घरी संस्कृत गोष्टींचे पुस्तक नव्हतेच. आज्जीची पुस्तके होती पण ती देवाची होती. त्यात गोष्टी नव्हत्या. हरिविजय , गोपिकाष्टकम , महाभारत रामकथासार अशी होती. आणि आज्जीला त्या गोष्टी माहीत होत्या आई ती पुस्तके वाचायची पण तीला त्यातील गोष्टी माहीत नव्हत्या. नाही म्हणायला संगीत मंदारमाला नावाचे एक नाटकाचे पुस्तक होते पण ते मराठीत . संस्कृत नाही. कुठेतरी सापडायलाच हवी संस्कृत गोष्ट.
मागील दुवा http://misalpav.com/node/47035
संस्कृत पुस्तके दुकानात पण मिळत नाहीत. जी काही मिळतात ती श्लोक आणि कसल्याशा पुराणांची. गोष्टीचे पुस्तक संस्कृत मधे मिळवायचं म्हणजे जरा विचीत्रच की. लहानपणापासून आज्जीने आईने आणि देवळात संस्कार गटात जायचो तिथेही संस्कृत मधले श्लोक शिकवले होते. बाईंचंही काहितरी सांगण्यात चुकले असावे. संस्कृत श्लोक ऐवजी त्यांनी गोष्ट असेच सांगायला हवे होते. गोष्टीचे कधी श्लोक असतात का? श्लोक म्हणजे कविता , गाणे . आता गाणे आणि गोष्ट एक असणार आहे का?
बाईंना कोण सांगणार. रेडीओवर च्या बातम्या लिहून घेता आल्या तर बरे. पण त्याही दिवसातून एकदाच असतात आणि तेही थेट सकाळी सात वाजता.
"आई सांगना या बाई तरी कशा विचीत्र . संस्कृत गोष्ट लिहुन आणायला सांगितलीय."
" मग लिही की . काय अवघड आहे त्यात"
" अगं पण संस्कृत मधे आत्तापर्यंत फक्त श्लोक असतात. यांनी गोष्ट लिहायला सांगितली आहे"
" मग काय झाले त्याला" ही आई पण ना. …. गोष्ट सांगायची तर नुसता उपदेश करत बसली आहे.
" अगं पण संस्कृत मधे फक्त श्लोक आहेत. श्लोक म्हणजे कविता , गाणी , गान्यात का गोष्ट असते कधी?"
" का नसायला काय झाले. कितीतरी गाणी आहेत गोष्ट सांगणारी "
"कुठे आहेत ?"
" हे काय ……. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. होते कुरूप पिल्लू त्यात" ही गोष्टच आहे गाण्यात सांगितली आहे. किंवा मग शेपटीवाल्या प्रान्यांची पूर्वी भरली सभा . पोपट होता सभापती मधोमध उभा" ही पण गोष्टच आहे. ससा तो ससा , नी कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली" ही गोष्टच आहे की. गान्यात सांगितली आहे इतकेच. आणि श्लोकात पुराणात जे सांगतात त्याही गोष्टीच असतात. फक्त देवादिकांच्या असतात इतकेच."
पण मग बाईंनी संस्कृत मधे गोष्ट लिहून आणायला सांगितली आहे. त्याचे काय?
तू लिही की एखादी गोष्ट घे सोपी आणि त्यातल्या प्रत्येक वाक्याला संस्कृतमधे लिहायचे.
तू केलं आहेस असे कधी?
मला शाळेत संस्कृत नव्हते. पण एखादी गोष्ट कोणीतरी केल्याशिवाय होत नाही. कोणी केलेली नाही म्हणून आपण करणार नाही म्हणालो तर ती कधीच होणार नाही.
हे बरोबर आहे. आईचे बरोबर आहे. अगोदर कोणी लावला नाही असा विचार करत बसला असता तर जेम्स वॅट वाफेच्या इंजीनाचा शोध लावूच शकला नसता.
आपण करून बघायला काय हरकत आहे. फारतर चुका होतील इतकेच.
अरे बाईंना पण ही कल्पना असेलच की. तुम्ही विद्यार्थी आहात. प्रयत्न तर कर.
नको मुले हसतील.
हसू देत की. तुझ्याच वर्गातली ना ! त्यांचे संस्कृत पण तुझ्या एवढेच त्यांच्या हसण्याची काळजी नको करूस.
कुठली गोष्ट लिहु. अगदी सोप्पी.
तुला कुठली वाटते सोप्पी .
लाकुडतोड्याची ……….? लाकुडतोड्याची गोष्ट संस्कृत मधे लिहुया. प्रयत्न तर करून पाहुया.
