बाहुल्यांच्या विश्वात : बाहुलीनाट्यकार सुषमा दातार यांच्याशी संवाद

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
10 Nov 2010 - 4:03 pm

''प्रौढत्वी निज शैशवास जपणे'' ह्या आपल्या बाण्याशी प्रामाणिक राहून गेली दोन दशके लोकरंजनाबरोबरच सामाजिक जागृती, पर्यावरण प्रबोधन व मूल्यांची जाणीव करून देणाऱ्या कठपुतळीकार आणि ''संवाद''शिल्पी सुषमा दातार यांच्याशी त्यांच्या कठपुतळी कलेविषयी व हातमोजांच्या कठपुतळ्यांचे खेळ करण्याविषयी केलेला हा खास संवाद!

वनस्पतिशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर मास् कम्युनिकेशन्, पत्रकारिता व कम्युनिकेशन् मिडिया फॉर चिल्ड्रन् या विषयात उच्चशिक्षण घेणाऱ्या सुषमा दातार यांचा बायोडेटा वाचतानाच त्या किती विविध क्षेत्रांमध्ये लीलया संचार करतात याची कल्पना येऊ लागते. वेगवेगळ्या विषयांवरील सखोल संतुलित लिखाण, मासिकांचे व वार्तापत्रिकांचे संपादन, मुक्त पत्रकारिता, चित्रपट-रसग्रहण, प्राध्यापकी, साथ साथ विवाह मंडळात संवाद प्रशिक्षण, विवाह विषयक समुपदेशन, वंचित विकासच्या व अन्य संस्थांच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांसाठी चालणारे त्यांचे समाजकार्य, महाराष्ट्र पालक-शिक्षक संघाचे कार्य, शिक्षण क्षेत्रात केलेली कामगिरी, मुलांसाठी केलेले पुस्तक लेखन, भाषांतरे, कठपुतळ्या बनविण्याच्या कार्यशाळा घेणे अशा बहुविध पातळ्यांवर काम करणाऱ्या सुषमा ताईंचे व्यक्तिमत्त्व तितकेच उत्साही आहे. त्यांच्याशी संवाद साधताना त्या ज्या सहजतेने कोणताही विषय हाताळतात, चपखल उदाहरणे देत - किस्से सांगत व हास्याची पेरणी करत समोरील व्यक्तींना आपल्या गप्पांमध्ये सामील करून घेतात त्यावरूनच त्यांची संवाद साधण्याची हातोटी लक्षात येते.

मला त्यांची मुलाखत घेताना खूप मजा आली. आशा आहे की वाचकांनाही हा संवाद आवडेल.

सुषमा दातार

प्रश्न : तुमच्या ''संवाद'' ग्रुपविषयी सांगता का? त्याची सुरुवात केव्हा, कशी झाली? ''संवाद''च्या प्रवासाबद्दलही जरा सांगा.

सुषमाताई : २० एप्रिल १९९० रोजी, ''पृथ्वी दिना''ला आम्हा कठपुतळीकार मैत्रिणींच्या ''संवाद'' ह्या मुलांसाठी व मुलांबरोबर काम करणाऱ्या ग्रुपचे औपचारिक अनावरण झाले. माझ्या सहकलाकार मैत्रिणींशी माझा संपर्क एस्. एन्. डी. टी. संस्थेच्या कम्युनिकेशन् मीडिया फॉर चिल्ड्रन् ह्या अभ्यासक्रमाच्या निमित्ताने झाला. फार मस्त आहे हा कोर्स! या अभ्यासक्रमात आम्हाला मुलांसाठी कठपुतळ्यांचा शिक्षणात उपयोग कसा करावा याची स्वतंत्र कार्यशाळाच होती. त्यातून देशातील नामवंत कठपुतळीकारांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभायचे. मधुलाल मास्टर हे त्यापैकीच एक होत. तेव्हा ते ऐंशी वर्षांचे होते. खूप गाढा अनुभव! प्रचंड मेहनत करवून घ्यायचे ते आमच्याकडून. ''मेरा नाम जोकर'' चित्रपटामधील रसिकांना लुब्ध करणारी विदूषकाची बाहुली त्यांनीच बनवलेली. त्यांच्या हाताखाली कठपुतळ्या तयार करण्यापासून ते बाहुल्यांची देहबोली, संवादफेक, स्वरनियंत्रण, हालचाली, खुसखुशीत संवाद, हजरजबाबीपणा इत्यादींविषयी खूप शिकायला मिळाले. त्यांनी फार मोलाचे मार्गदर्शन केले. नेपथ्य, वेषभूषा, केशभूषा, रंगरंगोटी, शिवणकाम, संगीत, गायन, नृत्य, नाट्य, शब्दोच्चार अशा अनेक तांत्रिक बाबींकडे त्यांच्यामुळे आम्ही अजून लक्ष पुरवू लागलो. मला सुरुवातीपासून शिवणकाम, रंगकाम, चित्रकला, टाकाऊतून टिकाऊ इत्यादीची विशेष आवड होती. इथे त्या आवडीचे सार्थक झाल्याचे वाटायचे. शिवाय खूप नवे नवे काही शिकायला मिळायचे. अजून एक ख्यातनाम कठपुतळीकार महिपत कवी अहमदाबादी यांच्याकडून मी बॉलवर म्हणजे चेंडूवर करायच्या पपेट्स शिकले.

सुषमाताईंच्या संग्रहातील काही स्वनिर्मित बाहुल्या

विदूषक तर हवाच!

बोटांवर नाचणार्‍या फिंगर पपेट्स (टाकाऊतून टिकाऊ)

आजी आणि नातवंडे

माझा कोर्स पूर्ण झाल्यावर मी त्याच कोर्ससाठी शिकवू लागले. हाताखाली अनेकजणी तयार होत होत्या. त्या पाच वर्षांमध्ये आम्ही संस्थेच्या प्रदर्शनात आमचाही कठपुतळ्यांचा एक स्टॉल लावायचो. वेगवेगळ्या शाळांच्या मुलांचा त्या स्टॉलला खूप सुंदर प्रतिसाद मिळायचा. जरा मुलांचा एखादा मोठा गट प्रदर्शनाला भेट द्यायला आला की आम्ही एखाद्या मदाऱ्याच्या थाटात डफली, खंजिरी वाजवून ''या, या, सारे या, '' असे पुकारत मुलांना आमच्या बाहुल्यांच्या खेळाकडे आकर्षित करत असू. मुलं त्या बाहुल्यांच्या समोरून हालायला तयार नसायची. ते पाहून आम्हाला अभिनव, कर्नाटक स्कूल सारख्या शाळांमध्ये कठपुतळ्यांचे प्रयोग करण्यासाठी बोलावले जाऊ लागले. इतर शाळाही बोलावू लागल्या.

