अमेरिका-६ रस्ते आणि गाड्या

निमी's picture
निमी in जनातलं, मनातलं
15 Aug 2023 - 3:36 pm

*रस्ते आणि गाड्या*

दूरदर्शन मुंबईनंतर अन्य महाराष्ट्रात सुरू झालं तेव्हा बातम्या ऐकण्यासोबत बातम्या देणारे-देणाऱ्या दिसू लागल्या. त्याच काळात बातम्यांना हिंदीत समाचार आणि इंग्लिश मध्ये न्यूज म्हणतात हे कळलं. काही दिवसांनी माझ्या बाबांनी विचारलं,' NEWS शब्द कसा तयार झाला माहितीये का?' माझ्या चेहऱ्यावरचे सपशेल शरणागतीचे भाव समजून म्हणाले, 'चारही दिशांची आद्याक्षरे घेऊन म्हणजे North चे N, East चे E, West चे W, South चे S घेऊन NEWS शब्द तयार झालाय. दहावीपर्यंत भूगोलात 'गोल' मिळाला नसला तरी भारतीय आणि वैश्विक भौगोलिक ज्ञान आजतागायत अगाध राखण्याची किमया मला साधली आहे. 35 वर्षानंतर अमेरिकेच्या भूगोलाने छळायचा वसा उचलला..मला चक्क रस्त्यावर आणून !

अमेरिकेत लक्षात राहतात रस्ते, वाहतूक, गाड्या, स्पीड, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मैलाच्या भाषेत सांगितलं जाणार अंतर. प्रत्यक्ष नासा, गुगल अशा ठिकाणी जाण्याचे अंतर इथले लोक अजूनही मैलातच सांगतात. गुगलीण बाई गुगली न टाकता अचूक नेते हे खरंय पण अपेक्षीत ठिकाणी नेताना सगळं-सारखं दिशांचे संदर्भ देत बोलते. तुम्ही आता साऊथला जा.. मग ईस्टला वळा हे ऐकण्यात कारमध्ये लावलेलं सुंदर, अविट गाण्याला मात्र 'वेस्ट' करते.

बरं रस्त्याला 'रोड' शब्द आपल्याला परिचित आहे. एक्सप्रेस वे, हायवे, सबवे हे शब्द बाय द वे आपल्याला माहीत असतात. पण काहीही साधं, सोप्प, सरळ ठेवतील तर ती अमेरिका कुठली ! स्ट्रीट, लेन, लाईन समजू शकतो..पण इथे रस्त्यांना एव्हेन्यू, ड्राईव्ह, बुलीव्हर्ड, ट्रेल, ट्रॅक, ट्रू फेअर, पार्क वे असे अनेक फसवे शब्द तुमच्या भांडारात वाढतात. प्रत्येक रस्त्याला नाव आणि प्रत्येक एक्झिटला नंबर अनिवार्य आहे. भरीत भर 16 A असे लिहून 16 B कडून पुन्हा 16 A ला जाता येईलच अशी शाश्वती नाही. गुरुपौर्णिमेला या गुगलीण बाईच्या पायांच तीर्थप्राशन करावं आणि तिच्या अखंडवाणीला एखादा हार घालून आपली हार प्रकटपणे जाहीर करावी असं वाटलं. कुठूनही कुठेही जायचं असलं तरी हिचे बोट निर्धास्तपणे धरावे आणि गाडी हाकारावी.

इथल्या गाड्यांचे स्पीड पाहून बोबडीच वळते. वळणदार घाटांचे रस्ते अत्यंत उत्तम स्थितीत असतात. गाड्यांचे तर हर प्रकार तुम्हाला रोज दिसतील. हल्ली तर पेट्रोल, डिझेल, गॅस सह इलेक्ट्रिक कारही असतात. इलेक्ट्रिक कारला धूर सोडणे, इंजिन गरम होणे असते की नसते काय माहित नाही पण ती 'टेस्ला' कार डोळ्यांच्या ऑपरेशन नंतर चष्मा घातल्यासारखी मजेदार दिसली. इथे पेट्रोल पंप नाहीत, आहेत त्याला गॅस स्टेशन म्हणतात आणि 'गॅस' म्हणून चक्क 'लिक्विड' पेट्रोल, डिझेल भरतात.

