राजयोग - १९

Primary tabs

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
3 Jul 2020 - 11:20 am

राजयोग-१८

***

श्रावण महिना सुरु असताना त्रिपुरामधॆ उंदरांचा उपद्रव सुरु होता. शेतांमध्ये मक्याची कणसं तयार होत होती. डोंगराळ प्रदेशातल्या शेतीत आता पिकांमध्ये दाणे भरू लागले होते. बघता बघता तीन महिने पूर्ण झाले. मार्गशीर्ष महिन्यात जेव्हा देशावरची पिकं तयार होऊन, कापणी करायची वेळ आली तेव्हा सगळीकडे आनंदाचे वातावरण झाले. शेतकरी, स्त्रिया, तरुण, वृद्ध, लहान मुले सगळे हसतखेळत शेतावर पोचले. हैय्या हैयाच्या आरोळ्यांनी एकमेकांना उत्साहित करू लागले. तरुण तरुणींच्या गीतांनी शेतं आवारं दुमदुमली. राजाविषयी असलेली नाराजी दूर होऊ लागली. सर्व काही ठीक होत असतानाच बातमी आली की नक्षत्रराय राज्यावर आक्रमण करण्यासाठी मोठ्या संख्येने मुघल सैनिक घेऊन राज्याच्या सीमेवर आला आहे. सीमेवरच्या गावांमध्ये त्याने भरपूर लुटालूट आणि अत्याचार करायला सुरवात केली आहे, या बातमीने सगळे राज्य पुन्हा भीतीच्या सावटाखाली गेले.

ही बातमी ऐकताना राजाला जणू कुणीतरी त्याच्या हृदयावर धारदार चाकू फिरवत आहे असं वाटलं. चिंता सर्व बाजूंनी राजाला वेढू लागली. राहून राहून त्यांना नक्षत्रराय त्यांच्यावर आक्रमण करतोय असं जाणवू लागलं. नक्षत्ररायवर असलेल्या निस्सीम प्रेमापोटी त्याचा निरागस चेहरा पुन्हापुन्हा त्यांच्या मृदू डोळ्यांसमोर येऊ लागला आणि त्याचबरोबर जाणवलं, हाच नक्षत्रराय कितीतरी सैनिकांना एकत्र करून, हातात तलवार घेऊन आपल्यावर आक्रमण करायला येत आहे. एक एका क्षणी त्यांना वाटू लागलं, एकही सैनिक बरोबर न घेता, विशाल युद्धभूमीवर नक्षत्ररायच्यासमोर छाती उघडी करून उभं रहावं, त्याला म्हणावं, घाल तुझ्या हजारो सैनिकांच्या तलवारी या छातीत!

ध्रुवला जवळ ओढून ते म्हणाले, "ध्रुव, हा मुकुट मिळवण्यासाठी तूसुद्धा माझ्याशी लढशील का रे?" उद्विग्न होऊन त्यांनी मुकुट खाली फेकला. त्यातला एक मोठा मोती घरंगळून खाली पडला.

ध्रुव उत्सुकतेने हात पुढे करून म्हणाला, "मी घेणार!"

राजाने ध्रुवच्या डोक्यावर मुकुट ठेवला. त्याला मांडीवर घेतलं. "हा घे, मला कुणाशीही भांडायचं नाही." असं म्हणून ध्रुवला आपल्या छातीशी कवटाळलं.

त्यानंतर राजा पूर्ण दिवस, "ही फक्त माझ्याच पापाची शिक्षा आहे" असं म्हणून स्वतःलाच दोष देत राहिला. ही जरूर ईश्वराची इच्छा आहे. त्याशिवाय का एक भाऊ दुसर्या भावावर आक्रमण करेल? या विचाराने त्यांना थोडा दिलासा मिळाला. नक्षत्ररायही आपल्या सारखाच माणूस आहे. परमेश्वराची इच्छा टाळणं त्याला कसं शक्य आहे? स्वतःची अशी समजूत काढत त्यांनी आपल्या दुःखी मनाला शांत केलं. हे पापाचं ओझं आपण आपल्या खांद्यावर घेऊन नक्षत्ररायचा भार हलका करावा असं त्यांना वाटलं.

