उभा मी वाटेवरती
तुझ्या डोळ्यांचे
काजळ मी आहे
मला जरासे तू
लावून घे ना
तीट म्हणूनी गालावरती
फुलबागेमधले
मी फूल सुगंधी
मला जरासे तू
माळून घे ना
तुझ्या तिमिरी केसांवरती
मी एक गाणे
युगल, प्रितीचे
मला जरासे तू
गाऊन घे ना
चांदणवर्षावातल्या राती
तुझा मी होईन
पदर भिरभिरता
मला जरासे तू
लपेटून घे ना
तुझ्या शहारत्या अंगाभोवती
काहीही होतो
तुझ्या आवडीचे
मला जरासे तू
सांगून बघ ना
उभा मी तुझ्याच वाटेवरती
- संदीप चांदणे