मागील दुवा http://misalpav.com/node/45778
ती दोघेही त्यांच्या त्यांच्या मित्रमैत्रीणीना सांगणार, ती त्यांच्या मित्रमैत्रीणीना , त्या त्यांच्या, ती त्यांच्या. असे करताना कोणाच्या घरी पाहुणे वगैरे आले असतील तर तेही ऐकणार, आणि ते त्यांच्या त्यांच्या गावी गेल्यावर तिथे सांगणार. ते ज्याना सांगणार ते इतरांना सांगणार. हळू हळू हे भारतभर होणार. बातम्या अशाच पसरत असतील. ….
रेडीओवरच्या बातम्या सगळेजण एकाच वेळेस ऐकतात . त्यांना पसरवायची गरज नसते. पण एकाला समजलेली बातमी तो दुसर्या दोघांना सांगतो. दुसरे दोघे आणखी दोघा दोघांना सांगतात. ते चौघे आणखी दोघा दोघाना सांगतात. , मग ते आठजण आणखी दोघा दोघांना……
हिवतापाची लागण ही अशीच पसरत असेल. एक निरोगी डास हिवताप झालेल्या एकाला चावतो. त्या नंतर तो त्याचा हिवतापाचा विषाणू घेवून फिरताना नवीन दोघांना चावतो. मग त्या दोघांना हिवताप होत असेल त्या दोघांना चावलेले डास आणखी दोघांना चावत असतील ते चौघे हिवतापाने आजारी पडत असतील त्यांना डास चावत असतील……. मग ते आणखी आठजणांना…. २, ४, ८, १६, ३२, ६४,१२८,२५६,५१२,१०२४,२०४८,४०९६..... अनंत लोक हिवतापाने आजारी पडतील.
गणीताच्या घाटे सरांनी अंकांच्या अशा मांडणीला भूमितीय श्रेणी म्हणतात असे शिकवले होते.हिवतापाचे एक ठीक आहे की तेथे डास चावलेला प्रत्यकजणाला हिवताप होईलच असे नाही, शिवाय एखाद्याला डास चावून त्याला हिवतापाची लागण व्हायलाही काही वेळ लागतो. असे नाही होत की चावला डास की झाला हिवताप. मधे वेळ जातोच. त्यामुळे हिवताप पसरायला वेळ लागत असेल.
पण बातम्यांचे तसे नाही. एकाला समजले की ते लगेच समजतेच. मधे वेळ जाईल तो फक्त ज्यांना सांगायचे ती दुसरी दोन माणसे सापडेपर्यंतच. पण ज्यांना सांगतो त्यांना बातमीची लागण नक्की होणारच. आणि ते लोक ती बातमी इतरांना सांगणारच.
अर्थात हे ती ऐकलेली गोष्ट किती महत्वाची आहे त्यावर सगळं आहे. आपण सगळ्याच गोष्टी काही सगळ्यांना सांगत नाही, गणीतातले उदाहरण सोडवताना घाटे सरांच्या हातातला खडू तुटला. ही बातमी फारतर वर्गातल्या पन्नास मुलांपर्यंत टिकते. ती सगल्यांनीच पाहिलेली असते.पण शाळेत कसल्यातरी कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांच्या पॅंटची चेन लागलेली नाही. ही बातमी एका मिनीटात सगळ्याना समजते होते. आणि त्या पाहुण्यांच्या भाषण ऐवजी ती न पाहिलेली पँटची चेनच जास्त गाजते.
घाटे सरांनी ही भुमितीय सारणी शिकवताना एका राजाची गोष्ट सांगतात. एक राजा असतो. त्याच्याकडे एक भिकारी येतो. राजा भिकार्याला म्हणतो काय हवे. भिकारी म्हणतो थोडे धान्य हवे. राजा विचारतो किती हवे. पसाभर धान्य पुरेल का आजच्या साठी. राजा म्हणतो मी दहा दिवस रोज पसाभर गहू देईन. भिकारी गणीत शिकलेला होता तो म्हणाला रोज पसाभर मिळाले तर माझ्या इतका आनंदी कोणीच नसेल. रोज पसाभर नको तसे मिळाले तर मी आळशी होईन. थोडे थोडे द्या पण निदान चौसष्ठ दिवस द्या .अगदी एक एक दाणा द्या आज जेवढे दिलेत त्याच्या दुप्पट उद्या द्या. आन एक तर उद्या दोन , परवा चार तेरवा आठ… . असे चौसष्ठ दिवस द्या. साधाभोळा राजा अर्थातच गणीत शिकलेला नव्हता. पण राजा होता राजाला वाटले की काय येडा आहे हा. पसाभर गहू देतोय तर घेत नाही आणि दोन चार गव्हाचे दाणे मागतोय. त्याने भिकार्याला भर दरबारात तसे वचन दिले. वाचन पूर्ण करू शकलो नाही तर राज्य तुला देऊन टाकेन.
