घरातून आलो माणसांच्या घोळक्यात
अचंबित झालो पाहून नाना रूपे.
सुख, दुःख, एकांत वेगळे प्रत्येकाचे
मुकी नजर विचारे, "जायचे आहे कुठे?"
आकाश सम, जमीन विषम आहे
हातात हात घ्यायला पूर्वग्रहांची बंदी आहे.
शरीर सारखेच पण पांघरूण 'लायकी'नुसार
माणूसकी सोडून सगळे बाकी जोरदार.
हाव मनात व्यसन, पैसा अन् वासनेची
भूक मिटते रात्रीपुरती, ओढ नाही झोपेची.
कत्तली करण्यात मशगुल रक्तपिपासू
ओळख न सांगता वाहतात कोरडे आसू.
घरी परत जायच्या वाटा बंद केल्या
दया आणि करूणेच्या भावनाही मेल्या.
यंत्र झालो नाही, माझ्यात आगच पेटेना
अनोळख्या गर्दीत कुणी वाटाड्या भेटेना.
जीव गुदमरला की माणूस तडफडतो
मरणाच्या भितीने हातपाय मारतो.
धक्के लागले शेजाऱ्यांना, त्यांचे मुखवटे गळाले
घोळक्यात फक्त माणसेच नव्हती हे मला कळाले.