Reprinted with permission from EnlightenNext magazine,
© 2005 EnlightenNext, Inc. All rights reserved. www.enlightennext.org
आता इतिहासात डोकावले तर मात्र असा गोंधळ त्या काळातल्या घटनांबद्दल होत नाही किंवा झालाच तर बराच कमी होतो. गॉर्डन ब्रुनोच्या जिभेतून तापती सळई घालून त्याला जिवंत जाळण्यात आले, कारण काय तर त्याने असे जाहीर केले की विश्वात आपल्या सूर्यासारखे अनेक सूर्य तळपत आहेत. चर्चच्या या अशा क्षुद्र मनोवृत्तीचा आणि वागण्याचा मी आता अगदी सहज धिक्कार करु शकतो. गॅलिलीयोच्या खटल्याचा खरा निकाल काय लागायला पाहिजे होता हे ही मी ठामपणे सांगू शकतो. पण आपण जरा पुढे आपल्या आत्ताच्या काळात आलो की या विचारांचे पाणी गढूळ व्हायला सुरवात होते. उदा. उत्क्रांतीवाद वि. उत्पत्तीवाद यांच्यातला वाद. या प्रसिध्द वादात कर्मठ चर्चचा असा आग्रह आहे की बायबलमधला उत्पत्तीवाद हा विचारप्रवाह शाळांमधे शिकवण्यात यावा. हे तर मी समजू शकतो. पण जेव्हा उत्क्रांतीवादी सिध्द न झालेल्या निओ-डार्वीन तत्वांचा उपयोग करुन शाळांमधे आमच्या मुलांना जेव्हा पटवू पहातात की ते एक प्रयोजनशून्य जगात रहात आहेत, तेव्हा माझा विज्ञानावरचा विश्वास परत डळमलीत होतो. अर्थात जर हा हा संघर्ष याच वादाने थांबणार असेल तर मी माझे मत मात्र विज्ञानाच्या पारड्यातच टाकीन हे निश्चित. त्यासाठी मला वाट थोडीशी वाकडी करावी लागली तरी चालेल. पण सध्याचे वातावरण पहाता हा संघर्ष इतक्यात थांबण्याची काही लक्षणे दिसत नाहीत. खरंतर विज्ञानाच्या भात्यात दोन भरवश्याची अस्त्रे सामील झालेली आहेत त्यामुळे विज्ञानाचे पारडे जड झाले आहे असे मला वाटते. या अस्त्रांमुळे विज्ञानाचे लक्ष आता माणसाचे मनच आहे. म्हणजे जेथून विचार उगम पावतात त्याचाच अभ्यास केला की बराचशा बाबींचा उलगडा होईल.
पहिले शास्त्र आहे उत्क्रांतीमानसशास्त्र. याचेच पहिले नाव जैविकशास्त्रज्ञ एडवर्ड विल्सन याने ठेवले होते “समाजजीवशास्त्र” लोकप्रिय मासिकांमधे याचा बराच बोलबाला होता कारण यात त्यात माणसाच्या एकपत्नीव्रता, गोल्फचे प्रेम, नैतिक संताप अशा मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून अवघड अशा गोष्टींची :-) चर्चा केली जात होती. या नव्या अस्त्राचा वापर करुन हे लोक माणसाचे वागणे, अगदी नि:स्वार्थीपणापासून ते अध्यात्मीक जडण घडण हे एका चौकटीत बसवत आहेत. त्यामुळे एक फायदा झाला की ज्या गोष्टी विज्ञानाच्या विश्लेशणाच्या परिघाबाहेर होत्या त्या आता बर्याच प्रमाणात विज्ञानाच्या भिंगाखाली आल्या आहेत. जरी उत्क्रांतीमानसशास्त्राने डार्वीनचा सिध्दांत हा विश्लेशणाचे एक टोक आहे तरी एक लक्षात घेतले पाहिजे की ती त्याची तात्विक स्पष्टीकरणाची ताकद आहे, ते प्रयोगाने सिध्द करू शकत नाहीत. यामुळे या अस्त्राची ताकद तशी मर्यादितच म्हटली पाहिजे. पण त्यांचे खर ताकदवान अस्त्र होऊ शकते ते म्हणजे “न्युरोसायन्स” म्हणजे चेताशास्त्र. हे शास्त्र मधल्या बर्याच गाळलेल्या जागा भरु शकते. यासाठी या शास्त्रामधे मेंदूचे कार्य समजवून घ्यायची ताकद असलेले काही मार्ग आहेत. या शास्त्राचा शोध लावणारे आणि यात संशोधन करणारे शास्त्रज्ञ यांना एकदाच हे सिध्द करायचे आहे की मन, भावना, बुध्दी या सगळ्या बाबी या तीन पौंडाच्या मेंदूची करामत आहे आणि दुसरे काही नाही. नोबेल पारितोषिक विजेते फ्रान्सीस क्रिक जे म्हणतात “तुम्ही, तुमचा आनंद आणि दु:खे, तुमच्या आठ्वणी, तुमची ध्येये, तुमची स्वत:ची स्वत:ला असलेली ओळख, स्वतंत्र विचार इ.इ. हे सर्व मज्जातंतूंच्या असंख्य पुंजक्यातल्या पेशींचे आणि त्यांच्या संपर्कात येणार्या त्यांच्या अणूंचे वागणे आहे, बाकी काही नाही. तुम्ही म्हणजे अशा पेशींचा एक ढिगारा आहात........” शास्त्रज्ञांना हेच एकदा सिध्द करुन दाखवायचे आहे.
