दोसतार - २६

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
5 Dec 2019 - 8:17 am

मागील दुवा http://misalpav.com/node/45761#comment-1054834
पावसाची ना कशी गम्मत असते. अगोदर येतो तो त्याच्या येण्याची जहीरात करत. दवंडी पिटत. एकदम गडगडाट करत विजा चमकवत. तडाम तडाम ताशा वाजवत. आपल्याला डोळे झाकून कोणीतरी भॉ करावे तसा. अचानक गाठतो. रस्त्यावरून चालणाराला भिजवून टाकतो. शिवाजी महाराजानी कारतालब खानाला खिंडीत गाठला तसा. पावसाळा तसा सगळाच आवडतो. पण खास आवडतो तो पहिला पाऊस. पाटणची आज्जी तर मुद्दाम या पहिल्या पावसाची वाट पहायची. पहिला पाऊस आला की ती एकदम खुशीत यायची. खरे तर तीला पावसात भिजायचे असे. बघ पाऊस आलाय म्हणून बाहेर बोलवायची. मुद्दाम भिजायला पाठवायची. आणि मी बाहेर अंगणात भिजतोय हे पाहिल्यावर आत घेवून जायला स्वतः यायची. खरे तर मला घ्यायला आल्यामुळे तीलाही भिजता यायचं. मी एकदा तीला विचारलंही होतं. तु मला घ्यायला अंगणात येतेस तू पण भिजशील. आज्जीने डोळे मिचकावले. खुदकन हसली. म्हणाली अरे मलाही तुझ्यासारख्या गार्‍यागार्‍या भिंगोर्‍या करायला मज्जा येते. पण एकटीच पावसात खेळत बसले तर लोक म्हणतील आज्जीबाईला चळ लागलाय.
चळ म्हणजे गं काय आज्जी.
चळ म्हणजे मनात जे असतं ते सगळं करायचं. लहानपणी जे जे करायचं राहिलय ते सगळं चल ये बाहेर म्हणून काढायचं . गायचं नाचायचं खेळायचं.
मग काय बिघडलं. आम्ही करतोच की हे.
अरे ते तुम्ही मुलं सगळीच जणं करता. सगळ्याच लहान मुलांना करायला जमतं . काही म्हातार्‍या माणसाना ते जमत नाही. शिंगे मोडून वासरू व्हायची लाज वाटते. काही जणांना ते येतही नाही. मग आपल्याला येत नाही हे इतरांना कळू नये म्हणून त्याला ते लोक म्हातरचळ म्हणतात. जाऊ देत. ज्यांना जे म्हणायचं ते म्हणू दे. मी नाही पर्वा करत. आपण कसे मस्त सगळे छान करून घ्यायचे. पहिल्या पावसात भिजायचे , कोजागिरीच्या चांदण्यात गच्चीत निजायचे आणि शिवरात्रीला पहाटेपर्यंत जागायचे. एवढे करून बघ वर्षभर आनंदात रहाशील. बंद्या रुपयाएवढे सोळा आणे आनंदात. एवढे म्हणून आज्जी स्वतःशीच हसली बाळाचा खुळखुळा वाजल्यागत .
मग तीने माझे डोके पंचाने खसखसा पुसले. मला वाटले डोक्यातच खुळखुळा वाजतोय.
