जब I met मी:-5

Cuty's picture
Cuty in जनातलं, मनातलं
4 Jul 2020 - 5:00 pm

मी जन्माला आलो तेच मुळी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन! आज कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही एवढी गडगंज संपत्ती होती आप्पांकडे. आप्पा! माझे वडिल. गावचे पोलीसपाटिल. माझे आजोबाही गावचे पाटिलच होते. कित्येक पिढ्यांपासून आमच्या घराण्याचा दबदबा होता पंचक्रोशीत. संपूर्ण तालुक्यात पाटलांशिवाय पानही हलत नसे कुणाचे. प्रचंड जनसंपर्क आणि जनाधारही होता आप्पांच्या मागे. बाकी तालुकापातळीवरचे सरकारी अधिकारी आणि राजकारणी फक्त नावालाच. आप्पांचा शब्द शेवटचा असायचा गावाबाबतच्या कोणत्याही निर्णयात. जिल्हापातळीवरील कोणीही अधिकारी किंवा राजकारणी लोक गावात आलेच तर आप्पांची घरी येऊन भेट घेतल्याशिवाय जायचे नाहीत. आप्पांबद्दल एक आदरयुक्त भीती होती लोकांच्या मनात. आप्पाही मनाने खूप दिलदार, प्रेमळ होते. त्यांना वारसाहक्काने बरेच काही मिळाले असले तरी हा आदर, मानसन्मान त्यांनी स्वकर्तृत्वाने मिळवला होता. त्यांची गावावर माया होती आणि गावाची त्यांच्यावर!
माझा आई म्हणजे शालीनतेची मुर्ती होती. पाटलांच्या घराण्याचा आब राखून पण आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व जोपासून तिनेही लोकांच्या मनात जागा मिळवली होती. लोकांना तिच्याबद्दल फार आदर वाटे. पण दुर्दैवाने ती एका अल्पशा आजाराचे निमित्त होऊन मला लहानपणीच पोरका करून देवाघरी गेली. नाही म्हटले तरी आप्पा तिच्या जाण्याने थोडे खचले. मला आप्पांनी लहानपणापासूनच लाडाकोडात पण अतिशय शिस्तीत वाढवले होते. खायचेप्यायचे, कपड्यालत्त्याचे लाड असत मात्र शाळेच्या अभ्यासाबाबत, थोरामोठ्यांशी वागण्याबाबत कडक शिस्त त्यांनी लावली होती. मी लाडाने बिघडू नये याची ते सर्वप्रकारे दक्षता घेत. माझे घराबाहेरही उठणेबसणे, लोकांशी बोलणेवागणे अतिशय नम्र आणि विचारपूर्वक असे. एखाद्या अनोळखी व्यक्तीला सांगूनही खरे वाटले नसते की हा गावच्या पाटलांचा मुलगा आहे. मी शाळेत, बाहेर सर्व जातीधर्माच्या, गोरगरीब मुलांमधेही मिसळत असे. स्वभावाने अतिशय शांत मुलगा म्हणून माझी शाळेतल्या शिक्षकांमधे आणि गावात सर्वत्र ओळख होती.
आईच्या जाण्याने खचलेले आप्पा हळूहळू सर्व व्यापातून अंग काढून घेऊ लागले. व्यवहाराच्या बर्याच गोष्टी ते आता धाकट्या काकांकडे देऊ लागले. तर घरची जबाबदारी काकूंकडे आली. मी आता थोडा मोठा झालो होतो. माझ्यावर वाढलेल्या अभ्यासाचा आणि अपेक्षांचा बोझा होता. मी पूर्णपणे अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत केले होते. पण ईकडे काकाकाकूंची वेगळीच तर-हा होती. आजपर्यंत आईने घरची जबाबदारी , पैपाहुणे, आल्यागेल्याची ऊठबस याशिवाय शेतीची कामे, देखरेख, नोकरचाकर सांभाळणे हे सर्व अतिशय कुशलतेने केले होते. माझ्या दोन बहिणींचे शिक्षणही पुर्ण होत आलेले. पण आई असताना काकूने कधीच यासर्व गोष्टींकडे जबाबदारी म्हणून पाहिले नव्हते की, जास्त लक्ष घातले नव्हते. घरकामात मदतीला म्हणून दोनतीन बायका असायच्या. त्या धुणीभांडी, केरकचरा याशिवाय स्वयंपाकातही थोडी मदत करायच्या. बाकी सर्व स्वयंपाक व इतर गोष्टी आईच पहायची. काकू नावाला काहितरी काम करायची आणि तिची दोन लहान मुले म्हणजे माझ्या चुलतभावंडांना साभाळत बसायची.
