‘ती आज येईल, तेव्हा तिला सांगेन,’ मनोहर कॅमेऱ्याची लेन्स पुसता पुसता स्वतःशीच म्हणाला. ‘तिला कळत नसेल, असं नाही, पण तिच्या लक्षात आलं नसेल. आपल्यातरी कुठं लक्षात आलेलं आधी!?’ सोनेरी फ्रेममधून त्याने बाहेर नजर टाकली. पाचगणीचा table land सकाळच्या कोवळ्या उन्हात फार लोभस दिसत होता. आज या batchला घेऊन जायचं होतं. आधी या मैदानावरून एक चक्कर, मग दऱ्याखोऱ्यात , जंगलात .....निसर्गाची प्रत्येक फ्रेम सुंदर, कशाचेही फोटो काढा! .... अठरा मुलंमुली, वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या. आज तिसरा, उद्या शेवटचा दिवस. उद्या संध्याकाळी सगळे पांगतील. पुन्हा गाठ पडतील, न पडतील.... मनोहरला हे नवे नव्हते. गेली कित्येक वर्षे तो व्यावसायिक फोटोग्राफर म्हणून काम करत होता. बरीच वर्षे जाहिरात क्षेत्रात काढल्यावर, तो आपल्या या पाचगणीच्या वडिलार्जित घरी परतला होता. फोटो काढणे हा त्याचा श्वास होता. रक्तात होतं. मागील काही वर्षापासून त्याने नव्या तरुणाईला फोटोग्राफी शिकवण्यासाठी, एक दिवस ते एक आठवड्यापर्यंत अशा वेगवेगळ्या कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली होती. तो शिकवत होता, स्वतः वेगळ्या अर्थाने समृद्ध होत होता. त्याच्या भटक्या, कलंदर मनाला outdoor म्हणजे नितांत सुंदर वाटे. ‘फोटो काढता येणार नाही, अशी फ्रेम अजून जगात तयार झाली नाही, फक्त त्यासाठी नजर पाहिजे,’ हे त्याचं लाडकं मत. बाहेर बघता बघता, त्याला स्वतःच्या या लाडक्या मताची परत आठवण आली, ‘काही लाडकी मतं, लाडक्या माणसामुळे बदलू शकतात...’ त्याला काही आठवले, आणि डोळ्यात किंचित हसू उमटले....
‘ती आज येईल, तेव्हा तिला सांगेन,’ तो परत स्वतःशीच म्हणाला.... आणि बाहेर पाहू लागला.
..........
किती वर्षे उलटली या गोष्टीला? काळाने शिळ्या होणाऱ्यातली ही गोष्ट नव्हे. हिरवेगार गवत मऊ मऊ असायचे. आल्प्सच्या दऱ्याखोऱ्यातून रांगत येणारे ऊन कोवळे कोवळे असायचे. सोनेरी स्वच्छ उन्हात दिवसच्या दिवस भटकत जायचो. मार्था म्हणायची, ‘अरे, कॅमेरा इतका घट्ट धरू नये हातात. स्थिर असणे आणि घट्ट धरून ठेवणे यांचा काही संबंध नाही.’
हिरव्यागार गवतावरची इवली इवली फुलं, मार्था हसायची तर तिच्या डोळ्यांत डुलायची. म्हणायची, ‘आल्प्सची purity क्लिक व्हायला, आधी नजर नितळ व्हायला पाहिजे. लेन्स तंत्र आहे, नजर जान आहे.’
हॉलस्टेटच्या नितळ सरोवराचे मौन तिच्या दिवसभराच्या बडबडण्यात किणकिणायचे. म्हणायची, ‘मन, तुझ्या देशात सगळेच रंग जरा जास्त भडक असतात, नाही?’ तिच्या गर्द निळ्या डोळ्यात उतरत मी केवळ होय म्हणायचो. तिला आनंद व्हायचा. केवळ फोटो पाहून भारत ओळखू पाहणाऱ्या त्या गोऱ्या मुलीला मी दुसरं काय सांगणार?
का कोण जाणे, माझे लक्ष युरोपातील निसर्गापेक्षा तिथल्या माणसांकडे, सुंदर आखीव, सुबक इमारतींकडे आणि पुतळ्यांकडे जास्त जाई... निसर्ग सगळीकडे सारखाच असतो, अशी त्यावेळी माझी अडाणी समजूत होती.
