दगडावर पडल्यावर पाण्याचा कसलासा खिसफीस खिसफीस आवाज येत होता . आत्तापर्यंत पाणी किती गार आहे ते समजले होते त्यामुळे पाण्याच्या धारेत ओंजळ धरल्यावर अगोदर बसला होता तसा शॉक बसला नाही. ओंजळीतले ते पाणी तोंडात घेतले. आहाहाहा... जगातल्या कुठल्याच सरबताला त्या पाण्याची चव आली नसती. जादुची चव होती. प्रत्येकजण ते पाणी प्याला. ताजेतवाने की काय तसे झालो.
तेथून पाय निघत नव्हता पण आता आम्हाला यवतेश्वरला पण पोहोचायचे होते..
मागील दुवा: http://misalpav.com/node/45748
खरे तर अजून तेथे थांबावेसे वाटत होते. शाळेने या सहलीचे नाव यवतेश्वर सहल या ऐवजी धबधब्याची सहल एवढेच ठेवायला हवे होते. म्हणजे फक्त आणि फक्त धबधबा पहायला म्हणून येता आले असते. शाळेचे हे नेहमीचेच. काही चांगले असले की त्याला एकटे ठेवायचेच नाही. इतिहासासारख्या मस्त विषयाच्या जोडीला नागरीक शास्त्र ठेवतात . शिवाजी महाराजांची स्वराज्याची स्थापना आणि नगरपालीकेची कामे हे दोन्ही एकाच पुस्तकात.
सहलीचे नाव बदलणे आता शक्य नव्हते. त्यामुळे पुढे जाणे अपरीहार्य की काय म्हणतात ना ते तसे होते. आम्ही पुढे निघालो. मघाशी चढ चढल्यामुळे लागलेली धाप वगैरे एकदम गायब झाले होते. हवेतही एक छान गारवा वाटत होता. धबधब्याच्या पाण्यामुळे हाताच्या बोटांवर सुरकुत्या पडल्या.बोटे गार पडली. इतकी गार की ऊब वाटते म्हणून पँटच्या खिशात हात घालूनही काही फरक पडत नव्हता. गार हवेमुळे असेल पण आता आम्ही अधीक उत्साही झालो होतो.
चढणही आता जवळपास संपली होती. रस्त्या अजूनही डोंगरातून होता पण चढ नव्हता. आत्तापर्यंत कोणताच फाटा न फुटलेल्या रस्त्याला अंब्याची फांदी फुटावी तशी डाव्या बाजूला एक वाट फुटत होती. त्या वाटेने आम्ही निघालो. एक वळण घेवून यवतेश्वराच्या देवळा समोर आलो.
देऊळ हेमाडपंथी पद्धतीने बांधलय असे भोसेकर सरांनी सांगीतलं . दगडावर दगड रचत जायचे. वजनामुळे दगड हलत नाहीत. वजनाचा योग्य समतोल साधल्यामुळे पडतही नाहीत. निदान हजार वर्षे तरी झाली असतील देवूळ बांधून.
हे असली जुनी देवळं पाहिली की डोक्यात एक मोठं जातं घरघरायला लागतं . त्यातून शंकांचं पीठ सांडायला लागतं. यवतेश्वरला जायला डांबरी रस्ता आहे हजार वर्षापूर्वी साधी पायवाटही नसेल. सातारा गावही नसेल कदाचित. मग हे देऊळ या इथे इतक्या आडवाटेला कोणी आणि कोणासाठी बांधले असेल. किती लोक दगड फोडत बसले असतील ते दगड इथवर कसे आणले असतील? मग या देवळात कोण येत असेल? इथल्या शंकराची पूजा कोण करत असेल? ते पूजा करणारे लोक कुठे रहात असतील ? त्यांना दक्षिणा कोण देत असेल? मुळात इतक्या लांबवर एवढे मोठे देऊळ बांधायचंच कशासाठी? ते बांधायचा खर्च किती झाला असेल तो कोणी दिला असेल. त्या काळी मजुरांना मिळालेले ते रुपये त्यांनी कसे खर्च केले असतील ? हे मजूर पुढे कोणत्या बांधकामावर गेले असतील?