पुढे पाच वर्षांनी मी ती नोकरी सोडली. पण आमचा कठपुतळ्या नाचविणाऱ्या मैत्रिणींचा जो ग्रुप तयार झाला होता त्या ग्रुपचे आम्ही ''संवाद'' असे नामकरण करून स्वतंत्रपणे कठपुतळ्यांचे खेळ करायला सुरुवात केली. गेली वीस वर्षे आम्ही चार महिला ह्या ग्रुपमध्ये सातत्याने कार्यशील आहोत. माधुरी सहस्रबुद्धे, विदुला कुडेकर, संगीता देशपांडे व मी अशा आम्ही चाळीस ते एकोणसाठ या वयोगटातील चौघीजणी आपापसात कसलेही विसंवाद न होऊ देता ''संवाद''च्या माध्यमातून मुलांच्या रंजनासाठी वेगवेगळ्या गोष्टी, प्रयोग, पात्रे, बाहुल्या तयार करण्यात मग्न आहोत.

सुरुवातीला आम्ही शाळांमध्ये जे काही बाहुल्यांचे खेळ केले त्यातून कठपुतळ्यांचे प्रभावी, सोपे व सर्वसमावेशक माध्यम मुलांसाठी वापरण्याची व त्याद्वारे मनोरंजन, थोड्या प्रमाणात प्रबोधन, शिक्षण व जागरूकता साधण्याची कल्पना पालक, शिक्षक व खुद्द मुलांना खूपच आवडली. परिणामी, अनेक शाळांमधून ''संवाद'' ग्रुपला हातमोजांच्या बाहुल्यांचा खेळ करण्यासाठी निमंत्रण येऊ लागले. वाया गेलेल्या वस्तूंमधून पपेट्स बनवण्याचे आमचे प्रयोग चालूच होते व त्याचबरोबर पपेट्सचा शिक्षणात वापर करण्याचा प्रसार.

आजकाल ह्या बाहुल्या आपल्याकडे विकतही मिळतात. पूर्वी तसे नव्हते. पण सध्या मऊ, कापडी खेळण्यांची लोकप्रियता वाढली आहे. आम्हीही गेली अनेक वर्षे ह्या क्षेत्रातून पालक, संस्थाचालक, शिक्षक यांना कृतिशील शिक्षणाविषयी सांगत आहोत. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे आता बऱ्याच बालशाळांमध्ये हातबाहुल्यांचा वापर होत आहे. शाळा पपेट्सच्या माध्यमातून मुलांना कृतिशील शिक्षण देताना दिसतात. मात्र हे सर्व घडून येण्यासाठी मध्ये बराच काळ जावा लागला.

प्रश्न : बाहुल्यांच्या किंवा कठपुतळ्यांच्या खेळाविषयी व त्यांच्या इतिहासाविषयी सांगाल?

सुषमाताई : भारतात बाहुली नाट्याची परंपरा बरीच जुनी आहे. किंबहुना नाटिका किंवा नाट्यप्रकारांच्या अगोदरही बाहुली नाट्य हा मनोरंजनाचा लोकप्रिय प्रकार होता असे आपण म्हणू शकतो. दोरीच्या आधारे नाचवल्या जाणाऱ्या कठपुतळ्या, छाया बाहुल्या (शॅडो पपेट्स) हे तर अगदी पारंपरिक प्रकार! त्यातील राजस्थानी कठपुतळ्या चित्रपट व सांस्कृतिक महोत्सवांच्या माध्यमातून सर्वांना ज्ञात आहेत. परंतु त्याखेरीजही भारताच्या विविध प्रांतांमध्ये त्या त्या ठिकाणाचे वैशिष्ट्य दाखवणाऱ्या बाहुल्या किंवा कठपुतळ्या आढळून येतात. उदाहरणार्थ, उत्तर-पूर्वेकडच्या प्रांतातील कठपुतळ्यांची चेहरेपट्टी ही त्या प्रांतातील लोकांशी साधर्म्य दाखवणारी असते. दक्षिणेकडेही कठपुतळ्यांचे विविध प्रकार सापडतात. चामड्याच्या, लाकडाच्या व कापडी कठपुतळ्यांना बनवतानाचेही खास संकेत असतात. मुळात पूर्वी बाहुलीनाट्य करणाऱ्या विशिष्ट जमाती होत्या. त्यांच्याकडे ह्या कलेचा पिढीजात वारसा जपला जाई व पुढे दिला जाई. त्यांना बाहुल्या बनविणे, त्यांचे कपडेपट - नेपथ्य - मंच व्यवस्था- रंगभूषा -केशभूषा - मांडणी इत्यादी कौशल्य व कलाकुसरीचे काम तर असेच; शिवाय ह्याच्या जोडीला संगीत, गायन, वादन, नृत्य, संवादफेक, नाद-लय-स्वर, संभाषणकला, शब्दांचे उच्चारण, देहबोली, स्वरनियंत्रण इत्यादींचेही ज्ञान आवश्यक असे. त्यामुळे एका जमातीतील किंवा परिवारातील लोक एकत्र मिळून हा कलाप्रकार हाताळत असत व त्याचे प्रयोग करत असत. गावागावांत आपले पेटारे घेऊन लोकांचे मनोरंजन करत हिंडत असत. अगदी सुतारकाम, चित्रकला, भरतकाम, शिवणकाम, विणकाम, रंगकाम यासारख्या कलांचाही ह्या खेळात उपयोग होत असे. या नाट्यांची कथानकेही पारंपरिक, पुराणकथांवर बेतलेली असत. रामायण, महाभारत हे तर ह्या नाट्यांचे लोकप्रिय विषय. त्या त्या प्रांतातील भाषांनुसार व त्या प्रांतातील कथा रुपांतरानुसार त्यांच्या संहिताही बनवलेल्या असत. तसेच काही ठिकाणी तर देव व दानव यांच्या बाहुल्यांना कोणते रंग वापरायचे, कोणती वस्त्रे वापरायची, चामडे वापरायचे असेल तर कोणत्या प्राण्याचे चामडे वापरायचे यांचेही विशिष्ट संकेत असत आणि त्यानुसारच त्या बाहुल्या बनवल्या जात. भारतात वेगवेगळ्या प्रांतांमध्ये बाहुल्यांचे पारंपरिक खेळ करणाऱ्या विविध जमाती असल्या तरी सध्या महाराष्ट्रात मात्र सावंतवाडी नजीकच्या पिंगुळी गावात अशी एकमेव पारंपरिक कठपुतळीकार जमात दिसून येते.

