माझा आजोळ बेळगाव २

स्वप्निल रेडकर's picture
स्वप्निल रेडकर in जनातलं, मनातलं
2 May 2018 - 12:15 am

बेळगाव म्हटलं कि खूप साऱ्या गोष्टी माझ्या मनाभोवती रुंजी घालू लागतात. कॅलिडोस्कोप सारखा वेगवेगळ्या आठवणी,माणसं ,जागा ,चवी नॉस्टॅल्जिक बनवतात .
प्रेमळ आजी आजोबा ,आमच्याबरोबर मित्रांसारखे वागणारे आमचे मामा, मावश्या ,घरातल्यासारखे शेजारी त्यांची कानडी हेल असलेली गोड़ मराठी , आम्हा सर्व नातवंडांच्या दंगा ,मिलिटरी महादेव मंदिराची विज़िट ,शिवाजी गार्डन , गोआ वेसचा स्विमिन्ग पूल ,कपिलेश्वर मंदिर आलेपाक ,अनारसे ,पिठीसाखर भुरभुरलेले चिरोटे ,गार्डेनकडची विहीर जिच्यामध्ये पोहायला शिकलो,रविवारची कलावती मातेची बालोपासना ,खूप सारे सिनेमे ,आणि रेल्वे ब्रिज च्या जवळच्या ग्राऊंडवर भरणारे हँडीक्राफ्ट आणि फन फेअर जिथला पॉपकॉर्नचा वास अजून पण माझ्या मनात दरवळतो .
माझे आजोबा कोर्टात टायपिस्ट होते. रिटायरमेंट नंतर ते घरी टायपिंगची काम करायचे. अगदी शिस्तशीर सकाळी लवकर मॉर्निंग वॊक असायचा,आन्हिक देवपूजा आटपली कि त्यांच्या टायपिंग टेबल वर टायपिंगचं काम करत बसायचे. तेव्हा टाइपराईटर च्या कीज कडे न बघता फक्त मनुस्क्रिप्ट कडे बघत लयीत टाईप करताना बघणं मौज असायची .
माझी आजी नऊवारी नसणारी,काळ्याभोर केसांचा आंबाडा बांधणारी .खूप छान दिसायची. ती देगावची,बेळगाव जवळचा एक छोटयाश्या खेडेगावातून आलेली .सगळे राधाबाई म्हणून हाक मारायचे तिला.शेजारपाजारी ,नातेवाईक सगळ्यांना धरून ठेवणारी,माणसांची ओढ असलेली ,सुगरण असलेली,मुला नातवंडावर भरभरून माया करणारी,आम्ही लांब राहणारी नातवंड म्हणून आमच्यावर जरा जास्तच.:)तिच्याबरोबर भल्या पहाटे कुडकुडत जवळच्या बिच्चू गल्लीतल्या विठ्ठल मंदिरात काकड आरती ला जायचो ,तिथे विठ्ठलाला दह्या तुपाने आंघोळ घातलेली बघण्यासाठी .ती घरी शेवया बनवायची,पापड,कुरडया,सांडगे . दुपारच्या वेळी आजी ,माझी चुलत आजी शेजारच्या काकू ,मावश्या माजघरात बसून पापड शेवया बनवायच्या आमचं काम पापड वाळत टाकायला मदत करायचं असायचं त्याबदल्यात मस्त पापडाच्य पिठाची गोळी मिळायची .आजी संध्याकाळच्या वेळी आम्हाला गार्डन मध्ये काही खाऊ खाण्यासाठी स्वयंपाक घरातल्या फडताळातून पैसे द्यायची .मज्जा करा म्हणून सांगायची.सुट्टी संपल्यावर परत निघताना भरलेल्या डोळ्यांनी पुन्हा कधी येणार विचारायची .ती आता या जगात नाहीय हे पण अजून मन मानत नाहीय. असं वाटत कि तिथे घरात पाय टाकल्यावर समोर येईल ,मायेनी जवळ घेऊन डोक्यावरून हात फिरवेल .
आता बेळगावच झपाट्याने शहरीकरण होतंय ,ठिकठिकाणी नवनवे कॉम्प्लेक्स उभे राहिलेत ,पण मला अजून पण आठवतात ती लांबच लांब पसरलेली घर. घराचा पुढचा दरवाजा एका गल्लीत उघडणारा तर मागचा दरवाजा दुसऱ्या गल्लीत उघडणारा. बाहेरच्या बाजूला काडाप्पाचे कट्टे,जिथे लोक संध्याकाळी ,रात्री गप्पा मारत बसायचे .आजोबांच्या घरी घरापाठी मस्त लांबलचक अंगण होत ,मोठ्ठ पेरूचं झाड,जांभूळ,फणसाच झाड ,भरपूर सारी फुलझाडं ,एक काळ्याशार दगडाची झाडांच्या सावलीतली विहीर,तिच्याबाजूला त्याच दगडाची कपडे धुवायची डोण . छानसं तुळशी वृंदावन आणि त्यावर पडणारा प्राजक्ताचा सडा .
गल्लीतली सगळी घर थोड्याफार फरकाने अशाच रचनेची . काही काही घर मस्त भरपूर लाकूडसामान वापरून डेकोरेटिव्ह केलेली .काही साधी मातीची पण . काही घरात गोठा बाहेरच्या खोलीतच. कोकणात अस दिसत नसल्यामुळे ते विचित्र वाटायचं .आमची सराफ गल्ली बेळगाव मधली सर्वात रुंद गल्ली . गणपतीच्या दिवसात इतर गल्ल्या मंडपांमुळे जाम होऊन जायच्या पण सराफ गल्लीत हा प्रॉब्लेम कधी जाणवायचा नाही .
