दोसतार - ५५

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
24 Jun 2020 - 9:16 am

"काय शिकवतात म्हणजे! रेड कशी मारायची. पाटी कशी दाबायची. बोनस कसा मिळवायचा पटात घुसून रेडरला कसा उचलायचा. सगळं दाखवतात. कबड्डी कबड्डी म्हणताना दम कसा टिकवायचा. ते पण शिकवतात.सोप्पे नाहिये ते. मंडळातला नर्‍या गायकवाड आख्खी दोन मिनिटे दम टिकवतो. अजिबात श्वास सोडत नाही."
आता इतर सगळे खेळ बाजूला पडले. वर्गाची कबड्डी ची टीम . त्यात कोणकोण असणार आणि प्रॅ़क्टीस कधी करायची यावरच सगळे बोलणे एकवटले

मागील दुवा : http://misalpav.com/node/47071

कोण कोण ? हा एक मोठा प्रश्न . कारण कबड्डीला निदान बारा खेळाडू लागतात. सात जण आत मैदानात आणि पाच जण बदली म्हणून. यातही एखादा आला , जखमी झाला तर अजून तीन चार राखीव खेळाडू. म्हणजे निदान पंधरा जण तरी नक्की. सराव करताना काही जण गळतील हे धरुन आपल्याला वीस जण तरी लागणार.
गिरीष , संज्या , प्रभाकर , सुध्या , राजा , मंदार , महेश ,अज्या दामले अव्या. एल्प्या , टंप्या अरविंदा , योग्या असे करत बारा जण झाले. पुढचे आठ जण तयार करायला लागणार . बघु या आख्ख्या वर्गाला बोलावले तरच होतील इतके जण.
कबड्डीला सराव लागतो का हा एक प्रश्न डोक्यात होताच. लहानपणापासून खेळत आलोय की. पण असू शकेल. केली प्रॅक्टीस म्हणून काय बिघडलं. अजून वीस एक दिवस होते. योग्या शिवाजी उदय मंडळात जातो . त्याच्या ओळखीचे एक सर आहेत. तिथे. ते घेणार आहेत सराव. त्यांनी सरावासाठी शाळेत यायचं कबूल केलंय.
शिवाजी उदय मंडळ तालीम आणि कबड्डी साठी एकदम प्रसिद्ध. महाराष्ट्राची कबड्डीची टीम आख्खी इथलीच. उथळेगुरुजेंनी बांधलेली. आम्हाला शिकवणारे सर . दादा म्हणायचे त्यांना. योग्या आणि अव्या जाऊन भेटलेत त्याना . संध्याकाळी सराव.
शाळा सुटली तसे कुणालाच घरी जाउ दिलं नाही. सगळ्यांना घेऊन वरच्या ग्राउंडवर. एल्प्याने खेळाचे मैदान एका काठीने आखून घेतले. तोवर दादां ही आलेच. दादा हातात एक काठी आणि शिट्टी घेऊनच आले. सर्वांना अगोदर उंची नुसार उभे केले. अन्या सर्वात पुढे आणि एल्प्या सर्वात मागे. ही ओळ न मोडता सर्वांनी ग्राउंडला दोन फेर्‍या मारायच्या. आणि शिट्टी वाजली. वरचे ग्राउंड तसे लहान दोन फेर्‍या अगदी सहज झाल्या.
हा वॉर्म अप . आता या ग्राउंडला तीन फेर्‍या मारायच्या. सर्वात अगोदर कोण पुर्ण करतय ते पहाणार आहोत.
अगोदर दोन फेर्‍या झाल्या होत्या आता तीन त्याही पुढे जायचं म्हणून जोरात धावायचे. तीसरी फेरी पूर्ण करत करता. बहुतेक सगळेच जण फासफुस करत श्वास घेत होते.
हे झाल्यावर मैदानाला डावीकडे आडवे उड्या मारत पुन्हा एक प्रदक्षणा . डावीकडे उड्या झाल्यावर तेच उजवी कडे. मग जागेवर उड्या. हाताचे व्यायाम . पाय ताणून हात ताणून व्यायाम . इतके झाल्यावर तीन तीन च्या गटात एकमेकांचे हात धरून पुन्हा डावीकडे आडवे उड्या मारत पुन्हा एक प्रदक्षणा . डावीकडे उड्या झाल्यावर तेच उजवी कडे..
सगळे जण घामाघूम. एल्प्याने मैदान आखून घेतले होतेच त्यावर पाणी मारणे. पाणी मारून मैदान ओले केले. आता खेळायला सुरवात. एल्प्या , टंप्या आणि अज्या मधे. राजा सुध्या आणि योग्या आणि अव्या. हे दोन्ही बाजूला. प्रभाकरने मैदानाला हात लावून नमस्कार केला आणि कबड्डी कबड्डी म्हणत एंट्री घेतली.
अंधार पडेपर्यंत . खेळ चालू राहिला. दादा म्हणाला आता उद्या कळेल कोण कोण खेळणार आहेत.
सकाळी अंथरुणातून अजिबात उठवतच नव्हतं. पाय जण जड झालेत. खांद्यात कोणीतरी चार चार किलोची वजने ठेवलीयेत . तरी बरे गृहपाठ दिलेला नाहिय्ये म्हणून. वहीवर लिहायला सुद्धा जमलं नसतं.