इतक्यात बिल्वन तिथे येऊन म्हणाला, "महाराज, कुठे हरवला आहात? ही फ़क्त विचार करीत बसायची वेळ आहे का?"

राजा म्हणाला, "ठाकूर, ही सर्व माझ्या पापाची शिक्षा आहे."

बिल्वन नाराज होऊन म्हणाला, "महाराज, तुम्ही असं काही बोलू लागलात की माझा धीर सुटू लागतो. कुणी सांगितलं, दुःख फक्त पापाचंच फळ असतं? कधीकधी पुण्य करुनही दुःख वाट्याला येऊ शकतं. असं नसतं तर कितीतरी महान लोकांचे संपूर्ण आयुष्य दुःखमय झाले नसते."

राजाला यावर काही उत्तर सुचले नाही.

बिल्वनने विचारले, "महाराजांनी असं कुठलं पाप केलं, म्हणून आता हे सर्व घडत आहे?"

राजा म्हणाला, "स्वतःच्या भावाला राज्यातून निर्वासित केलं."

बिल्वन म्हणाला, "तुम्ही भावाला नाही, दोषी व्यक्तीला निर्वासित केलं."

राजा म्हणाला, "दोषी असला तरीही भावाला निर्वासित करणं पापच आहे. आता त्याचे परिणाम तर भोगावेच लागणार. कौरव तर दुष्ट, दुराचारी असूनही त्यांचा वध केल्यावर पांडवांना सुखाने राज्याचा उपभोग घेता आला नाही. त्यांनीसुद्धा यज्ञ करून प्रायश्चित्त केलं. पांडवांनी कौरवांकडून राज्य जिंकलं, त्याच कौरवांनी युद्धभूमीवर धारातीर्थी पडूनही ते राज्य हिरावून घेतलं. मी नक्षत्रला निर्वासित केलं, आता तो मला निर्वासित करायला येतोय. "

बिल्वन म्हणाला, "पांडवांनी पापाची शिक्षा देण्यासाठी युद्ध केलं नाही. राज्य मिळवणं हा एकच उद्देश होता त्यांचा. महाराजांनी मात्र स्वतःच्या सुखदुःखाची पर्वा न करता फक्त धर्माचे पालन व्हावे, नीतीचे पालन व्हावे यासाठी पापाची शिक्षा दिली आहे. तरीही तुम्हाला प्रायश्चित्त देण्यात मला काहीच हरकत नाही. मी ब्राह्मण इथे आलो आहे. मला संतुष्ट केलेत तरी तुमचे प्रायश्चित्त झाले असं समजा. "

राजा थोडंसं हसून शांत बसला.

बिल्वन पुढे म्हणाला, "असो, आता युद्धाची तयारी सुरु करा. उशीर करून चालणार नाही."

राजा म्हणाला, "मी युद्ध करणार नाही."

बिल्वन त्यांची समजूत काढत म्हणाला, "असं तर बिलकुल चालणार नाही, तुम्ही शांतपणे पुढची योजना तयार करा. मी तोपर्यंत सैनिक गोळा करण्याची तजवीज करतो. सगळे शेतीच्या कामांसाठी गेले आहेत, आता सैनिक मिळणं कठीण आहे."

इतकं बोलून राजाकडून उत्तराची वाट न पाहता बिल्वन तिथून निघाला.

ध्रुवच्या मनात अचानक काय आलं कोण जाणे; राजाच्या जवळ येत त्यांच्या चिंताग्रस्त चेहऱ्याकडे पहात ध्रुव म्हणाला, "काका कुठे आहे?"

ध्रुव नक्षत्रला काका म्हणत असे.

