ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वर-१ 

शाली's picture
शाली in जनातलं, मनातलं
4 May 2018 - 10:17 pm

काही मित्रच असे असतात की ते कधीही भेटले तरी मन कसं प्रसन्न होवून जातं. पण माझ्या या मित्राची जातकुळी जरा वेगळी. मनःस्थिती चांगली असताना भेटला तर वेळ मजेत जातो पण एऱ्हवी मात्र याला पाहीले की ‘कुठून ही ब्याद आली’ असे होते. कारण हा वृत्तीने प्रचंड नास्तीक. नास्तीक असल्याने नास्तीकांचे ‘स्वयंघोषीत अधिकार’ याला प्राप्त. त्यामुळे हा सदैव हातात एक अदृष्य तलवार घेऊन हिंडत असतो. म्हणजे कुणाला चतुर्थीचा ऊपवास असला की याचा लगेच वार. कुणी सोमवारी पिंडीवर अभिषेक केला की याचा लगेच हल्ला. असेन का नास्तीक. काय लक्ष द्यायचे. असंही म्हणता येत नाही. कारण या प्राण्याचा व्यासंग मोठा दांडगा. आधिच नास्तीक त्यात व्यासंगी शिवाय कोडगा. समोरच्याची बोलती बंद केली की याला आसुरी आनंद होतो. तर स्वारी घरी आली. बायकोने त्याला बसायला सांगीतले आणि आत येऊन मला वर्दी दिली. मी घाईने ऊठलो. देवघरातील भरपुर अंगारा तिन बोटावर घेऊन कपाळावर मोठा त्रिपुंड्र ओढला आणि मग बाहेर आलो. फार अगत्य असल्यासारखे विचारले “काय देवा, आज ईकडे कुठे पालखी आली तुमची?” आक्रमण हेच बचावाचे पहिले धोरण असते म्हणतात. पण माझा आक्रमक पवित्रा पाहून ‘देव’ काही गडबडले नाहीत. उलट हसत म्हणाला. “वा, यामुळेच आपल्याला आवडतो यार तू. माणसाला पोटाच्या भुकेबरोबर बौद्धीक भुकही असते. तुझ्याकडे आलो की ती भागते.” मरा. म्हणजे आज हा वेळ आणि डोके दोन्ही खायच्या तयारीने आला होता तर. आता माझा नक्की किती मेंदू खावून याची बौद्धीक भुक शमनार होती तेवढेच पहाणे माझ्या हातात होते. हताश होत, तसे भाव स्पष्ट चेहऱ्यावर दाखवत मी सोफ्यावर बसलो. बायकोला आवाज देऊन सांगीतले “चहा नको टाकूस गं लगेच, हा टळत नाहीये इतक्यात.” तर हा हसुन म्हणाला “वहिणी, थोडा चहा टाकाच. जाताना परत थोडा घेईन.” मग माझ्याकडे पहात, दोन्ही पाय वर घेऊन त्याने मस्त मांडी ठोकली आणि शेजारची छोटी ऊशी मांडीवर घेतली. मग मात्र तो आणि मी दोघेही चुपचाप बसुन राहीलो. बायकोने चहा आणुन दिला. चहा झाल्यानंतर रिकामे कपही घेऊन गेली. तरीही हा चुपच. मला जाणवलं की हा आज काहीतरी गंभीर विषयावर वाद घालणार. मी मनोमन ठरवलं की काहीही झाले तरी आज संयम सोडायचा नाही. मग गडी एक एक शब्द सावकाश ऊच्चारीत म्हणाला

“माझं असं मत आहे की ज्ञानेश्वरी लिहीणारे ज्ञानेश्वर आणि अभंग रचणारे ज्ञानदेव या दोन वेगवेगळ्या व्यक्ती होत्या. ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगावचा तर ज्ञानदेवांचा जन्म हा आळंदीचा. या शिवाय ज्ञानेश्वर हे योगी होते तर ज्ञानदेव हे भक्त होते. ज्ञानेश्वर हे शैव होते तर ज्ञानदेव वैष्णव होते. ज्ञानेश्वर योगी असल्याने त्यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीत अनेक देवांचा ऊल्लेख असला तरी ‘विठ्ठलाचा’ कुठेही ऊल्लेख नाही. तसेच अनेक भाषांमधले शब्द ज्ञानेश्वरीत असले तरी एकही मुसलमानी शब्द ज्ञानेश्वरीत नाही.”

बोलणे थांबवून त्याने माझ्याकडे ऊत्तराच्या अपेक्षेने पाहीले. मी संयम सोडायचा नाही हे पक्के ठरवून बसलो होतो तरी मित्राने त्याचे पुर्ण कौशल्य वापरुन काडी टाकली होती आणि मी अस्वस्थ व्हायला सुरवात झाली होती. कॉलेजला असताना या विषयावर मी चर्चासत्रे गाजवली होती. हिरीरीने सगळी मते साधार खोडून काढली होती. पण हळू हळू जाणवायला लागले होते की ‘फलसफी को बहस के अंदर खुदा मिलता नही।” वडीलही एकदा म्हणाले होते की “तुम्हाला ज्ञानेश्वरी समजली की नाही याचे पहिले लक्षण म्हणजे वाद घालण्याची वृत्ती हळू हळू नाहीशी होते.” म्हणजे, “आपण किती अज्ञानी आहोत” हे कळायला लागले म्हणजेच तुम्हाला ज्ञान व्हायला लागले. वृत्ती शांत होने म्हणजेच ज्ञानेश्वरी कळणे. “तुम्ही म्हणता ते बरोबरही असेल, आम्ही धाकटे, आमची बुद्धीही धाकटी” असं म्हणने म्हणजे ज्ञानेश्वरी समजने. माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे की

म्हणौनि थोरपण पऱ्हाच सांडिजे । व्युत्पत्ति आघवी विसरिजे ।
जै जगा धाकुटे होईजे। तैं जवळीक माझी॥

