दोसतार - ५३

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
22 Jun 2020 - 8:54 am

येन रुम नपाम्रधु थेये. येन रुक नपाद्यम थेये..
मराठी वाक्य उलटीकडुन वाचत त्याने संस्कृत म्हणून लिहीले होते. अभ्यंकर बाई शब्दार्थ शोधत होत्या.

मागील दुवा http://misalpav.com/node/47052

घटक चाचणी नंतर सगळ्यांना वेध लागलेले असतात ते गॅदरिंग चे. गॅदरिंग हा प्रत्येका साठी वर्षातला महत्वाचा दिवस. सणच म्हणूया ना. गॅदरिंग होणार ही चर्चा कोणं सुरू करते हे समजत नाही. पण लहान भुरभुरीने पाऊस सुरू व्हावा आणि मग तो सगळीकडे पसरत जावा तसे गॅदरिंगची चर्चा वर्गावर्गात सुरू होते. य्हात महत्वाचे असते म्हनजे मागच्या वर्षी कोणी काय केले होते ते. पाटणच्या शाळेत गॅदरिंगला कोणीतरी प्रमुख पाहुणे यायचे. सकाळी ते मुलांना काहितरी संगायचे. मग दूपारे रांगोळी स्पर्धा, उंच उडी लांब उडी धावण्याच्या स्पर्धा असल्या मैदानी गोष्ती व्हायच्या. संध्याकाळी विवीध गुणदर्शन . यात नाच, लहान मुलांची गाणी कोणाची नक्कल एखादी नाटीका असे काहीपण व्हायचे. दुसर्‍या दिवशी सुट्टी . त्या दिवशी आदल्या दिवशी गॅदरिंगला कोणाचे काय चुकले याची चर्चा. शाळेचे गॅदरिंग सगळ्या शाळांत सारखेच. प्रत्येक शाळेचे शालागीत वेगळे इतकाच काय तो फरक. काहिही असो. गॅदरिंग ची चर्चा गॅदरिंग सुरु व्हायच्या अगोदर महिनाभर तरी अगोदरपासून सुरू झाली. कोण काय काय करणार या सोबत गेल्या वेळेस काय चुकले होते कुणाची फजिती झाली होती याच्याही गप्पांनी.
गेल्या वर्षी धावण्याच्या स्पर्धेत गिरीष थोडक्यात मागे पडला आणि क तुकडीतला जमीर पटेल पहिला आला. दोरीच्या उड्या स्पर्धेत आंजी तीसरी आली होती. ती एरवी ही इतक्या उड्या मारत असते की तीला वेगळ्या दोरीची गरजच पडत नाही. संज्या पाटील ने कुस्तीत पहिला नम्बर काढला होता. कबड्डीत सहावी ब ने सातवी ब वर निसटता विजय मिळवून ढाल त्यांच्याकडे राखली होती. संगीता आणि माधुरीने गॅदरिंगला समूह गीत म्हंटले होते. स्वागत गीत म्हंटले होते. स्वागत गीताला या वेळेस आम्हाला बोलावणार नाहीत हे नक्की होते.
आणखीही काय काय होते. तीन पाय शर्यत , लंगडी पळती , पोत्यातल्या उड्या. वगैरे वगैरे. आणि सर्वात खास म्हणजे गॅदरिंगला लाडू पुरीचे आणि रस्सा मसालेभाताचे जेवणही होते. सगळ्यानी पिशवीतुन स्वतःचे ताट वाटी आणायचे जेवायला.. बरीच मज्जा येत असणार गॅदरिंगला. इतकी सगळे जण एकत्र जेवताना मी माई आत्त्याच्या लग्नातच पाहिली होती. आख्खा गाव आला होता जेवायला. आणि जानाई देवीच्या उत्सवात भंडार्‍याला .इथे आख्खी शाळा येणार जेवायला. शाळेचे गॅदरिंग म्हणजे एक उत्सवच की . देव नाही इतकेच.
वर्गात आठवडाभर हीच चर्चा. मग गॅदरिंगला नाटकात कोण काय काम केले होते. कोण बोलताना चुकले होते . कोणी नाचताना उजवीकडे पहायच्या ऐवजी डावीकडे पाहिले होते अन त्यामुळे सगळा नाचच चुकला . गेल्या वर्षी मी शाळेत नसल्यामुळे मला सगळ्या गोष्टी नवीनच होत्या. कोण जे म्हणेल ते खरे . पण भारी गम्मत येत असणार. गॅदरिंगबद्दल कुणी बोलायला लागला की त्याचे डोळे भारी चमकायचे. आम्ही दोघे बोलत असू तरी त्यात कोणीतरी तिसरा येणार आणि " आरे हे काहीच नाही. तो अम्र्या तर लै भारी. कबड्डीला अशी एन्ट्री केली होती . आख्खी पाटी मारली. त्याला धरायला गेलेल्या पाची जणांना ओढत इकडे आणला रेषेच्या आलीकडे. मगच त्याने दम सोडला. एका एंट्रीत लोण चढले..