ज्येष्ठ नाट्यकर्मी कै. विष्णुदास भाव्यांनीही खूप सुंदर कठपुतळ्या बनवल्या होत्या. त्यांनी त्या तंत्राचा किती सखोल अभ्यास केला होता व त्यावर किती कष्ट घेतले होते हे त्या बाहुल्यांच्या प्रत्येक अवयवाच्या सुट्या हालचालीवरून लक्षात येते. मध्यंतरी त्या बाहुल्यांचे सांगाडे, आराखडे इत्यादींचा पेटाराच मिळाला तेव्हा ही गोष्ट दृष्टोत्पत्तीस आली. रामदास पाध्येंनी मोठ्या मेहनतीने त्या बाहुल्यांचा व तंत्राचा अभ्यास करून त्यांना पुनरुज्जीवन दिले आहे.

हातमोजांच्या बाहुल्या ह्या त्यामानाने आधुनिक आहेत. परंतु त्यांच्यातही पारंपरिक मूल्यांचा विचार केलेला दिसतो. आम्ही ह्या बाहुल्या निवडायचे कारण म्हणजे त्या वापरायला सुटसुटीत आहेत व हाताळायला त्या मानाने सोप्या आहेत. तसेच पर्यावरण, आधुनिकता व पारंपरिकता यांचा योग्य मेळ या बाहुल्यांमध्ये साधता येतो. कठपुतळीकार या बाहुलीला आपल्या हाताच्या व बोटांच्या साहाय्याने नाचवितो.

प्रश्न : हातमोजांच्या बाहुल्यांविषयी व त्यांच्या खेळाविषयी जरा सांगा. त्यासाठी काय काय साहित्यसामग्री लागते? तुम्ही त्यासाठी काही विशेष प्रयत्न घेता का?

सुषमाताई : शिवणकाम, रंगकाम, कलाकुसरीचे सर्व साहित्य तर ह्यात लागतेच, शिवाय आमच्या या बाहुल्या अनेकदा टाकाऊतून टिकाऊ किंवा कचऱ्यातून कला ह्या धर्तीवर तयार होतात. मला स्वतःला अशा कामाची विलक्षण आवड असल्यामुळे त्यात बरेच प्रयोग करता आले. तुमच्यातील कलाकारीला इथे भरपूर वाव असतो. सुरुवातीला आम्ही प्रयोग करताना एक लाकडी पाट बनवून घेतला होता. त्यावर कापडी पडदा अडकवून आम्ही प्रयोग करायचो. तसेच गायन-वादन-संगीतासाठी तबला-पेटी-खंजिरी-डफली इत्यादी साहित्य घेऊन जायचो. पण हे सर्व नेणे-आणणे खूप यातायातीचे होते. मग आमचे सामान एक मोठी सुटकेस व दोन पिशव्यांमध्ये मावेल इतके सुटसुटीत केले. सलाईनचे दोन स्टॅंडस, त्यांना अडकवायला एक दोरी, दोरीवर टांगण्यासाठी वेगवेगळे रंगीत पडदे आणि आमच्या विविध बाहुल्यांचे संच असे त्याचे स्वरूप!
प्रयोगातील गाणी, संगीत आम्ही ध्वनिमुद्रित करून घेतले. माझी सहकारी मैत्रीण माधुरी सहस्रबुद्धे यांच्या घरची रिक्षा होती. ती स्वतः रिक्षा चालवत असे व आम्हाला सामानासकट वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोगाला घेऊन जात असे. खूप मजा यायची. आमची रिक्षा जिथवर जाईल तिथवर लांबचे प्रयोग आम्ही स्वीकारायचो. लांबच्या ठिकाणी, पुण्याच्या आजूबाजूला प्रयोग असला की गाडीने जायचो. बऱ्याच एन्. जी. ओ., शाळा, संस्थांतर्फे आम्हाला त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी कठपुतळीचा खेळ करायला बोलावले जायचे. तसेच पुणे व पुण्याच्या चतुःसीमांवरच्या वाड्या, वस्त्या, खेडी, महिला गट, रिमांड होम इत्यादी अनेक ठिकाणी आम्ही हातमोजाच्या बाहुल्यांचे खेळ केले.

प्रश्न : हा खेळ करण्यासाठी लागणारे कौशल्य/ पात्रता याविषयी सांगाल?

सुषमाताई : बाहुल्यांच्या या खेळासाठी तांत्रिक कौशल्य (नेपथ्य, शिवणकाम, चित्रकला, अभिनयाची माहिती, संवादफेक इ. इ. ) तर लागतेच पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे हजरजबाबीपणा, उत्स्फूर्तता व विनोदबुद्धी! आवाजात बदल - चढ उतार, हात व हाताची बोटे सफाईदारपणे नाचवावी लागतात. आमचे प्रयोग हे जास्त करून लहान मुलांसमोर असतात. त्यामुळे त्या त्या वयोगटाची भाषा, त्यांची समज, वातावरण, त्यांच्या आवडी-निवडी इत्यादी अनेक गोष्टी लक्षात घेऊन आम्ही आमचे संवाद तयार करतो. बरं, हे संवादही लिहून पाठ केले वगैरे प्रकारातले नसतात बरं का! आज गेली वीस वर्षे एकमेकींबरोबर काम करत असल्याचा फायदा हा झालाय की आमचे सर्व कलाकारांचे आपसांत जबरदस्त ट्यूनिंग आहे. त्यामुळे आम्ही जी गोष्ट सांगणार आहोत तिचे वेगळे स्क्रिप्ट असे लिहून काढत बसत नाही. त्या ऐवजी कोणत्या प्रवेशात काय काय गोष्टी घडायला हव्यात याचा कच्चा मसुदा आम्ही एका कागदावर लिहितो आणि तो कागद पडद्याच्या आतल्या बाजूला आम्हाला दिसेल असा टाचून ठेवतो. बाकी संवाद अतिशय उत्स्फूर्त असतात. त्यांच्यात सोपेपणा, खुसखुशीतपणा असतो. मुलांच्या विश्वाशी जेवढ्या सहजतेने नाते जोडता येईल तेवढे चांगले. ती किमया आमच्या बाहुल्या तर साधतातच! बाहुल्यांच्या तोंडचे संवाद, त्यांचे आवाज, मुरके-गिरक्या-नाच, सभोवतालचे संदर्भ, गोष्टींचा सोपेपणा आणि विनोदांची पेरणी यांमुळे मुलं बघता बघता त्या खेळात समरस होतात.