आज्जी अशी हसली की ती दिवसभर हसतच रहायची.तीच्या बारीक घंटेसारख्या किणकीणत्या आवाजात गाणी म्हणत रहायची. गातागाता अचानक एखादी गिरकीही घ्यायची मनातल्या कुठल्यातरी ठेक्यावर . डोक्यात वाजणार्‍या खुळखुळ्याच्या तालावर आज्जीची ती किणकीणणारी गाणी ऐकताना मलाही आज्जी सारखं नाचावसं वाटायचं . पण बाहेर कुठेच काही वाजत नसताना त्या मनातल्या ठेक्यावर नाचायचं कसं ? मी तर असं कुणी बीन ठेक्याने नाचताना दिसलं असतं तर येड्यातच काढलं असतं. पण तरीही आपण हे करून बघायलाच हवं एकदा. गणपतीत ढोल वाजत नसतानाही नाचून बघायचं एकदा. कोण बघतंय , येड्यात काढतंय याचा जर्राही विचार करायचा नाही. आज्जी अशी हसरी नाचरी झाली की घरात दिवे लावले नसतानाही लख्ख उजेड वाटायचा .दिवस कधी संपुच नये वाटायचे.
आज्जीला मी हे एकदा सांगितले होते. मग तीने मला आनंदी कावळ्याची गोष्ट सांगीतली.
एक राजा असतो. त्याच्या राज्यात सगळे दु:खी असतात. कोणीच नाचत गात नसतो. पण एक कावळा त्याचे नाव आनंदी कावळा, नेहमी गाणे गात नाचत आनंदात रहात असतो. नाचून गाणे गाऊ या नाचून गाणे गाऊया....
राजाच्या प्रधानाला याचा राग येतो. तो कावळ्याला पकडून राजापुढे हजर करतो.सदा आनंदी रहाणार्‍या कावळ्याला पाहून राजा ही रागावतो. तो कावळ्याला तापलेल्या तेलात फेकून देतो. तापलेल्या तेलात ही कावळा गात असतो. .कानात तेल घालूया रे नाचून गाणे गाऊया हे पाहून राजाला आणखी राग येतो. राजा मग त्या आनंदी कावळ्याला काट्याकुट्याच्या विहीरीत फेकून देतो. विहीरीतले काटे कानात अडकवत कावळा गाऊ लागतो. कानात डूल घालूया रे नाचू गाणे गावूया.
आनंदी कावळा रडत न बसता गाणे गाऊ लागलाय हे पाहून राजा खूपच रागवतो. तो त्याला गार पाण्याच्या विहीरीत ढकलून देतो. आनंदी कावळा विहीरीत पोहायला लागतो. आणि गाणे गाऊ लागतो " ठंडे ठंडे पाणीसे मस्त न्हाऊया…. आणि नाचून गाणे गाऊया.
आनंदी कावळ्याला दु:खी करण्याचे राजाचे सगळे प्रयत्न फसतात. राजा कावळ्याला विचारतो. इतक्या कठीन शिक्षा केल्या तरी तुला भीती वाटली नाही. इतकी दु:खे दिली तरी तू आनंदी कसा रहातोस?
कावळा म्हणतो. महाराज दु:खी करणे हे तुमचे काम. दु:खी व्हायचं की नाही ते मी ठरवणार. आपण कारण शोधायचं. आनंदी रहायला भरपूत कारणं सापडतात. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्तीत आनंदी रहाता येतं. साधं रस्त्याने चालले तरी कसं मजेत चालता येतं याचा आनंद घेता येतो.
ही गोष्ट झाल्यावर आज्जी पुढे म्हणायची. मी आनंदी कावळा आहे विनु. इतरानी दु:ख दिले म्हणून आपण आपला आनंद का घालवायचा. काय?
काय ? असा प्रश्न विचारून आज्जीने टाळीसाठी हात पुढे केला. मी पण जोरात टाळी दिली.तीच्या त्या कापसासारख्या हातावर टाळी वाजलीच नाही. की मग ती टाळी आमच्या दोघांच्या हसण्यात विरून गेली ते समजलेच नाही.

