राजयोग - १७

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
19 Jun 2020 - 12:13 pm

राजयोग-१५

राजयोग-१६

***

अनेक व्यक्तीगत कारणांमुळे पूर्ण करायची राहून गेलेली ही मालिका सर्व वाचकांची माफी मागून पुन्हा सुरु करीत आहे. सर्व रसिक वाचक मोठ्या मनाने मालिकेला पुन्हा प्रतिसाद देतील अशी आशा आहे. या भागात फक्त भाग सोळा आणि पंधराची लिंक देते आहे. पंधराव्या भागात अनुक्रमणिका असल्याने मागचे भाग सहज उपलब्ध होतील. या काळात ही मालिका पूर्ण करावी म्हणून प्रोत्साहन देणार्या सर्व मिपाकरांचे अनेक आभार. :)

***

राजयोग - १७

या कादंबरीची सुरुवात झाली तेव्हापासून आता दोन वर्षांचा कालखंड उलटला आहे. दोन वर्षांचा ध्रुव आता चार वर्षांचा झाला आहे. आता तो भरपूर नवीन गोष्टी शिकला आहे. आपण खूप मोठे झालोय असं त्याला वाटतं. अजूनही बरेचसे शब्द तो स्पष्ट बोलू शकत नाही, तरीही त्याची अखंड बडबड सुरु असते. राजाला काही आमिष दाखवायचं असेल की तो कधी "बाहुली देईन" असं म्हणतो, तर कधी राजा काही खोडकरपणा करणार असं वाटलं की "कक्षात बंद करेन" अशी धमकी देऊन घाबरवतो. ध्रुवने राजाला आता पूर्णपणे आपल्या कह्यात करून ठेवलं आहे. त्याच्या मनाविरुद्ध काहीही करायचं राजाच धाडस होत नाही.

याच दरम्यान ध्रुवला एक मैत्रीणही मिळाली आहे. ध्रुवच्या एका शेजाऱ्यांची मुलगी, त्याच्यापेक्षा सहा महिन्यांनी लहान. अगदी दहा-बारा मिनिटातच त्यांच्यात मैत्री झाली. मधेच थोडा रुसवा फुगवा होण्याची शक्यता होती. ध्रुवच्या हातात एक बत्तासा होता. पहिल्यांदा प्रेमाच्या भरात ध्रुवने आपल्या छोट्याशा बोटांनी काळजीपूर्वक बत्ताशाचा एक छोटा तुकडा आपल्या मैत्रिणीच्या तोंडात कोंबून अगदी समजूतदारपणे मान हलवत तिला सांगितलं, "तू का"

मैत्रीण बत्ताशाचा तुकडा तोंडात घोळवत खुश होऊन म्हणाली, "अजून"

यावर ध्रुव थोडा दुःखी झाला. त्याच्या प्रेमावर एवढा अधिकार दाखवल्यावर त्याला स्वतःवर अन्याय होतोय असं वाटलं. मूळच्याच गंभीर चेहऱ्यावर समजूतदार असल्याचा आव आणीत तो म्हणाला, "छी - अजून नाही कायची. अजून कशाला? बाबा मारतील."

असं म्हणून अजिबात वेळ न दवडता त्याने सगळा बत्तासा एकदाच तोंडात कोंबून संपवून टाकला. आपल्या छोट्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावर नाराजीची छटा उमटली, ओठ फुलले, भुवया वर ताणल्या, रडायला सुरुवात करण्याची सर्व लक्षणे तिच्या चेहऱ्यावर दिसू लागली.

ध्रुवला कुणाचंही रडणं सहन होत नाही. तो लगेच तिची समजूत काढत म्हणाला, "उद्या देतो हां."

राजा येताच आपण अतिशय हुशार असल्याचे दाखवत ध्रुव म्हणाला, "तिला काही म्हणू नका. ती रडेल. मारायचं नसतं, छी!"

खरंतर राजाच्या मनात असं काहीही करायचं नव्हतं, तरीही राजाला सावध करणं ध्रुवला अतिशय गरजेचं वाटलं. राजाने काही मुलीला मारलं नाही, ध्रुवला वाटलं आपण बरं झालं, आपला सल्ला वाया गेला नाही.

