. एल्प्या डाव्या बाजूला गेला. अंदाजा प्रमाणे आदर्शचा दम संपायला लागलाय. तो परत फिरणार आता. तरीपण जाताना जमले तर पाहुया म्हणत आदर्शने हात फिरवला. एल्प्याने त्याचा हात चपळाईने पकडून ओढला. आदर्शचा तोल गेला. तो बाजूच्या रेषेच्या बाहेर गेला. अगोदर आम्हाला कळालेच नाही. पण बाहेर बसलेल्या टीमने है.म्हणत मैदान डोक्यावर घेतले. एका गुणाने आम्हाला निसटता विजय मिळाला होता. सातवी क ने एकदम शेवटपर्यंत झुंजवले .
पुढची मॅच . आठवी ड बरोबर.
मागील दुवा : http://misalpav.com/node/47076
आठवी ड सोबत मॅच तशी अवघड होती . त्यांचे गडी आडदांड होते. बघितल्यावर आम्हाला अवघडच वाटले होते पण नुसते गडी थोराड असून चालत नाही. सराव नीट असेल तर दम टिकतो. सुरवातीला त्यांच्या चढाई च्यावेळेस आम्ही औट व्हायला लागलो. खेळाडूची पकड केली तरी ते आमच्या एक दोघांना सहज ओढत नेउ शकत होते. या डावाला प्रतिडाव म्हणजे चढाईला आलेल्या खेळाडूला त्याचा दम निघेपर्यंत नाचवत ठेवायचे, बोनस रेषेपर्यंतही येवू द्यायचे नाही. आणि पकडायचेही नाही. खेळाडूचा नाईलाज होतो. तो बोनस लाईनला हात लावायला मिळावा म्हणून मधली पाटी दाबतो. त्यांनी मागे जायचे तोवर बाजूच्या कव्हर ने पुढे यायचे. अगोदर डावे त्या पाठीमागे उजवे. बोनस लाईनला जाईपर्यंत चढाई करणाराचा दम सम्पायला आलेला असतो. तो एकदा आत आला की मग मधल्या पाटीने आणखीन मागे सरकत त्याला पूर्ण आत येऊ द्यायचे. गडी गाफील होतो. त्याच्या पाठीमागून डाव्या कव्हर ने त्यच्या कमरेला धरायचे. लगेच उजव्या ने साखळी करून जखडायचे. मधल्या पाटीने पूर्ण कडे करायचे. कितीही आडदांड खेळाडू असला तरी तो गारद होतो. त्यात त्याचा दम सम्पायला आला असेल तर ते अधीकच सोप्पे होते. मधे जखडलेला असल्यामुळे आलेला गडी बाजूला सरकायचा प्रयत्न करतो तो आपोआप बाजूच्या रेषेच्या बाहेर जातो. हा खास शिवाजी उदय मंडळातला डाव.सरावाच्या वेळेस एल्प्या चढाई करायला आला की आम्ही हमखास वापरायचो. तो उपयोगी आला. या डावाला तोड नाही.
आठवी ड वर हा डाव वापरून नऊ गुण मिळवले आणि मॅचही जिंकली
आता गटवार सामन्यात सातवी आठवी च्या गटात आम्ही म्हणजे आठवी ब , नववी दहावी च्या गटात नववी अ
आमचा पुढचा सामना नववी अ शी.
या वेळेस संघात बदल केलाय. अर्ध्या टीमला आराम दिलाय. मंगेश महेश राजा मोरे आणि मी. असे चौघे बाजूला. राजा मोरे ऐवजी मधल्या अन्या. महेश आणि मंगेशच्या जागी अव्या आणि अज्या दामले. माझ्या जागेवर प्रभाकर. थोराड एल्प्या आणि टंप्या च्या मधोमध बारका अन्या आई वडीलांच्या मधे लहान मुलगा हात धरुन उभा आहे असा वाटतोय. हसूच येतय. ही मॅच जिंकली तर पुढची मॅच पहिल्या स्थाना साठी दादाने आमच्याशी पैज लावली आहे. ही मॅच जिंकली तर तो आराम हॉटेल मधे आईसक्रीम देणार आख्ख्या टीम ला.
