तर...
मळभ हटले की सूर्य सापडतोच असं नाही. तोवर रात्रही झालेली असू शकते. प्रकाश वाट्याला आला की तो मनाप्रमाणे नसतो उधळायचा. आपलं मन म्हणजे खोल गुहा- उभी की आडवी ते नाही माहीत. कदाचित दोन्हींच मिश्रण असावं. त्यामुळेच तर कधी खूप खोलात गेल्यासारखं वाटतं तर कधी खूप मागे. कुठून आणायचा मग इतका सारा प्रकाश, स्वत:चं मन पादाक्रांत करायला? बरं गुहेचं हे भारी असतं नाही- बाहेरून कितीही आग लागू देत, आतला अंधार अचल, अविरत आणि जवळपास अजिंक्य! म्हणून सूर्य माथ्यावर असला की डोक्यात अंधारात चाचपडायचं बळ आणि अनुभव दोन्ही गोळा करावा. ज्यांनी वचन दिलं नाही त्यांना गृहीत का धरावं? उद्या पृथ्वी फिरलीच नाही तर...