परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ३

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
28 Jun 2010 - 10:17 am

image006

Reprinted with permission from EnlightenNext magazine,
© 2005 EnlightenNext, Inc. All rights reserved. www.enlightennext.org

परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - १
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - २

माझ्या बाबतीत खरं सांगायचे तर तो लेख डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा ठरला. मेंदू आणि मन यांच्यातल्या परस्पर संबंधाबद्दल माझी स्वत:ची कल्पना विझार्ड ऑफ ऑझ सारखी होती. त्या सिनेमात ते बुजगावणे सारखे “अरेरे मला मेंदू असता तर.... असा मंत्र घोकत असला तरी त्याचे काही अडत नसते. त्या गवत ठासलेल्या आकारात भावना आणी व्यक्तिमत्व जरुर होते आणि त्याच्या आधाराने ते बुजगावणे जीवन जगतच असते याचे मुख्य कारण म्हणजे त्याची माहीती गोळा करायची क्षमता. आता एवढ्या वर्षांनंतर माझ्या या विषयावरच्या कल्पना बर्‍यापैकी परिपक्व झाल्या असल्या तरी हे नाकारण्यात अर्थ नाही की आत्ता जर माझे मत विचारले तर माझे मत मॅक्ससारखेच असेल. पण जर समाजात माझ्यासारखीच माणसे जर बहुसंख्य असतील तर हा प्रश्न गंभीरच मानला पाहिजे. लहान मुलांच्या बाबतीत हे समजू शकते पण ज्यांचे शिक्षण झाले आहे त्यांच्या बाबतीत हे जरा गंभीर वाटते. चेताशास्त्राने कितीही ओरडून सांगितले की आपले वागणे आणि अनुभवाच्या मागे मेंदूच आहे तरीही आपल्यापैकी हे अविश्वसनीयच वाटेल. असे का ? याची बरीच कारणे आहेत. पहिले कारण हे आहे की जर आपण हे मान्य केले तर , “आत्मा जडद्रव्य नाही” हे आजवर उराशी जपलेले तत्व एकदम खोटे ठरेल. ज्यांचा आत्मा इ. विषयांवर विश्वास नाही, त्यांनाही हे मानणे जड जाईल, कारण आपण म्हणजे फक्त मेंदू आहोत हे सहन करणे जरा जडच जाईल. समजा हे मानले तरी आपण आयुष्यभर जपलेल्या कल्पनांचे काय ? मी स्वत: बराच प्रयत्न करुन बघितला पण मी म्हणजे फक्त मेंदूच ही कल्पना काही माझ्या पचनी पडली नाही. याचे कारण मला काही भौतिक जगापलिकडचे अनुभव आलेले आहेत हे नसून, माझे असणे हे फक्त मज्जातंतूच्या कार्यावर अवलंबून आहे असे माझा अनुभव सांगत नाही. ज्या प्रमाणे चेताशास्त्रज्ञ त्यांच्या मतावर ठाम आहेत त्या प्रमाणे मलाही वाटते की “मी” म्हणजे अजून काहीतरी असू शकेल. इथेच सगळी गोची आहे. मी जर मान्य केले की “मी” म्हणजे अजून काहीतरी असेल, तर इतरत्र होते तसेच माझ्याबाबतीतही होणार. धार्मिकबाजूचे लोक जेव्हा विज्ञान त्यांना आव्हान देते तेव्हा याचाच आधार घेतात नाही का ? मग मी जर असाच विचार करणार असेन तर गॅलिलीओच्या वेळेच्या चर्चमधल्या धर्ममार्तंडांच्यात आणि माझ्यात काय फरक आहे ? त्यांनी गॅलिलीओला जी शिक्षा सुनावली त्या मुळे ते अपराधी ठरणार असतील तर माझे काय ?

या परिस्थितीत फरक पडलाय असे मला कोणीतरी सांगितले तर मला निश्चितच बरं वाटेल. आत्तापर्यंतच्या विश्वाच्या शोधात आपण पृथ्वीला विश्वाच्या केंद्रस्थानातून बाहेर ढकलले आहे आणि सूर्याच्या बर्‍याच जवळ पोहोचलो आहे. या संघर्षाचा आत्तापर्यंतचा इतिहास आपण बघितला तर मला वाटते चेताशास्त्राच्या मतावर आपल्याला आता गंभीर्पणे विचार केलाच पाहिजे. निरिश्वरवादी किथ ऑगस्टाईन त्याच्या एका लेखात काय म्हणतो बघा “ जर धर्म आणि विज्ञानाच्या संघर्षाच्या इतिहासात आपण डोकावून बघितले तर आपल्याला हे मानावेच लागेल की धर्माला नेहमीच विज्ञानाच्या म्हणण्यापुढे मान तुकवायला लागली आहे. आपण कधीतरी उलटे झालेले बघितले आहे का ? या एकाच गोष्टीमुळे मला वाटते विज्ञानाचे श्रेष्ठत्व सिध्द झालेले आहे. विज्ञानाने इतक्या प्रश्नांची उत्तरे शोधून काढलेली आहेत की आता सर्व धर्मांनासुध्दा विज्ञानावर आधारित धर्माची आवश्यकता वाटू लागली आहे.