माणसाच्या बौध्दीक विश्वात आणि त्याच्या जाणिवेच्या जगात मेंदूचे कार्य फार महत्वाचे आहे हे सगळ्यांनी या शतकाच्या प्रारंभीच मान्य केलेले आहे. सारासारविवेक बुध्दी कमी होते का ? त्याच्या बौध्दिक आणि भावविश्वात मेंदूचे काम काय आहे ? याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा मार्ग फार काटाकुट्याचा आहे.
काही वर्षांपूर्वी न्युयॉर्क टाईम्सच्या “शरीर आणि आत्मा यांच्यातील द्वंद्व” या लेखात मानसशास्त्रज्ञ पॉल ब्लूम यांनी त्यांच्या सहा वर्षाच्या मुलाबरोबर झालेला संवाद नमूद केला होता. मॅक्सला म्हणजे त्याच्या मुलाला त्यांनी एक साधा प्रश्न विचारला “मेंदूचे काम काय ?” त्याने थोडा विचार करुन उत्तर दिले. तो म्हणाला “ तो फार महत्वाचे काम करतो. मी जो विचार करतो ते काम तोच करत असतो.” हे येथपर्यंत ठीक आहे. पण पुढे तो म्हणाला “माझ्या दु:खाशी किंवा भावाशी होणार्या भांडणाशी किंवा प्रेमाशी त्याचा काही संबंध नाही. ते सगळे मी करतो. पण मला वाटते मेंदूची त्यासाठी मला मदत होत असेल” हे त्या मुलाचे शब्द नाहीत, तो जे बोलला त्यातून काढलेला अर्थ आहे. श्री. ब्लूम हे चेताशास्त्राच्या बाजूचे असल्यामुळे ते पुढे म्हणतात “लहान मुले मेंदूला त्यांच्या जाणीवेतल्या अनुभवांचा आणि इच्छांचा स्त्रोत मानत नाहीत. ते त्याला एक साधन समजतात, जे ते बौध्दीक कार्यासाठी वापरतात. ते एक असे ज्ञान आहे की जे त्यांचा आत्मा त्यांची गणिती क्षमता वाढवायला वापरतो”.
दुर्दैवाने आजही वयाने मोठ्या असलेल्या माणसांचेही हेच म्हणणे आहे.
भाग - २ समाप्त.
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
24 Apr 2017 - 7:48 am | सतिश गावडे
अगदी हाच आशय असलेले मी एक पुस्तक वाचले होतं
Synaptic Self: How Our Brains Become Who We Are
जोसेफ लिडक्स नावाच्या प्रसिद्ध चेताविज्ञान शास्त्रज्ञाने लिहीलेलं हे पुस्तक आहे.
हे पुस्तक वाचल्यानन्तर आणि त्यातील मते इतर पुस्तकांमधून पडताळून पाहिल्यानंतर लक्षात आले की भारतीय जनमानसात, साहित्यात मनाबद्दल जी कल्पना आहे, तो नुसताच कल्पनाविलास आहे.
24 Apr 2017 - 9:48 am | प्रकाश घाटपांडे
परमेश्वर हा मनाचा कल्पनाविलास आहे असे मानले तर मनाचे स्थान मेंदुत आहे सबब परमेश्वराचे उगमस्थान मेंदु आहे या मांडणीचा आता प्रभाव विज्ञानात दिसतो. पण मनाच्या अमूर्त स्वरुपामुळे त्याचे साहित्यातील स्थान अढळ आहे हे नक्की!