काय करावे? शेवटी वडीलांची शिकवण हरली आणि मित्र जिंकला. मग मीही पाय वर घेवून भक्कम मांडी घातली आणि त्याला म्हणालो “हां बेटा, बोल. काय म्हणायचं आहे तुला? एक एक मुद्दा सांग, मी तुला सांगतो खरं काय आहे ते…”

मग मीही पाय वर घेवून भक्कम मांडी घातली आणि त्यालाम्हणालो “हां बेटा, बोल. काय म्हणायचं आहे तुला? एक एक मुद्दा सांग, मी तुला सांगतो वस्तूस्थिती काय आहे नक्की ते…”
हे बोलायला सोपं होतं पण समोर बसलेले महाशय काही ‘सोम्या-गोम्या’ कॅटेगरीत मोडणारे नव्हते. चौफेर व्यासंग असणारे होते. बरं ठरवून आला होता म्हणजे ‘बाळ’ अभ्यास करुन आलेलं असणार. आपला मुद्दा समोरच्याला पटवता नाही आला तर थोडा भावनेला हात घालून भडकवले की काम होते पण हा मित्र कोडगेपणा पुरता कोळून प्यायला होता, त्यामुळे तोही मार्ग बंद होता. अर्थात त्याचा प्रश्नच चुकीच्या मुद्द्यांवर आधारीत होता त्यामुळे मला फारसे कष्ट पडणार नव्हते. अडचण ही होती की माझ्या वाचनात असलेली ज्ञानेश्वरीची प्रत ही ‘दांडेकरांची’ १९६२ सालातली आहे. त्यामुळे ती जरा जपुन हाताळावी लागते. अर्थात आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सगळे अध्याय माझ्याकडे PDF मध्ये ऊपलब्ध होते त्यामुळे फारशी चिंता नव्हतीच.

मित्र म्हणाला “ज्ञानदेव हे भक्त होते तर ज्ञानेश्वर हे योगी होते. या दोन्ही वेगवेगळ्या व्यक्ती होत्या. तुम्ही वारकरी हे ऐकूनही घेत नाही, कबुल करायचे दुरच. असे का?”
मी म्हणालो “हे बघ, जो कोणी ज्ञानेश्वरी निर्विकार मनाने वाचेल मग तो वारकरी असो नसो, आस्तिक असो वा नास्तिक, त्याला ज्ञानेश्वरी किंवा अमृतानुभव वाचताना हे स्पष्ट जाणवेल की या दोन्ही व्यक्ती भिन्न नसून एकच आहेत. माझ्या साठी ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वर एकच असल्याने, मी माऊली शब्द वापरतो तेव्हढे समजून घे मग पुढचे बोलू”
मित्र “ठिके, बोल.”
मी “तु ज्ञानेश्वरी वाचलीच आहे, त्यामुळे तुला हे मान्यच करावे लागेल की ज्ञानेश्वर हे सगळ्यांचा समन्वय साधणाऱ्या वृत्तीचे होते. धर्मातील सर्व साधने ही साधकाला एकाच मुक्कामाला घेवून जातात असे ज्ञानेश्वर मानतात. आणि ती सर्व साधने एकाच ध्येयाला घेवून जात असतील तर त्यांची योग्यता मानायलाच हवी. आता याला पुरावा म्हणजे माऊलींनीच नवव्या अध्यायात म्हटले आहे की

तरी कीर्तनाचेनि नटनाचें। नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे।
जे नामचि नाहीं पापाचें। ऐसें केलें॥

म्हणजे येथे माऊली किर्तनाचे महत्व सांगतात. दुसर्या ओविमध्ये अष्टांग योगमार्गाचा ऊल्लेख करतात. तर याच अध्यायत ते ‘नमन’ आणि ‘ज्ञानयज्ञाचेही’ महत्व सांगतात. चारही साधनांचे वर्णन करतात. तेही अतिशय ऊत्कटपणे. पण तरीही माऊलींना याची जाणिव होती की ईतर साधनाने साधकाचा जरी ऊद्धार झाला तरी सर्वसामान्यांना ही साधने जमतिलच असे नाही. म्हणजे रहाता राहीला एकच मार्ग, तो म्हणजे किर्तनाचा, नामस्मरणाचा, भक्तीचा. वरच्या ओवित माऊली ज्या किर्तनाचे वर्णन करतात ते ‘वैष्णवसंकीर्तन’ आहे. त्यांनी केलेले कीर्तनाचे आणि कीर्तनकाराचे वर्णन वाचण्याजोगे आहे. नवव्या अध्यायात माऊली म्हणतात

तरी कीर्तनाचेनि नटनाचें। नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे।
जे नामचि नाहीं पापाचें। ऐसें केलें॥

यमदमां अवकळा आणिली। तीर्थें ठायांवरुनि उठविलिं।
यमलोकीं खुंटिली। राहटी आघवी॥

यमु म्हणे काय यमावें। दमु म्हणे कवणातें दमावे।
तीर्थें म्हणती काय खावें। दोष ओखदासि नाहीं॥

ऐसे माझेनि नामघोषें। नाहीं करिती विश्वाचीं दुःखें।
अवघें जगचि महासुखें। दुमदुमित भरलें॥

किती सुंदर आणि ऊत्कट वर्णन केले आहे कीर्तनाचे आणि नामस्मरणाचे. तु म्हणतोस तसे ज्ञानेश्वर जर फक्त योगी असते तर वरील वर्णन करु शकले नसते. अजुन एक ओवी सांगतो, ऐक.