एकदा एका गावात लखोबा नावाचा लाकुडतोड्या रहात होता. एकस्मिन काले एके ग्रामे लखोबा नामः लाकुडतोड्या आसित. तो रोज जंगलात जायचा. सः प्रतिदिने अरण्ये जातः
असे बरेच काही लिहून गोष्ट पूर्ण केली. काही चुकले तर बाई सुधारून देतील की. बघु या की करून.
संस्कृत आणि मराठी कुठे फार वेगळे आहे!. अगदी सारखेच आहे की. कर्ता कर्म क्रियापद. एका ओळीत ठेवले की झाले वाक्य. सोप्पे आहे की. विभक्ती प्रत्यय आणि क्रियापदाचे रुपे हे जरा नीट पहायचे इतकेच. म्हणजे रांम आंबा खातो. हे संस्कृत मधे रामः अम्रः खादति. असे येणार.
अरे संस्कृतच काय पण जगातली प्रत्येक भाषा अशीच बनते. आणि दुसरे हे की तू प्रयत्न केलास म्हणून तुला समजले की ते सोप्पे आहे. प्रयत्न च केला नसतास तर ते कायमच अवघड राहीले असते. कोण काय म्हणेल किंवा आपण चुकू या भितीने प्रयत्नच केला नाही तर हमखास अपयश येणार. युद्धात सैनीक लढलेच नाहीत तर हारणार हे नक्की. पण लढले तर युद्ध जिंकूही शकतात.
हे डोक्यातच आले नव्हते कधी. गणीत सोडवायचा प्रयत्न केलाच नाही तर ते सुटणारच नाही कधी. आई म्हणते ते बरोबर आहे.
गोष्ट लिहून झाली . आपल्याला जमली की. .
सकाळी उठल्यावरही डोक्यात गोष्टीचेच विचार.
वर्गात आज कोण कोण काय लिहून आणेल हे पहायचे.
संस्कृत चा तास आज व्हायलाच हवा.
"आज बाई आजारी पडल्या तर बरे होईल. " टंप्याची गोष्ट लिहून झालेली नाहिये म्हणून तो प्रार्थना करतोय.
एल्प्या मात्र मजेत सगळ्यांची गम्मत पहातोय. त्याला बहुतेक एखादी गोष्ट सापडली असावी.
बाईंचा तास सुरू झाला. एकेकाला गोष्ट वाचायला सांगताहेत. सुरवात पुढच्या बाकापासून .
प्रशांत आज नेमका पुढे बसलाय.
"पूर्वम अरावलीप्रान्ते कस्मिन्कश्चित वने कृष्णचन्द्रः नमा पण्डितः गुरुकुलं चालयति स्म.
उत्तम गुरु: इति समग्रदेशे तस्य कीर्ति: प्रसुता आसीत..
पूर्वी अरावली प्रान्तात एका वनामधे कृष्णचंद्र नावाचा एक पंडीत गुरुकूल चालवत असे.
उत्तम गुरु अशी त्याची कीर्ति सगळ्या देशात पसरली होती." प्रशांत संस्क्रुत गोष्टीचा अर्थही सांगायला लागला. त्याने गोष्ट बहुतेक मोठ्या बहिणीकडून लिहून आणली असणार.
पण प्रशांत ने गोष्टीचा अर्थ सांगून बाकीच्यांची पंचाईत करून ठेवली. बाकीच्या सगळ्यांनाही त्यांच्या गोष्टीचा अर्थ सांगायला लागणार आता.
संज्या पवार प्रशांतच्या शेजारी बसलाय. संज्याने गोष्ट लिहून आणलेली नाहिये. तो नुसताच उभा राहिलाय. वही उघडली आहे. पण कोर्या पानावर गोष्ट थोडीच सापडणार आहे.
पुढचा बाक गौरीचा. तीने अगोदरच बोट वार केलंय. तीला वाचायचंय. ही बया म्हणजे जरा उत्साहीच आहे. गृहपाठाचा बाबतीत जरा जास्तच. आपण गृहपाठ केलेला नसला की नेमका हीने केलेला असतो. आपण म्हणत असतो की सराना गृहपाठ दिल्याचं आज विसरायला होऊ देत. पण ही नेमकी त्याच वेळेस सरांना आठवण करुन देणार गृहपाठ पहायची. पण जाऊ दे आज मी गोष्ट लिहून आणलेली आहे. आणि अर्थही सांगू शकतो.
बाईंनी गौरीला सांगितले. गौरी वाचू लागली.
