अव्यक्त

तिथे कोणी नि:शब्द

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
21 Nov 2021 - 9:25 pm

नव्या अंतरिक्षी पुन्हा प्राणपक्षी
जसा झेप घेण्यास सरसावतो...

....खगोलातल्या अद्भुताच्या स्वरांनी
चिदाकाश व्यापून झंकारतो

...स्थलाच्या त्रिमितीत कालाक्ष थोडा
उगा विरघळावा तसा भासतो

.....जिथे चुंबिते पाणरेषेस व्योम
तिथे कोणी नि:शब्द झंकारतो

अव्यक्तकविता माझीमुक्तक

अवचित गवसावे काही जे...

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
17 Nov 2021 - 10:46 am

प्रश्न पडावा असा की
ज्याच्या उत्तरातुनी नवा
प्रश्न मला चिडवीत नव्या
उत्तरास
शोधत यावा

वाट दिसावी अशी की
अद्भुत प्रदेशी जाताना
विरून जाव्या पुसून जाव्या
सार्‍या
हळव्या खुणा

सूत्र सुचावे असे की
ज्याने यच्चयावतास
सहज गुंफुनी जरा उरावे
अधिक
गुंफण्यास

अवचित गवसावे काही जे
ज्ञातापलिकडल्या
मितीतुनी दाखवील इथल्या
स्थलकाला
वाकुल्या

अव्यक्तमुक्तक

जीव कोरा

मायमराठी's picture
मायमराठी in जे न देखे रवी...
12 Nov 2021 - 12:13 am

गंध साऱ्या पाकळ्यांना
जागवे जो जाणीवांना,
मोगऱ्याचे उमलणे,
सोसते का नकारांना ?

मोहण्याची हौस नाही
त्याविना जीणेच नाही
जगे कसा जीव कोरा
रंग ज्यात उरलेच नाही ?

विरहगीत हाय रे !
सुमन कसे सावरे
मधुप का स्तब्ध होई
पंख रोखून बावरे ?

हा उत्सव नित असे
दैवयोग मग हसे
गळून गेल्या आसवांना
प्रणय कोणाचा पुसे ?

अव्यक्तकविता

आसतेस.... नसतेस....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
23 Oct 2021 - 12:54 pm

आसतेस घरी तू जेव्हा
कोंड्याचे होती मांडे
कळत नाही कसे ते
भरती दुधा दह्यांचे हांडे

नसतेस घरी तू जेव्हा
वाहती दुधाचे पाट
अवतार घराचा होतो
जसा आठवडी बाजार हाट

आसतेस घरी तू जेव्हा
कधी रणभूमी सम घर वाटे
दामिनी कडाडे वाजे
हतप्रभ होती सारी शस्त्रे
जेव्हां ब्रह्मास्त्र जलंधारांचे गाजे

नसतेस घरी तू जेव्हा
अन्न वस्त्रांचे होती वांधे
धुणे भांडी करूनी
दुखतात किती ते सांधे

आसतेस घरी तू जेव्हा
चिंता नसे कशाची
साम्राज्य आपुले म्हणूनी
मिरवतो मीजा़स फुकाची

अव्यक्तव्यक्तिचित्र

रानफुले

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
21 Oct 2021 - 10:35 am

करू कशाला तमा जगाची
मागू कशाला उगा क्षमा
प्रमाद माझा एकच झाला
शोधत गेलो मानवतेच्या पाऊलखुणा

ढळलो नाही वळलो नाही
वेचत गेलो काटे कुटे
शोधत होतो जळ मृगजळी अन
गर्द सावली फड्या (निवडुंगा) खाली

तमा न केली उगा कशाची
फुटलो मी जरी उरी
प्रमाद माझा एकच झाला
कधी न केले क्रंदन
कितीही शीणलो मी तरी

जरी लक्ष माझी सोनफुले
शोधत होतो रानी वनी
कधी न केले अवडंबर त्याचे
जरी हाती आली रानफुले.......
21-10-2021

अव्यक्तकविता

संभाव्याच्या अब्ज छटांतून

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
23 Sep 2021 - 6:50 pm

संभाव्याच्या अब्ज छटांतून
वर्तमान उजळतो कशाने?
कोण ठरविते? किंवा सारे,
यदृच्छयाच घडून जाते?