गाड्यांमध्ये पण इथे पर्याय सापळे आहेतच. स्पोर्ट्स कार फॅमिली कार लक्झरी कार व्यतिरिक्त रूफ टाॅप - सन लाईट की मून लाईट अशा पासून ते कारला काय लावून फिरणार त्याप्रमाणे अटॅचमेंट्स इथे पाहिल्या आहेत. आपल्याकडे टू व्हीलरला दुधाचे कॅन लावून येणारे गवळी किंवा दूधवाले, मोठे मोठे पार्सल्स बोजड बॅगेतून घेऊन येणारे डिलिव्हरी बॉय, अन्नपदार्थ देणाऱ्याच्या मागे मोठा डबा असणाऱ्या दुचाकी असतात. इथे गाडीत, मागे, टपावर मोठे बॉक्स, कॅरेज, फोल्डिंग चेअर,टेन्ट्स, बेबी गाड्या असतील असं वाटलं होतं..पण इथे मात्र कारला अडकवून सायकल, सर्फिंग बोर्ड, स्केटिंग बोर्ड इतकच काय टपावरून आणि गाडी मागून मोठ्या बोटींची पण वाहतूक होताना दिसते. रस्ता समुद्रापर्यंत..जंगलात.. कॅम्पसाईट पर्यंत, पर्वताच्या पायथ्यापर्यंत असतोच. तिथून पुढे हवे तेवढे हव्या त्या प्रकारे बोटीने/ सायकलने मजेत फिरू शकता.

कॅम्प साईटला तंबू टाकून रहा...अन्न शिजवा...तळ्यात डुंबा...समुद्राकाठी वाळूत खेळा-लोळा, नाहीतर आपल्या आवडीचं पेय घेऊन तुमच्या मित्र-मैत्रिणी-प्रेयसासोबत वेळ घालवा. काही ठिकाणी आवश्यक साहित्य ठेवलेलेच असते. पण अनेक जण स्वतःची चूल-मूल घेऊनही ट्रिपला आलेले दिसतात. लॉंग विकएन्डला घरी राहणे म्हणजे महापापच! काम, घरकाम आठवड्यातील पाच दिवस.. भेटीगाठी, सेलिब्रेशन वीकएन्डला! दुचाकी वरून प्रवास करणारे कमी आणि जास्त धाडसी! सायकल वरून जाणारे हौशी आणि स्वास्थ प्रेमी! तर सर्वात जास्त मान, प्राधान्य मिळते ते पादचाऱ्यांना. पोलिसांनंतर, रस्ते नियमानंतर सर्वात जास्त इथले लोक घाबरतात, रिस्पेक्ट देतात ते पेडिनां म्हणजे पेडिस्ट्रियनना.. म्हणजेच 11 नंबरचे - 2 पायांचे वाहन घेऊन फिरणाऱ्यांना ! भारतात आपल्याकडे 11 नंबर बक्कळ आहेत..

मांडणीविचार

प्रतिक्रिया

साहना's picture

16 Aug 2023 - 2:02 am | साहना

NEWS हा शब्द मूळ फ्रेंच शब्दावरून आला आहे आणि कुणीतरी इंटरनेट वर जोक म्हणून NEWS=North East West South अशी अफवा पसरवली आणि ती विख्यात झाली पण ती सत्य नाही.

अमेरिकेन रस्ते हे माझे खरे प्रेम आहे. आपला लेख लिहून लक्षांत आले कि मी आजतागायत अमेरिकन रस्त्यावर एकही मराठी लेख लिहिलेला नाही. लिहिलाच पाहिजे.

अमेरिकन रस्त्याचे एकूण ४ मोठे वर्ग आहेत.

- इंटरस्टेट - हे केंद्रीय पैश्यांनी बनवलेले आधुनिक रस्ते. ह्यांचा मूळ उद्द्येश लांबच्या पल्ल्याचा प्रवास असून ह्याला एक्सिट एन्ट्री जास्त नसतात. कधी कधी टेक्सस मध्ये मला एक एक्सिट चुकले म्हणून ५+५ १० मैल (१६ किमी) अंतर जास्त चालवून मागे यावे लागले आहे.

ह्यांची नावे I-५ , I -८० अशी असतात. अन्य काली गुगल नसताना ह्या आकड्यानीच प्रवास व्हायचा.

ज्या रस्त्याची नावे ५ वरून संपतात ते रस्ते आंतरराष्ट्रीय म्हणजे मेक्सिको किंवा कॅनडा मध्ये जातात. ज्यांची नावे ० वरून संपतात उदा I ८० असे रस्ते आडवे आणि कोस्ट टू कोस्ट जातात.

सम अंकी रस्ते आडवे पूर्व-पश्चिम आहेत तर विषम अंकी आकडे उत्तर दक्षिण असे असतात.

काही रस्त्यांची नावे तीन अंकी असतात. ह्यातील शेवटचे दोन अंक मुख्य रस्ता असतॊ तर पहिला आकडा सम असेल तर हा रस्ता बायपास आहे असे दर्शवतो.

म्हणजे i-680 i-880 हे रस्ते मुख्य रस्ते नसून i-80 ला जुळणारे बायपास आहेत असा त्याचा अर्थ होतो. बायपास रस्ते हे मुख्य शहराला वळसा घालून जातात.