पापण्यांवर जमा झालेले अश्रू थांबवीत राजा म्हणाला, "काका येतोय, ध्रुव."

***

बिल्वन ठाकूर अनेक कामांमध्ये व्यस्त झाला. चट्टग्रामच्या डोंगराळ प्रदेशात त्याने तर्हेतर्हेच्या भेटी घेऊन दूत पाठवले. त्यांना शक्य तितक्या लवकर चट्टग्रामला पोचायची आज्ञा दिली. तिथल्या कुकी जमातीच्या प्रमुखांना कुकी सैनिक पाठवून मदतीची विनंती केली. युद्धाच्या कल्पनेनंच ते लोक बेभान झाले. कुकी जमातीच्या प्रमुखांनी युद्धाची बातमी गावोगावी पोचवण्यासाठी लाल रंगात बांधलेल्या मशाली घेऊन दूत पाठवले. बघता बघता कुकी सैनिकांचा लोंढा चट्टग्राममधून निघून त्रिपुराच्या दर्याखोर्यात पोचला. कुठल्याही नियमांच्या बंधनात रहायला या लोकांना आवडत नसे. बिल्वन स्वतः त्रिपुराच्या गावोगावी गेला. शेतीच्या कामात गढून गेलेल्या तरुण साहसी मुलांना त्याने एक एक करून गोळा केले. त्याचवेळी पुढे जाऊन मुघल सैनिकांवर आक्रमण करणे बिल्वनला योग्य वाटले नाही. मैदानी प्रदेश पार करून एकदाचे ते डोंगराळ प्रदेशात आले की जंगल, पहाड आणि अनेक गुप्त मार्गांनी त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना भंडावून सोडायचे असं त्याने ठरवले. मोठमोठाले दगड गोळा करून गोमतीच्या पाण्याला बांध घातला. झुंज देऊनही अखेर पराजय होत असल्याची चिन्ह दिसू लागताच हा बांध तोडला की त्या तीव्र पाण्याच्या प्रवाहात मुघल सैनिक वाहून जातील अशी त्याने योजना बनवली.

इकडे नक्षत्रराय देशावरती लूटमार करीत करीत त्रिपुराच्या पहाडांमध्ये पोचला. तोपर्यंत पिकांची कापणी पूर्ण झाली होती. सगळे शेतकरी हातात धनुष्यबाण, मशाली घेऊन युध्दाला तयार झाले. भरतीच्या लाटांप्रमाणे आक्रमक झालेल्या कुकी सैनिकांच्या टोळीला आता थोपवून धरणे अशक्य होऊ लागले.

गोविंदमाणिक्य म्हणाले, "मी युद्ध करणार नाही. "

बिल्वन ठाकूर म्हणाला, "असं करून बिलकुल चालणार नाही."

राजा म्हणाला, "मीच शासन करण्याच्या लायक नाही, त्यामुळेच हे सर्व घडतंय. मी शासन करू शकत नाही, त्यामुळेच प्रजेचा माझ्यावरचा विश्वास उडाला, त्यामुळेच दुष्काळ आला, आणि त्यामुळेच आता हे युद्ध! मी आता राज्याचा त्याग करावा अशीच त्या परमेश्वराची इच्छा दिसते आहे."

बिल्वन म्हणाला, "ही परमेश्वराची आज्ञा असू शकत नाही. जेव्हा राज्यावर काही संकट नव्हतं तेव्हा तुम्ही तुमचं कर्तव्य अगदी सहज पार पाडलंत. आता संकट येताच राज्याचा त्याग करून तुम्हाला स्वतंत्र व्हायचंय. ही परमेश्वराची आज्ञा असं म्हणून तुम्ही स्वतःच स्वतःची फसवणूक करताय. "