नववी अ ची टीम . सगळेच आमच्या पेक्षा उंच.
ओली सुकी झाली. योग्याने चढाईसाठी एल्प्याला पाठवलाय. या एल्प्या पुढे गेलाय त्याने बोनस साठी मधली पाटी दाबली. मधली पाटी आणखी मागे गेली. एल्प्या थोडा पुढे गेला. त्याने बोनस रेषेला स्पर्ष केला आणि मागे फिरला.. अरे हे काय एल्प्याला उजव्या आणि डाव्या कव्हर ने जखडून टाकले.सेम आमचाच डाव. एल्प्या बाद. पहिला गुड नववी अ ला. नववी अ चा सुध्या चौगुले चढाईसाठी आला. त्याला आम्ही पुढे येवू देत नाही. त्याला बोनसही मिळत नाही. तो परत फिरला. तसा अज्या दामले ने त्याला फॉलो मारला. फॉलो मारणे म्हणजे चढाईसाठी गेलेला खेळाडू त्याच्या बाजूला परतत असतानाच आपण चढाईसुरू करत त्याला पाठमोराच औट करणे. सुध्या चौगुले ला पंचांनी औट दिले नववी अ च्या पोरांनी आरडा ओरडा करत पंचांना गराडा घातला. नियमात बसत नाही , नियमात बसत नाही. पंचांशी हुज्जत घालायला लागले. पंचांनी शिट्टी फुंकत हे नियमात बसते सांगत खेळ पुन्हा सुरू केला. गुण आम्हाला मिळाला
नववी अ च्या मुलांना त्यांच्यावर अन्याय झालाय असे वाटले. खेळ सुरू झाल्याने काही बोलणे शक्य नव्हते. पुढची चढाई नववी अ ची. मंदार भालेराव आला. त्याने कोपर्यातल्या योग्याच्या हातावर हात मारत त्याला बाद केले. आणि तो लगेच परत फिरला. गुण नववी अ ला मिळाला.
मंदार परत फिरतोय न फिरतोय तोच प्रभाकरने त्याला फॉलो मारला. मंदार बहुतेक यासाठी तयारच होता. तो तसाच पुढे जात राहीला. प्रभाकर नीट आत आला आहे हे पाहून मंदार उलटा फिरला. प्रभाकरला त्याने वाकून कमरेतून उचलला. आणि तसाच खांद्यावर घेतला. बाकीच्यानीही त्याला घेरला. प्रभाकरचा दम तुटला. तरीही त्यानी त्याला सोडले नाही. प्रभाकरचा दम पूर्ण तुटला. पंचांनी तो बाद झाल्याची शिट्टी फुंकली. तसा प्रभाकरला सगळ्यांनी वर असतानाच सोडून दिला. प्रभाकर रप्पकन तोंडावर आदळला. नशीब मैदान ओले होते. पडलेला प्रभाकर पडूनच राहीला. खेळ काही मिनिटे थाम्बवला. प्रभाकरला काही मुले बाजूला घेवून गेली. त्याच्या नाकातून रक्त येत होते.
नववी अ ने त्यांच्यावरच्या अन्यायाचा बदला घेतला होता. पंचांनी नववी अ ला धसमुसळा खेळ न करण्याची ताकीद दिली.पुढची चढाई नववी अ ची. प्रदीप शेंडे चढाईसाठी धावत आला. त्याने अन्याला हात मारला. पण अन्या त्याच्या हाताखालून गेला. प्रदीप ने अन्याला बैठी मारायचा प्रयत्न केला तसा योग्याने मागून पकड केली. प्रदीप औट. योग्या चढाईसाठी गेलाय. त्याने बोनस लाईन पार केली. मंदार ने त्याला पकडलाय. बाकीच्यांनी ही त्याला पकडलाय. योग्या या डावासाठी तयार आहे. तो अगोदरच मधल्या रेषेकडे सरकलाय. मंदार ने त्याला आडवा पाडलाय. योग्या हात लांबवतोय. मधली चढाई रेषा अगदी दोन इंचावर आहे. योग्याचा दम संपायला आलाय. योग्याने जोर लावून एक उसळी घेतली. हात पुढे केला चढाई रेषेला जेमतेम त्याचे मधले बोट लागले. योग्याचा दम सम्पला. नववी अ आनंदात उड्या मारताहेत. पंचांनी नववी अ चे चौघेजण बाद दिले. नववी अ ला हा निर्णय मान्य नाही. त्याम्ना वाटतय पंचानी पार्श्यलिटी केलीये. पंचांच्या निर्णयावर ते नाराज आहेत.
