मुक्त कविता

अंतर्नाद

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
27 Mar 2021 - 7:55 pm

अमूर्ताचा अंतर्नाद
अक्षरांच्या कपारीत
शब्दाशब्दाच्या घळीत
ओळीओळीत गुंजला

अमूर्ताचा पायरव
हलकेच जाणवता
अनाहत तरंगांनी
डोहडोह डहुळला

अमूर्ताचा पोत कसा
अमूर्ताचा पैस किती
अमूर्ताचा डंख कुठे
विचारत विचारत
अणुरेणू झंकारला

मुक्त कविताकविता

खिडकी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
19 Mar 2021 - 12:57 pm

क्षितिजावरचा
निळसर पर्वत
कातळमाथा
ढगात घुसळत
भूशास्त्राला
कोडी घालत
खोल ठेऊनी
लाव्हा धुमसत
पुरातनाचे
सूक्त गुणगुणत

नभरेषेवर
उंच उसळुनी
दिसे अनाहूत माझ्या खिडकीत

निळे पाखरू
पहाटफुटणीत
पंखभिजवत्या
दवास झटकत
चोच मुलायम
पिसात फिरवीत
पंखांतील
अचपळ बळ जोखीत
साद घालुनी
अधीर, अवचित

नभांगणाला
उभे छेदुनी
उतरे अलगद माझ्या खिडकीत

आखीव रेखीव
खिडकी चौकट
निळ्या नभाचा
कापुनी आयत

निसर्गमुक्त कविताकविता

ते तुझ्याचपाशी होते

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
13 Mar 2021 - 4:26 pm

सळसळत्या झाडावरती
किलबिलणार्‍या पंखांनी
आणले नभातून जे जे
ते तुझ्याचपाशी होते

अर्थाचे अनवट कशिदे
विणणार्‍या चित्रखुणांना
जे जटिल असूनही कळले
ते तुझ्याचपाशी होते

तार्‍यांच्या मिथककथांचा
आकाशपाळणा अडता
जे पुरातनाला सुचले
ते तुझ्याचपाशी होते

मुक्त कविताकवितामुक्तक

मनातला ऐवज..

सरीवर सरी's picture
सरीवर सरी in जे न देखे रवी...
11 Mar 2021 - 12:37 pm

मनातला ऐवज..
दिलाय उधार
ठेव जपून...
वाटलं तर
परत कर..
कातर सांजवेळ
डोळ्यातलं काजळ
स्मिताच मोहळ
..
अन् नाहीच जमलं तर
उधळूही नको
फक्त कुरवाळत राहा
एक एक भाव जपत राहा..

मुक्त कविताकवितामुक्तक

तुझे चालणे दरवळून जाते.......

किरण कुमार's picture
किरण कुमार in जे न देखे रवी...
28 Feb 2021 - 1:29 pm

उन्हाला कसा थांगपत्ता नाही
कसे झाकले नभाला धुक्याने
इथे अतृप्त सुर्य व्यक्त होतो
जराशा कवडश्यातूनी मुक्याने ............

प्रवासा पुन्हा हाक अस्तित्व देते
गंधीत मृदाचे तृणांचे शहारे
इथे स्पर्श ओला निळ्या सागराचा
गगनातूनी जणू थव्यांचे पहारे .............

इथे धुंद असते अशी शर्वरी की
कुठे चांदणे विरघळून जाते
किती बोलणे ते चमकत्या विजेचे
तुझे चालणे मात्र दरवळून जाते ..............

- किरण कुमार

bhatkantiNisargपाऊसमुक्त कविताकविता

वार्‍याने पेटते रान आता हे ..

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
21 Feb 2021 - 2:50 pm

घामाच्या चिंब भरलेल्या सदर्‍याला
ठिगळे अनेक रंगबेरंगी..
पोटाच्या खळगीसाठी उगाच चालली
बेसुमार झीज पायाची ..

वार्‍याने पेटते रान आता हे
कशास विचार फुका..
होरपळले शेत जरी हे
ढेकळाचा रंग काळा तो काळाच..

ठिंणगी बनलेला विचार तुझा
तू दूर आकाशातील तारा ..
ओसाड ह्या जगण्यावरती
उगा बुजगावण्यांचा पहारा..

दगडाला कुठे फुटतो पाझर ?
कुठे शोधु देवपण त्याच्यात ?
जन्मलो मातीत या
पुन्हा मातीत मिटण्यासाठी...

-- शब्दमेघ
(शीघ्रकाव्य, २१-०२-२०२१)

मुक्त कविताकविता

कधीतरी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
2 Feb 2021 - 4:30 pm

उल्कापाताच्या आतषबाजीने
दिपून जातोय मी आज
पण कधीतरी
चंद्रमाधवीच्या अद्भुत प्रदेशात
अंतर्बाह्य उजळायचंय मला

शब्दांच्या समृद्ध अडगळीत
हरवून जातोय मी आज
पण कधीतरी
शब्दापल्याडच्या घनघोर निबिडात
निरुद्देश पोहोचायचंय मला

नीटनेटक्या रंगरेषा
रेखाटतोय मी आज
पण कधीतरी
अमूर्ताचं असीम अवकाश
अनवट रंगांनी भरायचंय मला

त्रिमितींच्या अभेद्य पिंजर्‍यात
घुसमटतोय मी आज
पण कधीतरी
स्थलकालाचं
वितान व्यापून
थोडं थोडं उरायचंय मला

मुक्त कविताकविता

हाक आभाळाची येता

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
1 Feb 2021 - 5:07 pm

रूटीनाचे गंजलेले
यंत्र अखंड घुमते
जुन्या व्रणावर रोज
नवी जखम करते

अनावर भोवंडून
शिणलेल्या प्राणासाठी
वाटेवरच्या झाडाची
साथ वाटे मला मोठी

त्याचा मायाळू विस्तार
घाले हिरवी फुंकर
एक रंगीत पाखरू
झुले उंच फांदीवर

इवल्याश्या कंठातून
काढी तरल लकेरी
हाक आभाळाची येता
झेपावते दिगंतरी

मुक्त कविताकविता

नीरव

सरीवर सरी's picture
सरीवर सरी in जे न देखे रवी...
21 Nov 2020 - 4:45 pm

असंख्य काजव्यांच रान
अंधाराला लावला टित

सरू नये उरू नये गाणं
मर्मभेदी घुसलाय मान

तरंगावर पहूडली कात
अशी ही नीरव कवनं

मुक्त कवितामुक्तक

...पाहिले म्यां डोळा

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
5 Oct 2020 - 11:10 am

पालथ्या मुठीत घुसवलेली iv ची सुई
जीवघेण्या कवितेपेक्षा टोचरी.
अँटिव्हायरलच्या ठिबकसिंचनाचा
गिनीपिगी जीवरोपट्यावर विफल अभिषेक.
बेबंद नाडीठोक्यांपुढे मुक्तछदंही अचंबित.
धपापते विद्रोही तप्तश्वास.
PPE आच्छादितांच्या नि:शब्द कवायतींनी कोंदलेले भवताल.
स्वप्न-जागृती, शुध्दी-बेशुध्दीच्या अस्थिर सीमारेषांवर भोवंडणार्‍या जाणिवानेणिवांची कण्हणारी कडवट कडवी.
संपतील एकदाची आत्ताच
की,
ध्रुपदत राहतील
व्हेंटिलेटरच्या जागत्या पहार्‍यात
आज
उद्या
परवा?

मुक्त कवितामुक्तक