ज्याप्रमाणे या संघर्षात आपण टाकून दिलेल्या दुराग्रही मतांचा खच पडलेला आपल्याला दिसतो, त्या प्रमाणे जेव्हा शास्त्रज्ञ मेंदूवर संशोधन करायला लागतील तेव्हासुध्दा हेच होणार आहे, याची अपेक्षा होतीच. खरं तर आपली अवस्था फार बिकट आहे कारण आपल्याला सत्यच स्विकारायाचे आहे. विज्ञान का धर्मशास्त्र ? या संघर्षात कोणाची बाजू घ्यायची या बद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात द्वंद चालूच असणार. या संघर्षातली ही सगळ्यात अवघड फेरी आहे कारण ही फेरी तुमच्या मेंदूवर आहे. गंमत म्हणजे ज्या धर्मात सत्याची कास धरा हे सांगितले आहे, त्या धर्माच्या पाठिराख्यांसाठी फारच अवघड आहे. या सत्याच्या शोधात आपल्याला स्वत:ला प्रश्न विचारावे लागतील. आपण त्याची प्रामाणिक उत्तरे द्यायला घाबरणार का ? हा ही एक प्रश्न आहेच.

पण एक गोष्ट निश्चित. या संघर्षात मला तिसर्‍या बाजूचा विजय अजुबात नकोय. ती बाजू म्हणजे “अज्ञान” यासाठी मला आजवर मला अनभिज्ञ असलेल्या मेंदूच्या अभ्यासात उडी मारावी लागणार आणि हे सगळे काय चालले आहे हे शोधून काढावे लागणार.

आपल्या सगळ्या अनुभवाच्या मागे आपला मेंदू असतो याचा अर्थ काय? त्याला पुरावा काय ?आणि जर हे खरे असेल तर अध्यात्म, साक्षात्कार हे सगळे खोटे ठरवावे लागेल का ?मेंदू हाच आत्मा असेल का? याचा शोध घेताना माझी जाम दमछाक झाली. अनेक वेळा मी या आणि त्या बाजूला ओढला गेलो. काही वेळा माझी फरफट झाली. या सगळ्यातून माझ्या सर्व शंकांचे निरसन झाले असे म्हणणे धाडसाचे ठरेल पण एक निश्चित, की आजवर मला माझ्या ज्या अवयवाचे सगळ्यात कमी ज्ञान होते त्याची व माझी थोडीशीतरी ओळख झाली – मेंदुची.

ट्कसनची कॉन्फरन्स !
सकाळचे नऊच वाजत होते पण उन्हं चांगलीच तापली होती. मी टकसनच्या “कॉन्फरन्स सेंटर” ला चाललो होतो. उकडून जीव चालला होता. मला तेथे पाहून कोणीही हेच विचारले असते की गावची थंडगार हवा सोडून तू इथे काय करतो आहेस ? पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगायला हरकत नाही की इथेच दरवर्षी जगातले सर्व शास्त्रज्ञ जे “मन आणि त्याचे चैतन्य” या विषयावर अभ्यास करतात, गोळा होतात. येथे होणारी चर्चासत्रे ही एक या विषयावरची मेजवानीच असते. गाडीचे ब्रेक्स लागले तसे मी काचे बाहेर बघितले तर समोरच्या गाडीच्या मागच्या काचेवर लिहीलेले ते मजेशीर वाक्य नजरेस पडले “दोन डुलक्यांच्या मधला काळ : चैतन्य. ते वाचून मला हसू आले.