बिल्वनच्या स्पष्ट शब्दांनी गोविंदमाणिक्य उदास झाले. काही वेळ ते काहीही न बोलता, शांत बसून राहिले. शेवटी अगदी हळवे होऊन म्हणाले, "वाईट वाटून घेऊ नका ठाकूर, पण मी आधीच हरलो आहे. नक्षत्र कधीच माझी हत्या करून राजा झाला आहे. "

बिल्वन म्हणाला, "युद्धभुमीवर लढत असताना अशी वेळ आली तर मला अजिबात महाराजांसाठी वाईट वाटणार नाही. पण कर्तव्याचे पालन न करता त्यापासून दूर पळालात, तर त्याहून मोठं दुःख माझ्यासाठी कुठलंही नाही."

राजा थोडा अस्वस्थ होऊन म्हणाला, "स्वतःच्याच भावाची हत्या करू?"

बिल्वन म्हणाला, "कर्तव्यापुढे कुणीच भाऊ नसतो. कुरुक्षेत्रावर युद्धाच्या वेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश जरा आठवून पहा. "

राजा म्हणाला, "ठाकूर, तुम्हाला म्हणायचंय मी माझ्या हातात तलवार घेऊन नक्षत्ररायवर वार करू?"

बिल्वन म्हणाला, "होय. "

अचानक ध्रुव जवळ येऊन गंभीरपणे म्हणाला, "छी, असं नाही बोलायचं."

तिथे जवळच खेळत असलेल्या ध्रुवला दोघांमध्ये चाललेला वाद ऐकून वाटलं, नक्कीच हे दोघे काहीतरी वाईट काम करतायंत, तेव्हा वेळीच यांना रागवून शांत केलेलं बरं, असा विचार करून तो अगदी गंभीरपणे मान हलवत पुन्हा म्हणाला, "छी, असं नाही बोलायचं. "

पुरोहित ठाकूरला त्याची फार गंमत वाटली. हसून त्याने ध्रुवला आपल्या कडेवर घेतलं आणि प्रेमाने त्याला पापी दिली. पण राजा हसला नाही. त्यांना वाटलं, जणू या लहान मुलाच्या मुखातून देवच बोलतोय.

दृढ आवाजात गोविंदमाणिक्य म्हणाले, "ठाकूर, मी निश्चय केला आहे. मी हा रक्तपात होऊ देणार नाही. मी युद्ध करणार नाही. "

बिल्वन ठाकूर काही वेळ शांत बसला. शेवटी म्हणाला, "जर महाराजांना युद्ध करायची इच्छाच नाही तर एक काम कराल? तुम्ही नक्षत्ररायला भेटून त्याला युद्धापासून परावृत्त करा."

गोविंदमाणिक्य म्हणाले, "ठीक आहे. माझी काही हरकत नाही. "

बिल्वन म्हणाला, "मग लवकरच एक प्रस्ताव लिहून नक्षत्ररायकडे पाठवूयात. "

राजानेही या गोष्टीला विरोध केला नाही.

***

क्रमश:

कथा

प्रतिक्रिया

खूप छान झालाय हा भाग, अत्यंत ओघवता अनुवाद

श्वेता२४'s picture

4 Jul 2020 - 8:50 pm | श्वेता२४

आधीचा संदर्भ लागावा म्हणून सगळेच भाग आज पुन्हा एकदा वाचून काढले. खूपच ओघवती लेखनशैली आहे तुमची रात राणी. व्यनि करुन कळविल्याबद्दल धन्यवाद. आता मात्र लेखमाला पूर्णच करा हा प्रेमळ आग्रह.

टर्मीनेटर's picture

5 Jul 2020 - 10:53 am | टर्मीनेटर

वाचतोय...
पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहे.

अनिंद्य's picture

6 Jul 2020 - 2:53 pm | अनिंद्य

भाषांतर वाटू नये इतका छान जमला आहे हा भाग !
पु. भा. प्र.

रातराणी's picture

10 Jul 2020 - 12:37 pm | रातराणी

सर्वांचे अनेक आभार :)