शाळेत गेल्यावर बाकीसगळ्यांची स्थिती तशीच. प्रभाकर तर आजारी आलाच नव्हता. त्या दिवशी दिवसभर कुठल्याच शिक्षकांना कुणी काही शंकाही विचारली नाही. शंका विचारायला म्हणून हात वर केला तरी खांदा दुखतोय.
संध्याकाळी ग्राउंडवर सव्वीसातले सहाजण गैरहजर. पाय दुखतोय गुढघा दुखतोय, हात दुखतोय खांदा दुखतोय. मांड्यात गोळे आलेत, पाठ दुखतेय मान दुखतेय कोण कोण काय काय सांगतय. दवाखाना गोळा केल्या सारखं वाटतय. फक्त जीभ डोळे आणि पोट सोडून सगळे अवयव दुखताहेत.
दादांनी कुणाचंच ऐकलं नाही. त्यांनी कालच्यासारखेच ग्राउंडला एका ओळीत दोन फेर्‍या मारायच्या. . हळू हळू .पहिली काही पावले चालायलाही जड गेलं धावणं लांबच राहिलं. पण दुसरी फेरी संपताना सगळ्यांची पावलं धावत होती. पुढचा आदेश जोरात धावायचा. तीन फेर्‍या. पूर्ण होतील की नाही शंका आहे. पण गम्मत म्हणजे त्या झाल्या. तीसरी फेरी होताना प्रत्येकाचे खांदे , पाठ पाय हात दुखत होते ते दुखायचेच विसरले . जागेवर उड्या झाल्या डावीकडे उजवीकडे आडव्या उड्या झाल्या हात पाय ताणून करायचे व्यायाम झाले. मैदानावर पाणी मारून झाले सगळे एकदम ताजे तवाने झाले. कालच्या सारखीच साखळी धरली. आणि योग्याने मैदानाला हात लावून नमस्कार केला आणि सर्वीस केली.
एक आठवडा झालाय. आम्ही रोज खेळतोय. शेवटच्या तासालाच शाळा सुटल्यावर कधी एकदा मैदानात जातोय असे होते. सव्वीस मुलांपैकी अठराजण टिकले आहेत. पण जे येताहेत ते नियमीत येताहेत. दादा पण आम्हाला सर्वीस , रेड म्हणायचें त्याला, कशी करायची. रेड मारणाराने पाटी कशी दाबायची. , रेड मारणाराला कोपर्‍यात कसा घ्यायचा. पट कसा काढायचा. बोनस गुण कसा मिळतो. दम कसा टिकवायचा. बरेच काही सांगतात.
दुसरा आठवडाही संपला. रोज सराव चाललाय. दादांनी सर्वात बेडूक उड्या आणि दंड बैठका हा नवा व्यायाम वाढवलाय.आमचा सराव पहायला एकदा कापसे सर येऊन गेले , मुख्याध्यापक सर पण येऊन गेले. एकदा सातवी अ ची पोरे येऊन गेली. कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी आमचा सराव रोज चाललाय. खेळून घरी गेल्यावर सणकून भूक लागते. आई मुद्दाम दूध भाकरी देते.
आता आमचा सराव एकदम छान चाललाय. अठरा जणांची संख्या आता पंधरा जणांवर आलीये. प्ण ते शेवटपर्यंत खेळणारे आहेत. दंड बैठका बेडूक उड्यांमुळे गेल्या आठवड्यात सकाळी नीट चालायला जमत नव्ह्ते ते आता जमतय. बाकीच्या वर्गांचा सरावही तेवढाच जोरात चाललाय. गॅदरिंगला खेळायला मजा येणार .
गॅदरिंगचे वेळापत्रक आले. कबड्डी च्या मॅचेस दोन दिवस ठेवल्यात. आदल्या दिवशी इयत्तावर , मग गटवार.
दुसर्‍या दिवशी फायनल
पहिली मॅच. सातवी अ विरुद्ध , आमची सात जणांची टीम . मी आणि योग्या डावीकडे टम्प्या राजा मोरे आणी एल्या मधे. मंगेश आणि महेश उजवी कडे. कापसे सरांने पर्यवेक्षक सरंच्या हाताने नारळ फोडून स्पर्धेचे उद्घाटन केले. सरांनी नाणेफेक करुन ओली सुकी केलीये.
आम्ही आम्हाला हव्या असलेल्या बाजूला येऊन उभे राहिलो. ओलीसुकी सातवी क ने जिंकली. सातवी क च्या टीमच्या मानाने एल्प्या सोडला तर सगळे लहानच वाटताहेत. सातवी क च्या टीम मधे. संदीप येवले. हा जिल्हा संघात खेळतो. त्याच्यावर लक्ष्य ठेवायला हवे. तो त्या टीमचा कॅप्टनही आहे. आमचा कॅप्टन योग्या.
संदीप येवले ने राजा संकपाळ ला चढाई साठी पाठवलय. राजाला बोनसही करु द्यायचा नाही. ग्राउंडच्या पाया पडून राजाने चढाई साठी आवाज घुमवला . कबड्डी कबड्डी.