त्यानंतर ध्रुव एखाद्या मुरलेल्या मध्यस्थाप्रमाणे कुठलं तरी मोठं संकट टाळतोय अशा गंभीरपणे मुलीची समजूत काढू लागला.

त्याचीही काहीच गरज नव्हती, मुलगी स्वतःच न घाबरता, राजाजवळ जाऊन उत्सुकतेने त्यांच्या हातातलं कडं फिरवत त्यांचं निरीक्षण करीत होती.

अशाप्रकारे सगळीकडे प्रेम आणि शांतता प्रस्थापित झाल्यावर, आपल्या अथक मेहनतीचं सार्थक झालं असं समजून आपला गोल, प्रसन्न फुलासारखा आनंदी चेहरा ध्रुवने राजासमोर नेला, त्याला त्याच्या कामाचं बक्षीस मिळालं, राजाने त्याला एक गोड पापी दिली.

ध्रुवने आपल्या मैत्रिणीचा चेहरा वर करून प्रेमाने राजाला आग्रह आणि आज्ञा या दोन्ही भावनांचे मिश्रण असलेल्या सुरात म्हणलं, "तिला पण एक द्या."

ध्रुवच्या आज्ञेचं उल्लंघन करणं राजाला शक्य नव्हतं. तेव्हा छोटी स्वतःच, बोलवण्याची अजिबात वाट न पाहता, अगदी नैसर्गिकपणे आनंदाने फुललेला चेहरा घेऊन राजाच्या मांडीवर बसली.

आतापर्यंत जगात कुठेही काही गडबड होण्याची शक्यता नव्हती, मात्र आता ध्रुवच्या सिंहासनावर दुसरं कुणी अधिकार दाखवताच, त्याचं प्रेम डळमळीत झालं. राजाच्या मांडीवर फक्त आपलाच अधिकार आहे ही भावना प्रबळ झाली. चेहरा आकसून त्यानं एक दोन वेळा तिला खाली ओढलं, इतकंच काय या विशिष्ट परिस्थितीत तिला मारणंही त्याला अन्यायकारक नाही वाटलं.

तेव्हा राजाने समेट करायच्या हेतूने ध्रुवलाही आपल्या अर्ध्या मांडीवर ओढून घेतलं. तरीही त्याचं समाधान झालं नाही. दुसऱ्या मांडीवरही आपला अधिकार परत मिळवायच्या दृष्टीने त्यानं प्रयत्न सुरूच ठेवले. त्याचवेळी नवीन राज पुरोहित बिल्वन ठाकूर कक्षात आले.

राजाने दोघांनाही मांडीवरून खाली उतरून राजपुरोहितांना प्रणाम केला. ध्रुवला म्हणाले, "ठाकूरांना प्रणाम कर."

ध्रुवला त्याची गरज वाटली नाही. तोंडात बोट घालून तो बंडखोरपणे उभा राहिला. राजाचं पाहून मुलीने स्वतःच पुरोहितांना नमस्कार केला. बिल्वन ठाकूरने ध्रुवला जवळ ओढून विचारलं, "ही मैत्रीण कुठून आली तुझी?"

ध्रुव थोडा वेळ विचार करून म्हणाला, "आम्ही टक टक चब" (मी घोड्यावर बसणार)

पुरोहित म्हणाला, "वा! प्रश्न काय विचारला आणि उत्तर काय!!"

ध्रुव तिच्याकडे पहात, तिच्याविषयीचं आपलं मत थोडक्यात प्रकट करीत म्हणाला, "ती दुष्ट ए. मी मारणार तिला." असं म्हणून त्याने आपला छोटासा ठोसा हवेत फिरवला.

राजा गंभीरपणे म्हणाला, "छी ध्रुव!"

फुंकर मारताच जसा दिवा विझतो, तसाच क्षणात ध्रुवचा चेहरा पडला. दोन्ही हातांच्या मुठी डोळ्यांवर नेऊन तो चोळू लागला. त्याच्या एवढ्याशा हृदयाला ते सहन झालं नाही आणि तो रडू लागला.