हे प्रश्न सगळ्यांनाच पडले होते. या पैकी एकतरी प्रश्न विचारावासे वाटले. पण विचारले तर कोणी हसेल म्हणून सगळे बिचकत होते. कधी नव्हे ते एल्प्या आणि टम्प्या ला पण शंका होत्या. एवढे मोठे दगड नेताना कशातुनं नेले असतील . की दगड डोंगरावर फेकण्यासाठी गलोलीसारखे काही यंत्र वापरले असावे. शंका विचारली तर शाबासकी मिळेल की मूर्खासारखा काय विचारतोस म्हणून आपल्या गाढवपणावर शिक्कामोर्तब होइल ते समजत नव्हते. अर्थात गाढवपणावर शिक्कमोर्तब बसणे यात फार काही नवे नव्हते. पण आपले शंका निरसन झाले नाही याचे वाईट वाटले असते. दुसरे असे की आपण विचारलेला प्रश्न हा त्या विषयाशी संबंधीत आहे का ते समजत नाही. शिवाजी महाराजांनी तीनशे किल्ले जिंकले होते. पण त्या प्रत्येक किल्ल्यावर ते गेले होते का. हा प्रश्न इतिहासाच्या सरांना विचारावा की भुगोलाच्या सरांना हेच कळत नाही.
पाटणच्या शाळेत गण्याला हे असले प्रश्न पडायचे. त्याने विचारलेल्या बर्याचशा प्रश्नांना शिक्षक उत्तरच देत नसत. त्यांच्या मते असले प्रश्न विचारणे नव्हे हे असले प्रश्न पडणे हा वेळ वाया घालवायचा प्रकार आहे. खरे तर शाळेत अभ्यासाबद्दल किंवा कसलेही प्रश्न पडणे हा वेळ वाया घालवायचाच प्रकार आहे. अर्थात मुलांनी प्रश्न विचारायचे नाहीत तर मग कुणी ? अर्थात हा ही प्रश्न वेळ वाया घालवायचा प्रकार असेल. नागरीकशास्त्रात विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास असतो. असे वाचले होते. त्या तासाला आमदार प्रश्न विचारतात. हे समजल्यावर ,त्याची उत्तरे कोणते सर देतात? उत्तर येत नसेल तेंव्हा तिथले सर प्रश्न विचारणाराला " गप्प बैस गाढवासारखे काहीपन विचारू नकोस. फार अक्कल पाजळू नका ' असे काही बोलतात का? हे प्रश्न लगेच मनात चमकून गेले होते. अर्थातच मी प्रश्न विचारायचे धाडस केले नाही. उत्तर काय मिळणार होते ते माहीतच होते.
यवतेश्वराच्या देवळा च्या मागच्या बाजूने उतरून आम्ही तिथल्या एका पाण्याच्या पाटाजवळ आलो. सपाट आणि त्यातल्या त्यात कोरडी जागा पाहून न सांगताच सगळे गोल रिंगण करून बसले. इतका वेळ चालून आलो दंगा घातला आता पोटात कावळे ओरडायला लागले. अगोदरच पोटात कावळे असतील तर मग आपल्याला भूक कशी लागते हा प्रश्न विचारून गण्याने विचारला होता. अर्थात उत्तर मिळालंच नाही.
गोल रिंगण करून सर्वांनी डबे उघडले. सर्वांनी हात जोडून जेवताना म्हणायचा श्लोक म्हंटला " वदनी कवल घेता. नाम घ्या श्री हरीचे....." त्या अगोदर भोसेकर सरांनी एक सूचना दिली. प्रत्येकाने डब्यातील एक घास झाकणात घ्यायचा आणि डबा पुढच्या मुलाकडे सरकवायचा. त्याने त्या डब्यातील एक घास आपल्याअ जवळच्या झाकणात घ्यायचा आणि तो डबा पुढच्या मुलाकडे सरकवायचा. डबा रीकामा झाला की ज्याचा त्याने काढून घ्यायचा.
प्रत्येकालाच कचकून भूक लागली होती. त्या मुळे सुरवातीला थोडी गडबड झाली. अगोदर काय चालले आहे ते नीट कळाले नाही. मग एक एक डबे जसे पुढे सरकत गेले तशी गम्मत झाली. डब्याचे झाकण निरनिराळ्या पदार्थानी एकदम भरून गेले. नुसत्या खिचडीचेच किती तरी प्रकार होते. भरपूर खोबरे घातली. बारीक साबुदाण्याची शेंगदाण्याचा बारीक कूट असलेली , दही घातलेली , दुधात भिजवलेली, हिरवीगार कोथिंबीर पेरलेली, पांढरे शुभ्र खोबरे पेरलेली,लाल मिरचीमुळे किंची लालसर गुलाबी झालेली, कुणाचे धिरडे, बटाट्याचे काप, रत्याळ्याचे काप , साखरेतली रताळी, काकडीची कोशिंबीर, भोपळ्याची कोशिंबीर , शेंगदाण्याच्या कुटाची आमटी, हिरवी चिंचेची चटणी. तवकीरीच्या वड्या, ताकाच्या पाटवड्या ...... काय काय म्हणून सांगायचे.
