आठवतो आज पुन्हा...
आठवतो आज पुन्हा
माझा गाव माझी माती
सारं काही सोडले मी
वितभर पोटासाठी.
बरसून येती मेघ
भिजूनिया जावे चिंब
ओंजळीत पावसाचे
झेलूनिया घ्यावे थेंब
घेवूनिया हाती काठी
जात होतो पोरं पोरं
माळावरी चरावया
घेऊनिया गुरं ढोरं.
रानपाखरांच्या जैसे
रानिवणी हिंडण्यात
किती आठवू ते दिस
मौज होती जगण्यात.
मग सरले ते दिस
हरवले बालपण
शहरात पोटासाठी
सुरू झाली वणवण.
उलटले दिस मास
किती काळ गेला पुढं
तरी मना अजूनही
आहे गवाचीच ओढ.