बिल्वन ठाकूरने त्याला प्रेमाने जवळ घेऊन झुलवलं, कडेवर घेतलं, हवेत उंच फेकलं आणि पुन्हा पकडत जमिनीवर ठेवलं. त्याला असं अगदी हलेडुले करून मग मोठ्या आवाजात ध्रुवला पटपट म्हणाला, "ध्रुव ऐक ऐक, एक श्लोक सांगतो ऐक -"

कलह कटकटां काठ काठिन्य काठ्यम्
कटन किटन कीटम कुटमलं खटमट्म।

म्हणजे काय सांगू? जी मुलं रडतात त्यांना कलह कटकटांमध्ये टाकून खूप काठ काठिन्य काठयम देतात, मग खूप कटन किटन कीटम घेऊन तीन दिवस सतत कुटमलं खटमट्म"

पुरोहित मग असंच काहीही बडबडत राहिला. ध्रुवचं रडणं केव्हाच बंद झालं. पहिल्यांदाच हा असा काहीतरी गडबडगुंता ऐकून तो हैराणही झाला आणि आश्चर्याने भरलेल्या डोळ्यांनी बिल्वन ठाकूरकडे पाहू लागला. बिल्वन ठाकूरचे हावभाव पाहून त्याला फार मजा वाटली.

रडणं विसरून तो हसत हसत म्हणाला, "परत म्हणा."

पुरोहिताने पुन्हा श्लोक म्हणून त्याचा उलटसुलट अर्थ सांगितला. खळखळून हसत ध्रुव म्हणाला, "परत म्हणा."

राजाने ध्रुवच्या रडून रडून गरम झालेल्या कपाळाचं आणि हसू भरलेल्या ओठांचं पुन्हापुन्हा चुंबन केलं. राजा, राजपुरोहित आणि दोन्ही मुलं मिळून खेळू लागली.

बिल्वन ठाकूर राजाला म्हणाला, "महाराज, तुम्ही या मुलांबरोबर किती आनंदी राहता. रात्रंदिवस अशा हुशार लोकांबरोबर राहून हळहळू बुद्धी समाप्त होऊन जाईल. सुरीलापण सतत धार लावली तर ती एक दिवस घासून घासून गायब होते. तिची जाडशी मूठ तेवढी शिल्लक राहते."

राजा हसून म्हणाले, "असं! मग तर नक्कीच माझ्या प्र्खर बुद्धीची लक्षणं तुम्हाला दिसली नाहीयेत अजून."

बिल्वन - "नाही - तीक्ष्ण बुद्धीच एक लक्षण आहे, कुठलीही साधीसोपी गोष्ट क्लिश्ट करणे. या जगात इतके सारे बुद्धीमान लोक नसते तर जगातली कितीतरी कामं सोपी झाली असती. अनेक सोयीसुविधा तयार करता करता, अनेक गैरसोयींचादेखील जन्म होतोय. कळत नाही याहून जास्त बुद्धीमत्ता घेऊन माणूस अजून काय करणार आहे."

राजा म्हणाला, "जे उपलब्ध आहे त्यात व्यवस्थित काम होतंच असतं. दुर्भाग्य हे आहे की, जे आहे त्याहून अधिक मिळवण्याच्या इच्छेमुळे अजून काम करावं लागतं."

राजाने ध्रुवला बोलावलं. ध्रुव पुन्हा एकदा आपल्या मैत्रिणीबरोबर शांतता प्रस्थापित करून नवा खेळ खेळत होता. राजाने बोलवताच खेळणं सोडून चटकन त्यांच्याजवळ आला. त्याला आपल्या समोर बसवून राजा म्हणाला, "ध्रुव, ठाकूरांना ते नवीन गीत तर ऐकव."

ध्रुवने मात्र काहीतरी मोठं संकट आल्याचा चेहरा करून ठाकूरकडे पाहिलं.

राजाने त्याला आमिष दाखवत म्हणलं, "तुला टक टक वर बसवेन."

ध्रुव अडखळत गाऊ लागला -

"मला दाखविती मार्ग सारे, म्हणती
प्रत्येक पावलाला तू चुकतो वाट.
कितीक गोष्टी सांगून ज्ञानी म्हणती,
का तू संशयात बुडाला रे?

तुझ्या समीप यावं, ही एकच इच्छा,
तुझे बोल ऐकून दूर व्हावे अज्ञान,
माझ्या कानांमध्ये मात्र कोलाहल
अनेको लोकांची अनेको मत-मतांतरे.