ते पाहांटेंवीण पाहावित। अमृतेंवीण जीववित।
योगेवींण दावित। कैवल्य डोळा॥
किंवा
कहीं एकाधेनि वैकुंठा जावें। तें तिहीं वैकुंठचि केलें आघवें।
ऐसें नामघोष गौरवें। धवळलें विश्व॥

नुसता योगी 'योगेंवीण दावित। कैवल्य डोळां’ असे व्याख्यान करु शकणारच नाही. जर ग्रंथकर्ता हा नुसता योगीच असता व त्यास भक्तिमार्ग पसंत नसता तर, त्याने या ओव्या लिहिल्याच नसत्या. ज्ञानेश्वरी ही ‘योगी ज्ञानेश्वरांनी’ लिहिली हे तुझंच म्हणने आहे. मग योगी ज्ञानेश्वर भक्तिमार्गाचे ईतके ऊत्कट वर्णन कसे करु शकतील? अनन्य भक्ति म्हणजे ईश्वरावर प्रेम करणे. यावर माऊली अकराव्या अध्यायात म्हणतात

परि तेचि भक्ति ऐसि। पर्जन्याची सुटिका जैसी।
घरावांचूनि अनारिंसी। गतिचि नेणें॥

कां सकळ जळसंपत्ती। घेऊनि समुद्रातें गिंवसती।
गंगा जैसी अनन्यगती। मिळालीचि मिळे॥

तैसें सर्वभाव संभारे। न धरत प्रेम एकसरें।
मजमाजीं संचरें। मीचि होऊनी॥

माऊली वर जे वर्णन करतात ते योगाचे फळ नाही तर भक्तिमार्गाचे फळ आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ‘अर्जुन’ व ‘संजय’ यांची जी वर्णने आहेत ती ज्यांना भक्त म्हणतात त्यांची आहेत. कैवल्याकरता रागद्वेषशुन्य होऊन ‘तहाने तहानचि पियावी’ असे योगाची साधना करणाऱ्या योग्यांची नाहीत. हे सगळं का सांगतोय मी तुला? तर ज्ञानेश्वरीचे लेखक श्रीज्ञानेश्वर हे जसे योगी होते तसेच भक्तही होते. त्यांचे ह्रदय प्रेमभक्तिने ओसंडून वहात होते. म्हणजे निदान तुला एवढे तरी मान्य आहे का की जे योगी ज्ञानेश्वर होते ते भक्तही होते? हे मान्य असेल तर पुढे बोलू, नाहीतर तुला अजुन काही ओव्यांचा दाखला देऊ?
मित्र म्हणाला “येथपर्यंत पटले. योगी ज्ञानेश्वर भक्त असू शकतात पण मग अभंग रचणाऱ्या ज्ञानदेवांचे काय?” मी आज चंगच बांधला होता की याच्या सर्व शंकाचे आज नुसते निरसनच करायचे नाही तर याला आज वारकरीच करुन सोडायचे. या आषाढीला खांद्यावर भगवी गुढी घेऊन याला वारीला पाठवायचेच.
त्याला विचारले “येवढे मान्य आहे ना? मग आता ज्यांनी अभंग रचले त्या तुझ्या ज्ञानदेवांकडे वळू.”

क्रमशः

वावरविचार

प्रतिक्रिया

माहितगार's picture

5 May 2018 - 8:19 am | माहितगार

रोचक , पुभाप्र

पुष्कर जोशी's picture

5 May 2018 - 7:13 pm | पुष्कर जोशी

भारीच होऽऽ

सुनील's picture

5 May 2018 - 7:38 pm | सुनील

ज्ञानेश्वर आणि ज्ञानदेव ह्या दोन वेगळ्या व्यक्ती होत्या असे आंबेडकरांचेदेखिल मत होते आणि त्यांनी यासंदर्भात काही संशोधनदेखिल केले होते. परंतु, काही कारणांमुळे तो लेख पूर्ण करणे त्यांना जमले नाही.

वरील माहिती मी कुठेतरी वाचली होती. आता तो संदर्भ मात्र आठवत नाही.

अर्धवटराव's picture

6 May 2018 - 1:20 am | अर्धवटराव

काहि शतकांपूर्वीचे न्युटन, आइन्स्टाईन वगैरे कोण होते व त्यांनी काय म्हटले यावरुन आज आपला वैज्ञानीक दृष्टीकोन ठरत नसुन 'प्रत्येक कार्यामागे काहि कारण असतं' हा सिद्धांत आपल्याला वैज्ञानीक दृष्टीकोन देतो. त्याचप्रमाणे काहि शतकांपूर्वी ज्ञानदेव/श्वर एकच व्यक्ती होते कि शंभर, आणि त्यांनी ओव्या रचल्या कि पोवाडे याच्याशी 'एखादी गोष्ट "असते" म्हणजे नेमकं काय?' ( याला आस्तिक्य म्हणतात ) हा प्रश्न आज आपल्याला छाळायला लागण्याशी काहिही संबंध नाहि. असो. असल्या वाद-विवादांचा विशिष्ट कैफ असतो. त्याचा उपभोग घ्यायला काहि हरकत नाहि :) .

माहितगार's picture

6 May 2018 - 8:55 am | माहितगार

....त्याचप्रमाणे काहि शतकांपूर्वी ज्ञानदेव/श्वर एकच व्यक्ती होते कि शंभर, आणि त्यांनी ओव्या रचल्या कि पोवाडे याच्याशी 'एखादी गोष्ट "असते" म्हणजे नेमकं काय?' ( याला आस्तिक्य म्हणतात ) हा प्रश्न आज आपल्याला छाळायला लागण्याशी काहिही संबंध नाहि. असो. असल्या वाद-विवादांचा विशिष्ट कैफ असतो. त्याचा उपभोग घ्यायला काहि हरकत नाहि :) .

भक्ती अथवा विज्ञान असो त्याचा आस्वाद घेताना त्याच्या मागचा संत किंवा वैज्ञानिक कोण होता याच्याशी सामान्य भक्ताला देणे घेणे असू नये हे अंशतः मान्य. म्हणजे कि एखाद्या ग्रंथात चांगली भर घातली गेली तर आस्वाद घेणार्‍या वाचकास खूप फरक पडू नये. पण इथेच अडचणी आहेत, मूळ लेखकाने त्याच्याच नावाने भर घालण्यासाठी अनुमती दिलेली आहे का ? मूळ लेखकाचे स्वतःचे काही अधिकार असावेत कि नाही ? चांगली भर हे व्यक्ती आणि काळपरत्वे बदलणारा घटक आहे नाही का ? जी लेखक नावांची सरमिसळ होते त्यातून लेखनाची सर मिसळ होते आणि त्यापुढे जाऊन विरोधाभास येऊन उभे होतात त्या विरोधाभासांचे काय ?

