ.) कशा उत्पन्न करु शकतात? तसेच त्याच्या विरुध्द या भावना ज्यांच्यावर कुठलेही भौतिकशास्त्राचे नियम चालत नाहीत त्या भौतिक गोष्टींवर परिणाम करतात का ? हा ही एक प्रश्न आहेच.
जरा आता आपल्या चर्चासत्रांकडे वळूयात.
उदघाटनानंतरच्या पहील्या सत्राचे नाव होते “Neural Co-relates of Consciousness” म्हणजेच “अंतर्मनाच्या जाणीवांचे ज्ञानतंतू लावत असलेले अर्थ. ज्याला आता सगळे NCC म्हणून ओळखतात. सगळ्या चर्चासत्रांचा केंद्रबींदू जवळ जवळ हाच होता असे म्हणायला हरकत नाही. कॅमर्सच्या स्वागतपर भाषणांनंतर तीन व्यक्त्यांनी मज्जाजीवशास्त्राचा अंतर्मनातील जाणीवांकडे बघायचा दृष्टिकोन व त्याची प्रगती याच्यावर भाषण दिले. पहिला व्यक्ता होता ख्रिस्टॉफ कॉच. त्याने फ्रॅन्सीस क्रिक यांच्या बरोबर दृष्टी आणि त्याची मेंदूतील जाणीव याच्यावर जे काम केले होते त्यामुळे त्यांनी विज्ञानाच्या या क्षेत्रात बरीच प्रसिध्दी मिळवली होती. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास त्यांचे भाषण माझ्या डोक्यावरुनच गेले. पुढच्या दोन व्यक्त्यांची भाषणे मी जेव्हा ऐकली तेव्हा एकूण जे मला कळाले त्याची गोळाबेरीज ही अशी होती –
NCC चा अभ्यास करणार्यार या शास्त्रज्ञांचे हे प्रयत्न चाललेत
– १ ज्ञानतंतूंच्या पातळीवर आपला मेंदू, जेव्हा आपण एखाद्या वस्तूची जाणीव करुन घेत असतो, तेव्हा कसा वागतो.
- २ जेव्हा आपण तीच वस्तू आपण जाणीवेच्या पलिकडे जाऊन बघतो तेव्हा मेंदू तसाच वागतो का?
आता जाणीवेच्या पलिकडे जाऊन आपल्याला कशाची तरी जाणीव होऊ शकते हेच पटणे कठीण आहे. याच्यात विरोधाभास आहे हे आपल्या लगेचच लक्षात येते. पण थांबा. त्याला काय म्हणायचे आहे हे समजवून सांगण्यासाठी कॉचने एक अत्यंत वेगळे व विचित्र उदाहरण दिले. त्याला त्याने नाव दिले “ दृष्टींची स्पर्धा”. थोडक्यात ते असे सांगता येईल –
आपण जगाकडे डोळ्याने बघतो हे या वाक्याइतके सोपे नाही. बघणे ही एक फार गुंतागुंतीची क्रिया आहे. तसे म्हटले तर मेंदूतील प्रत्येक क्रिया ही फार गुंतागुंतीची व समजण्यास अत्यंत अवघड अशी असते. जेव्हा आपण बघतो तेव्हा काय होते ते आता बघूया. जेव्हा आपण एखाद्या वस्तूकडे बघतो तेव्हा त्यावरील परावर्तित प्रकाशाचे किरण आपल्या बुबुळात शिरुन आपल्या दृष्टीपटलावर पडतात. त्याच्या मागे दृकशास्त्राच्या नियमानुसार त्या वस्तुच्या दोन उलट्या पण द्विमितीय प्रतिमा तयार होतात. या प्रतिमा जेथे त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते अशा मेंदूमधील वेगवेगळ्या ३० ठिकाणी पाठवल्या जातात. या प्रक्रियेनंतर मेंदू आपल्याला एक त्रिमितीतील प्रतिमा दाखवतो. या प्रक्रिया काय आहेत आणि मेंदू त्या कशा तयार करतो हे गुढ अजून पूर्ण्पणे उलगडलेले नाही. चेताशास्त्रामधे याला “बाइंडींग प्रॉब्लेम” असे म्हणतात. थोडक्यात काय, दोन डोळे एखाद्या वस्तूचा वेगवेगळा भाग पहातात, पण मेंदू मात्र तुम्हाला आपल्याला त्याची एकच लांबी, रुंदी आणि खोली असलेली वस्तू दाखवतो.
