सध्या काय वाचताय?

प्रचेतस's picture
प्रचेतस in जनातलं, मनातलं
13 Aug 2023 - 7:25 pm

बऱ्याच वर्षानी एक कादंबरी एकाच बैठकीत वाचून संपवली-

हाकामारी -हृषीकेश गुप्ते.

ही तशी जेमतेम १०० पानांची लघुकादंबरी, हल्ली इंटरनेट, व्हाट्सप, टीव्ही मुळे माझे वाचन प्रचंड मंदावले आहे, अगदी मध्यंतरी घेतलेले लॉर्ड्स ऑफ द डेक्कन हे पुस्तक आवडीचे असूनही निवांतपणेच वाचन सुरू होते, ते आज संपवले, आणि परवाच विकत घेतलेले 'हाकामारी' वाचण्यासाठी बाहेर काढून ठेवले, संध्याकाळी खरे तर बाहेर भटकायला जायचे होते पण कंटाळा केला आणि पुस्तक वाचायला घेतले आणि सुरुवातीपासूनच झपाटून गेलो, गुप्ते यांची दंशकाल ही कादंबरी, तसेच गानू आजीची गोष्ट वाचली होती. नव्या दमाचा ताकदवान लेखक.
मात्र रूढार्थाने हाकामारी ही भयकादंबरी नाही. पण त्यात भयाचा आकळ सतत जाणवत राहतो. कोकणातल्या गोठणे गावाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कादंबरी, जसा हलकेच सुरू होणारा पाऊस मुसळधार होऊन सर्व जमीन पाण्याने भरून काढतो तशी ही कादंबरी झिरपत झिरपत जाऊन मनोव्यापारांचे एक अनोखे जग आपल्यासमोर पुढे करते. कधी त्यात बालपणीचे स्मरणरंजन येते, वाड्यातले गूढरम्य विश्व उभे राहते तर हाकामारीचे परंपरागत संदर्भ येत राहतात आणि आपण ज्याची कल्पनाही केली नसेल अशा एका दुर्दैवी घटनेने कादंबरीची समाप्ती होते.

कादंबरीचे भयकारी मुखपृष्ठ बघून कादंबरी वाचण्यास सुरुवात केल्यास सुरुवातीलाच काय पण आपण कादंबरी संपवत आलो तरी मुखपृष्ठ आपल्या वाचनाशी विसंगत वाटत राहते. मात्र शेवटच्या काही पानात त्या मुखपृष्ठाचा अर्थ अचानक उलगडतो आणि लेखकाचंच एक वाक्य आपल्या मनात रुंजी घालू लागतं.

रुबीक क्यूबचं कोडं सुटतं तेव्हा प्रत्येक वेळी मनात आनंदाची कारंजीच उडायला लागतात असं नाही. कधी कधी कोडं सुटल्यावर मेंदूतून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्यागत सर्वव्यापी वेदना शरीरभर पसरतात.

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Aug 2023 - 9:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान ओळख. कादंबरी मिळाली तर वाचेनच. पण सध्या नुसते पुस्तक घेतो आणि इंटरनेट, वॉट्सॅप, मुळं काही पानं वाचतो आणि ठेवतो. प्रवीण बांदेकरांचं 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' सुरु केलं ठेवलं. मग मसापच्या कार्यक्रमात राजू बाविस्करांचं 'काळ्यानिळ्या रेषा' आत्मकथन घेतलं काही पानं वाचली ठेवलं. समीक्षेबद्दल गणेश वामन कनाटेचं 'दीर्घ' असंच राहील.

अवघड झालं सगळं.

-दिलीप बिरुटे

पण सध्या नुसते पुस्तक घेतो आणि इंटरनेट, वॉट्सॅप, मुळं काही पानं वाचतो आणि ठेवतो.