अनावर दुःख घेऊन मी उभा तुझ्या दारी
सगेसोयरे करतात फ़क्त सांत्वन,
मी धरतीची धूळ याचसाठी आहे,
मिळत नाही तुझ्या चरणांची धूळ रे.

अनेक भाग्य माझे,अनेक दिशांना धावती,
कधी आपसातच त्यांचा होई बेबनाव
कुणा कुणाला मी सांभाळू,
मी एकटा, ते अनेक रे.

एकरूप करून मला, बांध तुझ्या प्रेमात,
दाखव मला न ढळणारा एकच मार्ग,
किती आक्रोश करू या गरगरणाऱ्या भोवऱ्यात,
आता तरी दे तुझ्या चरणांशी स्थान रे."

ध्रुवच्या निरागस,बोबड्या शब्दात ही कविता ऐकून बिल्वन ठाकूरला भरून आले. म्हणाला, "तुला खुप खूप आशीर्वाद देतो. खूप मोठा हो, चिरंजीवी हो."

ठाकूरने ध्रुवला उठवून मांडीवर बसवत पुन्हा एकदा विनंती केली, "अजून एकदा म्हण ना."

ध्रुवने गाल फुगवून आपली असहमती दाखवली. डोळे झाकून घेत पुरोहित म्हणाला, "मग मला रडू येईल."

ध्रुव थोडा चलबिचल झाला. बिल्वन ठाकूरला तो म्हणाला, "उद्या ऐकवतो. आता तुम्ही घरी जा. बाबा मारतील."

बिल्वन हसत हसत म्हणाला, "हे बरं आहे, गोड गोड बोलून मलाच बाहेर काढतो काय!"

राजाची आज्ञा घेऊन पुरोहित ठाकूर आपल्या घरी निघाले.

त्याच रस्त्यावर दोन वाटसरू चालले होते. पहिला दुसऱ्याला म्हणाला, "तीन दिवस झाले त्याच्या दारावर डोकं आपटतोय, एक पैसा पण नाही मिळाला. आता तो भेटला रस्त्यात तर त्याचंच डोकं फोडतो, बघू तेव्हा तरी काही मिळतंय का."

बिल्वन हे ऐकून म्हणाला, "तरीही काहीच मिळणार नाही. अरे बंधू, या डोक्यात बुद्धी तर बिलकुल नाही, फक्त दुर्बुद्धी भरली आहे. त्यापेक्षा तर तू स्वतःचंच डोकं फोडून घेतलेलं चांगलं आहे. कमीत कमी कुणाला उत्तर तर द्यावं लागणार नाही."

दोन्ही वाटसरूंनी एकदम चमकून मागे पाहिले, घाबरून त्यांनी ठाकूरला नमस्कार केला. बिल्वन म्हणाला, "दादा तुम्ही जे बोलत होता, ते योग्य नाही."

दोघे म्हणाले, "ठाकूर जशी तुमची आज्ञा. आता असं काही बोलणार नाही."

रस्त्यात ठाकूरला मुलांनी वेढले. त्यांना त्याने संध्याकाळी आपल्याकडे गोष्ट ऐकायला बोलवले. आनंदाच्या भरात मुलांनी दंगा धुडगूस सुरु केला. संध्याकाळ झाली की ठाकूर कधी कधी मुलांना गोळा करून त्यांना रामायण, महाभारतातल्या सुरस गोष्टी अगदी रंगून सांगत असे. अधून मधून एखादी कंटाळवाणी कथाही अगदी रंगवून रंगवून सांगण्याचा प्रयत्न करत असे. पण एकामागे एक मुलांच्या जांभया दिसू लागल्या की त्यांना मंदिराच्या आवारातील बागेमध्ये सोडत असे. तिथल्या असंख्य फळझाडांवर ती वानरसेना तुटून पडली की बिल्वन तृप्त मनाने त्यांचा उच्छाद पहात बसे.

