आमच्या चिमुलवाड्यावरील बाळा हा तसा गडी माणूस. आजकाल वेगवेगळ्या घरांत वेगवेगळ्या "कामवाल्या" असतात ती सिस्टिम आमच्या वाड्यावर अजूनही आलेली नाही. धुणी-भांडी करायला शांताबाई आणि बाकीची जी म्हणून काही कामे असतील ती करायला हा बाळ्या. एकंदरीत स्वयंपाकघरात बाळ्याचे काही काम नसे व उरलेल्या घरात शांताबाईचे ! तर एवढ्या घरची एवढी कामे करून बाळ्या बाकड्यावर बसून विड्या फुकत असे. बाकी आम्ही लहान असताना गोविंद मामा आम्हाला कानातून आणि नाकातून विडीचा धूर काढून दाखवायचे ! "डोळ्यातल्यानूय काडटा हा पय !" असेही ते आम्हाला सांगायचे पण कित्तीतरी वेळा बारकाईने पाहून सुद्धा डोळ्यातला धूर काही आम्हाला दिसला नाही. पण बाळ्याला मात्र कानातून धूर काढणे कधीच जमले नाही ! फारफार तर तो नाकातून काढायचा ! बाळ्याची सगळी कामे संपतात तोवर ७-७:३० व्हायचे. घरात बायकांच्या मालिकांचा तोच काय तो वेळ ! आता त्या मालिकांत रस नसल्याने मीही बाळ्यासोबत बाहेर बाकड्यावर बसायचो व विडीच्या साथीने बाळ्या सांगत असलेल्या गोष्टी कुतूहलानं ऐकायचो ! अश्याच एका संध्याकाळी बाळा आणि मी बाकड्यावर गजालींना बसलो होतो. म्हणजे मी ऐकायला व तो सांगायला ! बाळ्याने कामाच्या शर्टातुन लीलया विड्यांचे पाकीट काढले. तिथेच ठेवलेल्या फस्काने त्याने लीलया एक विडी पेटवली. काडी विझवून ती बाहेर फेकून दिली आणि कुठल्याही जुन्या सिनेमातील व्हिलनच्या तोऱ्यात पहिला धूर सोडून स्वतःला बाकड्यावर सामावून घेतले व बाळ्याने सांगितलेली हि गोष्ट !!!
कित्ती तरी वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या काळी चिमूवाड्यावरील अधिकसे लोक स्वावलंबी असल्याने बाळाकडे जास्त कामे नव्हती. मग म्हणून बाळा देवकीकृष्णाच्या देवळात साफ सफाईची कामे करणे, कोणाच्या भाटात वावर करणे, कोणाला जमीन सारवून देणे, कोणाला तेल चोळणे इत्यादी विविधांगी कामे करायचा. त्यात तो पहाटे ''नुस्त्याच्या फॅक्टरी"त जायचा व तिथे जाळ्या, कॅन इत्यादी साफ करण्याचे काम करायचा. "नुस्त्याच्या फॅक्टरीसाठी , पावसाच्या सुरुवातीलाच, नवीन सीझनसाठी, खास ठरलेल्या कंत्राटदाराकडून मजुरांना आणण्याचे एक महत्वाचे काम बाळा करायचा. रेल्वेचे तिकीट मिळाले तर मिळाले नाही तर हायवे वर उभा राहून एका मागे एक ट्रक बदलत बाळा कणकवलीला जायचा. तिथून येताना मात्र कंत्राटदाराची टेम्पो असायची !