उदाहरणार्थ मी माहितगार टोपण नावाने लिहितो. आता ऐसि अक्षरे या संकेतस्थळावर अजूने एक माहितगार आहेत , (आणि तिथे माझा आयडी माहितगार मराठी आहे) या शिवाय मराठी आंतरजालावर अजून दोन एक माहितगार नावाचे आयडि होऊन गेलेत त्याशिवाय माहितगार या अर्थाने सामान्यनाम म्हणून हा शब्द वापरला जातोच.

माहितगार टोपणनावाने लिहिताना, मला व्यक्तिशः मान्य असलेल्या मुल्यव्यवस्थेचे मी त्यातून समर्थन करत असतो, तर त्याच टोपणनावाची वेगळी व्यक्ती वेगळ्या विचारांचे प्रतिपादन करु शकते, आमच्या लेखनाची कुणी सरमिसळ - आमच्या जिवंतपणी केली तर कायदे विषयक प्रश्न उपस्थित होऊ शकतात , टोपणनावांवर इतर स्थावर जंगम नसते पण खर्‍या नावांची सरमिसळ झाली तर मरणोपरांतही कायदे विषयक प्रश्न शिल्लक त्राहू शकतात ते तुर्तास बाजूस ठेऊ- पण कायदे विषयक प्रश्न जरी दूर ठेवले तरी लेखनाची सरमिसळ झाल्याने विवीध विरोधाभास निर्माण होऊ शकतात त्यांचे काय करायचे ? हा एक प्रश्न; या ही पेक्षा मोठा प्रश्न इतिहासाच्या अभ्यासकांपुढे उभा होत अस्तो तो इतिहासाच्या कालानुक्रमे क्रोनॉलॉजीकल मांडणीचा - आणि इतिहासाच्या अभ्यासकासमोरचा प्रश्न त्याच्या अभ्यासाचे स्वरुप पहाता गंभीर असू शकतो.

माहितगार's picture

6 May 2018 - 10:00 am | माहितगार

प्रक्षिप्त गोष्टी जोडल्या जाण्यातील एक विचीत्र अडचण अशी असते की अमुक काळा पर्यंत झालेले प्रक्षिप्त मूळ म्हणून मान्य केले जाते त्या नंतर त्या ग्रंथात बदल करु दिले जात नाहीत , आणि त्यामुळे मूळ किंवा मूळवरचे प्रक्षिप्त याचे काळानुरुप खंडण काव्य जोडता येत नाही.

मी इथे काय म्हणतोय ते समजले नसेल तर सोपे करतो, मला थोडक्यात नवे प्रक्षिप्त जोडण्याचा आधिकार हवाय ! कारण आधी जे (प्रक्षिप्तासहीत स्विकारुन थांबले गेले) त्याची एक मोठा समुदाय शब्दपूजा आणि व्यक्ती पूजा करतो , या व्यक्तिपूजा अथवा शब्दपूजा अनेक वेळा कालसुसंगतता संपल्याने जाचक ठरु लागलेल्या असतात , शब्द आणि व्यक्तिपूजकांचा आजूबाजूच्यांना त्रास होऊ लागतो हे माझ्या लक्षात येते , आता तुम्ही मला आधीचे प्रक्षिप्त वगळू देत नाही आणि नवे प्रक्षिप्त जोडूही देत नाही पण काळाची गरज तर बदल झाला पाहिजे म्हणते त्याचे काय करायचे ? अर्थात हा प्रश्न ज्ञानेश्वर माउलींच्या बाबतीत कमी यावा ! पण तरीही ज्ञानदेव या नावाने जे पसायदान लिहिले गेले हे
बरेच उदात्त आहे (तरीही नास्तिकांना दुर ठेवते हा भाग तुर्तास बाजुस ठेऊ) बॅलन्स साधते , तेच जन्माधारीत चातुर्वर्ण्याचे बाबतीत म्हणता येत नाही. इथे विस्तार भय पेक्षा या संबंधी माझा “पसायदानातील समतोलाचे एक आगळेपण” हा लेख पहावा.

ज्ञानेश्वर आणि ज्ञानदेव एका असोत वा वेगळे त्यांच्या नावार जे लेखन जमा केले गेले त्यात खूप भयावता संभवत नसावी , पण जगाच्या पाठीवर काही ग्रंथातून भयावता आहे आणि त्या ग्रंथांची शब्द पूजाही होते , त्या ग्रंथांची नावे घेऊन हिंसा आणि अन्य्याय कारवाया होतात मग ज्या कथित प्रेषित संतांच्या नावावर जे लेखन खपवले जाते ते त्यांनी खरेच केले आहे का कुणी घुसडले असण्याच्या शक्यता आहे हे पाहावयास हवे कि नाही ?

आपण भारतीय ग्रंथातील रामायण पाहिले तर त्यातील रामाच्या नावावर खपवले गेलेले शंबुकावर अन्यायाचे समर्थन करणारे उत्तरकांडा ची प्रक्षिप्तता सहज लक्षात येणारी आहे . त्यात शंबुकावर अन्याय आहे म्हणून प्रक्षिप्त आहे असे नव्हे , ग्रंथांच्या फलश्रुती सहसा ग्रंथाच्या शेवटी येतात , वाल्मिकी रामायणातील फलश्रुती युद्धकांडातच येऊन जाते , ग्रंथातील प्रक्षिप्तता डोळे झाकून स्वीकारल्यातर काय होते याचे हे एक उदाहरण म्हणून दिले रामायणातील प्रक्षिप्तता हा स्वतंत्र मोठ्या अभ्यास आणि चर्चेचा विषय आहे .