चालता चालता मार्था मध्येच थांबे, दूर आल्प्सच्या एखाद्या सुळक्याकडे नजर टाकी, म्हणे, ‘मन, हा माझा आल्प्स आणि तुझा हिमालय same same but different different आहेत. तुला हे same काय, different काय, कळू लागेल तेव्हा, तुझे फोटो बघ कसले भारी येतील!’ मी नेहमीप्रमाणे केवळ हसायचो.
म्हणायची, ‘सारखं या यंत्राशी खेळू नये.’ ज्या बास्केटमध्ये खायला घेऊन यायची, त्यातच मग ड्रोइंगचे कागद, पेन्सिली, रंग, ब्रश, लाकडी pads घेऊन यायची. म्हणायची, ‘आज नो कॅमेरा, आज चित्रं काढू...’ एखादे सरोवर, किवा नदीकाठ बघून तिथे आमचा औट घटकेचा संसार मांडायचो. तिचे सगळे टापटीपीत चाललेले असे. ती pad ला नीट कागद लावे, रंग, ब्रश, पेन्सिली सगळे ओळीने मांडून ठेवी. म्हणे, ‘इथं सगळं आहे, पाहिजे ते घे!’ तिचा उत्साह आणि निरागसपणा पाहून माझे मन तिच्या भोवती पक्ष्यासारखे भिरभिरत जाई.
डोळ्यांना सुख देईल, अशी एक निसर्गाची फ्रेम तिच्या नजरेत आली कि मग तिची तंद्री लागे. तिच्या त्या सगळ्या मोहक हालचाली पाहण्यात माझे कागद बराच वेळ कोरे रहात. ती जेव्हा, चित्र काढण्यात मग्न होई, तेव्हा आता आपण आपले चित्र काढावे, हे मला कळे.
.......
हॉर्नच्या आवाजाने तो एकदम भानावर आला. जराशा अंतरावर बस थांबली होती. ‘These young photographers…’ स्वतः शीच म्हणत त्याने कॉफीचा मग हातात घेतला. त्याची नजर तिचा शोध घेऊ लागली. नेहमी प्रमाणे ती सगळ्यात मागे. शेवटी. Sack ची एक वादी गुडघ्यापर्यंत लोंबकळणारी, क्लचरमध्ये न बसणारे, तोंडावर, मानेभोवती अस्ताव्यस्त उडणारे केस. फेंगाडे पाय टाकीत, एका हातात कॅमेरा छातीशी धरून ती येत होती.... तिचा हा अवतार पाहून तो जरा वैतागलाच, ‘How clumsy! Be a little bit smart, lady!’ तो स्वतःशीच म्हणाला. गेल्या दोनतीन दिवसात त्याने या मुलीला पाहिले होते. बाकीच्या सगळ्या टीप top तरुणाई मध्ये तीच एक वेंधळी दिसे. नाव भूमी.... पहिल्याच दिवशी त्याने तिचे क्लिक्स पहायला घेतले आणि पहात राहिला. अप्रतिम फ्रेम्स. तांत्रिक सफाई बऱ्यापैकी होती. जे कॅमेऱ्यात पकडले होते, त्यात जान होती. जिवंतपणा होता. तिचे angles सहसा बरोबर असत. कुठल्याही फोटोत मी आता जगावेगळ काही कैद करून दाखवणार आहे, असा आव नव्हता, कि जो बाकीच्या सगळ्या फोटोग्राफर्स मध्ये सहसा असतो. रंगसंगती डोळ्यांचे सांत्वन करणारी होती.....
एका फोटोपाशी तो थांबला, बराच वेळ पहात राहिला. गुलाबाच्या फुलाचा फोटो होता. कुठल्या तरी बागेत आलेलं फूल असावं. दोन गर्द रंगाच्या कलमांचं..... फूल उन्हाने थकले होते, किंचित झुकले होते....
‘हिला सांगितलं पाहिजे, हिला नक्की कळेल. आजपर्यंत आपण हे कुणाला सांगितले नाही... पण हिला सांगू... ही मुलगी समंजस आहे,’ तो स्वतःशीच म्हणाला.
......