चैतन्य या विषयावर शास्त्रीय अभ्यास ही कल्पनाच तशी नवी आहे. विज्ञानामधे वस्तूनिष्टतेवर जास्त भर दिला जातो त्यामुळे विज्ञानाकडून हे काल्पनिक वाटणारे शास्त्र तसे उपेक्षितच राहिले आहे. मानसशास्त्राच्या सुरवातीला विल्यम्स जेम्स या शास्त्रज्ञांनी स्वत:च्या मनावर प्रयोग करुन आणि त्याची टिपणे करुन याच्या अभ्यासाला चालना दिली. त्यानंतर १९०० सालाच्या सुरवातीला वॅटसन यांनी माणसाच्या वर्तवणूकीचा वस्तूनिष्ट अभ्यास करायच्या पध्दती शोधून या शास्त्राला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यात त्यांनी निरिक्षणाला फार महत्व दिले होते. या सगळ्यामुळे विज्ञानात त्या पध्दती मान्यता पावल्या. १९६० मधे कॉग्निटीव्ह मानसशास्त्राचा जन्म झाल्यावर ( याचा अर्थ मला समजला तो असा – ज्ञान किंवा अनुभूती या संदर्भात होणारी वैचारिक किंवा मनाची कार्यप्रक्रीया) चैतन्य हा शब्द परत ऐकू यायला लागला. या शास्त्रामधे मेंदूमधे होणार्या् क्रियांचा अभ्यास केला जातो. उदा. दिसते म्हणजे मेंदू मधे नक्की काय होते ? गणित सोडवताना मेंदूत काय होते ? भाषा म्हणजे मेंदूच्या दृष्टीने नेमके काय? आपल्याला आठवते म्हणजे मेंदूत निश्चित काय होते? इ.इ. पण या आभ्यासाला खरे महत्व प्राप्त झाले ते ख्रिस्टॉफ कॉच आणि क्रिक या द्वयीने देवाचे आणि आत्म्याचे अस्तित्व नाही हे सिध्द करण्यासाठी चेताशास्त्राची मदत घेतली तेव्हा. चेताशास्त्राचा उपयोग त्यांनी चैतन्याची वस्तुनिष्ठ व्याख्या करायला घेतली तेव्हा मात्र या जगतात खळबळ उडाली. ( चैतन्य म्हणजे मला येथे conscienceness असे म्हणायचे आहे. याला योग्य असा शब्द जो सर्व ठिकाणी चपखलपणे वापरता येइल असा न सापडल्यामुळे माझी बर्यागच ठिकाणी गडबड उडाली आहे हे मी मान्य करतो. त्या मुळे आपलीही गडबड उडण्याची शक्यता आहे हे मी नाकारत नाही).

हे संशोधन जेव्हा १९९४ साली मांडले गेले. यावर आणि या नंतरच्या संशोधनावर २००४च्या चर्चासत्राचा पाया घातला गेला. ही चर्चासत्रांना मी उपस्थिती लावली होती. जे मी बघितले त्या वरुन मी म्हणतो की चैतन्याचा अभ्यास हा एक महत्वाचा विषय तेव्हाच झाला होता.आत्ता मी जेव्हा या सभागृहात प्रवेश केला तेव्हा सगळे सभागृह तुडूंब भरले होते. एक खुर्ची पकडून मी उत्सुकतेने वाट पाहू लागलो. कॅमर्स आणि मंडळींनी व्यासपीठाव्र प्रवेश केला आणि सभागृहात शांतता पसरली. १९९४ पासून या विषयावर चर्चा, वाद यांचे नाव घेता होणे जरा अशक्यच आहे.

जयंत कुलकर्णी.
भाग - ३ समाप्त.

इतिहाससमाजतंत्रविज्ञानलेख

प्रतिक्रिया

युयुत्सु's picture

28 Jun 2010 - 11:10 am | युयुत्सु

देव दानवा नरे निर्मिले
हे मत लोकां कळवूं द्या
काठोकाठ भरूं द्या पेला
फेस भराभर उसळूं द्या

-केशवसूत

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

जयंत कुलकर्णी's picture

28 Jun 2010 - 2:03 pm | जयंत कुलकर्णी

\\देव दानवा नरे निर्मिले
\\हे मत लोकां कळवूं द्या

हे आवडले. पुढच्या ओळी ........... :-)
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

युयुत्सु's picture

28 Jun 2010 - 5:31 pm | युयुत्सु

काठोकाठ भरुं द्या प्याला फेस भराभर उसळू द्या
प्राशन करता रंग जगाचे क्षणोक्षणी ते बदलू द्या
आमुच्या भाळी कटकट लिहीली सदैव वटवट करण्याची
म्हणेल जग आम्हास मद्यपी पर्वा कसली मग याची

जिव्हेची बंधने तर ढिली करा तीव्र या पेयाने
यदुष्णतेने द्यावापृथ्वी द्रवूनी मिसळती वेगाने

होऊनिया मग दंग मनी
व्हावे ते आणा ध्यानी
गा मग सूचतील ती गाणी

परसूनी त्यांचे शब्द रूढींचे दास झणी ते खवळूं द्या || काठोकाठ...

क्लृप्तीची तर मग करूनी नौका व्योमसागरावरी जाऊ
उडुरत्ने ही गरीब धरेला तेथून फेकुनिया देऊ

अडवतील ते देव जरी
झगडु त्यांच्याशी निकरी
हार न खाऊ रतिभरी

देव दानवा नरे निर्मिले हे मत लोका कळवूं द्या || काठोकाठ ...

पुढची कविता आठवत नाही. पाठ केल्याला ३५ वर्षे झाली.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

प्रकाश घाटपांडे's picture

28 Jun 2010 - 5:36 pm | प्रकाश घाटपांडे

अरे वा! एवढी का होईना कविता एकदम तोंडपाठ! लई भारी कविता आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.