राजा डावा पाय बाजूला फेकत नाचत येतोय. तो बहुतेक उजवी बाजू दाबणार आणि बोनस घेणार. मी पलीकडे महेशला खुणावले. राजा एकदा उजवी कडे एकदा डावीकडे नाचतोय. पण त्याच्या पाय फेकत नाचायच्या मुळे समजतय की तो उजवीकडेच शेवटी जाणार. टंप्या जर मागे गेला नाही तर त्याला आत घेवून त्याचा पट काढता येईल. आमचा अंदाज बरोबर ठरलाय राजाने उजवीकडे पाटी दाबली आहे. महेश आणि मंदार मागे आलेत. टंप्या, एल्प्या आणि राजा मोरे ने त्या मागे जातोय दाखवत बाजूने पुढे आलेत. राजा संकपाळ बरोबर आत सापडलाय. योग्या आणि मी पुढे आलोय. राजा संकपाळला आता पूर्ण जेरबंद केलायु. तो मागे फिरूच शकत नाही. राजा मोरे ने वाकून त्याच्या कमरेला पकडलेय. एल्प्याने त्याला मिठी मारून उचललेय. राजा संकपाळचा दम सम्पला.
एक गुण आम्हाला.
पुढची रेड आमची. राजा मोरे. रेड टाकणार. त्याने सेंटर लाईन ला नमस्कार केला. आवाज घुमवला कबड्डी कबड्डी.
राजा मोरेला सातवी क ने बरोब्बर ब्लॉक केलाय. त्याला पुढेच येवू देत नाहीये कोणी. राजाने एका बाजूला पाटी दाबायचा प्रयत्न केला पण सातवी क ची पोरे चपळ आहेत. ते राजा मोरेला बोनस रेषेपर्यंतही येवू देत नाहियेत. कुठूनही घुसू देत नाहियेत. एकही गुण न मिळवता राजा परत आलाय.
आता चढाई त्यांची. शंकर जाधव चढाई करायला. एल्प्याच्या इतकाच उंच. त्याने चढाई एकदम जोरात केली. वेगात म्हणजे खूप वेगात. मधल्या साखळीवर नजर आहे.राजा मोरेला हात मारून आउट करायचंय त्याला .एल्प्याने राजा मोरेचा हात सोडत साखळी सोडली. शंकरला त्याचा वेग आवरत आला नाही. एल्प्याच्या बाजूने जाताना एल्प्याने त्याला आणखी मागे ढकलले . त्याचा तोल गेला. साखळी चा अडथळा नसल्यामुळे तो थेट बोनस लाईन च नाही तर शेवटची लाईन ही ओलांडून तो बाहेर गेला.
हा असला डाव आम्हीच काय पण कबड्डीच्या इतिहासात कुणी खेळला नसेल. आठवी ब च्या पोरांनी है... असा आरडा ओरडा करत मैदान डोक्यावर घेतले.
आता सातवी क चे दोन गडी बाद झालेले आहेत. दोन्ही कॉर्नर चे. पण एकेकटा गडी कॉर्नरला असणे सुट्टा हे ही जरा धोकादायक. दोन्ही कडे लक्ष्य ठेवायला हवे. पाचच गडी मैदानात असताना बोनस गुण मिळतात की नाही हे नक्की माहित नाहिये. गडी औट केला तरच गुण मिळेल. योग्याने मला रेड करायला सांगितलेय. मी मधल्या रेषेला हात लावून आवाज घुमवला. कबड्डी कबड्डी . मी नाचत पुढे आलोय. मधली साखळी दबली जातेय . आणखी दाबूया. बोनस गुण मिळाला तर मिळेल. शिवाय औटही करता येईल कोणाला. मी आणखी पुढे जातो. मधली साखळी दाबण्याच्या नादात सातवी क च्या सापळ्यात बरोबर अडकलो. बराच आत आलोय. दोन्ही बाजुंचे कॉर्नर धावून आलेत. दोघांनी हात धरत साखळी केली. समोर तिघांची साखळी. मागे दोघांची साखळी. मी पूर्ण अडकलो. सातवी क च्या मकरंद भोसले ने माझी कंबर धरून मला उचललेय. माझा दम संपला. मी औट. सातवी क च्या पोरांनी है..... करत एकच जल्लोश केला. सातवी क ने खाते उघडले. दोन एक.
पुढची रेड सातवी क ची , त्यांचा कॅप्टन संदीप येवले रेड करायला आलाय. मी नाही त्यामुळे डावी बाजू योग्या एकटाच लढवतोय. संदीप ने आत येतानाच डावी बाजू दाबलीये. त्याने हाताने योग्याच्या हातावर फटका मारलाय. तेथूनपरत जाण्यासाठी नितीन पुढे येणार तेवढ्या एल्प्या इकडून पुढे आला. नितीनला पकडायचा प्रयत्न करतोय. निसटता स्पर्ष झाला ,संदीप ने वाकून एल्प्याला हूल दिली. तो सटकला. आणि मध्यरेषेच्या अलीकडे आला. एका फटक्यात संदीप ने आमचे दोन गडी गारद केले. सातवी क वरचढ . स्कोर दोन तीन.
आता आमच्या कडे चारच गडी . सातवी क कडे पाच. योग्या रेड करायला . माझाच डाव पुढे चालवत पण या वेळेस योग्याने उजवी बाजू दाबलीये. डावीकडून मकरंद तेवढा पुढे येणार नाही हे त्याला माहीत आहे. योग्याने नरेंद्र खटावकरच्या हातावर हात मारलाय. योग्या परात यायला निघालाय. म़करंद त्याला आडवायचा प्रयत्न करतोय. नरेंद्र खटावकर पण पुढे आलाय. योग्याने दोन्ही हात पसरलेत. नरेंद्र ने आ योग्याचा हात पकडलाय . मकरंदने योग्याचा दुसरा हात पकडला. मधल्या साखळीने योग्याला कमरेला धरून उचलला. योग्याचा दम संपला.
