कळले तुजला?
कारण काढून भेटायाचे
किती दुरूनी आलेला तू!
लपवलेस तू मनातले तरी
किती बाभरा झालेला तू!
कळले मजला...
विचारसी तू देऊन हाती चित्रे काही
सापडते का यांच्यामधले लपले अक्षर?
इतके बोलून सहज उभा तू माझ्यामागे
आणि इथे मी चूर लाजुनी शोधीत उत्तर
कळले तुजला?
मधुभासांचे रिंगण पडले सभोवताली
गोंधळले मी तुझा गंध का होते अत्तर?
केसांवरती तव श्वासांची मोहक फुंकर
क्षणाक्षणाला वितळत होते मधले अंतर
कळले तुजला??