जून महिन्यात पाऊस येताना दवंडी पिटत येतो. हळु हळू तो इथलाच होतो. मागल्या महीन्या पर्यंत उघड्या अंगाने बसलेले डोंगर जुलै संपता संपता हिरवे कपडे घालून जणू मिरवायला आले आहेत दिसतात. श्रावण संपताना पावसाचा सुरवातीचा जोर कमी झालेला असतो. तड तड कमी कमी होत त्याची रीप रीप वरून भुरभुर झालेली असते. अगोदरचा पावसाच्या सरींचा तडम तडम वाजणारा पत्र्यावरचा ताशा बंद होतो.
रोज सोबत असणारा पाऊस हळू हळू बुट्टी मारायला. कधीतरी लक्ष्यात येते. छत्री बूट रेनकोट हे गेल्या दोनतीन दिवसात भिजलेलेच नाहीत. लागलाय. येताना जोरदार दवंडी पिटत इतके दिवस रोज सोबतीला असलेला पाऊस चुपचाप पाय काढता घेत असतो. बाळाला कुशीत घेवून झोपवले की तेथून निघताना जोशीकाकू बाळाची झोप मोडून नये म्हणून हलकेच हळू हळू पाऊलही न वाजवता तेथून बाजूला होतात ना तसा येताना दणदणाट करत आलेला पाऊस जाताना हलकेच पाऊल न वाजवता निघून गेला.
खेळाचे मैदान वाळायला लागले तसे दुपारच्या सुट्टीत मैदान खेळणार्‍या मुलांनी भरून जायला लागले. मुले जणू पाऊस कधी संपतो याची वाटच बघत असावीत.
मुले पळाल्याच्या, एकमेकांना हाका मारल्याच्या, हसत बोलल्याच्या आवाजानी मैदान भरून गेलेले असते.
शाळेच्या मैदानाच्या एका कोपर्‍यात पिण्याच्या निळ्या रंगाची पाण्याची गोल उभी सिमेंटची टाकी. त्याला आठ नळ लावले आहेत. मस्त गार पाणी येते. कंबरेतून थोडे ओणवे वाकायचे. हाताच्या पंजाने उभी ओंजळ करायची ओंजळीचे एक टोक ओठाला लावायचे दुसरे नळाच्या टोकाला. दुसर्‍या हाताने तोटी उघडायची. आणि पोटभर पाणी प्यायचे. त्या गोल टाकीच्या आठ नळावरून आठ मुले एका वेळा पाणी प्यायची. कदम काकुंच्या बनी मांजरीची तीन पिल्ले बनीच्या आचळातून असेच दूध प्यायची.
मी हे एल्प्याला सांगीतले. तो रानात झेंडु फुटल्यागत हसायला लागला. म्हणाला तुझ्या बोलण्यामुळे मला ही पाण्याची टाकी एखाद्या मोठ्या मांजरीसारखी , वाघिणीसारखी म्हणना ,दिसायला लागलीये. आपण सगले वाघिणीचे पाणी पितो. एल्प्याने हे टंप्याला सांगितले. टंप्याने योग्याला, योग्याने आणखी कोणाला तरी . त्या आणखी कोणीतरी ने अजून आणखी कोणालातरी , त्याने आणखी कुणाला तरी... शाळा सुटेपर्यंत हे आख्ख्या शाळाभर झाले. शाळेत बातम्या पसरायला वेळ लागत नाही. आता ही बातमी गावात पण पसरणार. उद्या किंवा फारतर परवा दुपारपर्यंत. शाळेत असताना आपण शाळेतली मुलेमुलेच बरोबर असतो पण घरी गेल्यावर सगळीच मुले एकत्र होतो. मग त्यांनाही कळणारच ना हे. रम्याची धाकटी बहीण कन्या शाळेत , मोठा भाऊ सहकारी शाळेत. आता रम्याने हे घरी सांगीतल्यावर त्या दोघानाही समजणारच की. ती दोघेही त्यांच्या त्यांच्या मित्रमैत्रीणीना सांगणार, ती त्यांच्या मित्रमैत्रीणीना , त्या त्याम्च्या, ती त्यांच्या. असे करताना कोणाच्या घरी पाहुणे वगैरे आले असतील तर तेही ऐकणार, आणि त्यांच्या त्यांच्या गावी गेल्यावर तिथे सांगणार. ते ज्याना सांगणार ते इतरांना सांगणार. हळू हळू हे भारतभर होणार. बातम्या अशाच पसरत असतील. ….

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया


आज्जी अशी हसरी नाचरी झाली की घरात दिवे लावले नसतानाही लख्ख उजेड वाटायचा .

अशी वाक्ये वाचतांना मन नाचतेच.
कावळ्याची गोष्ट आवडली. एका सॅडिस्ट बॉसने रविवारी निष्कारण कामाला लावल्यावर आम्ही दुपारी जेवणावेळी थ्रीस्टार हॉटेलमध्ये मस्त पार्टी केली आणि ही बातमी त्याच्या चमच्यांमार्फत त्याला पोचवली. पुन्हा त्याने कधी रविवारी बोलावले नाही.

अनेक अनेक धन्यवाद.

यशोधरा's picture

5 Dec 2019 - 10:20 pm | यशोधरा

विजुभाऊ, हा भाग फार सुंदर जमला आहे..