पुलंनी रावसाहेब मध्ये म्हटल्याप्रमाणे बेळगावच्या लोण्यासारखी तिथली हवादेखील आल्हाददायक . अगदी गरमीच्या दिवसात देखील संध्याकाळच्या वेळी छान गार वारा सुटायचं आणि हलक्या पावसाच्या सरी पडायच्या आणि वातावरण एक्दम थंड होऊन जायचं .
मला चित्रपट बघायची आवड हि बेळगावची देणगी.माझे मामा पण चित्रपट शौकीन अमिताभ बच्चन चे डाय हार्ड फॅन्स. तेव्हा मी मिथुनचा फॅन होतो तेव्हा अमिताभ पेक्षा मिथुन जास्त जवळचा वाटायचा आणि त्याबद्दल माझे कझिन्स माझी मस्करी पण उडवायचे त्यावरून.आपल्यातला वाटायचा .बेळगाव मध्ये तेव्हा जवळपास १०/१२ सिंगल स्क्रीन थिएटर्स होती.गार्डन जवळच स्वरूप नर्तकी कि जुळी थिएटर्स नंतर प्रकाश जिथे नंतर फक्त कन्नड चित्रपट लागायला लागले ,भातकांडे गल्ली जवळच हिरा टॉकीज ,टिळकवाडी मधलं अरुण इंग्लिश चित्रपटांसाठी फेमस ,टायटॅनिक मी तिथेच पाहिलेला असं आठवतंय .सी ग्रेड इंग्लिश सिनेमे दाखवणार ग्लोब ,कपिल टॉकीजला आई मावशीबरोबर माहेरची साडी पण बघितलेला आठवतोय .सुट्टीत बेळगावला गेलो कि झाडून रिलीज झालेले सगळे चित्रपट बघायचो . आमच्या वेंगुर्ल्यात एकच थिअटर होत आणि त्यात चित्रपट भरपूर उशिराने लागायचे .त्यामुळे सुट्टीत जास्तीत जास्त सिनेमे बघायचे असायचे .आणि त्यात सोने पे सुहागा म्हणजे मामाने काही काळासाठी व्हीसीआर आणि विडिओ कॅसेट्स भाड्याने द्यायचा सीडी बिझिनेस पण चालू केलेला. आमची तर चंगळ चालायची.
आणखी एक न विसरण्यासारखी गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळी शिवाजी गार्डनच्या बाहेर बांबूच्या तट्याच्या दुकानात मिळणार आलेपाक आणि उसाचा रस. आणि हा आलेपाक म्हणजे आल्याच्या वड्या नाहीत हा. हि खास बेळगावची खासियत असलेला पदार्थ आहे.पोहे शेंगदाणे,भुरभुरलेलं खोबर, वरून मस्त पिळलेला लिंबू आणि वर फुटण्याच्या पिठाचा बनवलेला छोटासा गोळा.तो गोळा कुस्करून मिक्स करायचा आणि चमचमीत आलेपाक गट्ट करून टाकायचा,आणि सोबतीला मस्त ताजा उसाचा रस. गोड़ आवडणाऱ्यांसाठी बेळगावचा स्पेशल कुंदा ,खडेबाजारातलं 'रॉयल सोडा फौंटन 'जिथल वाळा सरबत आणि बदाम थंडाई ते पण वन बाय टू कधी कधी वन बाय थ्री पण असायचं.
बेळगाव म्हटलं कि काही पदार्थ डोळ्यासमोर येतात ते म्हणजे तांदळाच्या पिठाचं आजीच्या हाथच थालीपीठ वर छान लोण्याचा गोळा ,मावशीच्या घरचे मटण आणि फळ .आता प्रश्न पडेल कि फळ कसली तर फळ म्हंजे तांदळाच्या पिठाचे उकडलेले बॉल्स जे आतून पोकळ असतात .ते अंडा भुर्जी बरोबर पण एक्दम मस्त लागायचे ,दडपे पोहे,चिरोटे,माईनमुळंच लोणचं,अनारसे.बेळगावला सुट्टीत आलं कि वजन वाढवूनच परत वेंगुर्ल्याला जायचो .....

भाषाप्रकटनविचार

प्रतिक्रिया

लई भारी's picture

2 May 2018 - 10:38 am | लई भारी

आवडलं लिखाण.
सराफ गल्लीत जायचो लहानपणी मावशीकडे; आता बेळगावला जाणं खूप कमी झालंय.
आपण म्हणता तसे बदल प्रत्येक शहरात आहेतच. अलीकडे वडील जाऊन आले तेव्हा पिंपळ कट्ट्या आधीचा रेल्वे ओव्हर-ब्रिज बघून गोंधळून गेले :)

सुखीमाणूस's picture

2 May 2018 - 10:58 am | सुखीमाणूस

जुनी वर्णन वाचायला मजा येते आणि आपल्या आठवणी जोडल्या जातात

झेन's picture

2 May 2018 - 9:26 pm | झेन

मिलेटरी महादेवाकडून फिरून येताना आलेपाक आणि ऊसाचा रस मस्तच. आलेपाक ची चव लक्षात होती नाव विसरलो होतो.

पद्मावति's picture

2 May 2018 - 9:54 pm | पद्मावति

खुपच मस्तं लेख.