दुसरीकडे काकाची निराळीच गोष्ट! आजपर्यंत त्याच्यावर कसलीच जबाबदारी पडली नव्हती. आतापर्यंतचे सर्व आयुष्य पाटलांचा रूबाब दाखवण्यात आणि मिरवण्यात गेलेले. ना धड शिक्षण ना धंधा! बसून खायचे अन ऐश करायची. कधीतरी शेतात गेलाच तर गडीमाणसांवर डाफरण्यापलिकडे त्याला काही काम माहित नव्हते. चावडीवर, ग्रामपंचायतीत जाऊन रूबाब झाडायचा आणि त्यालोकांसोबत दिवसभर गप्पा मारायच्या आणि रात्री पार्ट्या करायच्या यापलिकडे त्याला राजकारण कळत नव्हते. भारी कपडे, बूट, परफ्यूम याचा त्याला फार शौक. याउलट सर्व थरातल्या लोकांत मिसळणे, त्यांच्या समस्या ऐकणे, त्यावर उपाय शोधणे, चर्चा करून समाजात, गावात काय चाललेय यावर लक्ष ठेवणे, विकासाच्या नव्या योजना आखणे, याऐवजी तो त्याच्या ठराविक मित्रांच्या कोंडाळ्यात कायम असायचा.
गावातील लोकांच्या मनात आईआप्पांबद्दल नितांत आदर होता पण काकाकाकूंविषयी वेगळीच भावना होती, हे आता माझ्याही लक्षात आले होते. पण आई गेल्यानंतर मला जबाबदारीची जाणीव प्रकर्षाने होऊ लागली, त्यामुळे मी फक्त अभ्यास एके अभ्यासच करीत असे. आप्पा माझ्या शिक्षणाबद्दल अतिशय जागरूक होते.
दुसरीकडे आता हळूहळू व्यवसायउद्योगाची, शेतीची, जमिनीची, शेतातील जनावरे, दुधदुभते, गडीमाणसे यांची जबाबदारी काकांच्या खांद्यावर येऊ लागली, ग्रामपंचायत, गावचा कारभार यांत आप्पा काकांना लक्ष घालायला लावीत. पण पहिल्यापासून ऐतखाऊ असलेल्या काकांना हे काही जमेना. ते बिथरले. कामचुकारपणा, टाळाटाळ करू लागले. क्वचित आप्पा आणि काकांमधे खटके उडू लागले. नविन काही कमावणे सोडाच पण काका असलेले वैभवही गमावणार हे आप्पांना कळून चुकले. काकांचा कल फक्त असलेली संपत्ती उधळण्याकडे होता. आप्पा त्यानंतर अतिशय
निराश राहू लागले. इकडे घरात काकी आता पाटलीणबाई झालेल्या होत्या. त्यांची घरात पूर्ण हुकूमत चालत असे. घरात कामाला येणार्या बाया, गडीमाणसे त्यांना अतिशय वचकून असत. आई असेपर्यंत आप्पांशी अदबीने वागणार्या काकू आता आप्पांशीही तुसडेपणाने वागू लागल्या. पण आई असेपर्यंत कधीही घरच्या गोष्टीत लक्ष न घातलेले आप्पा काकूंसमोर काय बोलणार? शिवाय माझ्या दोन मोठ्या बहिणी आणि मला सांभाळून काकू उपकारच करतात असा त्यांचा तोरा असे. त्या बर्याच वेळा तसे थेट बोलूनही दाखवत आणि मुले माझ्याकडे सोपवून निघून गेली म्हणून आईच्या नावाने बोटे मोडत. खरेतर माझ्या दोन्ही बहिणी शाळेत बर्यापैकी हुशार असताना, काकाकाकूंनी 'आता लवकर एकदाचे लग्न उरका आणि पाठवून द्या. आईवेगळ्या मुली कशाला जास्त दिवस घरात ठेवायच्या?' असे सांगून त्यांना काॅलेज