आता आपण अशी कल्पना करुया की या दोन डोळ्यांना आपण एकामेकांपासून वेगवेगळे केले आणि त्यांना एकदम वेगळी चित्रे दाखवली तर ती दोन्ही चित्रे आपल्याला एकदम दिसतील का ? आता डोळे वेगवेगळे कसे करायचे? नाक त्यांना वेगवेगळे करतेच. एक मोठा कागद घेऊन जर त्याला नाकाचा आकार कापून तो कागद पुढे एका भिंतीला नेऊन चिकटवला तर दोन्ही डोळे वेगवेगळे जोऊ शकतात. ते कसे करायचे ते आपण त्यांच्यावर सोडूयात. होते काय ते आपण बघुया. वरील प्रश्नाचे उत्तर आहे “नाही”. जेव्हा दोन्ही डोळ्यांना वेगळी चित्रे दाखवली जातात तेव्हा त्या दोन्ही डोळ्यांमधे स्पर्धा चालू होते. मेंदू तुम्हाला एका वेळेस एकाच वस्तुची जाणीव (येथे बघणे) करुन देऊ शकतो. त्यामुळे जरी त्याला दोन इनपूट मिळत असले तरी त्याला त्यातल्या एकाच इनपूट्वर काम करावे लागते. बर्याच वेळा तो एकावरच काम करतो आणि दुसर्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. जर या प्रतिमा सुसंगत क्रमाने दाखवल्या तर तो त्यांच्यावर आलटुनपालटुन काम करतो. आता इथे काय महत्वाचे घडतंय ते पहा. कुठल्याही एका क्षणी ज्या प्रतिमेची जाणीव मेंदू आपल्याला करत असतो त्यावेळीसुध्दा पहिली आणि दुसरी प्रतिमा आपल्या मेंदूत पोहोचत असतेच आणि तो इनपूट समान असतो. कॉच आणि त्याच्या सहकार्यांना हे समजणे फार महत्वाचे वाटते. याचे मुख्य कारण म्हणजे आता मेंदूच्या छायाचित्रणाचे अत्यंत प्रगत असे तंत्रज्ञान वापरून आता ते - १ मेंदू जेव्हा वस्तू जाणिवेतून बघतो (या वेळी आपण बघतो) आणि २ जाणीव नसताना बघतो ( वर सांगितल्याप्र्माणे) त्या वेळेच्या प्रतिमा काढून त्यांची तुलना करु शकतात. यावरुन त्यांना खात्री आहे की ते एक दिवस अंतर्मनाच्या जाणीवेचे, ज्ञानतंतू लावत असलेले अर्थ शोधून काढू शकतील.
हे वाचल्यावर तुमच्या मनात एक प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे आणि तो म्हणजे या प्रकारचे संशोधन आपल्याला आपले चित्त म्हणजे काय, हे समजायला कसे काय मदत करु शकेल ? हाच प्रश्न कॅमर्सने विचारला. आपण मागे बघितल्याप्रमाणे त्याच्या मते हे किरकोळ प्रश्न आहेत. वरील अभ्यासाने इतर बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली तरी मेंदू आपल्या चित्तातला अनुभव कसा काय तयार करु शकतो, हा प्रश्न सोडवण्यास या अभ्यासाचा उपयोग होईल असे वाटत नाही. तत्वज्ञानी जॉन सर्ल याने कॉचच्या “The quest for Consciousness” या पुस्तकाच्या परीक्षणात म्हटल्याप्रमाणे ज्या माणसांवर हे सगळे प्रयोग केले जातात ते सर्व अगोदरच चेतन असल्यामुळे आपण या अभ्यासामुळे जास्तीतजास्त एवढेच म्हणू शकतो की जो मेंदू चेतन आहे तोच जाणीव उत्पन्न करु शकतो..... मला असे वाटते की चित्त म्हणजे काय हे आपल्याला तेव्हाच कळेल जेव्हा मेंदू चेतना असलेले चित्त कसे तयार करते हे आपल्याला कळेल.”
कॉचच्या भाषणानंतर झालेल्या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमात एका स्त्रीने त्याला विचारले की तुमच्या या शास्त्राने काही माणसे जो मरणानंतरचे अनुभव सांगतात त्याचे काही स्पष्टीकरण देता येईल का ? त्यावेळी तर त्याचा मेंदू मृत अवस्थेत असतो. कॉचने काहीच विचार न करता पटकन उत्तर दिले “जर ते त्यांचे अनुभव सांगत असतील तर त्यांचे ज्ञानतंतू निश्चितच त्याचा अर्थ लावत असणार. मला त्यासाठी “डबल ब्लाईंड अभ्यास करावा लागेल” डबल ब्लाईंड म्हणजे
प्रयोग केला जात आहे आणि जे प्रयोग करतात त्या दोघांनाही त्या प्रयोगाचे उद्दीष्ट काय आहे हे न सांगता तो प्रयोग करणे. याचा फायदा असा असतो की दोघांचेही पूर्वग्रह या प्रयोगाच्या आड येत नाहीत.
भाग - ४ समाप्त
जयंत कुलकर्णी.