परवा दिवशी भारतात परत निघणार होतो. मार्थाबरोबर दुपारी कॅमेरा घेऊन बाहेर पडलो. भटक भटक भटकलो. ना ती बोलत होती, ना मी हसत होतो! सगळे कसे अबोल अबोल झाले होते! शेवटी एक भला मोठा, विस्तीर्ण पार्क लागला. उंच उंच झाडी. नजर पोहोचेल तिथपर्यंत लांबच लांब मऊ मऊ गवताचे हिरवेगार गालिचे. युरोपच तो... नाना तऱ्हेची नखरेल फुले! माझे मन कुठेच लागत नव्हते. ती तिच्या कॅमेऱ्याची लेन्स पुसत एका झाडाच्या बुंध्याशी बसली होती. मी तिच्याकडे पाहिले. किती तन्मयतेने ती तिचं काम करत होती! मी मग जरा दूर गेलो, तर तिथे आख्खे गुलाबाचे रान दिसले. मला भारताची आठवण आली. मी फोटो काढायला सुरुवात केली. युरोपातले ऊन असून असून किती कठोर असायचे! पण तेवढ्यानेही त्यातली काही फुले थकून गेली होती, त्यांनी किंचित माना झुकवल्या होत्या. मी फोटो काढले. मार्थाजवळ जाऊन बसलो, मी काढलेले फोटो ती पहात होती. बराच वेळ झाला तरी, ती काही बोलेना, कि मान वर करून बघेना. माझे मन भरून आले. मी हळूच म्हणालो, ‘मार्था डियर .....’ मग, तिने एक झुकल्या फुलाचा फोटो माझ्यासमोर धरला, म्हणाली, ‘थकल्या, झुकल्या फुलांचे फोटो काढू नयेत.’ तिचा आवाज कंप पावत होता. मी तिच्या हातांवर हात ठेवला.... तो मांसल, उष्ण स्पर्श कायमचा या तळहातावर कोरला गेला.
निघायच्या दिवशी विमानतळावर निरोप द्यायला आली. मी सहज कॅमेरा बाहेर काढला, तिचा एक फोटो घ्यायचा होता. निघताना. शेवटचा. परत आयुष्यात भेटेल, न भेटेल असे हे साजिरे सौख्य कायमचे कॅमेऱ्यात कैद करायचे होते. मी तिच्याजवळ गेलो, गालाला गाल लावले, म्हणालो, ‘तुझा एक फोटो काढू दे!’ माझी बाही लहान मुलीसारखी धरत म्हणाली, ‘थकल्या,झुकल्या फुलांचे फोटो काढू नयेत.’ माझे अवसान गळाले. कॅमेरा फट्कन बाजूला ठेवला, आणि तिला मिठीत घेतले. फुलांचे अडसर किती जीवघेणे असतात! जीव जात नाही, अन रहातही नाही.
......
दिवसभर सगळे भटक भटकले. हळूहळू ग्रुप पडले. फोटो काढता काढता ग्रुपमधले सगळे एकेकटे होत गेले. सगळे इकडे तिकडे पांगत गेले. प्रत्येकाचे जग निराळे होत गेले. मनोहरच्या काही ठराविक जागा होत्या, तिथे तो थांबे. तो सगळा परिसर त्याने शेकडोवेळा वेगवेगळ्या मौसमात आपल्या कॅमेऱ्यात कैद केला होता. एरवी तो शांतपणे डोळे मिटून बसला असता. पण आज त्याला तिला ती गोष्ट सांगायची होती, म्हणून जरा तिच्या लक्षात येणार नाही अशा रीतीने तिच्या मागोमाग चालला होता. ती कधीचीच एकटी पडली होती. ती कुणाच्या ग्रुपमध्ये तशी नव्हतीच. दुपार होत आली, तसा तो जरा रेंगाळला. त्याने आडोशाला उभे राहून तिच्याकडे टक लावून पाहिले. ती एका झाडाच्या बुंध्याशी बसून बाकीच्या लेन्स पुसत होती. किती मनापासून तिचं ते काम चाललं होतं! तो हळूहळू तिच्या जवळ गेला. त्याला पाहून ती हसली. तो ही हसला. झाडाच्या सावलीत बसत म्हणाला, ‘तुझे आधीचे क्लिक्स आणखी एकदा पाहू!’