पूर्ण करू दिले नाही आणि घरी बसवले. मग काय? घरकाम शिकवण्याच्या बहाण्याने त्यांना बिनपगारी मोलकरणीच बनवण्यात आले. आधीच आप्पा मुलांबाबत कडक शिस्तीचे. मुलांनी मोठ्यांसमोर काही बोलायचे नाही असा त्यांचा दंडक. मग त्या आयत्याच काकूंच्या तावडीत सापडल्या. दिवसभर कामाने मान वर करायची सोय नव्हती त्यांना. काकू फक्त आरामात उठून स्वतःचे, आपल्या मुलांचे आवरून, छानपैकी कपडे वगैरे करून दिवसभर सर्वांना हुकूम सोडायच्या आणि आल्यागेल्यासमोर पाटलीणबाई म्हणून मिरवायच्या. आप्पा सर्व माहीत असूनही हतबल होते. त्यांचेही आता वय झाले होते. त्यांना दगदग झेपत नव्हती.
बघता बघता माझी बारावी झाली. बहिणींच्या लग्नाचे अजून कुठे जमले नव्हते. काका तर आता मोकाटच सुटला होता. त्याच्याकडून अपेक्षा करण्यात अर्थ नव्हता. म्हणून आप्पांनी मला शेतीविषयक उच्चशिक्षण घेण्यासाठी परगावी एका चांगल्या काॅलेजला पाठवण्याचा निर्णय घेतला. मलाही शेतीची आवड होतीच. डिग्री घेऊन आपल्या गावातच नवनविन शेतीचे प्रयोग करायचे आणि घरचा व्यवसाय, कारभार यात लक्ष घालायचे असे माझ्याही मनात होते. मी आप्पांच्या ईच्छेनुसार शहरात होस्टेलवर रहायला आलो. आणि संपूर्ण लक्ष फक्त शिक्षणावर केंद्रित केले.
मी दुसर्या वर्षाला होतो. अन अचानक ती वाईट बातमी आली. एका अल्पशा आजाराचे निमित्त होऊन आप्पा गेले ! माझा एकुलता आधारही गेला. आता मला बहिणींची देखील चिंता सतावू लागली. मधे एकदोन वेळा मी घरी गेलो असताना, मी इकडे माघारी यायच्या वेळला दोन्ही बहिणी ढसाढसा रडल्या. त्यांचे केविलवाणे चेहरे पाहवत नव्हते. पण मी सुद्धा हतबल होतो.
माझे उच्चशिक्षण पूर्ण होऊन मी शहरातच चांगल्या पगारावर नोकरीला लागलो. कारण गावात परत यायची ईच्छाच उरली नव्हती. गावी राहून तरी काय करणार ? आईआप्पांच्या स्मृतीशिवाय तिथे माझ्यासाठी काहीच नव्हते. मधल्या काळात बरेच पाणी वाहून गेले होते. काकाकाकूंनी कशीतरी नाईलाजाने दोन्ही बहिणींची लग्ने गडबडीने एकत्रच उरकून, ते मोकळे झाले होते. खरेतर आईच्या नातेवाईकांनीच पुढाकार घेऊन ही लग्ने जुळवली होती. लग्नेही आईआप्पा नसल्याने अगदी साधीच केली गेली. फक्त एक समाधान होते, दोन्ही बहिणी निदान त्यांच्या घरी सुखी होत्या. माझ्या मनावरचे एक दडपण कमी झाले होते. तरी मामाने त्याची नाराजी माझ्याजवळ बोलून दाखवली. त्याला वाटत होते आज आईआप्पा असते, तर दोन्ही मुली तालेवार घरात ,धुमधडाक्यात लग्न करून ऐटीने गेल्या असत्या. आप्पांनी एवढी संपत्ती आणि माणसेसुद्धा जोडली असताना, त्यांच्याच मुलींची अशी लग्ने लावलेली पाहून तो हळहळला होता!
