जब I met मी:-5
मी जन्माला आलो तेच मुळी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन! आज कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही एवढी गडगंज संपत्ती होती आप्पांकडे. आप्पा! माझे वडिल. गावचे पोलीसपाटिल. माझे आजोबाही गावचे पाटिलच होते. कित्येक पिढ्यांपासून आमच्या घराण्याचा दबदबा होता पंचक्रोशीत. संपूर्ण तालुक्यात पाटलांशिवाय पानही हलत नसे कुणाचे. प्रचंड जनसंपर्क आणि जनाधारही होता आप्पांच्या मागे. बाकी तालुकापातळीवरचे सरकारी अधिकारी आणि राजकारणी फक्त नावालाच. आप्पांचा शब्द शेवटचा असायचा गावाबाबतच्या कोणत्याही निर्णयात. जिल्हापातळीवरील कोणीही अधिकारी किंवा राजकारणी लोक गावात आलेच तर आप्पांची घरी येऊन भेट घेतल्याशिवाय जायचे नाहीत.