झाले. भिकारी रोज राज्याच्या धान्य कोठारासमोर जाउ लागला त्याने पहिल्या दिवशी गव्हाचा एक दाण घेतला. दुसर्या दिवशी दोन तिसर्या दिवशी चार चौथ्या दिवशी आठ पाचव्या दिवशी सोळा... बत्तीस ,चौसष्ठ , एकशे अठ्ठवीस असे करत दहाव्या दिवशी पसाभर गहू झाले. अकराव्या दिवशी दोन पसे, सोळाव्या दिवशी गहू न्यायला मोठी पिशवी अपुरी पडली. अठराव्या दिवशी तो गहू पोत्यात घालून नेले. वीसाव्या दिवशी गहू मोजून मोजून कोठाराचे दिवाणजी थकले. त्यांनी सरळ सरळ वजन करून गहू दिले. बावीसाव्या दिवशी सोळा पोती गहू झाले. बत्तीसाव्या दिवशी राज्या कोठारातली गव्हाची सगळी पोती संपली. दिवाणजीनी राजाला ही माहिती सांगितली. राजा वचनाचा पक्का. तो म्हणाला शेजारच्या राज्याकडून मागवा. शेजारच्या राजाने काही पोती गहू दिले. पण पस्तीसाव्या दिवशी ती पोतीही सम्पली. आणखी पोती गहु द्यायला शेजारच्या राजाने नकार दिला. युद्धाची पाळी आली. शेवटी या गणीत शिकलेल्या भिकार्याने पुढे काय काय केले त्याने ते धान्य कसे नेले या बद्दल सरांनी पुढे काही सांगीतले नाही पण ती भुमीतीय श्रेणी डोक्यात पक्की बसली. आमच्या सगळ्यांच्याच.
नेहमीच्या त्या फुटक्के हौद गळक्या तोट्या ऐकायची सवय झालेल्या आम्हाला हे गोष्ट खूप आवडली. ते धान्य भिकार्याने कसे नेले असल्या शंकाच पडली नाही .कधी नव्हे ते टंप्याला काहीतरी शंका होती. त्याने शंका विचारायला म्हणून हात वर केला होता. मला वाटल्के की त्याला पाणी प्यायला नाहीतर लघ्वीला म्हणून बाहेर जायचे असेल. पण तसेही नव्हते. मधली सुट्टी आत्ताच तर संपली होती. शंका विचारतोय म्हणजे याला गणीत नीट समजले असावे. तरी पण आता तो काय शंका विचारतोय यानेच मला छातीत धडधडायला व्हायला लागले.
काय रे काय शंका आहे.
सर…. टंप्या अडखळला. उभा राहूनही तो पुढे बोलेना. त्याला शंका विचारल्यावर सर काय म्हणतील याचा अंदाज नव्हता. पण हे घाटे सर होते इनामदार मास्तरांसारखे शंका का विचारली म्हणून छडी मारणारे नव्हते.
ह विचार विचार...… मनात ठेवू नकोस काही विचार. शंकेचं निरसन झालंच पाहिजे.
टम्प्या आता काय विचारतोय याची धास्ती एल्प्याला पण होतीच. त्याने टंप्याचा शर्ट खाली ओढला. त्यामुळे टंप्याचा तो जायला लागला. तरीही टंप्या उभाच होता.
तो काय विचारतोय याची उत्सुकता होतीच पण धास्तीही होती. कारण तो कुणाला काय विचारेल ते सांगता येत नाही. एकदा त्याने घरी आलेल्या एका पाहुण्याना त्या पाहुण्यांनी त्यांची बॅग खाली ठेवायच्या अगोदर "इथून जाणार कधी असे विचारले होते." अर्थात त्याच्या शंका इतरानाही पडलेल्या असतातच पण कशा विचारायच्या म्हणून ते विचारत नाहीत. टम्प्याने शंका विचारली की त्याचे उत्तरे इतरांनाही मिळतात. एकदा कार्यानुभवाच्या तासाला त्याने " दूध हे शाकाहारी की मांसाहारी" असे विचारून पुर्ण तास खाल्ला होता. कार्यानुभवाच्या सरांनी त्या नंतर पुन्हा कुठल्याच तासाला कोणाला काही शंका आहे का हे विचारले नाही. अर्थात ही शंका अधूनमधून पुन्हा डोके वर काढतच असते. त्याचे निरसन झालेच नाही.