आपण मराठी संत साहित्या कडे वापस आलो तर अध्यात्मिक आणि संतसाहित्यातील नाममुद्रांचा घोळ बऱ्याच संतांच्या बाबतीत होतो . संत नामदेव आणि विष्णुदास नामा ; रामी रामदास आणि समर्थ रामदास अशी बरीच उदाहरणे आहेत त्या बद्दल स्वतंत्र धागा लेख आहे . अध्यात्मिक आणि संतसाहित्यातील नाममुद्रा

* साहित्यातील नावांची सर मिसळ झाल्याने इतिहास अभ्यासात येणाऱ्या समस्यांबद्दल हा धागा लेख आहे . :

अर्धवटराव's picture

7 May 2018 - 5:32 am | अर्धवटराव

पण मग चर्चा आस्तिक्यावर नसुन इतीहास संशोधनावर व्हायला हवी. आपल्याला भूक लागण्याशी गहु भारतीय पीक आहे कि परदेशी, साखरेचा निर्माता कोण, उष्मांकाचं प्रमाणीकरण कोणि आणि कसं केलं, इत्यादींचा संबंध नाहि. भूक हि जाणिव सत्य आहे कि काल्पनीक यावर चर्चा करताना मी बटाटे युरोपातुन कसे आणि का आले यावर उत्तर देत बसतो म्हटलं तर सगळं मुसळ पहिलेपासुन केरात गेलं.

माहितगार's picture

7 May 2018 - 9:56 am | माहितगार

श्रद्धा आणि परंपरांच्या चिकित्सेचे मार्गक्रमण अनेक बाजूने होत असते, जसे स्पर्धक पंथ परंपरा असतात, ईतिहास तज्ञ असतात, श्रद्धा परंपरा विकासाचा अभ्यास करणारे अँथ्रॉपॉलॉजीस्ट असतात, धर्मशास्त्राचा अभ्यास करणारे असतात, पण वस्तुतः आपण नेमके काय फालो करायचे ? का ? आणि कसे ? या विषयी जास्त वेळा श्रद्धावंत स्वतःच शंका चिकित्सा करत असतात या कडे नकळत दुर्लक्ष होते. उदा. संत मुक्ताबाईंची स्वतःची शिष्य परंपरा होती हे धर्मशास्त्राच्या अभ्यासकांना दिसत असते, आता कुणाला नव्याने संत मुक्ताबाईंच्या परंपरेचा स्विकार करावा वाटला तर त्यांनी संत गोरोंबा कुंभारांना गुरु मानायचे की गोरक्षनाथांना ? (संदर्भ लेख वेध संत गोरोबा, संत राजाई-नामदेव, संत मुक्ताईचा ) तुम्ही संत नामदेवांना मानत असाल तर वीष्णूदास नामाचे अभंग स्विकारायचे कि नाही ? तुम्ही वारकरी असाल तर संत तुकारामांच्या गाथेत प्रक्षिप्त वाटणार्‍या अभंगांचे पठण करायचे की टाळायचे , शिया सुन्नी कॅथॉलीक प्रोटेस्टंट कोणत्या गोष्टी मानायच्या आणि नाही मानायच्या यावर श्रद्धावंत स्वतःच अधिक चिकित्सा करत असतात .

आपण हिंदूंच्या उपवासांकडे वापस येऊ उपवासाला काय चालते काय नाही चालत या बद्दल एखादा नवीन पदार्थ समोर आला तर निर्णय कसा घेणार ? भारता बाहेरचे पदार्थ नको म्हटले तर भारता बाहेरुन आलेले पदार्थ उपवासास कसे चालावयास लागले ? हे स्वतः श्रद्धावंतां समोरचे प्रश्न असतात असे प्रश्न उपस्थित करणार्‍या व्यक्ती नास्तिकच असतात असे नाही.

काही लोक श्रद्धावंताच्या रोजच्या उठण्या बसण्यातले असतात, श्रद्धावंताची व्यवहारात केलेली अथवा न केलेली कृती याने प्रभावित होत असतात , कुटूंबातील एका सदस्याला दुसर्‍या सदस्यास महत्वपूर्ण मिटींगला घेऊन जायचे आहे अशा वेळी दुसरे सदस्य महोदय कर्मकांडात गुंतले आहेत तर अस्वस्थ होऊन तुमच्या कुटूंबातीलच प्रभावित व्यक्ती सहाजिकपणे त्या कर्मकांड आणि श्रद्धेची चिकित्सा करण्यास घेणार हे स्वाभाविक असावे.

आणि सर्वात महत्वाचे अशा चिकित्सा वेळोवेळी अधिकाधीक झाल्याने श्रद्धा डॉळस रहाण्यास मदत होते ,समर्थक , तटस्थ आणि विरोधी दृष्टीकोणांची माहिती होते, श्रद्धेतील काय चालू ठेवायचे काय सोडायचे याचा निर्णय घेणे सोपे जाते . मग जी श्रद्धा शिल्लक ठेवली ती बळकट होण्यास मदत होते . असे वाटते . असो

चिकीत्सा करायला काहिही हरकत नाहि. पण चिकीत्साविषय क्लीअर असायला हवा. मला मूळ गोची तिथेच जाणवते आहे. असो.

sagarpdy's picture

7 May 2018 - 9:45 am | sagarpdy

छान पु भा प्र

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2018 - 10:19 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख ! मुद्देसूद व खुलासेवार चर्चा आहे.

खूप दिवसांनी कोणी आस्तिकाने नास्तिकाबरोबर चाललेल्या चर्चेवर लेख लिहिला आहे. त्यातले म्हणणे पटले न पटले तरीही, "नास्तिकांनी लिहिलेल्या लेखांत विरोधकांवर न चुकता होणारे सपासप वार व दिले जाणारे शिव्याशाप" या लेखात दिसत नाहीत हे प्रकर्षाने जाणवले आणि आवडले... सर्व नास्तिक आणि त्यांच्या पाठीराख्यांनी कृपया याची नोंद घ्यावी, होsss !

माहितगार's picture

7 May 2018 - 11:41 am | माहितगार

सुंदर लेख ! मुद्देसूद व खुलासेवार चर्चा आहे.