एखादा आवडलेला पदार्थ नक्की कुणाच्या डब्यातला होता ते समजत नव्हते. तो डबा पुन्हा आपल्या पर्यंत येईल याची वाट पहाणे इतकेच काय ते करण्यासारखे होते. अर्थात तो डबा पुन्हा आपल्यापर्यंत येताना त्यात तो पदार्थ शिल्लक असायला हवा. हे शक्यच नव्हते. कारण बारा तेरा डबे पुढे सरकवल्यावर येणारे सगळेच डबे रीकामे झालेले होते. झाकणात पदार्थ मावत नव्हते. त्यामुळे पुढच्या येणार्या पदार्थासाठी जागा करणे भाग होते. चवीचा विचार न करता पटपट खाणे हाच त्यावर उपाय. आवडते नावडते असे काहीच नव्हते. तोंडात तिखट , गोड आंबट तुरट असा चवींचा एक मिश्र उत्सव झाला होता. एरवी फिदीफिदी हसत सततर बडबडणार्या मुली सुद्धा एकदम शांत झाल्या होत्या. सगळ्यांचे खाणे चालले होते. एकमेकांकडे पहायलाही वेळ नव्हता. इतकी सगळी मेजवानी आणि भूक. यांचा परीणाम .
पाच एक मिनीटे गेली असतील कुणीतरी मोठ्याने ढेकर दिला. आता यात हसण्यासारखे काय आहे. पण हसण्याची एक लाटच आली.
आमची पोटे तुडूंब भरली होती. " ती लाल मिरची वाली खिचडी कुणाची होती मस्त होती रे, मला खूप आवडली कोणीतरी सांगत होते. आणि ती भोपळ्याची दहीवाली कोशिंबीर…. अगदी लग्नातल्या जेवणात असते ना तश्शी झाली होती. आत्याच्या लग्नात केली होती . अगं ते तर काहीच नाही ती चॉकलेटी तवकीरीची वडी काय भारी होती रे. मी पहिल्यांदाच खाल्ली. खोबरे घातली खिचडी तर एकदम बेष्टच होती. केळ्याची कोशिंबीर असते हे माहीतच नव्हते. पण एकदम भारी. एरवी आईने केली असती तर मी खाल्लीच नसती घरी . पण आता मी आईला सांगणार करायला. रत्याळ्याचे गोडाचे काप गुलाबजाम पेक्षाही भारी असतात याचे कोणाला नव्याने ज्ञान झाले होते. गोषवारा काढायचा झाला तर सगळ्यांच्या डब्यातले सगळे पदार्थ एकदम बेष्ट होते. अंगठा आणि पहिले बोट जुळवून हात नाचवत प्रत्येकजण एकमेकांना सांगत होते. नावडते असे काहीच नव्हते. किंवा या जगात नीट चाखून पाहिले तर कोणताच पदार्थ नावडता नसतो. या बद्दल सगळ्यांचे एकमत होते.
खाण्याच्या पदार्थांबद्दल सगळे भरभरून बोलत होते. केळ्याची कोशिंबीर संगीताने केली होती. रताळ्याचे काप करायला योग्याने आईच्या मदतीने केले होते. दह्यातली काकडी अव्याने तर शेंगदाण्याचा बारीक कूट घालून केलेली खिचडी अंजीने स्वतः केली होती. तीच्या बाबांची खास आवडती ... आपण करत रहायचे अगोदर चुकते मग हळू हळू तीन चार वेळा केल्यावर जमायला लागते. हे सांगताना अंजी ला हसू लपवत येत नव्हते. तीला इतके आनंदी कधीच पहिले नव्हते.
आपल्याला फक्त चहाच करायला जमतो. तो ही सुरवातीला कधी गोड तर कधी एकदम पात्तळ व्हायचा . मग आईने ,पाऊण कप पाणी ,पाव कप दूध, एक चमचा चहा एक चमचा साखर हे प्रमाण ठरवून दिले. पण आता मी कोशिंबीर ही करायला शिकणार आहे. महेश सांगत होता.
सगळेच एकमेकांना सांगू लागले. एका पदार्थावरून दुसरा पदार्थ आठवायला लागला गाण्यांच्या भेंड्या खेळतात ना तशा पदार्थांच्या भेंड्या सुरू झाल्या होत्या.