तर, असाच कोणे एके वर्षाचा पावसाळा सुरु झाला होता. रात्रीचे ८ वाजले होते. बाळ्याने आपल्या ट्रँकेत मिळतात ते कपडे कोंबले व बाहेर येऊन पायात चप्पल चढवताच त्याचा बेल्ट शेजारच्या कुत्र्याने चावून चावून अर्धा केल्याचे त्याच्या लक्षात आले. ते पाहून बाळ्या देवकीकृष्णाच्या देवळात गेला. व येताना लोकांना त्याच्या पायात नवीन चप्पल दिसले ! तिथून मग "दिलखुष बार" मधून बाळकडूची एक बाटली घेऊन बाळ्या निघाला. तिठ्यावर भेटलेल्या फॅक्टरीतल्या सायबाने त्याला वार्षिक जवाबरीची कल्पना दिली. काही सूचना वगैरे दिल्या, २३५० रुपयांचे एक पाकीट दिले व बाळ्याला सी ऑफ केला. तिठ्यावरून जाणाऱ्या एस.टिला बाळ्याने गाठले व बाळ्याचा प्रवास सुरु झाला. बशीत बाळाला पकडून १३ प्रवासीच होते. त्यातले अर्धे अधिक बहुदा झोपेत असावेत. वाड्याची सीमा काढून बस पुढे निघाली. थंड वारा वाहात होता. काही सेकंदातच पाऊस पडेल अशी चिंन्हे होती. चिमूलवाड्यावरील माणसांच्या आवाजाची सवय झालेल्या बाळ्याला आज बसच्या खिळखिळणाऱ्या खिडक्यांचाही आवाज स्पष्ट ऐकू येत होता ! शांततेकडे दुर्लक्ष करण्यासाठी बाळ्याने खिडकीतून दिसणाऱ्या दुकानांच्या नावांचे बोर्ड वाचायला घेतले. तो उद्योग करेस्तोवर बस महामार्गाला टेकली व बाळ्या एक बरासा आळस काढून बशीतून उतरला.बाजूलाच उभा राहून ट्रक वा टेम्पोची वाट तो पाहू लागला. काही मिनिटे वेळ घालवण्यासाठी रस्त्यावरील कुत्र्यांना त्याने खेळवले व दुरून येणाऱ्या एका पिक-अपला बघून त्याने कुत्र्याचा नाद सोडून दिला. जवळ येणाऱ्या पिक- अपला त्याने थांबवले.
"पात्राव, कणकवली ?"- बाळ्या
"थंयच चाल्लाव आमी सगले. पण हय पुढे जागो नाय हा. तुमि मागे बसश्यात काय ?!!"- चालक आणि पुढे दाटीवाटीने बसलेले ४ प्रवासी
बाळ्याने आणि आणि वेळ न दवडता आपली ट्रँक मागे ठेवली व आत चढून चालकाला इशारा केला. बाळ्या थोडा निर्धास्त झाला. आता पुन्हा आणि गाडी बदलावी लागणार नाही ह्याचा त्याला आनंद झाला. पिक-अप मध्ये बाळाच्या आजूबाजूला १-२ मोठ्या पिशव्या, गाठोडी, एक गुंडाळलेली गादी, १ जुने कपाट, काही बांबूचे कोंडे इत्यादी सामान ठेवले होते. ते बाजूला ठेऊन त्याने आपल्यासाठी जागा करून घेतली. रात्र किती झाली होती त्याचा काही अंदाज नव्हता. झोप येत असल्याने तिथे ठेवलेली ती गादी त्याने थोडीशी सोडली व तो शांतपणे झोपी गेला.
नुकतेच उजाडले होते.बाळ्याला जाग आली ती मोठमोठ्याने रडण्याच्या आवाजाने ! गाडीतल्या त्या लोकांनी मागे येऊन सगले सामान उतरवायला सुरुवात केली.बाळानेहि स्वताहाचे सामान उतरवले. तेवढ्यात त्या सगळ्यांनी ती गादी खाली उतरवली व रडारडीचा आवाज आणखी वाढला ! जमावाने अर्धी गुंडाळलेली ती गादी हळुवारपणे सोडवली व त्यात असलेला एक मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन केला ! गोव्यावरून कणकवलीला पूर्ण रात्र आपण एका शवासोबत झोपलो ह्या कल्पनेनेच बाळाला कुडकुडा भरला ! पुढे बसलेले नातेवाईक एव्हाना उतरले होते. त्यांनी बाळाची माफी मागण्याचे एक शास्त्र केले. बाळ्या तोंडाला पाणी लावून शेजारच्या उडपी हॉटेलात बसला. बाळा व चहा केव्हाच थंड झाले होते ! जाताना देवळाकडले चप्पल चोरायचे दुष्कृत्य केले म्हणून देवकीकृष्णाने तर हि अद्दल घडवली नसेल ?! असा एक प्रश्न बाळाच्या मनात क्षणभरासाठी का होईना पण चमकून गेला !
समाप्त
प्रतिक्रिया
16 Dec 2019 - 5:43 pm | मुक्त विहारि
खुसखुशीत
16 Dec 2019 - 8:32 pm | सौंदाळा
साधीच गोष्ट, पण सुंदर शैली, आवडली
16 Dec 2019 - 10:17 pm | अभिनव प्रकाश जोशी
धन्यवाद !!
20 Dec 2019 - 4:21 pm | विनिता००२
छान लिहीलेय. भाषा आवडली