मास्तरांनाही धडकी भरवणार्या या असल्या शंका टांप्याच विचारू शकतो. तो काय शंका विचारणार आहे हे तोच काय त्याचे आईबाबा ही सांगू शकत नसतील.
"विचार रे …. काय विचारायचं आहे" घाटे सरांना पुढच्या शंका बाँबची कल्पना नसावी किंवा ते पूर्ण तयारीनिशी आले असावेत.
सर तो भिकारी गणीत शिकलेला होता ना?
हो.
मग त्याच्यावर भीक मागायची वेळ का आली?
या प्रश्नावर घाटे सरांना बाउन्सर च्या अपेक्षेने पुढे आलेल्या बॅट्स्मनला एकदम सरपटी बॉल यावा तसे झाले असेल.
टंप्याच्या त्या शंकेने सरांचीच काय पण वर्गातल्या सगळ्यांचीच विकेट घेतली होती.
तास संपल्याची घंटा झाली . घाटे सरांची सुटका झाली.
त्या दिवशी शाळा सुटताना टम्प्याची शंका सगळ्यांच्या घरी गेली.
क्रमशः
प्रतिक्रिया
6 Dec 2019 - 4:07 pm | श्वेता२४
पात्र अतिशय आवडले आहे.
6 Dec 2019 - 8:38 pm | आनन्दा
भारीच!
6 Dec 2019 - 10:54 pm | सुचिता१
हा भाग ही आवडला. टंप्या ची शंका रास्त आहे. पुलेशु!!
7 Dec 2019 - 2:54 pm | यशोधरा
टंप्या म्हणजे तुम्हीच का हो विजुभाऊ?
7 Dec 2019 - 6:33 pm | सुधीर कांदळकर
छान, मन ताजे टवटवीत करणारे लेखन. टंप्याच्या प्रह्स्नावलीवरून विख्यात विज्ञानसाहित्यिक आयझॅक अॅसिमॉव्ह यांचा किस्सा आठवला.
छोटा जेमतेम १०-१२ वर्षांचा आयझॅक शाळेत. इतिहासाचा तास सुरू. मास्तर म्हणाले
'आणि अशा तर्हेने ईश्वराच्या कृपेने जॉर्ज वॉशिंग्टन लढाईत विजयी झाला.'
आयझॅकने विचारले 'मग ईश्वराने लढाईच का थांबवली नाही? फुकट माणसे मेली की.'
मास्तर लालबुंद. पुढे बोललास तर मार मिळेल म्हणून दम दिला.
टंप्या की जय! टंप्यागिरी झिंदाबाद! छान लेखाबद्दल अनेक अनेक धन्यवाद.
7 Dec 2019 - 6:33 pm | सुधीर कांदळकर
छान, मन ताजे टवटवीत करणारे लेखन. टंप्याच्या प्रह्स्नावलीवरून विख्यात विज्ञानसाहित्यिक आयझॅक अॅसिमॉव्ह यांचा किस्सा आठवला.
छोटा जेमतेम १०-१२ वर्षांचा आयझॅक शाळेत. इतिहासाचा तास सुरू. मास्तर म्हणाले
'आणि अशा तर्हेने ईश्वराच्या कृपेने जॉर्ज वॉशिंग्टन लढाईत विजयी झाला.'
आयझॅकने विचारले 'मग ईश्वराने लढाईच का थांबवली नाही? फुकट माणसे मेली की.'
मास्तर लालबुंद. पुढे बोललास तर मार मिळेल म्हणून दम दिला.
टंप्या की जय! टंप्यागिरी झिंदाबाद! छान लेखाबद्दल अनेक अनेक धन्यवाद.
19 Jul 2020 - 5:24 pm | चौथा कोनाडा
छान छान उदाहरणे देणारे गणीताचे घाटे सर भारीच !
टंप्याचं काय विचारणार, वाचा बंद करुन टाकतो बेटा !
हा भाग ही आवडला.
19 Jul 2020 - 5:27 pm | चौथा कोनाडा
पुढील भाग :
दोसतार - २८