(कपाळ)मोक्ष!! :-)
सर्व व्यर्थता उमजत असते
तरि चित्ताला थारा नसतो
संदेशाची तिच्या प्रतीक्षा
मी प्रतिचातक बनुनी करतो
हस्तसंच मज गमे उपांगच
क्षणिक दुरावा असह्य होतो
'अजुनी उत्तर का येईना?'
प्रश्न मनाला कच्चा खातो
सतरा कामांचा खोळंबा
भार्या घोष ठणाणा करते
तरी पालथी घागर माझी
आंतरजालावर गडगडते
शेवटची कधि 'दिसली' होती
किती त्यावरी प्रहर लोटले
मोजुन घटिका तिज गमनाच्या
पंचप्राण कंठाशी रुतले
अन्य पुरुष तर नसेल कोणी?
भिवविति लाखो शंका हृदया
'निळ्या खुणे'ला विलंब होता
चलबिचले मम अवघी काया