दोसतार -५४

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
23 Jun 2020 - 9:04 am

"एका टीमच्या बॅट्समन चा उडालेला कॅच दुसर्‍या टीमचा फिल्डर पकडायचा. अशा वेळेस औट द्यायचा की नाही हेच समजत नाही.
गावसकरच काय पण टोनी ग्रेक आणि सोबर्स ही असल्या मॅच खेळले नसतील.
इतक्या सगळ्या नियमात बसवून क्रिकेटच्या मॅचेस घ्यायच्या शाळेला अवघड वाटणार नाही तर काय !

मागील दुवा http://misalpav.com/node/47063
शाळेनं हा विचार केलेला असणार
अज्या संज्या संदीप गार्‍या सगळे मिळून या वर्षी कोणता खेळ असेल हेच बोलत होतो. अज्याचे म्हणणे की प्रत्येक खेळाला समान न्याय द्यायला हवा,
"एखाद्या वर्षी फुटबॉल एखाद्या वर्षी हॉलीबॉल असे काहितरी ठेवायला हवे. सर्वात महत्वाचे म्हणजे देशी खेळ म्हणजे आट्यापाट्या सुरपारंब्या लपंडाव आबादुबी यांच्या मॅचेस व्हायला हव्या. " अज्या बोलायला लागला की काय बोलेल सांगता येत नाही.
आट्यापाट्या सुरपारंब्या यांच्या मॅचेस इथपर्यंत ठीक आहे. त्यांचे काहीतरी नियम असतात. पण उद्या समजा कोणी लपंडावच्या मॅचेस ठेवल्या तर कशा ठेवतील आणि त्याला नियम काय असतील?
" आवादुबी च्या मॅचेस असायला पायजेल रे लय मज्जा येईल आपण सरांना सांगुया" अन्याचे बरे आहे. आबादुबीच्या खेळात त्याच्या उंचीमुळे कोणालाच त्याला नेम धरुन बॉल मारता येत नाही. तो कायम तसाच सुटतो.
आबादुबी म्हणजे रबरी चेंडू एकमेकांना फेकून मारणे. ज्याच्यावर राज्य असेल त्याने कोणी फेकलेला बॉल मधे झेलला की फेकणारा औट. राज्य असलेल्या ने कोणाला बॉल मारला आणि त्याला बॉल लागला की तो औट. यात एखाद्याला शेकाटून काढायला मजा येते. औट झालेला गडी राज्य आलेल्या गड्याच्या पार्टीत सामील होणार. आणि ते दोघे मिळून इतराना औट करणार. सगळे औट झाले की मग पहिला औट झाला असेल त्याच्या वर राज्य.
एकदा सुरू झाल्यावर हा खेळ किती वेळ चालेल ते सांगता येत नाही. कधीपण बंद करता येतो आणि पहिल्यापासून सुरू करता येतो.
थोडे नियम बदलून हा खेळ खेळवता येईल. पण असला अरव्याच्या भाषेत सांगायचे तर राष्ट्रोत्तेजक खेळ आपल्या इथे सुरू होणार नाही. तो कुठेतरी पतियाळा नाहितर दुर्गपूरला अगोदर सुरू करतील आणि नंतर इथे महाराष्ट्रात येईल. आपलाच खेळ आपल्याला इतरांकडून शिकायला लागेल.
अरव्याचे आप्पा असेच बोलतात. त्यामुळे अरव्या पण तसाच बोलतो. कायम कुणाशी तरी भांडत असल्यासारखा.
"ते दुर्गपूर पतियाळा जाऊदे आबादुबी चा खेळ मुंबईतल्या मुलांना माहीत असेल की नाही कुणास ठाऊक." श्रिप्याला नेमका मुद्दा सुचतो अशा वेळेस.
" पण तुम्ही फक्त मुलांच्याच खेळाबद्दल का बोलताय. अक्कट दुक्कट आणि सागरगोट्यांच्या पण स्पर्धा हव्यात" आमच्या बोलण्यात मधे येऊन अंजीने आणखी एक मुद्दा मांडला. आम्हाला पुढचा धोका दिसायला लागला. शाळेने आबादुबीच्या मॅचेस ऐवजी अक्कट दुक्कट आणि सागरगोटे च्या मॅचेस ठरवल्या आहेत. मला डोळ्यासमोर चित्र दिसायला लागले. दोन्ही पाय आडवे पसरून सागरगोटे हवेत उंच उडवून झेलताना गिरीष , आणि संज्या दिसायला लागले. कापसे सर ते किती उंच फेकले आहेत ते मोजताहेत. अंजी काहीना काही बोलून खेळणाराचे लक्ष्य विचलीत करतेय. सागरगोटे हातात न पडता जमिनीवर पडलेत आणि सगळ्या मुली फिदीफिदी हसताहेत.
बापरे. आपण कितीही केलं तरी या मुली हरणार नाहीत. त्यापेक्षा कबड्डी ,खो खो बरा. निदान मुलींशी तरी खेळावं लागणार नाही.
"अरे माहितीये का . सातवी अ च्या वर्गाला भामरे सरांनी त्यांची कबड्डीची टीम तयार करायला सांगीतलीये." इतका वेळ चर्चेत कुठेच नसणार्‍या अव्याचा आवाज आला.
"हे आधी सांगायचे नाही का ,
"कधी सांगितले त्याना."
"प्रकटन सूचनाफलकावर लावलय का? "
" टीम कोण ठरवणार. आपल्या आपण ठरवायच्या की सर ठरवणार ? "
प्रॅक्टीस कधी करायची
ए कबड्डीला प्रॅक्टीस लागते का कधी. जायचं अन खेळायचं थेट.
तर तर आम्ही मंडळात रोज खेळतो की. शिक्षक शिकवतात तिथे.
काय शिकवतात? कबड्डी कबड्डी म्हणायला ? कबड्डी कबड्डी म्हणजे काय रामरक्षा आहे का शिकून पाठ करायला." गार्‍या कुलकर्णी. रामरक्षा पाठ आहे. म्हणून तो प्रत्येक वेळेस रामरक्षेचेच उदाहरण देणार.
"काय शिकवतात म्हणजे! रेड कशी मारायची. पाटी कशी दाबायची. बोनस कसा मिळवायचा पटात घुसून रेडरला कसा उचलायचा. सगळं दाखवतात. कबड्डी कबड्डी म्हणताना दम कसा टिकवायचा. ते पण शिकवतात.सोप्पे नाहिये ते. मंडळातला नर्‍या गायकवाड आख्खी दोन मिनिटे दम टिकवतो. अजिबात श्वास सोडत नाही."
आता इतर सगळे खेळ बाजूला पडले. वर्गाची कबड्डी ची टीम . त्यात कोणकोण असणार आणि प्रॅक्तीस कधी करायची यावरच सगळे बोलणे एकवटले.

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

24 Jun 2020 - 9:20 am | विजुभाऊ

पुढील दुवा http://misalpav.com/node/47076