आमच्या खेळांमधील बेडूक, माकड, उंदीर, ससा, कासव यांसारखी पात्रे तर बालदोस्तांच्या खास आवडीची! त्यांच्या तोंडून चुरचुरीत किंवा विनोदी संवाद आल्यावर मुलांना जो आनंद होतो तो केवळ अनुभवण्यासारखा असतो. आमच्याकडचे नाचरे माकड जेव्हा 'मेरी शेपूट देखो' म्हणत मुरका मारते तेव्हा मुलं काय खदखदून हसतात! प्रेक्षक जर एखादा महिला-गट किंवा वस्तीवासी असतील तर त्या प्रयोगात आमच्या सासू-सुनांच्या कठपुतळ्यांचा संवाद चांगलाच रंगतो. त्यांच्या खुसखुशीत, खमंग फोडणीयुक्त संवादांसरशी प्रेक्षकांमधून उत्स्फूर्त हास्य, टाळ्या तर मिळतातच; शिवाय नंतर अनेकजण येऊन आपल्याला खेळ खूप आवडल्याचे आवर्जून सांगतात.

तसे म्हटले तर आम्ही सगळ्याजणी सर्वप्रथम गृहिणी. आपापले घर-दार, मुले-संसार सांभाळून ह्या क्षेत्रात उतरलेल्या हौशी कलावंत. पण आमचे काम जास्तीत जास्त नेटकेपणाने व व्यावसायिक सफाईने कसे होईल ह्याकडे आमचा कटाक्ष असतो. खेळाची तारीख ठरली की प्रत्येकीने आपापल्या दिनदर्शिकेत त्याची नोंद करणे, त्या दिवशी कोणत्या वेळेला निघायचे हे निश्चित करणे, प्रयोग आमच्या बाजूने वेळेवर सुरू करून वेळेत संपविणे, हिशेबाबद्दल चोख असणे, आर्थिक नियोजन करणे इत्यादी बाबतीत आम्ही अतिशय काटेकोर आहोत. आणि त्याचा आम्हाला फायदाही होतो. याशिवाय सुरुवातीची पाच वर्षे आम्ही प्रत्येक प्रयोगानंतर त्या त्या प्रयोगातील अधिक उण्या गोष्टी लिहून काढायचो. मुलांनी सर्वात जास्त टाळ्या कुठे वाजवल्या, कोणत्या वाक्याला सर्वाधिक हशा उसळला, कोणता विनोद फुकट गेला, काय चुकले ह्याचबरोबर मुलांना व त्यांच्याबरोबरच्या मोठ्यांना आजच्या प्रयोगातील काय आवडले, त्यांचा प्रतिसाद कसा होता अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आम्ही लिहून काढायचो. कोठे चुका झाल्या, कोठे त्रुटी राहिल्या, अजून काय चांगले काय करता येईल इत्यादींचाही त्यात समावेश असायचा. बघता बघता त्याच्या डायऱ्याच तयार होत गेल्या. आणि तेव्हा बाणवलेल्या त्या शिस्तीचा आजही आम्हाला उपयोग होत आहे. हे डॉक्युमेंटेशन ही आमच्या ग्रुपची खासियत म्हणता येईल. तसेच तयार स्क्रिप्ट न वापरता आयत्या वेळी म्हटलेले उत्स्फूर्त संवाद हेही आमचे वेगळेपण आहे. त्यामुळे प्रत्येक प्रयोगात एक ताजेपणा येतो. तीच गोष्ट अधिक रंजक बनते.

प्रश्न : खेळामागचा उद्देश मनोरंजनाव्यतिरिक्त काय असतो? गोष्टीद्वारे मुलांमध्ये प्रबोधन किंवा मूल्यांची जाणीव करून दिली जाते का? कशाप्रकारे? मोठ्यांसाठी तुम्ही कशाप्रकारचे खेळ योजता?

सुषमाताई : आम्ही कथाविषय निवडताना अनेकदा लोकप्रिय किंवा आमच्या छोट्या मित्रांना प्रिय गोष्टीच निवडतो. पण त्या गोष्टीत वेगवेगळे बदल, तिचे रुपांतर इत्यादी कलाकुसर करणे हे आमचे काम. गोष्टीच्या मूळ आराखड्यात फार बदल न करता तिची रंजकता वाढविणे आणि त्यातून मुलांमध्ये पर्यावरण, मूल्यांच्या जाणीवांची जोपासना करणे यांकडे आमचे लक्ष असते. पण हे सर्व सहज रीतीने, बरं का! त्यात ''तात्पर्य'' हा भाग नसतो. तो संदेश मुलांना आपोआप मिळतो. उदाहरणार्थ ससा-कासवाच्या गोष्टीतून मुलांना पाणी स्वच्छतेचा संदेश मिळतो, उंदराच्या कुटुंबाकडून ते कचरा टाकण्याच्या शिस्तीविषयी शिकतात. हेच खेळ जेव्हा मोठ्यांसमोर होतात तेव्हा त्या त्या वाड्या-वस्त्यांमध्ये काम करणारे समाजसेवक आम्हाला त्या त्या गटासमोर 'तुम्ही तुमच्या खेळातून अमका विषय मांडलात तर फार बरे होईल, ' असे सुचवितात. त्यानुसार आम्ही अल्पबचत, दत्तक विधान, मुलींचे शिक्षण, मुलींना होणारा छेडछाडीचा त्रास, सासूने सुनेला चांगली वागणूक देणे असे अनेक विषय मांडलेत.

काही वेळा अतिशय गंभीर विषयांवर गंभीर स्वरूपातील बाहुल्यांचे खेळ करायचा प्रयोगही आम्ही करून बघितला. पण तो फारसा यशस्वी झाला नाही. कारण हे माध्यमच मुळी लोकरंजन करणारे आहे. विनोदी, खुसखुशीत, चुरचुरीत संवाद आणि एखाद्या विषयावर नरम पण परिणामकारक भाष्य करून कथानक पुढे नेण्याची शैली हाच प्रकार लोकांना जास्त भावतो.