भूतभविष्यातील भासांचे
इंद्रजाल मायावी छेदून
काल-प्रवाहा स्तब्ध करोनी
ऐलपैल वर्तमान उरते

कालौघाची गाज अनाहत
चराचराला व्यापुनी उरते
"क्षण आत्ताचा क्षणजीवी नच"
क्षणोक्षणी वर्तमान म्हणते

अव्यक्तमुक्तक

इम्पिरिकल डेटा

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
4 Sep 2021 - 11:21 am

आले कुटीस मेटा
सारे ओबीसी नेता
हा इम्पिरिकल डेटा
कुणी देता का हो डेटा

आरक्षणाचा रेटा
वकिलांना जा भेटा
इलेक्शन ती येता
बांधू कुणाचा फेटा

75 वर्षात भरल्या तुंबड्या
जनतेस मात्र कुबड्या
बाता त्या बड्या बड्या
कोर्टात पडल्या उघड्या

पाहिजे जरी आरक्षण
सीमेवर करा त्या रक्षण
सैन्यात जो दणादण
त्या कुटुंबास आरक्षण

येता नवीन ती पिढी
नका लावू ही शिडी
व्यसने दारू काडीबिडी
आयुष्य नाही सापशिडी

अव्यक्तकविता

टिपूर चांदणे

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
15 Jul 2021 - 2:46 pm

अज्ञाताच्या
ऐलतिरावर
ज्ञाताचे
ओझे खांद्यावर
वाहुनी थकण्या
आधी थोडे
पैलतिरा घालीन उखाणे

नश्वरतेचे
लेवुनी लेणे
चिरंतनाचे
गाता गाणे
शून्यत्वाच्या
अथांगातुनी
झरेल अविरत
कैवल्याचे टिपूर चांदणे

अव्यक्तमुक्तक

देव

अनुस्वार's picture
अनुस्वार in जे न देखे रवी...
5 May 2021 - 3:01 pm

देव म्हणजे हवा, नाही अगरबत्तीचा सुगंध
तो अन्नात आहे, उपवासात नाही.
देव दानशूर मोठा, लाचार नाही
न्यायी आहे देव, नवसाचा व्यापारी नाही.

देव आहे सदाचारात, अन्यायाचा शत्रू
देव मुहूर्त नाही, अनंत काळ आहे.
देवही भक्त आहे, भावाचा भुकेला
देव नाही खजिनदार-पुजारी.

देव देवळात नाही फक्त, आहे सगळीकडे
देव दाढीत नाही, शेंडीतही नाही.
जीवन देव आहे, मृत्यूही तोच
प्रचारात देव नाही, तो प्रकांड आहे.

देव म्हणजे गंभीर गोष्ट
माणूस त्याची गंमत करतो.
गुलाबजाम जणू पाकातला
हलवायाची व्याख्या करतो.

अव्यक्तजाणिवभक्ति गीतमुक्त कविताश्रीगणेशधर्मकवितासाहित्यिक

जपून ठेव!

अनुस्वार's picture
अनुस्वार in जे न देखे रवी...
1 May 2021 - 12:08 am

मी जरा बाहेर जातोय
माझे शब्द जपून ठेव.

काही तुला आवडलेले
काही मुद्दाम न वाचलेले.
रात्रीचे, पहाटेच्या स्वप्नांतले
बोललेले आणि अबोल राहिलेले.

अर्थाच्या शोधात पडू नको
तो मलाही लागत नाही.
आता शब्दही तुझेच आहेत
माझा कोरा कागद पतंग व्हायचं म्हणतोय.

अलगद हाताळ या शब्दांना
मुलायम असले तरी घावही घालतात.
दिसत नाहीत नेहमीच पण असतात जरूर
अश्वत्थाम्याप्रमाणे शब्दांनाही शाप आहे अमरत्वाचा.

अव्यक्तआयुष्यजीवनकविता