कापसे सरांनी त्याची समजूत काढलीये.
पहिली वीस मिनिटे सम्पली. खेळ मधल्या विश्रांतीसाठी थांबवलाय. नववी अ वर एक लोण चढलेय. चार बारा बे ते मागे आहेत.
प्रभाकर च्या नाकाचा घोळणा फुटलाय. तो आता पुन्हा खेळू शकत नाहिये. पंचांनी बदली खेळाडूला मान्यता दिली. पुढच्या खेळासाठी अंद्या कांबळे आत आला.
नववी अ ची मुले चिडलेली आहेत. ती भराभर चढाई करताहेत. चढाई करताना ही हाताने खेळाडूना फटके मारण्यावर भर देताहेत. त्याने काहीच होत नाहिये. अन्या उंचीने कमी त्यामुळे फटके वायाच जाताहेत. एकदा फक्त अज्या दामलेला फटका बसला. अज्या कळवळला. चढाईपेक्षा बचाव करताना खेळाडू सहज औट करता येतो त्याला आपटता येतेय . नियमात बसवून. नववी अ चे खेळाडू हे खेळ करण्या पेक्षा मारामारीच जास्त करताहेत. आमच्या कडे गुणांची चांगली आघाडी आहे. योग्याने निर्णय बरोबर घेतलाय. उगाच मारारारी करत धसमुसळे खेळण्यापेक्षा नुसता वेळ काढला तरी आपण जिंकू. आम्ही तेच करतो. बोनस गुण मिळवत ,एखादा खेळाडू बाद करत एकेक गुण वाढतोय. नववी अ ला त्यांच्या चढाईत फारसे यश मिळत नाहिये. एखाद्या दुसर्या बोनसवर त्यांना समाधान मिळतय.
खेळाची शेवटची दोन मिनीटे राहिली. बारा वीस ने नववी अ पिछाडीवर. आम्ही चढाई करण्यासाठी वेळ घेतोय. पंचांना काहितरी विचारून आणि तसेच काहीतरी करून टाईम पास करतोय. अर्धा मिनीत राहीलाय त्यांची चढाई आहे. मंदार चढाईसाठी आलाय. त्याने अन्याला हात मारला. अन्याने त्याला ढकलायला सुरवात केली. मंदार्ला हे अपेक्षीत नाही. तो भांबावला. त्याने अन्याला झटकले. तरीही अन्या त्याला चिकतून आहे. मंदारची सगळी शक्ती अन्याला झटकण्यात चाललीये.
अन्याला मंदार ने झटकले. अन्या बाजूला पडला. पंचांनी खेळ संपल्याची शिट्टी फुंकली. तेरा वीस ने नववी अ हारली.
आता पुढचा सामना सहावे ब सोबत.
हा अंतीम सामना. साधारणतः तासाभराच्या बिश्रांती नंतर. मधल्या वेळेत मैदानावर पाणी मारून झालेय. कापसे सरांनी आम्हाला पारले बिस्किटे दिली. प्रभाकर ला शिक्षकांच्या विश्रांतीच्या खोलीत नेलेय. इतकेच त्याच्याबद्दल समजतेय. दादाने आम्हाला मागच्या सामन्यात काय चुका झाल्या याची चर्चा करण्यापेक्षा पुढच्या सामन्यावर लक्ष्य केंद्रीत करायला सांगितलेय. पुढचा सामना सहावीशी आहे. पण त्यांना लिंबू टिंबू समजू नका.
या वेळेस योग्याने टीम मधे अन्याला ठेवलाय. मधल्या मी आत आलोय अंद्या कांबळे आत आहे.
अज्या दामले आणि टंप्या बाहेर आहेत.
मधली पाटी एल्प्या अन्या आणि राजा मोरे. डावे बाजू मी आणि योग्या उजवी बाजू महेश आणि अंद्या कांबळे.