बाहुलीनाट्यातील एक क्षण

असा रंगतो अमुचा खेळ! (लाडूची गोष्ट)

एकदा बजाज कंपनीतर्फे एका गावी महिलांना अल्पबचतीचे महत्त्व सांगण्याच्या दृष्टीने बाहुल्यांचा खेळ करण्याची विनंती आली. तिथे महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजण्यात आली होती. बहुसंख्य बायकांनी शेवग्याच्या पाल्यापासून वेगवेगळ्या पाककृती बनविल्या होत्या. त्यांच्या त्या पाककृतींचा उल्लेख जेव्हा आमच्या खेळातील बाहुल्यांच्या तोंडी आला तेव्हा त्या बायका जाम खूश झाल्या. तसेच तिथे काम करणाऱ्या समाजसेविकेच्या विनंतीवरून आम्ही सर्व कठपुतळीकार महिलांनी आमची ओळख गृहिणी म्हणून करून दिली. रोजचा संसार सांभाळून आम्ही अशी एखादी कला जोपासतो, तिचे प्रयोग करतो, त्यासाठी घराबाहेर पडतो व त्यातून पैसेही कमावतो ही गोष्ट त्यांना आवर्जून सांगितली. त्यातून आम्ही त्यांना आपापले संसार सांभाळून काहीतरी करण्याची प्रेरणा देऊ शकलो.

तसेच या खेळांच्या निमित्ताने डॉ. बानू कोयाजींसारख्या ज्येष्ठ समाजकर्मींचा सहवास, त्यांचे मार्गदर्शनही आम्हाला लाभले. त्यांच्या एका संस्थेसाठी एका खेड्यात कार्यक्रम करताना बचत व व्यसनमुक्ती असा दोन्हीचा संदेश एकत्र देण्यासाठी आम्ही आमच्या सासू-सुनेच्या बाहुल्यांच्या तोंडी बरेच खुसखुशीत संवाद घातले. सर्व बायका पदरात तोंड लपवून मनमुराद हसत होत्या. सून मिश्री लावणे -तंबाखू मळण्याची सवय सोडते व त्या वाचवलेल्या पैशातून सासूसाठी व आपल्यासाठी पंढरपुराच्या यात्रेचे तिकिट काढते असे त्यात दाखवले होते. शेवटी सासूला मिश्री लावणे सोडण्यासाठी उत्तेजन देण्यात आले होते. हे रूपांतरही आमच्या महिला प्रेक्षकांना खूप भावले.

प्रश्न : ह्या दृक् श्राव्य खेळात तुमची खेळ करणार्‍याची भूमिका काय असते?

सुषमाताई : कठपुतळीच्या खेळात आमचे मुख्य काम असते ते प्रयोगात चैतन्य ओतण्याचे. उत्स्फूर्तता व विनोद, हलके फुलके वातावरण कायम राखण्याचे. संवादात मीठमसाला भरण्याचे. आणि कार्यक्रमाची लय कोठेही बिघडू न देण्याचे. प्रेक्षकांनी तुमच्या प्रयोगाचा आनंद घेतला पाहिजे. त्यासाठी हजरजबाबीपणा, विनोदबुद्धी ही जर जात्या नसेल तर ती विकसित करावी लागते. हे एक जिवंत माध्यम आहे. त्यामुळे आम्हाला प्रत्येक खेळातून बरेच काही अनुभवायला व शिकायला मिळते. आम्हा चौघीजणींमध्ये विलक्षण ट्यूनिंग आहे. त्यामुळे प्रयोगाची खुमारी अजूनच वाढते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्हाला खेळ करताना भरभरून मिळणारा आनंद व समाधान. मुलांच्या विश्वात रमताना आम्हीही मूल होऊन जातो. त्या खोड्या, दंगा, खेळकरपणा, विनोद, हास्य, टाळ्या यांमधून आम्हाला जी ऊर्जा मिळते ती अनमोल असते.

मात्र अनेक वर्षांच्या अनुभवाने आम्ही व्यवहारात अधिक व्यावसायिकता आणली आहे. पूर्वी एका खेळाला दोनशे रुपये घ्यायचो, आता दोन हजार घेतो. आमचे काही अनुभव फारच गमतीचे आहेत. फुकट दिलेल्या वस्तूचे मोल नसते तसेच फुकट प्रयोगाचेही! जिथे लोकांना आमच्या खेळाचे मूल्य देणे परिस्थितीमुळे शक्य नसते (उदा. वस्त्या, वाड्या, सेवा प्रकल्प इत्यादी) तिथे होणारे खेळ आम्ही प्रायोजित करून घेतो व ज्यांनी प्रायोजित केले त्यांना जाहीर श्रेय देऊन तो खेळ होतो.

प्रश्न : सध्याच्या काळात लहान मुलांना मनोरंजनाचे एवढे मार्ग उपलब्ध आहेत... (टीव्ही, व्हिडियो गेम्स, इंटरनेट, दृक् - श्राव्य सीडीज् इत्यादी) अशा श्रोत्यांचे लक्ष वेधून घेणे आणि त्यांना एका ठिकाणी काही वेळ बसवून ठेवणे ह्यालाही कौशल्य लागते. तुम्ही ते कसे साध्य करता?

सुषमाताई : मुळात आमच्या खेळाची कालमर्यादा अर्धा ते पाऊण तासाच्या पलीकडे नसते. बाहुल्यांचे निरनिराळे प्रकार, आकर्षक रूपे, प्रत्येक पात्राची बोलायची ढब, आवाज, अंगविक्षेप, हालचाली, उत्स्फूर्त संवादांची पकड व विनोदी वळणाने जाणारी सहज शैली यामुळे मुलांना खूप मजा वाटते. त्यातही आम्ही मध्ये मध्ये गाणी ठेवली आहेत. त्यांत फिंगर पपेट्सची म्हणजेच बोटांवर नाचणाऱ्या पपेट्सची नृत्ये आहेत. मुलांनाही त्या गाण्यांच्या तालावर ठेका धरायला आवडते.

प्रश्न : भाषा, उच्चार, तंत्र, गोष्टींचे/ खेळाचे विषय यांकडे तुम्ही काही विशेष लक्ष देता का?

सुषमाताई : आधी सांगितल्याप्रमाणे मुलांसाठी गोष्टींचे विषय तेच असतात. त्यांना त्यातील बऱ्याच गोष्टी माहीत असतात. पण आम्ही त्या गोष्टींना विविध प्रसंग, संवाद, नाट्यमयता व मूल्य संदेशाने नटवतो. प्रत्येक व्यक्तिरेखेत वेगळे रंग भरतो. माकडांचे विशिष्ट आवाज, उंदराचा नाच अशा अनेक गोष्टी त्यात सादर केल्या जातात. त्या त्या पात्राप्रमाणे आमची भाषा बदलते. एवढेच नव्हे, तर ज्या प्रेक्षकवर्गासमोर आम्ही प्रयोग करणार आहोत तो प्रेक्षकवर्ग कशा प्रकारे बोलतो, वावरतो याप्रमाणे आमच्या पात्रांची भाषा बदलते. त्यासाठी सध्याच्या शहरी मुलांच्या विश्वात काय काय चालते, त्यांचे आवडते हिरो, क्रिकेटपटू, व्हिडियो गेम्स, कार्टून्स, पुस्तके, गाणी , खेळ, उपकरणे इत्यादींचाही आम्ही वेळोवेळी मागोवा घेत असतो. त्या त्या गोष्टींचे संदर्भ आले की मुलांना खेळात अधिक रस उत्पन्न होतो.