सहमत

...नास्तिकांनी लिहिलेल्या लेखांत विरोधकांवर न चुकता होणारे सपासप वार व दिले जाणारे शिव्याशाप" या लेखात दिसत नाहीत हे प्रकर्षाने जाणवले आणि आवडले...

सहमत होतानाच, अडचण मुदलात आहे. अभ्यासकात एखादी ऐतिहासिक व्यक्ती होऊन गेली कि नाही , त्या एक होत्या का अधिक होत्या, नावांची सरमिसळ झाली आहे का ? अशा अनेक विषयांची चर्चा होत असते. चर्चा करणारे सर्व अभ्यासक नास्तिक असतात असे नव्हे. संत मुक्ता बाईं नी उल्लेख केलेले गोरोबा गोरोबा कुंभार आहेत की गोरक्षनाथ असा प्रश्न विचारणार्‍या अभ्यासिका बहुतेक अस्तिकच आहेतप, एका आस्तीक अभ्यासकाच्या मनात गोरोबा कुंभार खरेच अधिक गोरे होते का असा विचार आला . असे विचार आणि अभ्यास आस्तिकातही होतात, प्रस्तुत लेखकाकडे त्यांचा मित्र या वेळी निव्वळ अभ्यासक म्हणून आला असण्याचीही शक्यता असू शकते - ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वर एक कि वेगळे या वादात बाजू मांडणार्‍याची नास्तिकत्वातूनच तो विचार येत असेल तर नास्तिकत्व रंगवणे समजता येऊ शकते पण ज्ञानेश्वर आणि ज्ञानदेव एक कि वेगळे हि सर्वसाधारण चर्चा असेल तर त्यांच्या मित्राचे नास्तिक असणे हा भाग गौण असावयास हवा . एक अभ्यासक या नात्याने आस्तीक नास्तीक असा भेद शिल्लक रहाण्याचे काही कारण नसावे.

ज्ञानदेव विषयक अनेक वादांचे मूलस्थान ठरलेली लेखमाला शि. ए. भारदे बुवा आणि भारद्वाज यांनी १८८९ ते १८९९ साली प्रथम सुधारक पत्रातून लिहिली असा मनोगतावरील चर्चेत उल्लेख आहे ? मग तसे पाहू जाता शि. ए. भारदे बुवा आणि भारद्वाज हे नास्तिकच होते किंवा या विषयावर चिकित्सा करणारा प्रत्येक जण नास्तिकच होता असे सिद्ध करावे लागेल जे वस्तुस्थितीस धरुन नसावे असे वाटते.

ज्ञानेश्वरांच्या चरित्रविषयक मतभेद हि मनोगतावर होऊन गेलेली चर्चा रोचक आहे ती जिज्ञासूंनी पहावी

माहितगार's picture

7 May 2018 - 11:54 am | माहितगार

* सॉरी, मनोगत नव्हे मायबोली !

माहितगार's picture

7 May 2018 - 12:09 pm | माहितगार

अजून एकदा सॉरी, मनोगतावर स्वतंत्र चर्चा आहे आणि मनोगतावरची हि चर्चा माबो चर्चेपेक्षा अधिक माहिती असलेली वाटते.

मनोगतवरची चर्चा वाचली. ज्ञानेश्वरी आणि अभंग यांची भाषाशैली वेगवेगळी असल्याने ज्ञानेश्वरही वेगवेगळे असावेत हे काही फारसे पटत नाही. एखाद्या कसलेल्या कविने जर बालगीते लिहीली तर अर्थातच भाषाशैली वेगळीच असणार. अभंग हे साधारण तळागाळातल्या लोकांसाठी लिहीले आहेत. त्यामुळे भाषा सहजसोपी असणारच. ज्ञानेश्वर एक की दोन हा वाद फारसा गंभीर नाही. काहींनी तर ज्ञानेश्वरांचे अस्तित्वच नाकारलय. असो. माहितीपुर्ण प्रतिसाद आहेत आपले. धन्यवाद!

माहितगार's picture

7 May 2018 - 10:26 pm | माहितगार

माझा ज्ञानेश्वरीचा काहीच अभ्यास नाही. त्यामुळे अशा विषयांवर विचार व्यक्त करणे धारीष्ट्याचे ठरते. अशा विषयावर अभ्यासकांचे म्हणणे काय आहे हे त्यांचे लेखन प्रत्यक्ष अभ्यासण्याची आवश्यकता असावी .

तरीही ज्ञानेश्वरांची प्राथमिक प्रसिद्धी पैठण येथील कथित चमत्कारास प्रसिद्धी मिळण्यामुळे असेल , बाकीच्या संत सज्जनांशी परिचय ज्ञानेश्वरी लेखनोत्तर आळंदीत पोहोचल्या नंतर असावा असा माझा समज आहे चुक भूल देणे घेणे. त्यामुळे ज्ञानेश्वरी लेखना संदर्भाच्या नेमक्या घटना ते भाऊ बहीण आणि ज्ञानेश्वरीचे लेखनिक या शिवाय ईतरांना ठाऊक असतीलच असे नाही.

तौलनिक भाषा अभ्यास हा तसा मोठा विषय आहे . आपण म्हणता तसे एकच व्यक्ती एक पेक्षा अधिक शैलीत लिहू शकते पण शब्द संग्रहात मोठा फरक पडत अधिक बारकाईने अभ्यासण्याची गरज असू शकते . संगणकीय युगात संगणकाच्या मदतीने या अभ्यास समस्यांची उकल जरा अधिक सुलभ असावी पण तसे महत्वपूर्ण प्रयोग मराठी साहित्याच्या बाबतीत झाल्याचे अद्याप तरी ऐकण्यात नाही.