पण खरा धक्का मला काकांनी दिला होता ! बहिणींच्या लग्नाला दोनतीन दिवसच झाले असतील. काकांनी घरात माझ्यासमोर लग्नाच्या खर्चाचा विषय काढला आणि सांगितले, 'आप्पांनी लग्नासाठी जी काही रक्कम जमा केली होती, ती तर सर्व त्यांच्या आजारपणातच गेली. लग्नासाठी काहीच शिल्लक नव्हते. शिवाय तुझ्या शिक्षणाचा खर्चही आमच्याच माथी आहे. नाईलाजाने काही शेती विकावी लागली. पुन्हा मला याबद्दल काही विचारायचे नाही!' मी हतबुद्ध होऊन पाहतच राहिलो. मला बहिणींनी लग्नाअगोदर सांगितले होते की आईचेच दागिने मोडून त्यांना लग्नात नविन दागिने केले गेले. शिवाय आप्पांनी बरीच मोठी रक्कम दोन्ही बहिणींच्या लग्नासाठी बॅकेत ठेवली होती हे त्यांच्याच बोलण्यामधून मी पुर्वी एकदा ऐकले होते. आणि आप्पा अचानकच गेल्याने त्यांच्या दवाखान्याचा खर्च अगदीच किरकोळ झाला असणार हे मला माहित होते. पण मी काही बोलू शकलो नाही. एकतर माझे शिक्षण चालू होते, आणि कशीतरी का होईना पण सांगायला काकांनी माझ्या बहिणींची लग्ने लावून दिली होती. आता मी काकाला हिशेब विचारू शकत नव्हतो. मला फ्रीसीटने अॅडमिशन मिळाल्याने शिक्षणाचा खर्च काही जड नव्हता. घरची एवढी शेती असताना, इतर व्यवसाय असताना भरपूर उत्पन्न येत होते. शेती विकायची गरज नव्हती.पण माझ्यावर आप्पांनीच संस्कार केले होते. मी काकांपुढे काहीच बोललो नाही. पण इथून पुढे अलिप्तपणे सा-या गोष्टी पहायच्या,वरचेवर गावी यायचे, शेतात, गडिमाणसांत मिसळायचे, आप्पांचे जुने स्नेही, मित्र यांच्या संपर्कात रहायचे अशी मनाशी खूणगाठ बांधली. त्याप्रमाणे मी गावी येणेजाणे सुरूच ठेवले. वरकरणी मला काहीच लक्षात येत नाही असे दाखवले.
काही दिवस गेले. आणि हळूहळू घरातील गडीमाणसे, गावातील ओळखीपाळखीचे लोक, स्नेही, नातेवाईक आणि माझी मित्रमंडळी तोंड उघडू लागली. काकांच्या 'कर्तव्याचा' पाढा माझ्यापुढे वाचू लागली. मी आप्पांचा मुलगा म्हणून यासर्वांचा माझ्यावर विश्वास आणि प्रेम होते. काकांचीच लक्षणे त्याच्या दोन्ही मुलांमधेसुद्धा दिसत होती, यामुळे सर्वांच्या माझ्याकडून अपेक्षा होत्या. त्यांना माझ्याबद्दल वाटणारी कळकळ त्यांच्या बोलण्यात दिसत असे. मी फक्त सर्वांचे बोलणे ऐकून घेत असे.
मी शिक्षण पूर्ण करेपर्यंत काकाने बरेच व्यवहार केले. लग्नाच्या खर्चाच्या नावावर शेती विकली होतीच. शेती जवळपास अर्धीच शिल्लक राहिली होती. अजून वाटण्या झाल्या नसल्या तरी त्याच्या वाट्याची शेती विकून तो मोकळा झाला होता. माझ्या शिक्षणाच्या खर्चाच्या नावाखाली, दोनतीन वडिलोपर्जित घरे, त्यात एक वाडाही होता तो विकला. येणारे भाडे बंद झाले. शेतातील काही उत्तम जनावरे, गुरे काम देत नाहीत या नावाखाली चांगल्या किमतीला विकल्याचे माझ्या कानावर आले होते. याउलट काकाने स्वतःसाठी आणि मोठ्या मुलासाठी चांगल्या बाईक घेतल्या होत्या. घरातील सर्वांना सोयीची म्हणून एक महागडी चारचाकी घेतली. आता काकू गावातल्या गावात देखील गाडी,ड्रायव्हर घेऊनच जाऊ लागल्या. थोरला मुलगा म्हणजे माझा चुलतभाऊ दिवसभर गाडी आणि मित्रांच्या कोंडाळ्यातच राहू लागला. काकाकाकू दोघांच्या अंगावर सोन्याचे दागिने तिपटीने वाढले. काकाने घरच्या व्यवसायाकडे, दुर्लक्ष करून त्यातील पैसा वापरून, त्याच्या स्वतःच्या नावाने व्यवसाय उभारले.