व्यायाम आणि डाएट (विविध प्रकारची) याबद्दल इतक्यांकडून,इतक्यांदा, इतकं लिहिलं गेलंय की आता ही वृद्धा आणखी नवीन काय लिहिणार असं तुम्हांला वाटेल. पण जसा/जशी प्रत्येकजण प्रेमात पडतो/पडते. काहीजणं तर अनेकदा प्रेमात पडतात, आणि त्या प्रत्येकाला आपलं प्रेम वेगळं, नव्या नवलाईचे, नवंकोरं आणि दुसऱ्याला"सांगण्यासारखं"वाटतं तसंच हे आहे. मलाही माझ्या व्यायामाबद्दल नव्यानं सांगावंसं वाटतं.
खरं सांगायचं तर मी जन्मभर व्यायाम करत आलेली आहे. पण माझ्या वजनाचा आणि व्यायामाचा फारसा काही संबंध नाही हे माझ्या पक्कं लक्षात आलेलं आहे. वजन यदृच्छेनं वाढतं आणि कमी होतं.
सुरुवातीला मी रोज पहाटे उठून पळायला, म्हणजे वेगाने चालायला खरं तर, .. जायची (गेले ते दिवस!) तरीही वयपरत्वे जरासं स्थूलत्व आलंच. पळणं जमेना, मग पहाटे उठून नुसतं चालायला सुरुवात केली. कधी योगासने केली तर कधी टेबल टेनिस खेळले. मी लहानपणी आणि तरुणपणी बऱ्यापैकी बारीक होते. पण हळुहळू चाळिशीनंतर नंतर जाड झालेच. नोकरीत स्थिर झाले. प्रपंचातील जबाबदाऱ्या थोड्या कमी झाल्या आणि पन्नाशीत माझ्या सामाजिक वजनवाढीबरोबरच शारीरिक वजनही आणखीच वाढलं. असं प्रत्येकाचं होतं. माझंही झालं. त्यात काय मोठंसं लागून गेलंय!. अशावेळी प्रत्येक जण नव्यानं ठरवतो की,आता व्यायाम वाढवायचा आणि कॅलरीज बर्न करायच्या. असा व्यायाम करताना आणि तो अपयशी झाल्यानंतरच्या आपल्या झालेल्या फजित्या(आमच्यात फजितीचं अनेकवचन फजित्या असंच करतात!),सांगायच्या. (त्याला मी कशी/ कसा जबाबदार नाही, ते सांगायचं)त्यावर लेख लिहायचे. मीही तेच करतेय.
आता सत्तरी ओलांडली आणि पंचाहत्तरी दिसू लागली, तरी मी झेपेल तसा व्यायाम करते. सकाळी साडेआठ ते सव्वानऊ अशी पंचेचाळीस मिनिटं चालते. त्या चालण्याने माझे पाय इतके दुखतात,की कधी एकदा घरी जाते असं मला होतं. मी इतकी हळूहळू चालते की काय बिशाद आहे कॅलरीज फिलरीज बर्न व्हायची! त्यानंतर मी नव्या "इंटरमिटंट फास्ट"चा एक भाग म्हणून (वो किस्सा फिर कभी) जेवते. मग तासाभराने तीस मिनिटे सायकलिंग. म्हणजे व्यायामाची जागीच उभी राहणारी सायकल. मग आंघोळ, देवाचे म्हणणं इत्यादी. मग दुपारी तीन ते साडेचार योगासने आणि प्राणायाम. एवढं सगळं करुन मी इतकी थकते आणि मला इतकी भूक लागते की (इंटरमिटंट फास्टची दुसरी वेळ) सहा वाजता मी जेवते. तेवढं जेवून घेतले की मी टीव्ही वरच्या कौटुंबिक बोअरिंग मालिका बघायला आणि जांभया द्यायला मोकळी!