अर्थात ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली आणि संत संपर्क वाढला आणि त्या दरम्यान त्यांच्या शब्दसंग्रहात बदल येण्याची शक्यता नाकारता नाही . ज्ञानेश्वरी स्वतः: विठ्ठलपंतांनी लिहिली असतीतर त्यांच्या महाराष्ट्र बाह्य प्रवासाने हिंदी शब्द ज्ञानेश्वरीत अधिक हवेत बहुधा तसे होता नसावे . दोन शक्यता अभ्यासाव्या लागतात पहिले निवृत्ती नाथांचे -कारण विठ्ठलपंतांच्या सोबत निवृत्तिनाथांचे वय आई वडील आजोबांकडून काही ज्ञान ग्रहण करण्याचे अनुभव घेण्याचे राहिले असू शकते . त्या शिवाय ज्ञानेश्वरीचे लेखनिक अधिक वयस्कर गृहस्थ राहिले असावेत त्यांचेही काही मार्गदर्शन पर योगदान असते तर सहसा त्या लेखनात तसा काही ना काही उल्लेख राहिला असता . विषयावर अभ्यासकांचे म्हणणे काय आहे हे त्यांचे लेखन प्रत्यक्ष अभ्यासण्याची आवश्यकता असावी .

त्या काळातील अंधश्रद्ध लोकांचे मन वळवण्यासाठी त्यांचा नमस्कार प्राप्त करण्यासाठी चमत्काराच्या कथा प्रस्तुत कराव्या लागत असतील तर नवल नाही . निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाईंच्या उत्तरकाळात संवाद ग्रंथाचे नाव ज्ञानबोध आहे . त्यात निवृत्तीनाथ काही शंका विचारतात आणि या गोष्टी चारचौघात चर्चा करण्याच्या नाहीत अशा काही मतितार्थाचे भाष्य मुक्ताई करताना दिसतात . सांगण्याचा मुद्दा हा कि या भावंडानी भरीव कार्य नक्कीच केले पण कुठेना कुठे काही क्लृप्त्यांची त्यांना जोड लागली असेल तरीही समजण्यासारखे आहे .

संत मंडळिंनी एकमेकांच्या नोंदी केल्या आहेत . त्यामुळे विठ्ठलपंत कुलकर्णी आणि त्यांची मुले होऊन गेली हे पूर्णतः नाकारणे अवघड असावे . ज्ञानेश्वरीची क्लिष्टता आणि रूपके आणि आलंकारिकतेचे डोंगर बघता १६ व्यावर्षी एवढे अनुभव कुणास शकतात का हि सर्वसाधारण शंका सर्वसाधारणपणे कुणालाही असेल, त्यामुळे ज्ञानेश्वरी ज्ञानदेव लिखित आहे का यावर अभ्यासकांच्या चर्चाच चालू राहातील तर नवल नाही.

डॉ सुहास म्हात्रे. आपल्याला लेख आवडला, बरे वाटले. प्रतिसादाबद्दल आभार.

प्रचेतस's picture

7 May 2018 - 7:51 pm | प्रचेतस

खूप छान लिहिलंय

फार सुरेख लिंक दिली माहितगा.

माहितगार's picture

8 May 2018 - 9:44 am | माहितगार

प्रा. केतकी मोडकांनी यांचा "कडकडोनी वीज निमाली ठायीचे ठायी (पिडीएफ दुवा)" या संशोधक ग्रंथ सुद्धा आवर्जून वाचावा असा आहे.

माहितगार's picture

8 May 2018 - 9:50 am | माहितगार

* प्रा. केतकी मोडक यांचा

माहितगार's picture

8 May 2018 - 10:04 am | माहितगार

@ शाली,
ती http://shodhganga.inflibnet.ac.in/ ची गूगल शोध लिंक आहे; या गूगल शोध लिंकेत शोध प्रबंधाचे प्रत्येक पान वेगवेगळे दिसते . त्या पानाच्या संशोधकाचा पूर्ण प्रबंध पाहण्यासाठी समजा खालील प्रमाणे युआरएल आहे

shodhganga.inflibnet.ac.in/jspui/bitstream/10603/156398/21/13_chapter%207.pdf
'

तर 10603/ च्या नंतरचा जो काही क्रमांक असेल जसे वरच्या युआरएल मध्ये 156398 आहे , तो कॉपी करायचा मग वेगळ्या टॅब मध्ये shodhganga.inflibnet.ac.in वर जायचे (त्यां वेबसाईटची पहिली सर्वसाधारण शोध खिडकी दुर्लक्षीत करायची ) दुसर्‍या क्रमांकाच्या How to cite या शोध खिडकीत जायचे Enter thesis number असे लिहिले असते तिथे 156398 अशा प्रकारचा जो काही क्रमांक असेल तो टाकावा मग सर्चवर क्लिक करावे म्हणजे http://shodhganga.inflibnet.ac.in/handle/10603/156398 असा दुवा ब्राउजर मध्ये आपोआप उघडुन संपुर्ण प्रबंधाचे दुवे मिळतात.

रविकिरण फडके's picture

7 May 2018 - 10:43 pm | रविकिरण फडके

आधी मला ज्ञानेश्वरीचा अर्थ कसा समजून घ्यावा ते सांगावे. कोणते पुस्तक वाचावे? मी जी काही एकदोन वाचली ती समाधानकारक वाटली नाहीत. मी मराठी माध्यमात शिकलो, माझे मराठी वाचनही बऱ्यापैकी होते आणि आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. पण ज्ञानेश्वरी मात्र काही कळत नाही. शब्द तरी अडतो नाहीतर संदर्भ तरी. आमचा एक मित्र म्हणतो वाचत राहायची, ज्ञानेश्वरीचा अर्थ आपोआप लागत जातो. पण दि. बा. मोकाशींची साक्ष काढली तर ते, 'हे काही खरे नाही', असेच म्हणतील (संदर्भ: आता आमोद सुनासी आले). मुळात ज्ञानेश्वरी हे गीतेवरील भाष्य. तर तीच कळायची पंचाईत, गीता दूरच. त्यापेक्षा टिळकांचे गीतारहस्य खूप चांगले; गीतेत सांगितले आहे त्याचे रोखठोक, सरळ, आणि तर्कशुद्ध विवेचन. उगीच शब्दांचा फुलोरा नाही. ह्यावर कुणी म्हणतात ज्ञानेश्वरी हे एक काव्य आहे. आता काव्य म्हटले की पंचाईत. स्वछ मराठी काव्याचा अर्थ लावणेही सोपे नाही, ज्ञानेश्वरी तर सातशे वर्षे दूर राहिली.
असो. हा माझा प्रॉब्लेम, दुसऱ्यांना देणेघेणे का असावे? पण ज्ञानेश्वरी ह्या विषयावर सतत काहीतरी लोक लिहीतच असतात. मग वाटते मलाच का कळू नये जे इतक्या लोकांना समजते ते?