पण जर पहिला आकडा विषम असेल उदाहरण म्हणजे i-515 तर हा रस्ता i-15 ला जुळणारा पण मुद्दाम मुख्य शहरातून जाणारा रस्ता आहे असे दर्शवतो. (इथे लास वेगास शहर).

हे सर्व झाले इंटरस्टेट चे पुराण. इंटरस्टेट १९५४ साली स्थापन झाले होते. ह्याच्या आधी US routes चे जाळे होते आणि आजही आहे. हे आकडे वेगळे आणि त्यांचे अर्थ वेगळे आहेत.

त्याशिवाय प्रत्येक राज्याचे आपले आकडे आहेत.

धन्यवाद आणि खूपच छान वेगळी, सखोल माहिती तुमच्या प्रतिसादाने दिली.. अधिक जाणून घेणे नक्कीच आवडेल आणि उपयोगीही पडेल.

अमेरिकेतील रस्त्यांवरून खूप प्रवास होत असला, तरी त्याबद्दल मला इतकी व्यवस्थित माहिती प्रथमच मिळते आहे. कदाचित अमेरिकेत स्थायिक लोकांना देखील येवढे ठाऊक नसेल.
NEWS या शब्दाबद्दल पुढील माहिती मिळाली: The English word "news" developed in the 14th century as a special use of the plural form of "new". In Middle English, the equivalent word was newes, like the French nouvelles and the German Neues.
--Middle English (abbreviated to ME) is a form of the English language that was spoken after the Norman Conquest of 1066, until the late 15th century. The English language underwent distinct variations and developments following the Old English period. Oxford English Dictionary specifies the period when Middle English was spoken as being from 1150 to 1500)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Aug 2023 - 9:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचतोय. माहितीपूर्ण भाग. पुभाप्र. साहनाची भर आवडली.

-दिलीप बिरुटे

मनःपूर्वक धन्यवाद.. पुभाप्र च डिकोडिंग जमलं..
फावापलाना..

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Aug 2023 - 11:50 am | राजेंद्र मेहेंदळे

वाचतोय.
मलाही सुरुवातीला ब्लॉक, ईंटर्सेक्शन, डिच्,यिल्ड, एग्झिट, फ्रीवे कळायचे नाहीत. त्यातुन युरोप प्रमाणे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने स्वतःच्या वाहनावर अवलंबुन राहायचे आणि मग हे सगळे माहीत असलेच पाहीजे असा तिढा होता. घर शिफ्ट करताना यु हॉल ही सेवा पाहुनही मी चकीत झालो होतो.
a
त्यातुन सायकल्,बोट्,कयाक,कॅरावॅन वगैरे लावुन चाललेल्या गाड्या पाहुन वेगळीच गंमत वाटायची.
c

अगदी बरोबर आहे ..घर शोधणे, मिळणे, शिफ्टिंग या सगळ्या फारच वेगळ्या गोष्टी आहेत.

कर्नलतपस्वी's picture

16 Aug 2023 - 5:40 pm | कर्नलतपस्वी

माझा अनुभव मी माझ्या परदेशवारी या लेखात मांडला आहे. पहिल्याच दिवशी चोवीस किलोमीटर रपेट झाली. घरी महाभारत झाले ते वेगळेच. कारण मुख्य रस्ता व जोड रस्ता या मधे गल्लत झाली. फेब्रुवारीत चहुकडे दाट बर्फाची गोधडी आणी विना भ्रमणध्वनी भटकंती महागात पडली.

पण माझ्यापुरता हा मस्त अनुभव होता.

बर्फ पडणाऱ्या काळात तुम्ही कर्नल असल्यामुळे जाण्याचा विचार आणि धाडस केलेत.. माझ्यासारख्यांचे हिटर शेजारीच अंथरुण घालावे लागेल.

बर्फ पडणाऱ्या काळात तुम्ही कर्नल असल्यामुळे जाण्याचा विचार आणि धाडस केलेत.. माझ्यासारख्यांचे हिटर शेजारीच अंथरुण घालावे लागेल.

इथल्या गाड्यांचे स्पीड पाहून बोबडीच वळते.
युरोपात तर फेफरचं येईल कि हो ?
अमेरिकेत १३७ कि मी प्रति ताशी अंदजे जास्तीत जास्त आहे तर जर्मनीत जरी १३० असले तरी त्यावर चालवणं हे बेकायदेशीर नाही !

युरोपमध्ये चार चाकीतून भ्रमंती झाली नाही, मोठी गाडी असल्याने कदाचित स्पीड जाणवला नसेल.. यासाठी आता पुन्हा युरोप ट्रीप केली पाहिजे

मुक्त विहारि's picture

24 Aug 2023 - 4:48 pm | मुक्त विहारि

छान लिहीत आहात