अंतीम सामना पहायला आख्खी शाळा गोळा झालीये.
आम्ही सज्ज झालोय. समोर सहावी ब ची पोरे टीम. एकदम बारकी बारकी पोरे. अन्याच्या उंचीची.
ही इतकी बारकी पोरे होय. सहज हरवू की. एका चढाईत तीनएक जण तरी औट होतील
एल्प्या तू त्यांना इतका लिम्बु टिंबू समजू नकोस. ही पोरे रोज शिवाजी उदय मंडळात खेळतात. रोजचा सराव आहे त्यांना.
योग्या आपल्यालाही दादाने शिकवलय की.
पाहुया. खेळताना नीट विचार करून खेळायचं .उगाच धसमुसळे नाही खेळायचं. आपल्याला त्यांचा अंदाज नाहिय्ये.
ठीक आहे.
ओली सुकी झाली पंचांनी सामना सुरू केल्याची शिट्टी फुंकली.आणि अंतीम सामन्याची पहिली चढाई सुरू झाली
पहिली चढाई त्यांची. उंचीने छोटा प्रताप सुळे. आला डावी उजवी कडे नाचवून गेला.
आमच्या कडून योग्याने एल्प्याला पाठवले. एल्प्या तीन एक जणाना सहज औट करणार म्हणत गेलाय. एल्प्याने मधली पाटी दाबायची म्हणून दोन्ही हात जमिनीला समांतर आडवे करत मधल्या पाटीला सामोरा गेलाय. कॉर्नरचा खेळाडू वाकून त्याच्या हाता खालून बाजूला गेला. त्याने एल्प्याचा पट काढलाय. पाय उचलल्यामुळे एल्प्याचा तोल गेला. तो गडबडला. असे काही होईल याची त्याने अपेक्षाच केली नव्हती. त्याचा दम संपला. एल्प्या बाद. गुण २ - ०
आम्हाला हा मोठा धक्का. पुढची चढाई त्यांची. नितीन कर्दे. उड्या मारत चढाईसाठी आलाय. त्याने आन्याला बैठी मारायचा प्रयत्न केला . अन्याने उडी मारली. नितीन च्या अंगावर. अंद्या कांबळेने नितीन ला कमरेला धरुन ओढला. नितीन चा दम गेला. नितीन बाद. गुण २ - १
पुढची चढाई अंद्याची. त्याने कोपरा मस्त पैकी दाबलाय. कव्हर नाचवत त्याने बोनस घेतला. गुण समसान झाले २- २
अंद्या परत येतोय न येतोय तोच त्याला प्रताप ने फॉलो मारला आणिएक गुण घेतला. गुण ३- २.
पुढची चढाई महेश पाठवलय. महेश ने बैठी मारली. पाय फिरवून चवडा मारत एक गडी बाद केला. आणि परत आला.
मध्यंतरापर्यंत गुण फलकावर एकेका गुणाने आघाडी मागेपुढे होत होती. मध्यंतराची शिट्टी झाली तेंव्हा गुणफलक ८ - ८
मध्यंतरापर्यंत आमचे सगळे डाव वापरून झाले होते.
हे सगळे डाव सहावी ब च्या पोरांना माहीत आहेत. मंडळात रोज खेळतात ना. आमच्या सगळ्या डावाना त्यांच्याकडे उत्तर आहे. दादाला नवा डाव सुचत नाहिय्ये. त्याने अंद्याला अन्याच्या जागी म्हणजे मधल्या जागेवर खेळवायला सांगितलय. अन्या उजव्या कव्हरला खेळणार म्हणजे आमची ती बाजू भक्कम होईल असे म्हणतोय.
अन्या लहान आहे तो तिकडे खेळल्याने ती बाजू कमकुवत होइल असे योग्याचे म्हणणे. धेवटी योग्याने दादाचे ऐकायचे ठरवले. कोणाच्या एकाच्या मताने जायचे तर ते दादाचे असू देत.
अन्या त्या बाजूला आल्याने महेशला एकदम हलके वाटायला लागले.
मद्यंतरानंतरची पहिली चढाई आमची. महेश चढाई ला गेलाय. प्रताप ने त्याचा पट काढायचा प्रयत्न केला. महेश उडी मारत निसटला. पहिल्याच चढाईत महेशने प्रताप आणि नितीन दोघांना टिपले.