प्रेक्षकांची संख्या आम्ही शक्यतो मर्यादित ठेवतो. लहान ग्रुपसाठी किंवा बंदिस्त सभागृहात प्रयोग करणे तांत्रिक दृष्ट्या सोपे जाते. बाहेर, मोकळ्या जागेत प्रयोग करताना ध्वनीसंयोजन, हवामान, प्रकाश इत्यादी अनेक बाबींकडे लक्ष पुरवावे लागते.

प्रश्न : बाहुल्यांचा खेळ करताना आलेल्या अनुभवाविषयी सांगू शकाल.... काही संस्मरणीय / मजेशीर/ स्पर्शून जाणारे अनुभव?

सुषमाताई : तसे सांगण्यासारखे बरेच अनुभव आहेत. पण तरी त्यातील एक-दोन अनुभव मी आवर्जून लोकांना सांगते. मनोरुग्णालयात बऱ्या होऊ घातलेल्या महिला रुग्णांसमोर आमचा प्रयोग ठेवला होता. रुग्णालयाबाहेरच्या बगीच्यात आम्ही अर्ध्या-पाऊण तासाचा खेळ केला. माफक प्रतिसादही मिळत होता. आम्हालाही बाहुल्यांच्या खेळाला तिथे कितपत प्रतिसाद मिळेल ह्याची शंकाच होती. पण तरीही त्या स्त्रियांनी त्यांच्या परीने खेळाचा आनंद घेतला. काही ठिकाणी हसून तर काही ठिकाणी टाळ्या वाजवून दाद दिली. प्रयोग संपल्यावर आम्ही सामानाची आवरासवर करत असताना तिथे त्यांच्यामधलीच एक जरा नीटनेटकी दिसणारी तरुणी आली. स्वतःची ओळख करून दिली आणि म्हणाली, ''ताई, या मोठ्या बाहुल्या कधी बनवल्यात हो? खूप त्रास पडला असेल ना! मलाही जमेल अशा बनवायला. मला विणकाम, भरतकाम चांगलं येतं. इथं त्याचे पैसेही मिळतात मला. मी साठवले आहेत बरं का ताई, '' असे म्हणत ती हळुवार हातांनी प्रत्येक बाहुली उचलून निरखत होती. सगळं सामान आवरून झालं तशी ती म्हणाली, ''खूप कष्टाचं काम आहे हो तुमचं! आमच्या संस्थेनं तुम्हाला काही दिलं की नाही? नसेलच, मला माहितेय ना! आता पुढच्या वेळेला याल तेव्हा मला आधी कळवा. आमचे बचतीचे पैसे मी आधी सांगून मेट्रनकडून घेऊन ठेवेन आणि तुम्हाला देईन. खूपच कष्ट करता हो तुम्ही! '' ते ऐकल्यावर काळजात काहीतरी हालले. मी तिच्या पाठीवर नुसताच हात ठेवला, त्यानेही तिला खूप बरं वाटलेलं दिसलं. बाहेर पडताना जाणवले की आपण कोणालाही किती सहजपणे ''वेडा'' म्हणतो! आपल्या त्यांच्याविषयीच्या जाणीवा - संवेदना किती बोथट आहेत हे तिथे प्रकर्षाने जाणवले.

अजून एक प्रसंग. एका श्रीमंत बंगल्याच्या आवारात त्या घरातील छोट्या मुलीच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ आमचा खेळ होता. खाऊच्या गाड्या, फुगेवाला, चक्री पाळणे, भिरभिरेवाला वगैरे जंगी तयारी होती. पाहुण्यांची लगबग चालू होती. आम्ही यजमानांना अगोदरच मानधनाचे पाकीट शो संपेपर्यंत तयार ठेवायला सांगितले होते. कारण शो संपल्यावर आम्हाला चौघींनाही आपापल्या घरचे वेध लागलेले असतात. त्याप्रमाणे आमचा खेळ संपला, सामान आवरून झाले, बराच वेळ लोटला, पण मानधनाचे पाकीट काही येईना. अखेर कंटाळून आम्हाला यजमानीण बाईंकडे जाऊन मानधनाचे पाकीट देण्याविषयी चक्क सांगावे लागले. तेव्हा त्यांनी कनवटीला हात घालून चार चुरगळलेल्या, दुमडलेल्या नोटा बाहेर काढल्या, इतर नातेवाईकांकडून थोडे पैसे जमा केले आणि ती रक्कम तशीच आमच्या हातात कोंबली. नकळत आमचा शहरी सुशिक्षित मानबिंदू थोडा दुखावला गेलाच! हा अनुभवही धडा देणारा ठरला.

प्रयोगाच्या संदर्भात लक्षात राहिलेली एक मजेदार आठवण म्हणजे एकदा आमचा 'म्हातारी व भोपळ्या'च्या गोष्टीवर आधारित खेळ होता. कधी नव्हे तो आम्ही प्रयोगाला भोपळाच न्यायला विसरलो! मजा म्हणजे ही गोष्ट आमच्या चौघींपैकी कोणाच्याच लक्षात आली नाही. आणि जेव्हा प्रयोगासाठी एकेक बाहुली, साहित्य काढून रचू लागलो तेव्हा ही गोष्ट लक्षात आली. आता इतक्या आयत्या वेळेला भोपळा आणणार तरी कोठून? मग एक शक्कल लढवली. आमच्याकडे एक हॅट होती. चांगली नेहमीच्या आकाराची. एरवी आमच्या खेळात एक उंदीरमामा त्या हॅटला घालून नाचतो व पळून जातो. मुलांना हे दृश्य बघायला खूप मजा येते. अगदी खदखदून हसून दाद देतात ती! तर मग त्या दिवशी ह्या हॅटमधून आमची म्हातारी जंगलातून आपल्या लेकीकडे गेली. ती हॅटमधूनच का गेली ह्याचे उत्तर देण्यासाठी तिथल्या तिथे एक गोष्ट रचावी लागली. आणि गंमत म्हणजे नंतर मुलांनी येऊन सांगितले, 'आज म्हातारी भोपळ्यातून न जाता हॅटमधून गेली तर आम्हाला खूप मजा वाटली.'