कश्चित कान्ता विरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्तः
शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः
यक्षश्चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु
स्निग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु.
एवढी जोडाक्षरे असलेली गोष्ट तीला कुठे मिळाली काय माहीत. पहिली ओळ वाचायला व्यवस्थित जमली पण पुढचा शब्द "शापेनास्तङ्गमित्महिमा " तीला पाचव्या वेळेस वाचला तेंव्हा कुठे वाचायला जमला. जे वाचताही येत नाही ते शब्द कसे काय लिहीतात . तीने नक्की कुठल्यातरी पुस्तकातून उतरून काढलाय. अर्थ माहीत नसणार हे नक्की. अर्थ माहीत असता तर निदान शब्द वेगळे करुन वाचता आले असते तीला. पुढचा श्लोक वाचायच्या अगोदरच बाईंनी संध्याला तीची गोष्ट वाचायला सांगितली बरे झाले खोड मोडली गौरीची. अर्थात एकदा खोड मोडली म्हणून ती पुढच्या वेळेस शहाणी होईल असे नाही.
संध्याने वाचायला सुरवात केली.
" मम नाम सन्ध्या. अहं प्रतिदिने सायंकाले गृहे संस्कृतं पठामि.
पठनवेलायाम आवधानं आवश्यकम.
माझे नाव संध्या . मी रोज घरी संस्कृतचा अभ्यास करते. अभ्य्साच्या वेळेस लक्ष्य देणे आवश्यक आहे." संध्याची आई संस्कृत पंडीत आहे. तीने आई कडून लिहुन आणलं असावं. पण साधी सोप्पे छोटी वाक्ये. कोणालाही समजतील अशी लिहुन आणली आहेत.
संध्याच्या पुढचा नंबर अन्याचा. अन्या ने काय लिहुन आणलय देव जाणे.
"नीट उभा राहून वाच " बाईंनी अन्याला सांगितले. अन्या इतका बुटका आहे की तो बाकाच्या बाहेर येऊन उभा राहीला तरच तो उभा आहे हे समजतं.
अन्याने वाचायला सुरवात केली.
अहं प्रतिदिने भोजनं करिष्यामि.
भोजनात अहं अन्नप्राश्नार्थे तांदुलं खाद्ययामि.
भोजानान्ते अहम तक्रम पिबयामि.
तक्रे सहितं तंदुलं मम प्रिय भोजनम.
अन्य बुभुक्षा समये अहं बिस्किटं च केकं च नवनीत ब्रेडंच भक्षयामि..
अन्याने सांगितलेल्या वाक्यांचा अर्थ सांगायची गरज नव्हती. पण त्याच्या केकं च बिस्किटं च ब्रेडं च मुळे स बाईनाही हसू आले.
आता पुढे कोण वाचणार या साठी बाई इकडे तिकडे पहाताहेत.
इतका वेळ काहितरी लिहीणारी आंजी आता बोट वर करुन दाखवतेय. बाई आंजीला सांगतात.
आंजी वाचायला लागली.
" प्रतिदिने अहम स्कूले गच्छन्ति. अहम स्कूले युनिफॉर्मम नेसयामी. शुभ्र फॉकः इति मम स्कूलस्य कन्या ड्रेस: आसित.
शुभ्र शर्ट सह खाकी चड्डी इति पुत्रस्य ड्रेस आसित."
स्कूले ड्रेसम नेसयामि. पुत्रस्य ड्रेसम ( मुलींचा कन्या युनिफॉर्मम, मुलांचा पुत्रस्य ड्रेसम ) …….. संस्कृत इंग्रजी आणि मराठी ची मिसळ होऊन एक नविनच भाषेचा शोध आंजीला लागला होता. त्या खाकी चड्डी आणि शुभ्र शर्टम मुळे वर्गात हसण्याची एकच जोरदार आली. त्यानंतर कोणीच काही बोलू शकले नाही.
हसण्यात तशीच एक चारपाच मिनीटे गेली. बाईच इतक्या जोरजोरात हसत होत्या की त्यांना ठसका लागला शेवटी अनघा ने त्यांना खुर्ची बसवून पाणी दिले.
कसाबसा वर्ग शांत झाला. आता वाचायची पाळी माझी होती. आंजीने इतके जोरदार वाचल्या नंतर माझे माय होणार होते कोण जाणे. आंजी इतकी फजिती होणार नाही हे नक्की. मला लाकुडतोड्या ला संस्कृत शब्द काय होता ते सापडले नव्हते.बाईंना विचारायला हवेहोते. पण आंजीच्या इतक्या भयानक संस्कृत नंतर माझा तो लाकुडतोड्या शब्द चालून गेला असता.