‘कशाला?’ तिने खटयाळपणे विचारले. मनोहर मात्र आश्चर्याने सर्द. जिला आपण इतकी वेंधळी, गबाळी, अबोल समजत होतो, ती कशाला परत फोटो पहायचेत असं बिनधास्त हसून विचारतेय! पण त्याला हे आवडले. तो हसून म्हणाला, ‘बघू, मला काय कळतंय का तुझ्या फोटोमधलं!’
तिने कॅमेरा त्याच्या हातात दिला. तो क्लिक क्लिक करत त्या गुलाबाच्या फोटोपाशी गेला.... उन्हाने थकलेले, किंचित झुकलेले.... तिला म्हणाला, ‘हा फोटो बघ!’
ती जागेवरून न उठता दुरूनच म्हणाली, ‘गुलाबाचा ना!’
त्याला परत आश्चर्य वाटले, ‘तुला कसं काय माहित, मी कोणत्या फोटो विषयी बोलतोय ते!’
‘पहिल्या दिवशी तुम्ही त्या फोटोकडे फार वेळ बघत होतात, म्हणून अंदाज केला. विशेष काही नाही.’
‘तू फोटो छानच काढतेस. एवढंच सांगायचं होतं कि.......’
‘थकल्या, झुकल्या फुलांचे फोटो काढू नयेत!’
त्याने चमकून तिच्याकडे पाहिले. ‘तू.... तू.... तुला कसं काय माहित हे? हे तुला कुणी सांगितलं ?’
‘माझा दादा जर्मनीतल्या विद्यापीठात संस्कृत शिकतोय. त्याने मागच्या उन्हाळ्यात मित्रांबरोबर ऑस्ट्रियात फोटोग्राफिचा छोटासा कोर्स केला होता हौस म्हणून. तिथल्या tutor ने हे त्याला आवर्जून सांगितलेय. त्याच्या मनात ते वाक्य कायम. सुट्टीत आल्यावर त्याने मला मुद्दाम हा फोटो दिला, आणि कशाचे फोटो काढू नयेत, ते सांगितले. हा फोटो पण तिथल्याच एका बागेतला आहे. त्यानेच काढलेला.’
‘ओह....’ मनोहर एवढेच कसंबसं म्हणाला.
........
पुढचे बरेच दिवस ना त्याने कुठला कॅमेरा हातात घेतला, ना कुठे कुणाच्या निरोपाला उत्तर दिले, ना त्याच्या त्या नेचर क्लबमध्ये गेला!
सकाळ संध्याकाळ त्या टेबल land वर एकटा फिरून यायचा. मनात हजार विचार येत.
‘भूमीला विचारून, तिथून तिच्या भावामार्फत ती tutor गाठणे काहीच अवघड नाही. आजच्या या नेटच्या जमान्यात तर नाहीच नाही. ती मार्थाच असणार. फोटोग्राफीच्या तंत्रात असला हळवा धडा देणारी तीच! इतक्या वर्षांनीही ती असाच विचार करते!!? असणार, आपण नाही का इतक्या वर्षांनंतरही तिचे ते वाक्य अजून प्रमाण मानून चालत! थकल्या, झुकल्याच काय पण कुठल्याच फुलांचे फोटो आपण त्यानंतर आजही काढले नाहीत. फुले झाडावेलींवर बघतो. कुठेतरी मनाच्या आरपार कोपऱ्यातली मार्था हसते. मी ही भुलतो, क्षणभर हसतो, आणि कॅमेऱ्याचा फोकस बदलतो. आज तिची भेट झालीच.... तर, तर काय होईल?... नको, आता ते फुलांचे जीवघेणे अडसर पार करायची शक्ती राहिली नाही....! मार्था, तुझे बरोबर आहे, अशा थकल्या, झुकल्या आयुष्याचेही नव्याने फोटो काढू नयेत.’
त्या दिवसांत मनोहर थकून फार लवकर झोपी जाई.
शिवकन्या
प्रतिक्रिया
11 May 2018 - 11:04 am | अनिंद्य
@ शिवकन्या,
हळुवार, ओघवतं आणि सौष्ठवपूर्ण लेखन.