खेळाच्या तयारीत (शिक्षांगण, गिरिवन येथे गावातील मुलांसाठी ठेवलेला खास प्रयोग)

खेळाचा आनंद लुटणारे प्रेक्षक

एकदा-दोनदा असे झाले की आम्हा चौघींपैकी एकीला प्रयोगासाठी येता येता रस्त्यात अपघात झाला. आयत्या वेळेला तिघींना तिचीही जबाबदारी निभावून न्यावी लागली. एकमेकींच्या अडीअडचणी असतील तर आम्ही निभावून नेतो. पण शक्यतो घेतलेली जबाबदारी कोणीच टाळत नाही. अगदीच आजारपण, परीक्षा किंवा खूप मोठी अडचण असेल तरच ती व्यक्ती हजर नसते. कधी कधी लहानांसाठीच्या खेळात तिथे उपस्थित पालकांचाच जास्त गोंगाट असतो असा अनुभव येतो. त्यांना शेवटी 'शांत बसा' म्हणून सांगावे लागते. परंतु शाळा, पालक व शिक्षकांचा आमचा एकंदरीत अनुभव फार चांगला आहे.

प्रश्न : विविध स्तरांवर व आघाड्यांवर काम करताना तुम्हाला मिळालेले ज्ञान व अनुभव तुमच्या खेळामध्येही प्रतिबिंबित होतात का? किंवा खेळातील अनुभव तुम्हाला इतर कार्यक्षेत्रात उपयोगी पडतो का? कशाप्रकारे?

सुषमाताई : हो, हो, उपयोग होतो तर! आमचे सर्वजणींचे मुख्य कार्यक्षेत्र वेगवेगळे आहे. प्रत्येकीला स्वतःच्या घरची व व्यक्तिगत समाजकार्याची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे ते सर्व अनुभव आम्हाला खेळ करताना नक्कीच कामी येतात. मला वनस्पतिशास्त्राची पार्श्वभूमी असल्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या बारीक निरीक्षणाची सवय आहे. ती मला बाहुल्या बनवताना किंवा खेळाचा विचार करताना उपयोगी पडते. संवादकौशल्य, शिस्त, व्यावसायिकता व सामाजिक दृष्टिकोनाच्या बाबतीतही आम्हाला प्रत्येकीचे अनुभव खूप मोलाचे ठरतात. काही चुकतंय, खुपतंय असं वाटलं की आम्ही एक मीटिंगच घेतो. त्यात चर्चेतून, विचारविमर्श करून प्रश्न सोडवतो. एकमेकींच्या पाठीमागे उलटसुलट बोलत नाही वा खुसपटे काढत नाही. जे आहे ते उघड सांगतो. त्यामुळे आमच्या नात्यात एक स्वच्छपणा आहे. आणि ह्या निकोप नात्यामुळे प्रयोग करताना आम्ही खेळात पूर्णपणे समरसून सहभागी होऊ शकतो.

खेळ करताना येणारे अनुभव, साधले जाणारे संवाद, विविध स्तरांतील लोकांशी येणारे संबंध, निर्मितीतून मिळणारा आनंद आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या बालप्रेक्षकांची मनापासूनची दाद यांमुळे आम्हालाही सतत नवीन काहीतरी शिकायला मिळत असते. माझ्या सह-कठपुतळीकारांची मुले जेव्हा लहान होती तेव्हा अनेकदा ती आमच्याबरोबर प्रयोगाला यायची. कधी पडद्याच्या आतल्या बाजूला बसून आम्हाला मदत करायची, तर कधी प्रेक्षकांमध्ये जाऊन बसायची. त्यांची टीका ही सर्वात उत्तम टीका असायची. कधी प्रयोग सुंदर झाला तर ''आज खूप मजा आली, '' म्हणून सांगायची. आणि कधी ''आज बोअर झालं, '' सांगायलाही विसरायची नाहीत!! प्रेक्षकांशी आमची नाळ जोडण्यात ह्या मुलांच्या शेऱ्यांचाही फार चांगला उपयोग झाला.

प्रश्न : ह्या क्षेत्रातील नवीन इच्छुक कलाकारांना काय सांगाल?

सुषमाताई : मी सांगेन, भरपूर मेहनतीला व सततच्या प्रयत्नांना पर्याय नाही. सराव करत करतच सुधारणा होत जाते. नवनवे प्रयोग करत राहा. नव्या पिढीची भाषा आत्मसात करत राहा. व्यावसायिकता बाळगा. आणि जे जे कराल त्याचे डॉक्युमेंटेशन ठेवायला विसरू नका. आपल्याकडे भारतात कठपुतळ्यांचा खेळ करणारे गुणी कलाकार बरेच आहेत. पण त्यात डॉक्युमेंटेशन ठेवणारे अभावानेच आढळतील.

प्रश्न : बाहुल्यांच्या खेळाविषयी तुम्ही एक पुस्तिकाही लिहिली आहे... तिच्याबद्दल सांगाल?

सुषमाताई : हो, मी एक छोटीशी पुस्तिका लिहिली आहे मराठीतून. तिचे नाव ''पपेटची दुनिया''.

कोणाला मागवायची असल्यास तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा दूरध्वनी क्रमांक : (पुणे) ०२० २५४३२५८०. ईमेल : sushamadatar@gmail.com

*****************************************************************************************************************

आमची मुलाखत संपत आली तसे मी सुषमाताईंचे इतकी छान माहिती दिल्याबद्दल व हातमोजाच्या बाहुल्यांच्या विश्वाची सफर घडवून आणल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले व त्यांच्या ग्रुपच्या आणि खेळाच्या कारकीर्दीसाठी शुभेच्छा देऊन आमच्या संवादाची सांगता केली.

फोटोग्राफ्स सौजन्य : सुषमा दातार व ''संवाद''.

--- अरुंधती कुलकर्णी.

कलानृत्यसंगीतसंस्कृतीनाट्यवावरसमाजजीवनमानतंत्रशिक्षणमौजमजालेखअनुभवप्रश्नोत्तरेमाहितीआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

10 Nov 2010 - 5:29 pm | अवलिया

छान !

मस्त सफर !!

स्पंदना's picture

10 Nov 2010 - 5:41 pm | स्पंदना

चांगला उपक्रम !

अन अनुभव सुद्धा चांगल्या रितीने मांडलेत. विशेष म्हणजे बहुते लोकेशन्स ओपन आहेत, झाडा झुडीत.