अशा तर्हेने वडिलोपार्जित आणि आप्पांनी कमावलेली संपत्ती विकली जात होती, किंवा तिची उधळपट्टी होत होती आणि काकाची वैयक्तिक संपत्ती वाढत होती. दरम्यान गावामधे काही राजकारणाच्या विषयाला घेऊन काकाबद्दल लोकांमधे नाराजी वाढली होती. शाळा ,दवाखाने, समाजोपयोगी कार्ये यांना आप्पांच्या काळात मिळणारा आर्थिक सहयोग आणि प्रत्यक्ष कार्यांमधे असणारा सहभाग काकांच्या काळात जवळपास बंद झाला होता. गावच्या निवडणुका जवळ आल्या होत्या आणि यावेळी काका काही पुन्हा सरपंच होणार नाही अशी सर्वांचीच अटकळ होती.
मी शहरात नोकरीला लागून दोनेक वर्षे झाली होती. एक दिवस मामांचा फोन आला. माझ्यासाठी त्यांनी एक स्थळ आणले होते. त्यांच्या मित्राचीच मुलगी होती. योगायोगाने तिनेही शेतीविषयक शिक्षण घेतले होते. मुलगी चांगली होती, मला शोभेल अशी. मामांच्या पाहण्यातील होती. मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. मग मामांनी पुढील सर्व बोलणी केली आणि माझे लग्न ठरले.
दरम्यान माझ्या कानावर आले की, काकाने राहते घर पाडून पुन्हा बांधायचा निर्णय घेतला आहे. याबद्दल त्याने मला काही सांगितले नाही आणि मीही काही विचारले नाही.
असेच तीनचार महिने गेले आणि मी लग्नासाठी पंधरा दिवस सुटी काढून घरी आलो.
आता घरी लगीनघाई सुरू झाली. पण मुलाकडची बाजू असल्याने इतके काही टेन्शन नव्हते आणि फार गडबडघाई नव्हती. लग्न चारपाच दिवसांवर आले. जवळचे काही नातेवाईकही आधीच आले होते. संध्याकाळी सर्वजण निवांत लग्नाच्या तयारीबद्दल चर्चा करत असताना, काकाने मधेच विषय काढला. अगदी सहज सांगतोय असा आव आणून म्हणाला, 'आता याचे एकदा लग्न लागले की माझे टेन्शन जाईल. आप्पा जाताना माझ्यामागे बरेच व्याप सोडून गेला होता. दोन मुलींचे लग्न, याचे शिक्षण आणि लग्न करायचे, वर प्रपंचही सांभाळायचा. थोडे आहे का? हे सर्व मी कसे जमवले माझे मलाच माहित. आता एकच काम उरले आहे. याच्या लग्नानंतर याचाही नविन संसार सूरू होईल. तेव्हा हे घर पाडून नविन बांधावे लागेल. आपले गावातले पेठेतले मोठे जुने घर आहे त्याची तशी चांगली किंमत येईल. मात्र अजून बरीच जास्त रक्कम लागेल. तेव्हा मीच माझ्या नावाने कर्ज काढून घर बांधतो. घर जरी माझ्या नावावर झाले तरी काय फरक पडतो? शेवटी आपले एकत्र कुटुंबच आहे. आपण कायमच एकत्र असणार आहोत. आणि एवढ्या मोठ्या कुटुंबाला घरही मोठे, साजेसेच पाहिजे. होय ना?' मी काहीच बोललो नाही. बहिणी माझ्याकडे पाहू लागल्या. पण मी गप्प बसलो.
लग्न लागले. पूजा झाली. जवळपास आठवडा झाला. लांबचे नातेवाईक पांगले. आता फक्त काही जवळचे नातेवाईक ,आणि माझ्या बहिणी, मामा घरी होते. मी मामांना मुद्दामहून थांबविले होते. दुपारची वेळ होती. सर्वजण निवांत गप्पा मारत होते. अचानक आप्पांचे जुने मित्र, काही कौटुंबिक मित्र, गावच्या पंचायतीचे प्रतिष्ठीत सदस्य असे दहापंधरा लोक घरी आले. काकाला काही कळेचना! मीच पुढे होऊन सर्वांना 'या, बसा' केले. मग काकाला म्हणालो, 'मीच यांना बोलावले आहे'.