मी वाचू लागलो.
एकस्मिन काले एके ग्रामे लखोबा नामः लाकुडतोड्या आसित. तो रोज जंगलात जायचा. सः प्रतिदिने अरण्ये जातः
वाचताना लाकुडतोड्या शब्द कुणालाच खटकला नाही. बहुतेक आंजीच्या त्या दिव्य संस्कृतपुढे तो शब्द फारच सौम्य वाटला असेल. हळूच शुभांगीकडे पाहिले. तीला पण काही खटकले नव्हते. हे तरी त्यातल्या त्यात बरे झाले.
एल्प्याने वाचायचे आहे म्हणून हात वर केला याचे बाईंना आश्चर्य .याने काय लिहीलय या विचाराने त्याही थोड्या विचारात पडल्या. पण वाचू देत म्हणत त्यानी एल्प्याला वाचायला सांगितले. एल्प्याने दोनच वाक्ये लिहून आणली होती.
येन रुक नपाद्यम थेये.
येन रुक नपाम्रधु थेये.
वाक्य वाचल्यायावर बाई विचारात पडल्या. वाक्य तर संस्कृत वाटत होती. पण यातला कोणताच शब्द कधी ऐकला नव्हता.
एल्प्या ला हे कोणी लिहून दिले असेल अशी शक्यता नव्हती. त्याने हे कुठून आणले असेल?
बाईंनी एल्प्याची वाक्य फळ्यावर लिहीली.
वर्गात कोणालाच त्यातल्या शब्दांचा अर्थ माहीत नव्हता. येन हा कन्नड शब्द रुक हा हिंदी पण बाकी शब्द इंग्रजीतलेही नव्हते. कुठल्या भाषेतले होते कोण जाणे.
एल्प्या हाताची घडी करून सगळ्यांकडे पहातोय. कोणी अर्थ सांगायला पुढे येत नसेल तरच अर्थ सांगतो.
अगोदर वेळ देतो सगळ्यांना . प्रयत्न करा. बाईं पण त्यांच्या हातातल्या पुस्तकात शब्दाचा अर्थ शोधताहेत. आम्ही एकमेकाना विचारतोय. कोणालाच अर्थ येत नाहोय्ये.
हरलो म्हणा. सगळे जण. तरच अर्थ सांगेन.
"हरलो. तू अर्थ सांग." चौघे पाच जण एकदम म्हणाले.
बघा हं बाईंसमोर म्हणालाय . मग शब्द मागे घ्यायचे नाहे.
" नाही घेणार. आम्ही हरलो. तू अर्थ सांग"
एल्प्या त्या थोडासा हसला. खरेतर त्याला त्या गब्बरसिंग सारखे हसायचे असावे. पण बाईंसमोर ते बरोबर दिसणार नाही म्हणून तो थोडासाच हसला.
या वाक्यांचा अर्थ आहे
" येथे मद्यपान करु नये . येथे धुम्रपान करू नये"
मी एल्प्याच्या वहीत पाहिले.
"नका दु चेण्यापका सके " हे लिहून त्या खाली त्याने दोन वाक्ये लिहीली होती
येथे धुम्रपान करु नये , येथे मद्यपान करु नये
येन रुम नपाम्रधु थेये. येन रुक नपाद्यम थेये..
मराठी वाक्य उलटीकडुन वाचत त्याने संस्कृत म्हणून लिहीले होते. अभ्यंकर बाई शब्दार्थ शोधत होत्या.
प्रतिक्रिया
22 Jun 2020 - 4:45 am | निनाद
मराठी वाक्य उलटीकडुन वाचत त्याने संस्कृत म्हणून लिहीले होते. अभ्यंकर बाई शब्दार्थ शोधत होत्या. हे धमाल आहे!
संस्क्रुत, प्रान्यांची वगैरे शब्द एकदा नजरे खालून घालायला हवे होते असे वाटले. बाकी कथा उत्तम चालली आहे.
22 Jun 2020 - 7:51 am | विजुभाऊ
येस सरजी
22 Jun 2020 - 6:16 am | प्रचेतस
खूप सुरेख सुरू आहे ही मालिका
22 Jun 2020 - 9:05 am | विजुभाऊ
दोसतार ५३ http://misalpav.com/node/47063
22 Jun 2020 - 9:59 am | अभ्या..
प्रचंड बोरिंग आणि कंटाळवाणे लिखाण.
चिकाटीचे मात्र कौतुक