अंड्याचे फंडे ८ - हरवलेले आवाज
बरेच दिवसांनी अंड्याचे कॉलेजला जाणे झाले जे तो कधीच मागे सोडून आला होता. होस्टेलला चक्कर मारली पण शुकशुकाट वाटला. बरेच वर्षांनी एखाद्या ओळखीच्या जागी जावे आणि तिथे कोणी आपल्या ओळखीचे दिसू नये की मग एकतर तेथील गजबजाट तरी अंगावर येतो किंवा शुकशुकाट तरी वैताग आणतो. तिथून बाहेर पडलो आणि कॉलेजच्या मुख्य इमारतीकडे वळलो. रात्रीचे साडेदहा वाजले होते. सिनेमा बघून परतत होतो. सोबतीला कॉलेजमधीलच मित्र होते. सारे एकाच कॉलेजचे माजी विद्यार्थी, म्हणून रात्री घरी परतण्याऐवजी कॉलेजलाच मुक्काम टाकून मैहफिल जमवायचा बेत आखला. कॉलेजच्या मुख्य इमारतीचा एक मजला रात्रभर जागत असतो हे सवयीने माहीत होते.