"ती" काळरात्र !
आमच्या चिमुलवाड्यावरील बाळा हा तसा गडी माणूस. आजकाल वेगवेगळ्या घरांत वेगवेगळ्या "कामवाल्या" असतात ती सिस्टिम आमच्या वाड्यावर अजूनही आलेली नाही. धुणी-भांडी करायला शांताबाई आणि बाकीची जी म्हणून काही कामे असतील ती करायला हा बाळ्या. एकंदरीत स्वयंपाकघरात बाळ्याचे काही काम नसे व उरलेल्या घरात शांताबाईचे ! तर एवढ्या घरची एवढी कामे करून बाळ्या बाकड्यावर बसून विड्या फुकत असे. बाकी आम्ही लहान असताना गोविंद मामा आम्हाला कानातून आणि नाकातून विडीचा धूर काढून दाखवायचे ! "डोळ्यातल्यानूय काडटा हा पय !" असेही ते आम्हाला सांगायचे पण कित्तीतरी वेळा बारकाईने पाहून सुद्धा डोळ्यातला धूर काही आम्हाला दिसला नाही.