'आज मला तुम्हा सर्वांशी काही महत्वाचे बोलायचे आहे'. मंडळी ऐकू लागली. मी पुढे म्हणालो, 'आपल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आप्पांच्या सुधारित विचारांनुसार वाटचाल करून गावचा विकास करायची माझी ईच्छा आहे. यासाठी सरपंचपद जरी महिलांसाठी राखीव नसले, तरी ते एका महिलेने भूषवावे असे मला वाटते. यामुळे गावचा विकास अधिक प्रामाणिक आणि चांगल्या पद्धतीने तर होईलच, पण गावच्या महिलांचे प्रश्न मार्गी लागून महिलांना अधिक प्रोत्साहन मिळेल. यासाठी मी माझ्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मला तुम्हा सर्वांचा पाठिंबा आणि काकांचे आशिर्वाद हवे आहेत.' काका तोंडात मारल्यासारखा पाहू लागला. तो काही बोलणार इतक्यात सर्व जमलेली मंडळी म्हणाली, ' उत्तम विचार!, चांगला निर्णय! आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. ' काका वरवर हसत म्हणाला , ' माझे आशिर्वाद आहेतच!'
मी पुढे म्हणालो, 'पण आता मला यासाठी गावातच राहणे क्रमप्राप्त आहे. मी शहरातली नोकरी सोडणार आहे आणि गावातच घरची शेती, व्यवसाय सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे. आजपर्यंत काकांनी माझ्यासाठी खूप काही केले आहे. पण आता माझे लग्नही झाले आहे. ईथून पुढे काकाकाकूंना जास्त त्रास द्यायची माझी ईच्छा नाही. यासाठी त्यांचा भार हलका करण्यासाठी माझ्या वाट्याची शेती व इतर व्यवसाय माझ्या नावे करून द्या. मी माझ्यापरीने सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. मी शेतीविषयक शिक्षणच घेतले आहे. त्याचा वापर करून नविन प्रयोग करून, सुधारित पद्धतीने शेती करण्याचा माझा विचार आहे. शिवाय हे राहते घर पाडून नविन घरासाठी काकांनी कर्ज काढून ते फेडावे हे मला मान्य नाही. याऐवजी काकांनीच ईथे आरामात रहावे. गावातले जुने घर फक्त माझ्या नावे करा. मी आणि माझी बायको गावातल्या घरी रहायला जाऊ. आमच्यामुळे कोणालाच त्रास नको !'
आता काका अगदीच हतबुद्ध झाला! जमलेले सर्वजण मला म्हणू लागले, 'वा! अतिशय योग्य केलेस' ,' जबाबदारी खांद्यावर घेतलीस.' कुणी म्हणाले, 'आप्पांचा मुलगा शोभतोस खरा!'
मी मामांकडे पाहिले, त्यांच्या चेहर्यावर समाधान आणि आनंद दिसला. बहिणी हसतहसत पदराने डोळे पुसू लागल्या. काकू मान खाली घालून आत गेल्या, ते दिवसभर बाहेच्या खोलीत आल्याच नाहीत!
निवडणुकीचा फाॅर्म भरायचा दिवस उजाडला. मी, माझी पत्नी आणि गावची पंधरावीस मंडळी फाॅर्म भरण्यासाठी निघालो. काकाही नाईलाजाने पण लोकलाजेस्तव आला होता. आम्ही सर्व औपचारिकता उरकून ऑफिसच्या बाहेर येऊन बघतो तर काय? जवळपास सारा गाव ऑफिसबाहेर जमला होता. त्यातही महिलांची संख्या लक्षणीय होती. आम्हाला बघताच सर्वांनी एकाच आवाजात जोरजोराने माझ्या पत्नीचा आणि आप्पांच्या नावाचा जयजयकार सुरू केला! मला आज खर्या अर्थाने आप्पांच्या अन स्वतःच्याही सामर्थ्याची जाणीव झाली ! मी बाजूला पाहिले, काकाचा चेहरा काळाठिक्कर पडला होता !