स्कोर दोन चार. आता आमचे तीनच गडी उरलेत. या चढाई ला आलेला गडी औट केला तरच काहीतरी होणा. पण तीन गड्यावर कसे जमवणार. टंप्या राजा मोरे आणि महेश मैदानात आहेत .
पुढची चढाई करायला आलेला गडी आदर्श गोरे. एकदम बुटका. अन्या एवढा असेल . तो आला आमची टीम मागे फिरली. एकादा डावीकडे एकादा उजवी कडे असे नाचवले. एकदा तर तो बोनस रेषेच्या पलीकडेही गेला. पण त्याला पकडायचे नाही. हे योग्याचे म्हणणे. ते ऐकले ते बरे झाले. कारण आदर्श गोर बुटका असला तरी चपळ आहे. हातातून कधी सटकला असता सांगता आले नसते. तिघेही औट झाले असते. आणि लोण खावे लागले असते. टंप्या महेश आणि राजाला नाचवून गुण न घेताच आदर्श मागे फिरला.
आता रेड करायला टंप्या.....
मध्यंतरापर्यंत गुण सातवी क ८ आठवी ब ४ आमच्यावर सातवी क ने एक लोण चढवलेले आहे.
मधल्या वेळेत दादा समोर आला. आम्ही घाईघाईत चढाई करण्यात गुण घालवतोय. सातवी क च्या पोरांना चढाई करायला आल्यावर दमवायला हवे. ते दम टिकवण्यात कमी पडताहेत आणि आपण चढाई करायला गेल्या गेल्या हाताचा फटका मारण्या ऐवजी पाय मारून औट करायला हवे. सातवी क च या पोरांचे लक्ष्य तुमच्या हातावर आहे., पायावर नाही.
दादा ने योग्याला आणखीन काही सांगीतले.
कापसे सरांनी शिट्टे फुंकली आणि दुसरा डाव सुरू झाला. पहिली चढाई सातवी क ने सावध केली . त्यांना आता गुण घालवायचे नव्हते. ते बोनससाठीही त्यांनी प्रयत्न केला नाही. आता चढाई एल्प्या करणार. एल्प्याने ठरल्या प्रमाणे सर्वात प्रथम समोर जात मधल्या गड्याला पाय मारत औट केला. हात दोन्ही बाजूला केले होते तरी फार लांब केले नव्हते. तो दोन्ही कोर्नरला जवळयेवू देत नव्हता. मधल्या गड्याने एल्प्याला घालवण्याचा प्रयत्न केला त्यातच डावीकडच्या कॉर्नर ने त्याला पकडायचा. दोघांच्या गोंधळात एल्प्या सटकला . कल्पना नसतानाही दुसरा गुण मिळाला.
पुढची चढाई शंकरची. शंकरला कसे औट करायचे हे अगोदरच ठरवलेले आहे. गेल्या खेपेला झाली तशी चूक शंकर करणार नाही हे माहीत आहे. डाव्य अकोपर्‍याने शंकरला पलीकडे दाबला. शंकरला बोनस रेषेपर्यंतही पोचू दिला नाही. त्याचा दम तुटायला लागला. तसा राजा मोरे पुढे झाला आणि त्याने शंकरची पकड केली. सातव्या चढाई नंतर दोन्ही संघांचे गुण समसमान झाले. आता फक्त तीन मिनीटे उरलीत.
या तीन मिनीटात जे काय करायचे तेच.
मैदानात आता दोन्ही संघांचे दोन दोन खेळाडूच उरलेत. आठवी ब चा एल्प्या आणि सातवी क चा आदर्श गोरे. एल्प्याने चढाई केली तेंव्हा आदर्श गोरे ने एल्प्याला आख्ख्या मैदानभर नाचून दमवला. एल्प्याला त्याला औट न करताच परत फिरावेल लागले.
आदर्श ची चढाई. या वेळेस फक्त दीड मिनीत उरलाय. ही शेवटचीच चढाई. सामना जिंकायचा असेल तर काहितरी वेगळे करायलाच हवे आदर्श तुरुतुरु करत मैदानात फिरतोय. एल्प्या त्याला टाळतोय. आदर्श पुढे सरकला . एल्प्या डाव्या बाजूला गेला. अंदाजा प्रमाणे आदर्शचा दम संपायला लागलाय. तो परत फिरणार आता. तरीपण जाताना जमले तर पाहुया म्हणत आदर्शने हात फिरवला. एल्प्याने त्याचा हात चपळाईने पकडून ओढला. आदर्शचा तोल गेला. तो बाजूच्या रेषेच्या बाहेर गेला. अगोदर आम्हाला कळालेच नाही. पण बाहेर बसलेल्या टीमने है.म्हणत मैदान डोक्यावर घेतले. एका गुणाने आम्हाला निसटता विजय मिळाला होता. सातवी क ने एकदम शेवटपर्यंत झुंजवले .
पुढची मॅच . आठवी ड बरोबर.
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