कबड्डी चे सामने . अगोदर वर्गवार मग गटवार , म्हणजे पाचवी सहावी . सातवी आठवी आणि नववी दहावी असे तीन गट असणार.
क्रिकेटचा एकच सामना. तो ही दहावी ची मुले विरुद्ध शिक्षक. टेनीस च्या बॉलने.
वर्गवार क्रिकेटचे सामने वेळ फार जातो म्हणून घेत नाहीत. एका वेळेस मैदानात एकच मॅच होऊ शकते. मैदान किमान दोन तीन तास तरी अडकून पडते.
कबड्डी खोखो हे कसे एकाच वेळेस मैदानात तीन चार ठिकाणी सामने खेळवता येतात. शिवाय एक सामना फार तर तास भर चालणार. त्यामुळे दोन तासात सहा सात सामने होतात.
क्रिकेटबद्दल तसे शाळेचे बरेच गैरसमज आहेत. या खेळाला मोठे मैदान अजिब्बात लागत नाही. दुपारच्या सुट्टीत शाळेच्या त्या मैदानावर सहा सात टीम तरी खेळत असतात. खेळताना गडी पाडणे , टीम ठरवणे ओलीसुकी करणे या साठी तर अजिबात जागा लागत नाही. दोन कॅप्टन नी ओलीसुकी केल्यानंतर गडी पाडणे तर एकदम भारीच ही आयडीया ज्या कोणाच्या डोक्यातून निघाली तो एकदम महान माणूस असणार आईनस्टाईन नाहीतर न्यूटन च्या डोक्याचा. गडी मागताना पहिला शब्द म्हणजे "माझा गडी मी". आपणच स्वतःला टीम मधे मागून घ्यायचं . हो बरोबर आहे ना. उद्या कॅप्टनलाच समोरच्या टीन ने गडी म्हणून मागितले तर घोटाळाच व्हायचा.
कॅप्टन एका टीमकडे आणि बाकी उरलेली टीम विरोधात. असले कधीतरी झाले असेल म्हणून हा नियम आला असेल.
एकदा टीम ठरली की कॅप्टन नंतर पुन्हा एकदा ओलीसुकी होणार बॅटिंग की बॉलिंग साठी. मधल्या सुट्टीत ज्याला बॉलिंग मिळाली त्याला संध्याकाळी शाळा सुटल्यावर बॅटिंग मिळायची. अंधार पडून बॉल फिल्डरलाही दिसेनासा झाला की मगच खेळ थांबणार.
कधीकधी दोन टीम होण्याइतके गडी नसायचे. त्यावेळेस नंबर पाडायचे. एखाद्या च्या पाठीवर बॅट ठेवायची त्यावर बोटे ठेवून हा नम्बर कुणाचा विचारायचे. समजा दोन बोटे असतील आणि ज्याच्या पाठीवर बॅट असेल त्याने प्रभाकरचे नाव घेतले तर तो प्रभाकरचा बॅटिंगचा नंबर. बॉलिंग साठी वेगळे नंबर नाहीत. बॅटिंगच्या उलट क्रमाने बॉलिंगचे नंबर.
या क्रिकेटचे नियमही आम्हीच केलेले. म्हणजे कुठेच लिहिलेले नाहीत पण प्रत्येकाला पाठ .
ओढ्यात बॉल मारला की औट आणि ओढ्यातून बॉल शोधून आणायची जबाबदारी. ग्रंथालयाच्या भिंतीला बॉल लागला तर एक रन. ग्रंथालयाच्या भिंतीवर एक टप्पे कॅच औट. सरपटी बॉल टाकला तर एक रन. जिकडे फिल्डर नाही तिकडे मारला तर रन नाही. . सुतारकाम वर्गाच्या भिंतीला चार रना. धावून कितीही रना काढल्या तर चालतील. शिक्षकांच्या मुतारीत बॉल गेला तर आणायची जबाबदारी बॅट्समनची. आणताना धुवून आणायचा. या सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे "कुजी बात नस्से." बॅट्समन खेळताना जोडीने खेळतात, समजा एका टीम मधे पाच जण आहेत. चार गडी औट झाले की पाचवा एकटाच उरतो. त्याला जोडीदार नाही म्हणून ती इनिंग तिथेच संपे. औट नसतानाही त्याची बॅटिंग संपणार. हा अन्याय सम्पवण्यासाठी त्या नटाऊट असणार्‍या गड्याला खेळता यावे म्हणून " कुजी बात नस्से ' हा नियम.