न जानें क्यों ये पढ़ते हुए कहीं दूर से अख्तरी बेगम के स्वर कानों में घुलते-पिघलते से लगे....
अनिंद्य
11 May 2018 - 12:42 pm | शिव कन्या
होय, हुरहूर लागणार....
धन्यवाद.
11 May 2018 - 11:28 am | शाली
वाह!
सुरेखच! लेखनशैली तर भारीच!
तुमचे ईतर लिखानही वाचायला घेतोय.
11 May 2018 - 12:43 pm | शिव कन्या
माझ्या इतर लेखनाने तुमचा अपेक्षाभंग होणार नाही, ही आशा.
वाचत असल्या बद्दल धन्यवाद.
11 May 2018 - 11:30 am | अभ्या..
ओहहहह,
फार दिवसांनी असे वाचायला मिळाले.
थँक्स शिवकन्या.
11 May 2018 - 12:45 pm | शिव कन्या
तुमच्या सारख्या कलावंताची दाद या कथेला मिळाली, यात सगळं आलं.
मनोहर तुमच्या पर्यंत पोहचला, समाधान वाटले.
धन्यवाद.
11 May 2018 - 12:15 pm | जागु
सुंदर.
11 May 2018 - 12:21 pm | एस
हळवी आणि सुंदर कथा. पण एखाद्या अपूर्ण पोर्ट्रेटप्रमाणे वाटली.
11 May 2018 - 6:36 pm | शिव कन्या
यशोधरा ताई म्हणतात त्या प्रमाणे अपुर्णतेतच गोडी.
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.
11 May 2018 - 1:21 pm | नीलकांत
अतिशय तलम लिहीलं आहे. लेखन खिळवून ठेवतं. सुंदर कथा. आवडली.
- नीलकांत
11 May 2018 - 6:42 pm | शिव कन्या
वाचत असल्या बद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
11 May 2018 - 1:26 pm | यशोधरा
तरल.. गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा.. आठवलं.
11 May 2018 - 6:43 pm | शिव कन्या
अपूर्णतेची गोडी आणि त्या प्रेमाची कमी दोन्ही आयुष्याला व्यापून उरतात.
धन्यवाद.
11 May 2018 - 1:29 pm | पद्मावति
आहा...काय लिहिलंयस गं. तरल आणि सुंदर. केवळ अप्रतिम.
11 May 2018 - 1:59 pm | श्वेता२४
फारच भावूक आणि मनाला स्पर्श करणारं लिहीलंत. निव्वळ अप्रतीम .
11 May 2018 - 3:25 pm | अनुप ढेरे
मस्तं लिहिलय!
11 May 2018 - 6:45 pm | शिव कन्या
आपल्या वाचून प्रतिक्रिया दिलीत, आभार.
11 May 2018 - 6:45 pm | शिव कन्या
कथा वाचून प्रतिक्रिया दिलीत, आभार.
11 May 2018 - 5:55 pm | अनन्त्_यात्री
गालबोट नसतं तर लेखन अधिक भिडलं असत.
11 May 2018 - 6:41 pm | शिव कन्या
मलाही लिहिताना हे जाणवले. पण ते गालबोटा इतके वाटत असेल, तर परत विचार केला जाईल.
पुनर्लेखन करताना, काही सुधारणा करता येईल का ते नक्की पाहीन.
उत्तम वाचन.
प्रांजळ अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
11 May 2018 - 7:11 pm | नाखु
आणि अव्यक्त दोन्ही आवडलं
गुमराह मधील ,"वो अफसाना "हेच कडव तंतोतंत लागू पडते
वाचकांची पत्रेवाला नाखु
11 May 2018 - 7:49 pm | खिलजि
असं आठवणींना साथ देणारं
अचानक कुणीतरी भेटतं
अन मग इथं पुढं आलेलं आयुष्य
परत मनाला भूतकाळात रेटतं
लिखाणात तो वेग, ती गहनता अशीच कायम आहे
हीच तर तुमची ताई , खरं गम्मत आहे
मस्तंय लेख शिवकन्या ताई आणि त्यातील अपूर्णता हा त्याचा आत्मा आहे . मला आवर्जून यावर व्यक्त व्हावंस वाटलं म्हणून अभिप्राय देत आहे . पुलेशु
सिद्धेश्वर विलास पाटणकर
12 May 2018 - 9:37 am | शिव कन्या
आवर्जून व्यक्त झालात, छान वाटले.