निनाद's picture

24 Jun 2020 - 10:09 am | निनाद

मस्त मॅच, अगदी समोर बसून पाहतो आहोत असे वाटले.

असा मी असामी's picture

24 Jun 2020 - 5:46 pm | असा मी असामी

"आठवी ब चा एल्प्या" च्या ऐवजी सातवी अ पाहीजे ना?
तसेच "सातवी क च्या टीमच्या मानाने एल्प्या सोडला तर सगळे लहानच वाटताहेत." इथे पण सातवी अ पाहीजे ना?

विजुभाऊ's picture

24 Jun 2020 - 10:16 pm | विजुभाऊ

नाही मॅच आठवी ब आणि सातवी क यांच्यात होतेय.
एल्प्या हा आठवी ब मधे आहे.

विजुभाऊ's picture

24 Jun 2020 - 10:16 pm | विजुभाऊ

पण तुमचे निरीक्षण छान आहे

विजुभाऊ's picture

24 Jun 2020 - 10:39 pm | विजुभाऊ

गट १ पाचवी सहावी
गट २ सातवी आठवी
गट ३ नववी दहावी

king_of_net's picture

29 Jun 2020 - 4:10 pm | king_of_net

थरार !
संपुर्ण प्रसंग डोळ्यांपुढे उभा राहीला