हा नियम आता ऑस्ट्रेलीयातही येणार आहे. अमेरीकेत हा नियम अगोदरपासून आहे. फक्त इंग्लंड चा या नियमाला विरोध आहे. अशी गुप्त माहिती सगळ्यांना माहीत होती. नियंम ठरवताना हे प्रत्येकजण सांगणार.
शेवटचा नंबर ज्याचा तो सर्वात अगोदर बॉलिंग करणार. स्पिन , एक टप्पी , बुंध्यात बॉल टाकणे , फाष्ट हे बॉलिंग चे सगळे प्रकार एकच बॉलर टाकणार. डायरेक्ट अंगावर आणि सरपटी हे थेट नॉबॉल. प्रेक्षागृहाच्या भिंतीला खडूने नाहीतर विटकरीच्या तुकड्याने आखलेले तीन स्टंप. भिंतीला स्टंप बनवायचा एक फायदा म्हणजे बॅट्समनच्या मागे भिंतच असल्यामुळे बॉल मागे जात नाही. मागे गेलेली बॉल आणायची जबाबदारी बॅट्समनची जबाबदारी कमी होते.
स्टंप पासून बावीस पावले सरळ मोजून तिथे एक दगड ठेवायचा. बॉलरने तेथून बॉल टाकायचा. बॉल टाकताना वेगळा अंपायर नसेल तर बॉलरने किती बॉल टाकले हे बॉलरलाच विचारायचे. त्यानेही त्या अगोदर सात बॉल टाकलेले असले तरी तो सेकंड लास्ट बॉल चालू आहे असेच सांगणार. हे सगळेच जण करणार त्यामुळॅ कुणाचीच तक्रार नाही.
कॅच आउट, रन आउट हे थेट दिसणारे औट. त्याबद्दल कुणीच तक्रार करत नाही. स्टंपला बॉल लागला हे भिंतीवर पडलेल्या बॉलच्या ठशावरुन ठरवायचे. बॅट्समन तो ठसा गेल्या वेळेपासून तिथेच आहे असे सांगणार. ही वाद संध्याकाळी शाळा सुटल्यावर चौकातल्या सावजीच्या दुकानापर्यंत ही चालणार.
खेळायला जर लाकडाचा चिक्की बॉल असेल तर एल बी डब्ल्यु नसायचाच. तो बॉल नडगीवरइतक्या जोरात लागतो की तसला बॉल आला की बॅटस्मन पायावर घेतच नाही. थेट स्टंपात गेला तरी चालेल.
दुपारच्या सुट्टीत आपले ठरलेले पीच दुसर्‍या टीमने घेऊ नये म्हणून तास संपल्या संपल्या अगोदर पळायचे. पण त्यातही एक अडचण असायची. कधी कधी , कधी कधी कशाला अगदी नेहमी. दुसरी एखादी टीम आमचे स्टंप असतील तिथून पाच सहा फुटावर त्यांचे स्टंप आखून खेळायची. म्हणजे प्रेक्षागृहाच्या भिंतीवर स्टंप आखून एका ओळीत चार पाच टीमा मॅच खेळत असणार. एका टीमचा खेळाडू कधी कधी दुसर्‍या टीमच्या खेळाडूच्या पाठीला पाठ लावुन उभा असणार. एका टीमच्या बॅअ‍ॅट्समन चा उडालेला कॅच दुसर्‍या टीमचा फिल्डर पकडायचा. अशा वेळेस औट द्यायचा की नाही हेच समजत नाही.
गावसकरच काय पण टोनी ग्रेक आणि सोबर्स ही असल्या मॅच खेळले नसतील.
इतक्या सगळ्या नियमात बसवून क्रिकेटच्या मॅचेस घ्यायच्या शाळेला अवघड वाटणार नाही तर काय !
त्यापेक्षा कबड्डीच्या वर्गवार टीम करुन गटानुसार मॅचेस घेणे सोप्पे.

क्रमश :

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

निनाद's picture

22 Jun 2020 - 9:58 am | निनाद

गॅदरिंग ची चर्चा गॅदरिंग सुरु व्हायच्या अगोदर महिनाभर तरी अगोदरपासून सुरू झाली. हे अगदी भारी होते... असेच असायचे!