कथालेख

प्रतिक्रिया

अरुण सरनाईक, राजशेखर, रवींद्र महाजनी, रंजना सगळे अगदी बरहुकुम.
तीन दशके मराठी चित्रपटसृष्टी ह्या प्लॉट वर चालली.
.

लक्ष्मीची पावले. सिनेमा आठवला.

मी या मंडळींचे चित्रपट फारसे पाहिले नाहीत. कदाचित त्या काळातल्या चित्रपटाची स्टोरी वाटू शकते. पण वास्तवात अशा बर्याच गोष्टी, कमीअधिक प्रमाणात, कमीअधिक तीव्रतेने का होईना ग्रामीण भागात तरी अजूनही पहायला मिळतात.

सिरुसेरि's picture

5 Jul 2020 - 4:03 pm | सिरुसेरि

+१ . छान लेखन . कथेमधे ग्रामीण मराठी चित्रपटाचा बाज अचुक पकडला आहे . कथा वाचुन अशोकमामा , निळुभाउ , वसंत शिंदे , राजशेखर अशा दिग्गजांच्या चित्रपटांची आठवण झाली .

सतीश विष्णू जाधव's picture

5 Jul 2020 - 9:11 pm | सतीश विष्णू जाधव

खूप सुंदर लेख, एकदम झकास.....

शहरात नोकरीसाठी आलेल्या तरुणांनी खरच गावाला जाण्याची आवश्यकता आहे.

धन्यवाद.

अमित खोजे's picture

3 Sep 2020 - 12:55 am | अमित खोजे

तुमची लिहीण्याची शैली खुपच छान आहे. गोष्ट हळु हळु पुढे जाते. लिहित रहा.