महेश आला तसा समोरून दिपक गायकवाड आला. त्याने चपळ हालचाली करत एल्प्याला टिपायचा प्रयत्न केला. त्याची ही चूकच ठरली एल्प्याच्या हातात त्याचा हात सापडला. तो आता सुटणार नव्हता. एल्प्याने त्याला तिथेच रोखला. दिपक परत जाण्याची धडपड करत असतानाच त्याचा दम संपला. दीपक बाद.
आता गुणफलक आमच्या बाजुने ११- ८
सहावी क च्या कॅप्टन हातवारे करत खेळाडुना काहितरी सांगितले त्यांचे चारच खेळाडू मैदानात .मैदानाला नमस्कार करून मी चढाईला गेलोय. डाव्या उजव्या बाजूला एक एक खेळाडू मधे दोघानी साखळी ठेवली आहे. हे खरेतर धोक्याचे आहे. डावी कडची बाजू दाबत मधल्या पाटीला मी मागे ढकलतोय. डावी कडची बाजू मधल्या पाटीकडे सरकलीये. मधली काटी आणखी उजवीकडे. उजवा कॉर्नर मागे आलाय. अख्खा संघ मैदानाच्या कोपर्यात एकवटलाय. त्यांचे चारच खेळाडू मैदानात असल्याने मला बोनस मिळणार नाही पण थोडे आणखी मागे दाबले तर आख्खे लोण चढवता येईल . मी पुढे जातो. दोन्ही हात जमिनीला समांतर. कोणी सुटायला नाही पाहिजे. माझे सगळे लक्ष्य मधल्या साखळीकडे. डाव्या बाजूचा संदीप खाली बसला. मधल्या पाटीतला खेळाडू डावी कडे सरकला. समोर साखळी नव्हती. अचानक संदीप माझ्या मागून आला आणि त्याने मला ढकलले. पुढे मला अडवायला कोणतीही साखळी नाही. मी माझ्या वेगामुळे पुढे ढकलला जातोय. सरळ मैदानाबाहेर. अगदी एल्प्याने पहिल्या वेळेस वापरलेला तो मधली साखळी सोडून मागे ढकलायचा डाव माझ्या विरुद्ध वापरला गेलाय. मी बाद. आमची सगळी टीम हसतेय दादा हसतोय. सहावी ब ची मुले मैदाना बाहेर नाचताहेत. इतक्या वाईट पद्धतीने मी बाद झालो. अती अत्मविश्वासाने.
आता त्यांची चढाई. संदीप भरभर हालचाली करतोय. त्याने एल्प्याला बैठी मारली. अंद्याला खांद्याला हात मारला. महेश च्या दंडाला हात फिरवून मारला. मैदानात संदीप चौफेर फिरतोय. त्याने आत्तापर्यंत अन्या सोडला तर बाकी सर्वांना औट केलेय. अन्या संदीपचा पट काढायपुढे गेलाय. अन्या वाकला. संदीपने त्याच्या पाठीवर हात ठेवून उडी मारली . संदीप त्यांच्या बाजूला पोहोचला सुद्धा.
पाच गडी बाद करून आमच्यावर पूर्ण लोण चढवले.
गुणफलक ११ - १४
तीन गुणांचा फरक.
सामना संपायला तीन मिनीटे बाकी.
एक बरे झाले की लोण चढल्यामुळे सगळे खेळाडू मैदानात आले.
आता तीन गुण घेऊन त्यांना पटपट गाठायला हवे.
सहावी ब ने खेळावर वर्चस्व राखलय. तो तोडायलाच हवे.
योग्याने आम्हाला हाताने भराभर हालचाली करायला सांगितले.
आमची चढाई अन्याला. अन्या पुढे गेलाय. तो चपळपणे इकडून तिकडे नाचतोय. त्याने संदीपला बाद करत एक गुण मिळवलाय.