प्रसाद गोडबोले's picture

7 May 2018 - 11:49 pm | प्रसाद गोडबोले

ज्ञानेश्वरीचा अर्थ कसा समजून घ्यावा ते सांगावे. कोणते पुस्तक वाचावे?
>>>
श्री. विजय पांढरे सरांनी ज्ञानेश्वरीचे आधुनिक मराठीत अतिषय सुलभ भाषेत रुपांतरण केल त्याते इथे मिळेल >

http://www.ednyaneshwari.com/

शिवाय हे संगीतबद्ध केलयं श्री. चंद्रमोहन हंगकेर यांनी आणि सौ. राधिका हंगेकर यांनी अतिषय सुश्राव्य आवजात म्हणले आहे ! साईटवर चकटफु उपलब्ध्द आहे . आर्काईव्ज वर सारे उपलब्ध्द आहे ! बिनधास्त डालो करा अन कधीही येता जाता ऐकत रहा ! हळु हळु अर्थ उमगायला लागल्यावर मुळ ज्ञानेश्वरी पहायला जमेल ! ती अ‍ॅनृऑईड अ‍ॅप्प वर चकटफु उपलब्ध्द आहे !

(काहीकाही वेळा रुपांतरण करताना जरा जास्तच लिबर्टी घेतली आहे असे मला वाटले , उदाहरणार्थ मुळ ज्ञनेश्वरीत रुक्मिणी असा उल्लेख आहे तिथे सरांनी गेयता येण्यासाठी कि मात्रा जुळवण्यासाठी राधा असे वापरले आहे , राधा हे क काल्पनिक पात्र आहे आणि गीता सांगणार्‍या कृष्णाच्या प्रतिमेला साजेसे नाही .)

पण तरीही ह्या कार्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे !

राही's picture

8 May 2018 - 12:21 am | राही

डॉ रवीन थत्ते यांच्या ज्नानेश्वरीचे दोन्ही भाग चांगले आहेत. सोप्या मराठीत आहेत. (वि)ज्नानेश्वरीसुद्धा वाचनीय आहे.

माहितगार's picture

8 May 2018 - 1:05 am | माहितगार

बेलसरेंचा दासबोधाचा अनुवाद वाचताना सुबोध वाटते. आधी मूळ ओवी , शब्दार्थ आणि संदर्भ , आणि न भरकटलेला सुबोध गद्य अनूवाद - जिथे पाठभेद आहेत तेथे त्यासहीत. या अटीत ज्ञानेश्वरीचे कोणते अनुवाद उपल्बध आहेत

प्रसाद गोडबोले's picture

8 May 2018 - 9:24 am | प्रसाद गोडबोले

महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलीली सार्थ ज्ञानेश्वरी घरी पाहिल्याचे स्मरते पण त्याचे संपादक कोण होते हे ठाऊक नाही , इन्टरनेटवर थोडे फार शोधले असता शासकीय मुद्रणालयण आणि खुद्द महामहोपाध्याय वि .का . राजवाडे असे निदर्शनास आले !!

अवांतरः आपल्या लाडक्या गो.नि.दांनीही भावार्थ ज्ञानेश्वरी लिहिली असल्याचे कळाले नेटवर ! आता वाचायला लागणार !!

अरविंद कोल्हटकर's picture

8 May 2018 - 8:33 am | अरविंद कोल्हटकर

माझी एक वेगळीच शंका आहे आणि ती वरच्या विद्वज्जड विवेचनाशी अजिबात संबंधित नाही. तरीहि धैर्य करून विचारतो.

ज्ञानेश्वर आणि तुकाराम ह्यांची ठराविक चित्रे आपल्या समोर असतात. ’मिसळपाव’च्या प्रत्येक पानावर ही चित्रे असतात आणि ’ज्ञानेश्वर’ किंवा ’तुकाराम’ म्हटले की तीच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. आता हे उघड आहे की ह्या दोघांना समोर बसवून कोणी समकालीन चित्रकाराने ही चित्रे काढलेली नाहीत. असे म्हणण्याची कारणे अनेक आहेत. पहिले म्हणजे हे दोघेहि प्रत्यक्ष जिवंत असतांना त्यांना आजची त्यांची ख्याति मिळाली नव्हती, ते केवळ आपापल्या पंचक्रोशीतच लोकांना माहीत असणार. आपल्याकडे व्यक्तींची चित्रे काढून ठेवण्याची आणि ती चित्रे शतकामागून शतके सांभाळण्याची काहीहि प्रथा आणि सुविधा नव्हती.

तेव्हा माझा मूळ प्रश्न. ह्या आपल्या डोळ्यासमोर उभे राहणार्‍या चित्रांचा उगम काय आहे?

माझ्या अंदाजाप्रमाणे ह्या चित्रांचा उगम प्रभातच्या गाजलेल्या संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम ह्या चित्रपटांतून आहे.
अनुक्रमे शाहू मोडक व विष्णूपंत पागनीसांनी ह्या भूमिका अजरामर केल्यात.

तुकारामांचे माहित नाही पण आज जे ज्ञानेश्वरांचे चित्र प्रचलित आहे ते तसे नसावे. डोक्यावर रुळणारे केस नसुन संजाब शेंडी असावी. गुलाबमहाराजांनी अंध असुनही ज्ञानचक्षुंनी ज्ञानेश्वरांना पाहून त्यांचे चित्र रेखाटले. अर्थात यावर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे.