गरिबीचा विळखा
सकाळ सकाळचं उन्हं चटकतं होतं. रायबानं दोन तीन पोती कांदयाची आणली होती. रातचं त्यानं कोठयावर आणून ठेवली होती.आज आठडयाचा बाजार.आठ दिवसा पासून त्यानं कांद काढून ठेवलं होतं. तसचं चांगलं चांगलं निवडून ठेवलं होतं. लालजरीत कांदं.. चमकत होतं. लयचं प्यूअर कांदा आला होता. बरं ते पोसला भी चांगला होता.खाताडाचा जोर होता. आंवदा त्यानं कारखान्याची गाडी बंद केली.. शेतातच डोकं लावलं होतं.दोघ नवरा बायको आणि एकुतली एक पोरगी. सारचं शेतात राबत होतं. उषीची शाळा म्हणजे नावला साळा. परीक्षा बीरीक्षा असली की त्यावढया पुरतं साळात जायचं. नाहीतर सारख रानातच खपायचं. मास्तरं भी चांगलेत.