सत्तर एक पदार्थांची नावे तरी झाली असती. इतकावेळ थांबलेला पाऊस भुरूभुरू येवू लागला. कुठेच आडोसा नव्हता. त्यामुळे तसेही फारसे काही बिघडत नव्हते. कारण पाऊस म्हणजे नुसती भुरभूरच होती.
तरी पण पाऊस वाढायच्या आत मात्र आता परत जायला हवे होते.
यवतेश्वरहुन खाली उतरायला डोंगरातून पायर्याचा एक रस्ता आहे. पण आत्ता पाऊस होता निसरडे होते.म्हणून आल्या वाटेनेच निघालो. येताना दोन दोन च्या जोडीने आलो होतो. जाताना त्या तशा शिस्तीत जावेसे वाटत नव्हते. तीन चारच्या घोळक्याने पण रस्त्याच्या कडेने आम्ही निघालो. जाताना शाळेतले सोबती होतो आता परतताना आम्ही एकामेकांच्याच्या घरातलीच भावंडे निघालोय असे वाटत होते.
वाटेतला धबधबा , हिरवेगार गवत याचाही आम्हाला विसर पडला.
घरी परतून कधी एकदा आईला ही गम्मत सांगतोय असे झाले होते. घरी आलो. आईने डोके पुसायला टॉवेल दिला, कपडे बदलून आलो आईने गरमागरम दुधाचा ग्लास दिला. पोटात एकदम ऊब आली. सहलीत काय काय पाहिले ते सांगायला सुरवात केली. सांगताना क्रम चुकत होता. धबधब्यातले पाणी, यवतेश्वराचे देऊळ, वाटेतल्या घोषणा, डबा खातानाची अंगतपंगत. महेशच्या शंका, सगळं उलटसुलट होत होतं .
सांगताना कधी झोप लागली कळालंच नाही.
स्वप्नात एकदम हिरव्या गार माळावर भुरभूर पावसात हुंदडत होतो. हातातली काठी इंद्रधनुष्य झाली होती ढगाच्या पोटाला गुदगुल्या करत होती. ढग हसत होता.
हसताना त्यातून प्राजक्ताची फुले पडत होती. अंजी अव्या योग्या खिचडी खात होते. टंप्या शिस्तीत ताटे मांडत होता. शाळॅचा वर्ग शाळेच्या छपरावर भरला होता. वर्गातला फळा आकाशात उभा होता.
क्रमशः
प्रतिक्रिया
30 Nov 2019 - 10:16 am | यशोधरा
खूपच गोड! आमचीही अशी सहल गेली होती लहानपणी आणि असेच डबे शेअर केले होते त्याची आठवण झाली.
30 Nov 2019 - 1:51 pm | आनन्दा
विजुभाउ पुस्तक काढणार आहात का?
30 Nov 2019 - 4:48 pm | वामन देशमुख
विजुभाऊ, दोस्तार नावाचं पुस्तक काढाच राव, नक्की माझ्या संग्रही राहील.
30 Nov 2019 - 10:00 pm | नावातकायआहे
+१
30 Nov 2019 - 5:25 pm | श्वेता२४
आपले लेखन नेहमीच आवडते.
30 Nov 2019 - 11:56 pm | सुचिता१
खुप सुंदर!! मुलांच्या भावविश्वाची सफर घडवून आणली तुम्ही! आपले बालपण तर आठवलेच पण
बाकी तपशील वेगळा असला तरीही आताची मुलंही relate करतील असे लिखाण आहे.
4 Dec 2019 - 7:34 am | विजुभाऊ
_/\_
4 Dec 2019 - 5:03 pm | सुधीर कांदळकर
कालयानात बसवून भूतकालात फिरवून आणलेत. जेवण फारच आवडले. मुंब्ईत पावसाळ्यात कांगा लीग या क्रिकेटच्या स्पर्धा होतात. या स्पर्धेतले खेळाडू पण पूर्वी असेच जेवण घेत.
मस्त लेख. धन्यवाद.
19 Jul 2020 - 1:36 pm | चौथा कोनाडा
सहलीच्या पंगतीचं बहारदार वर्णन वाचताना आपण तिथंच आहोत असं वाटलं !
लेखाचा शेवटही सुरेखच !
"वाह ताज"च्या चालीवर "वाह विजूभाऊ" म्हटल्या शिवाय राहवत नाही !
19 Jul 2020 - 1:38 pm | चौथा कोनाडा
पुढील भाग :
दोसतार - २६