अरुंधती's picture

10 Nov 2010 - 8:05 pm | अरुंधती

धन्यवाद अवलिया आणि अपर्णा!

अपर्णा, ते लोकेशन शिक्षांगण, गिरिवन येथील ओपन थिएटरचे आहे. :-)

पैसा's picture

10 Nov 2010 - 8:37 pm | पैसा

अगदी सविस्तर ओळख करून दिल्ये. आमच्या माहितीत फक्त रामदास आणि अपर्णा पाध्ये हेच होते बाहुल्यांचे खेळ करणारे आणि शब्दभ्रमकार. अर्थात याखेळांचं तंत्र वेगळं आहे. बाहुल्या हा एकच धागा समान! वेगवेगळे मानधनाबद्दलचे इ. अनुभवही आवडले.

स्वाती२'s picture

10 Nov 2010 - 8:57 pm | स्वाती२

मस्त!

शुचि's picture

11 Nov 2010 - 4:49 am | शुचि

छान मुलाखत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2010 - 10:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुलाखत आवडली. वर पैसा म्हणतात त्याप्रमाणे बाहुल्यांचा खेळ म्हटला की केवळ रामदास आणि अपर्णा पाध्ये हेच आठवतात. मनोरंजनासाठी काही पारंपरिक जमाती बाहुल्यांचा वापर करुन आपला उदरनिर्वाह करत असायचे त्या सांस्कृतिक कलांचा उपयोग व्यावसायिक स्वरुपासाठीही करता येऊ शकतो असेही मुलाखतीवरून वाटले. अर्थात कोणतीही कला शिकणे, शिकवणे त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. खूप वेळ द्यावा लागतो. घरकाम, कुटुंब, विविध जवाबदार्‍या सांभाळून बाहुली नाट्य सादर करणार्‍या सुषमा दातार आणि त्यांच्या मैत्रिणींचे कौतुकच आहे. कालच विकास यांचा सांस्कृतिक समन्वय साधणार्‍या संस्थेचा परीचय लेख वाचत होतो तेव्हाच एक असे जाणवले की, सांस्कृतिक कला परंपरांची जोपासना करणार्‍या अशा उपक्रमांना, कलांना प्रोत्साहित केले पाहिजे. नाही तर भविष्यात अशा कलाप्रकारांना आपण विसरुनही जाऊ. अशा कलाप्रकारातील कलाकारांना मानाची वागणूक मिळाली पाहिजे. बाकी, मनोरुग्णालयातील स्त्रीचा अनुभव कालवाकालव करणारा. बाहुली नाट्यांच्या परंपरेबद्दल अधिक माहिती मिळाली असती तर वाचायला अजून आवडलेच असते.

सुषमा दातार यांच्या कार्याचा परिचय करुन दिल्याबद्दल अरुंधती यांचे आभार..!!!

-दिलीप बिरुटे

स्वाती दिनेश's picture

11 Nov 2010 - 3:10 pm | स्वाती दिनेश

सुषमा दातार यांची मुलाखतीतून करुन दिलेली ओळख आवडली,
स्वाती

जागु's picture

11 Nov 2010 - 4:55 pm | जागु

खुपच छान.

श्रावण मोडक's picture

11 Nov 2010 - 5:45 pm | श्रावण मोडक

यांचा हा उपक्रम माहिती नव्हता.

अरुंधती's picture

11 Nov 2010 - 7:02 pm | अरुंधती

धन्यवाद!

स्वाती२, पैसा, स्वाती दिनेश, शुचि, डॉ बिरुटे, जागू, श्रावण मोडक... सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार! :-)

पैसा, मलाही बोलक्या बाहुल्या, कठपुतळ्या म्हणजे एक तर राजस्थानी कठपुतळ्या आणि रामदास पाध्येंच्या बाहुल्या एवढंच माहीत होतं. ह्या मुलाखतीच्या निमित्तानं माझ्याही ज्ञानात थोडीफार भर पडली. मला सर्वात छान वाटलं ते त्यांनी आपली कला शेअर करणं गेली वीस वर्षे चालू ठेवलंय. सहकलाकार मैत्रिणींनी ठरवून वेगवेगळ्या सामाजिक, शैक्षणिक किंवा मनोरंजक विषयांवर मिळून केलेले हे बाहुलीनाट्याचे खेळ कितीतरी चिमुकल्यांना आणि मोठ्यांना मनमुराद हसवून गेले आहेत!

डॉ बिरुटे : << मनोरंजनासाठी काही पारंपरिक जमाती बाहुल्यांचा वापर करुन आपला उदरनिर्वाह करत असायचे त्या सांस्कृतिक कलांचा उपयोग व्यावसायिक स्वरुपासाठीही करता येऊ शकतो असेही मुलाखतीवरून वाटले.>> हो, पुण्यात चोखीदानी, संस्कृती सारख्या ठिकाणी रोज कठपुतळ्यांचे खेळ होणे म्हणजे ह्या कलेचे व्यावसायिक रूपच म्हणता येईल. टूरिझम इंडस्ट्रीत वेगवेगळ्या ठिकाणी, सांस्कृतिक महोत्सवांत, बालरंजन कार्यक्रमांमध्ये किंवा अ‍ॅम्युझमेन्ट पार्क्स मध्ये अशा कलेचा खेळ करता येऊ शकतो.

<< बाहुली नाट्यांच्या परंपरेबद्दल अधिक माहिती मिळाली असती तर वाचायला अजून आवडलेच असते. >> तुमचा हा निरोप मी सुषमाताईंना नक्की देते. :-)

श्रामो, त्यांच्या अनेक ओळखींमधील एक ओळख आहे ही! :-)

श्रावण मोडक's picture

11 Nov 2010 - 7:49 pm | श्रावण मोडक

त्यांच्या अनेक ओळखींमधील एक ओळख आहे ही!

खरंय. सहमत. त्यांचे माध्यमाविषयीचे एक पुस्तक मी वाचले आहे. त्यानंतर दुसरे पुस्तक बहुदा सतीश बहादुरांच्या संदर्भातील चित्रपट या विषयाशी संबंधित आहे. बाहुल्यांचा छंद मात्र मला अजिबात माहिती नव्हता. आधी सुषमा दातार म्हटल्यावर मला त्या वेगळ्या छंदांच्या माणसांची कुंडली ठेवणाऱ्या सुषमा दातार वाटल्या. मग फोटो पाहिल्यावर कळलं या वेगळ्या. छंदवाल्या सिंहगड रोडच्या तर या प्रभात रोडच्या अशा ओळखी मी सांगायचो याची आठवण झाली.