शपथ
धर्म, पंथ, वंश, जात भेदभाव मालवू
एक सूर, एक ताल, एक राग आळवू ॥ ध्रु ॥
सावळे कुणी जरी, कुणास रूप गोरटे
रक्त आमुच्या नसानसांत लाल वाहते
कुंचले जरी विभिन्न, एक चित्र रंगवू ॥१॥
एक सूर...
द्रौपदी, तुझी इथे युगेयुगे विटंबना
हात रोखणार मात्र यापुढे, नराधमा
बद्ध या पणात नित्य पौरुषास चेतवू ॥२॥
एक सूर...
स्पंदनांत ये उचंबळून आज आर्तता
विश्व या कुटुंब कल्पनेस देत मूर्तता
अंतरी असीम बंधुभाव खोल बिंबवू ॥३॥
एक सूर...