वाचत असल्याबद्दल धन्यवाद .
11 May 2018 - 9:14 pm | मीता
अगदी तरल
12 May 2018 - 2:32 am | रातराणी
सुरेख!!
12 May 2018 - 9:39 am | शिव कन्या
आभार.
रच्याकाने, रातराणी अलिकडे लेखन दिसले नाही तुमचे? लिहित्या रहा, आम्ही वाचते राहू.
14 May 2018 - 6:19 pm | माहितगार
!
14 May 2018 - 8:05 pm | राही
कुठे कुणाच्या जुळल्या गाठी
त्या झुकल्या सुमनाची गाथा स्मृती अजूनही गाती!
अपरिमित अपुरेपणा हेच तर मानवाचे जगणे.
कथा आवडली. फोटोग्राफी हा विषय चित्राच्या वॉशसारखा घेऊन एक सुंदर प्रेमकथा मराठीत लिहिली गेली आहे. अनंत सामंताची 'ओश्तोरीज'. कॅमेरा, लेन्स आणि भोवतालची जीवसृष्टी यांचं एक तरल नातं त्यांत उलगडलं आहे. अर्थात ओश्तोरीज आणि या कथेचे पोत आणि मध्यवर्ती सूत्र अगदीच वेगळे, पण या कथेने जुनी आठवण जागी केली.
15 May 2018 - 9:18 pm | शिव कन्या
नाही, अनंत सामंत यांची 'ओश्तोरीज' नाही वाचली. आता वाचणार.
रसिकतेने वाचन केलेत, आवडले.
धन्यवाद.
14 May 2018 - 8:34 pm | मिसळपाव
शिवकन्या,
फार छान लेखन आहे हे. परवा एक परिच्छेद वाचून थांबलो. माझा अंदाज होता त्याप्रमाणेच झालं. दोन दिवसानी वेळ काढून, निवांतपणे घुटके घेत चहा प्यावा तशी वाचली. व्वा! असं लेखन हवं - शब्द वाचताना डोळ्यांपुढे दृष्य उलगडत गेलं पाहिजे. मला वाटतं 'एक माणूस मिशी काढून' तुमचीच आहे ना? त्यानंतर दोन-तीन पोस्टस् वाचली होती. आता "अधली-मधली छान टपोरी, फुले नेमकी होती हुकली" असं झालं आहे का बघतो!
तुम्ही अनिल बर्वेंची पुस्तकं वाचली आहेत का? नसल्यास 'स्टडफार्म' पासून सुरुवात करा. त्यानंतर 'डोंगर म्हातारा झाला', 'थँक्यू मिस्टर ग्लाड', 'अकरा कोटी गॅलन पाणी' पण वाचा हे मला सांगायला लागणार नाही :-). त्यांचं नाव घेतलं कारण छोट्या-छोट्या वाक्यातनं नेमका आशय सांगणं ही त्यांची हातोटी मला या तुमच्या कथेत जाणवली.
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.
15 May 2018 - 9:15 pm | शिव कन्या
सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. 'एक माणूस मिशी काढून' माझीच.
अनिल बर्वे यांचे ''थँक्यू मिस्टर ग्लाड', आणि 'बेगम बर्वे' वाचलेय. पण बाकीची आता वाचणार. पुस्तके सुचवल्या बद्दल आभार.
कथेच्या प्रकृती नुसार वाक्ये येत जातात मनात.
15 May 2018 - 7:54 am | प्राची अश्विनी
सुंदर!
15 May 2018 - 5:17 pm | सविता००१
आधी फेसबुक वर वाचून प्रतिक्रिया दिलीच होती तुला. तरीपण परत...
खूप खूप हळवं आणि कातर करून टाकणारं लेखन असतं तुझं..
फार छान
15 May 2018 - 9:19 pm | शिव कन्या
धन्यवाद.
सविता ताई, दोनदा वाचून, दोनदा प्रतिक्रिया लिहिलीत, माझ्यासाठी फार मोलाचे आहे हे.
परत एकदा आभार. :-)
17 May 2018 - 4:28 pm | पीसी
हुर हूर लावणारं लेखन