व्यायाम करणाऱ्यांचे प्रत्यक्ष किंवा व्हाॅटस्ॲप किंवा अन्य ग्रुप बनतात. त्यात प्रत्येक जणाने रोज केलेला व्यायाम सांगायचा किंवा टाईप करायचा. काही जण रोज दहा/दहा किलो मीटर पळणारे लोक.. त्यांना वंदन. काहीजण ४०/४०किलोमीटर सायकलिंग करायचे. त्यांना दोनदा वंदन. हे सर्व लोक फक्त न्यूनगंड देणारे असतात. त्यांच्यापुढे माझा व्यायाम उल्लेखणे म्हणजे मला संकोचच. पण ते म्हणतात,"आजी, वयाच्या मानाने तुम्ही खूप करतात. आम्ही तुमच्याकडून स्फूर्ती घेतो. "चला याही वयात मी कुणाचीतरी स्फूर्तीदेवता आहे, आणि तीही व्यायामासाठी..", हा विचार मला व्यायाम करायला नवं बळ देतो.
इतकं सगळं मी चार महिने केलं. चार महिने वजनकाट्यावर उभीच राहिले नाही. म्हटलं एकदम उभं राहून स्वतःला सरप्राइज करु. मी वजनकाट्यावर उभी राहिले तर काय! माझं वजन फक्त एक किलो कमी झालं होतं. मला रडू कोसळलं. इतकं सगळं करुन फक्त एकच किलो? असे निराशेचे प्रसंग काही माझ्या आयुष्यात कमी वेळा आलेले नाहीत. अहो,मी अनेक वेळा माझं वजन कमी करुन दाखविले आहे. जसं दारुडे म्हणतात,मी अनेक वेळा दारु सोडलेली आहे, तसं.
तरीही फक्त एकच किलो कमी? हाय हाय! वृद्धावस्थेत लठ्ठपणामुळे मला ब्लडप्रेशर,हार्ट अटॅक, डायबेटिस यांपैकी एक काहीतरी होणार नाही ना? किंवा आहे त्यातले बळावणार नाही ना? मला चिंता वाटू लागली. चिंतेमुळे वजन कमी होतं म्हणून मी तिकडे लक्ष दिले नाही. पण मी संतापले होते. वाटलं फेकून द्यावं ते डाएट. भंगारात घालावी ती एक्सरसाईज सायकल. टाकून द्यावी ती उपकरणे. का शरीराला त्रास द्यायचा? का मन मारायचं?
थोड्या वेळाने मन शांत झालं. त्रागा संपला. ठरवलं मर्यादित खाणं, झेपेल एवढाच व्यायाम निष्ठेने करायचा. वजनाची चिंता करायची नाही. त्याला वाटलं तर होईल ते कमी! I am happy now.
प्रतिक्रिया
31 May 2022 - 1:14 pm | उगा काहितरीच
छान लिहिलंय की आजी. To be or not to be पेक्षा मोठा प्रश्न आहे dumbell or burger. ५ किमी पळा की १० किमी वर असलेली मिसळ चापा. सकाळी लवकर उठून जिम ला जा की रात्री मस्त पार्टी करा.
31 May 2022 - 1:39 pm | sunil kachure
१) शारीरिक शक्ती वाढून स्पर्धा जिंकण्यासाठी.
.हा हेतू असेल तर.
विविध हार्मोन्स बदलणारे suppliment घेतली जातात.
टार्गेट.
प्रचंड energy शरीरात निर्माण व्हावी
२) काल्पनिक सुढोल शरीर निर्माण करण्यासाठी.
.इथे विविध डाएट ,व्हिटॅमिन, suppliment,वापरली जातात
टार्गेट प्रमाण बद्ध शरीरं
३)
निरोगी शरीर .कोणतेच आजार नाहीत
सुडौल शरीर हा हेतू नाही,अती प्रचंड शक्ती हा हेतू नाही वजन कमी हा हेतू नाही
फक्त निरोगी शरीर...
फक्त व्यायाम.डाएट नाही,व्हिटॅमिन suppliment नाही,हार्मोन्स बदलणारी औषध नाहीत..
फक्त व्यायाम आणि पारंपरिक आहार.
.असे वर्गीकरण करता येईल
31 May 2022 - 2:59 pm | सस्नेह
मी सकाळी अर्धा तास स्ट्रेचिंग/योगासने/एरोबिक्स यापैकी एक एक आलटून पालटून प्लस अर्धा तास प्राणायाम इतके करते. आणि संध्याकाळी अर्धा तास वॉकिंग. तेही रोज नाही, एक दिवसाआड. एक वर्षात माझे ७ किलो वजन कमी झाले.