बिल्वन कुठून आला, तो कुठल्या देशातला हे कुणालाच माहीत नाही. ब्राह्मण असूनही जानवे घालत नाही. नरबळी, पशुबळी वगैरे प्रकार बंद करून काही वेगळ्याच पद्धतीने तो देवीची पूजा करतो. पहिल्यांदा लोकांना ते आवडलं नाही, त्यांनी विरोध केला, पण आता सगळ्यांनाच हळूहळू सवय झाली आहे. बिल्वनच्या बोलघेवड्या स्वभावाला आता सगळेच भुलले आहेत. तो मुक्तपणे सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांची ख्यालीखुशाली विचारतो. कुठल्याही आजारी माणसाला तो देईल ते औषध लागू पडते. कुणाच्याही घरी कसलेही कार्य असू दे किंवा काही संकट येऊ दे, सगळे बिल्वनच्या सल्ल्यानुसार वागतात. त्याने कधी कुणाच्या भांडणात पडून ते मिटवले तर कुणालाही राग येत नाही. एकदा त्याने एखाद्या गोष्टीवर आपले मत सांगितले की त्याला कुणी प्रत्युत्तर करीत नाही.

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

19 Jun 2020 - 1:49 pm | प्रचेतस

मस्त एकदम.
खूप महिन्यांनी आला हा भाग, आता पुढचे भागही पटापट येऊ द्यात.

पुन्हा 'राजयोग' वाचून छान वाटले. इतक्या खंडानंतर येऊनही आधीच्या भागांइतकाच ताजा वाटला. कुठेही लिंक तुटल्यासारखे वाटले नाही. पुभाप्र.

अरे पण मला सुरुवाती पासून वाचायला सुरुवात करायला लागेल कि..
अवघड आहे.. 17 भाग.. हुश्श..

वाचल्यावर एकत्र रिप्लाय देईल.. तोपर्यंत 34 भाग होऊ नये म्हणजे मिळवली...

हा हा भरपूर अभ्यास करायचा आहे :)

मला तेव्हा पण आवडली होती हि सिरीज. पु. भा. प्र.
अवांतर : असे सगळ्याच लेखकांच्या सगळ्याच गोष्टींचे अपूर्ण भाग पटपट वाचायला मिळूदेत लवकर लवकर.
अति अवांतर - सगळ्याच लेखकांसाठी एक प्रश्न / विनंती आहे - एखादी गोष्ट आधी पूर्ण लिहून मग तिचे एक एक भाग प्रकाशित का नाही करत? म्हणजे गोष्ट पूर्ण झाली तर सगळीच होईल नाहीतर काहीच नाही, असं काही करता येईल का ? असं करण्यात काही तांत्रिक अडचणी असतात का ?

माझ्यापुरते सांगायचं तर, आपण लिहिलेलं कुणी वाचलं, त्यावर प्रतिसाद आले की छान वाटतं. आपल्या लिखाणावर पुनर्विचार, त्याची बांधणी वगैरे गोष्टींचा विचार करण्यात ते त्या क्षणी जाणवत असलेलं थ्रिल नाहीसं होतं. त्यामुळे चटकन प्रकाशित करून प्रतिसाद काय येतात याची उत्सुकता असते. मी घाई करते कुठलंही लिखाण प्रकाशित करायची. सर्व लिखाण पूर्ण करून मग एक एक भाग प्रकाशित करणं, त्यात फेरबदल करणं इतका पोक्तपणा नाही माझ्यात. माझ्यासाठी हा एक लर्निंग कर्व आहे. इथून पुढे ही चूक होणार नाही याची काळजी घेईन. :)

विजुभाऊ's picture

20 Jun 2020 - 11:43 am | विजुभाऊ

बरोबर आहे
मी पण सुचेल तसे लिहीत जातो.
ठरवून लिहीले की त्यातली उत्स्फूर्तता जाते

दोन्ही पद्धतींचे काही फायदे काही तोटे आहेत. :)

रातराणी's picture

20 Jun 2020 - 10:47 am | रातराणी

सर्वांचे मनापासून आभार :)

वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुन्हा सुरुवात केलीत हे उत्तम झाले.

आता थांबू नका, मालिका नक्की पूर्ण करा.

अनेक शुभेच्छा !

सुचिता१'s picture

23 Jun 2020 - 11:09 am | सुचिता१

छान आहे कथानक.

आता पुढील भाग केव्हा??

रातराणी's picture

23 Jun 2020 - 9:58 pm | रातराणी

धन्यवाद. एक - दोन दिवसांत टाकते पुढचा भाग. :)

रातराणी's picture

26 Jun 2020 - 12:29 pm | रातराणी

पुढचा भाग : राजयोग-१८