अन्या परत आला तसा गुणेश त्याला फॉलो मारायला आला. अन्याला याचा अंदाज होता. गुणेश वेगात आला तसा अन्या बाजूला सरकला. गुणेश त्याच्या वेगामुळे बाजूच्या रेषेबाहेर गेला. पुढची चढाई योग्याची. योग्याने पाय मारत मोहन ला औट केलं. तो परत आला. गुण फलक पुन्हा समान झालाय. १४ - १४
शेवटचा एक मिनीट. पंचांचा इशारा आला. आरडाओरडा करणारे प्रेक्षक मुले आता एकदम शांत झालीत. मुख्याध्यापक सरही सामना पहायला आलेत.
हा शेवटचा मिनीट दोन्ही संघांसाठी महत्वाचा. जिंकणे हरणे ठरवणारा.
शेवटची चढाई दोन्ही संघांसाठी. समोर चारच खेळाडु होते त्यामुळे आम्हाला बोनस मिळणार नाही. उलट बाद होणाचीच जास्त शक्यता.
आता त्यांची चढाई . मधुकर चढाईसठी आला. कॉर्नर दाबत त्याने बोनस घेतला. एल्प्याने मधुकर चा पट काढायचा प्रयत्न केला. खरेतर एल्प्यापेक्षा मधुकर खूपच बुटका. मधुकरला असे काहीतरी होणार याची कल्पना असावी. त्याने डाव्या बाजूला सरकत एल्प्याला पुढे येवू दिले आणि त्याच्या पाठीवर हात मारला. टुण्णकन उडी मारत मधुकर सटकला. त्याची उडी थेट मधल्या रेषेवर पडली. आणि तो पलीकडे गेला. आमच्यावर बोनस गुण आणि एल्प्या असे दोन गुण चढले. गुणफलक १६ - १४
आता आमची चढाई अर्धा मिनीटात जे करायचे ते . योग्या स्वतः चढाईसाठी गेलाय.
सहावी ब ने गुणफलकावर आघाडीला आहे. त्याना आता वेळ काढायचा आहे. योग्याने डावा कॉर्नरला दाबले की उजवा कॉर्नर पुढे येतोय. मधले गडी जराही मागे जात नाहिय्येत. अटीतटीची वेळ आहे. अवघे वीस सेकंद उरलेत.
योग्याने आडवा हात मारला मधुकरच्या डोक्याला हात लागला. मधुकर चा तोल गेलाय. योग्याचा दम सपायच्या आत त्याला आणखी दोन तरी गडी हवेत. त्याने पुन्हा हवेत हात मारला. हाताला काही लागले नाही पण योग्या आडवा झालाय. मधुकरने योग्याचा पाय पकडून त्याला पाडलाय. योग्या मधली चढाईची रेषा गाठायचा प्रयत्न करतोय. चढाईची रेषा दोन बोटेच लांब आहे.
मधुकरच्या मदतीला कोणी येत नाहिय्ये. योग्या पूर्ण ताकदिनीशी जोर लावत सरकतोय. योग्याचा हात रेषेला लागला. मधुकर औट. पंचांनी सामना संपल्याची शिट्टी फु़ंकली. योग्याचा हात दोनदा मधुकरलाच लागला होता. त्यामुळे आम्हाला एकच गुण मिळाला. गुण फलक १६ - १५
एका गुणाने सहावी ब जिंकली. अजिंक्य पद त्यांच्या कडे गेलं. सहावी ब ची मुले मैदानात नाचत होती.
आम्ही त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या चपळ खेळामुळे ते जिंकले. डोके शांत ठेवून खेळले म्हणून जिंकले
प्रभाकरला बरेच लागले होते. त्याला दवाखान्यात नेले .
रात्री झोपताना बरेच वेळ झोपच येत नव्हती. डोळे मिटले की डोळ्यासमोर मुलांनी गच्च भरलेले मैदानच येत होते.
मॅच हरलो तरी खूप मजा आली. मुख्याध्यापक सरांनी सहावी ब आणि आमच्या टीमला त्यांच्या घरी चहा चे निमंत्रण दिले. सर्वांचे अभिनंदन केले.
पुढचे बरेच दिवस मॅच शिवाय वर्गात दुसरा विषयच नव्हता.
क्रमशः
प्रतिक्रिया
11 Oct 2020 - 6:44 am | विजुभाऊ
http://www.misalpav.com/node/47099
अंतिम भाग