अर्थात आहाराची जोडही आवश्यक आहेच. भात आणि साखर पूर्णपणे बंद. आठवड्यातून दोनदा थोडेसे गोड पदार्थ. दोनच वेळा जेवण. मधल्या वेळी फळ आणि वाटीभर चुरमुरे/चिवडा/फरसाण असे काहीतरी.
करुन बघा तुम्ही.
31 May 2022 - 5:37 pm | उन्मेष दिक्षीत
ला माझा एक मित्र डाय इटिंग म्हणायचा ते आठवलं.
31 May 2022 - 5:51 pm | sunil kachure
पारंपारीक जेवण आणि दिवसभर शारीरिक ॲक्टिविटी.
.हे निरोगी आयुष्याचे गणित आहे.
Bmi, वजन,कॅलरीज ,फॅट्स..
हे प्रश्न आपण निर्माण केले आहेत
31 May 2022 - 6:06 pm | अमर विश्वास
व्यायाम ,,, I do care
वजन कमी होणे हे ७०% आहार आणि ३०% व्यायाम यावर अवलंबून आहे ... दोन्ही महत्वाचे ..
डॉक्टर साहेबांची (डॉ खरे ) वजनाचा काटा नावाची अप्रतिम लेखमाला मिपा वर आहे ... त्यामुळे मी अजून काय बोलू ..
31 May 2022 - 7:42 pm | कर्नलतपस्वी
तुमच्या पेक्षा चार पावले मागे. "शेवटचा दिस गोड व्हावा " , म्हणजे आगदी शेवटच्या दिवशी लाडू,जिलबी ,पाणीपुरी खावून निजधामास जाता यावे म्हणून व्यायाम.
उतारवयात व्यायाम शारीरिक रखरखाव (maintenance) करता. शरीर रखरखीत होऊन दवाखान्यात सुईने पाणी आणी नळीने अन्न नको म्हणून जमेल तसा झेपेल तसा शारीरिक व मानसिक व्यायाम उत्तम.
छान लिहिलंय.
31 May 2022 - 7:45 pm | कर्नलतपस्वी
नकोत कुठले आरोग्य सल्ले
नका समजू आम्हा निरे, निठ्ठंले
नको दिवेकर नकोच दिक्षू
आमचे आरोग्य आम्हीच रक्षू
ठावे आम्हा सारे आहे
काय खावे अन काय करावे
गोळ्या ,काढे निरे बहाणे
सोडून द्या चिंता करणे
आताच कोठे अर्थ कळाला
अन उलगडले हे जीवन गाणे
31 May 2022 - 8:01 pm | भागो
छान गाणे आहे हे.
2 Jun 2022 - 12:51 pm | नगरी
आजी तुमच्या उलट माझे, मी 4 km जाणे आणि परत येणे असे 8 km चालतो , मस्त दाबून जेवतो पण एक किलो वाढेल तर शपथ!माझ्यावर डॉक्टरनी सर्व प्रयोग करून पाहिले पण व्यर्थ, याचा अर्थ असा नाही की मी अशक्त आहे.चांगला काटक आहे मी 'ये हाडे नही फोउलाद है'
2 Jun 2022 - 8:39 pm | चौथा कोनाडा
छान लिहिलंय आजी !
हे बेष्ट झालं ! आय्याम हॅप्पी नाऊ ... हे महत्वाचं
17 Jun 2022 - 3:52 pm | आजी
उगा काहितरीच-माझं लिखाण'छान'वाटलं! धन्यवाद.
Sunil kachure-तुम्ही नीट कारणमीमांसा आणि वर्गीकरण दिलंयत. बरं वाटलं.
सस्नेह-तुम्ही म्हणता तसं करून बघेन.
उन्मेष दिक्षीत-डाय इटिंग! व्वा, छान कोटी !
Sunil kachure-पटलं.
"वजनाचा काटा"वाचणार आहे.
कर्नलतपस्वी-लिखाण आवडलं हे वाचून बरे वाटले."शेवटचा दिस गोड व्हावा"म्हणून व्यायाम. तुमची कविता आवडली. भागोनाही तुमची कविता आवडली.
नगरी-तुमच्या काटकपणाबद्दल आणि "फौलादी हाडांबद्दल"अभिनंदन.
चौथा कोनाडा-"आय ॲम हॅपी" महत्त्वाचं वाटतं ना तुम्हांला? तुम्हीही हॅपी राहावंत ही शुभेच्छा.