--- अगदी असेच माझेही झालेले आहे. आपल्यासारखेच इतरांचेही झालेले असल्याचे वाचून जरा हुश्श्य... वाटले. पण याबद्दल खंतही वाटतेच. मी दोन-तीन पुस्तके वर काढून ठेवलेली आहेत, त्यापैकी एकादे अधून मधून थोडेसे वाचतो.
हा धागा खूप महत्वाचा आहे. पुढे कधी पुन्हा वाचू लागलो तर यात रिकमंडिलेली पुस्तके वाचायची असा निश्चय सध्या करत आहे (तेवढेच जरा समाधान)

वाटसपचा दुरुपयोग वाढला आहे. आपल्या मित्रमंडळीतील लोकांनी फक्त त्यांनी केलेल्या,लिहिलेल्या कृती, कुटुंबातील फोटो वगैरे टाकले तर नव्वद टक्के फारवर्डेड कचरा दूर होईल. जालावरच्या रेडिमेड गुडमॉर्निंग मेसेजपेक्षा त्यांच्याच बागेतील फुलांचे फोटो टाकले पाहिजेत.
डॉक्टर,इतर व्यावसायिक त्यांचेच घट्ट वाटसप ग्रूप करतात ते चर्चेसाठी. ते ठीक आहे.
पुस्तके वाचायला वेळ मिळेल.

जुन्या काळातली पण मराठीत अनुवादित पुस्तके मुद्दाम पुन्हा वर काढून वाचायला घेतली. खास उद्देश असा काही नाही. सहजच एक वेगळा प्रयोग.

रॉबिन कुकचे कोमा, जेफ्री आर्चरची काही (उदा. ट्विस्ट इन द टेल), बेटी महमूदी (नॉट विदौट माय डॉटर) वगैरे.

काही आगोदर वाचली आहेत. काही पहिल्यांदाच वाचली.

बाकी या हाकामारीचे अल्प परीक्षण चांगले लिहिले आहे. फार म्हणजे फार पूर्वी तडकडताई नावाचे प्रकरण सांगली साईडला असायचे. रस्त्याने ती (तो) निघाल्यावर पोरे बाळे चिडीचूप असत. लपून छपून तिला बघत.

आता बातम्या पाहिल्या त्यानुसार ही प्रथा पुन्हा फॉर्मात आली आहे असे वाटते. पण आता पोरे बाळे तितकीशी निरागस राहिली नसतील. सेल्फी काढत असतील तडकडताई सोबत असा अंदाज. चुभूद्याघ्या..

तडकडताई बद्द्ल ऐकले नहते आधी पण हे हाकामारी प्रकरण ८०/९० च्या दशकात भलतेच फेमस होते. घरोघरी दरवाजांवर खडूने तीन फुल्या काढलेल्या असत. आमच्या आजेमावशीच्या घरी हाकामारी आली अणि तिच्या मुलाला तीन हाका देऊन ती बोलवत होती ह्याची कहाणी आजी अगदी रंगवून रंगवून सांगत असे.

कर्नलतपस्वी's picture

13 Aug 2023 - 10:24 pm | कर्नलतपस्वी

जी ए कुलकर्णी यांची रक्तचंदन, रमलखुणा,हिरवे रावे अमेझोन ने घरपोच केले आहे. पिंगळावेळ,काजळमाया नुकतीच संपवली आहेत.

'पर्व' किंडलवर आणी जी ए डोईजड झाले तर 'पडघवली' बेड साईड टेबलावर ठेवले आहे.

कवीता वाचन चालूच आहे. नुकतीच ग्रेस यांची आई या पारंपरिक प्रतीमेला सुरुंग लावणारी एक कवीता वाचली. ग्रेसांनी असे का लिहीले असावे याचा शोध घेत आहे.

सध्या एव्हढेच.

आई माझी रांगोळीतील
टिंब हरवली टिकली
कशास पाडू दार, कराया
भिंत घराची मधली...

माझी आई मत्त वासना
संभोगाची भूल
क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या
करुणेचेही फूल.....

माझी आई भिरभिर संध्या
सूर्य दिलासा
नश्वर शब्दांच्याही ओठी
काव्यकुळातील भाषा....

आई माझी अरण्यसरिता
चंद्र झुलविते पाणी
रामासाठी त्यावर लिहिते
शिळा अहिल्या गाणी...

आई माझी गाव निरंतर
पारावरती भरवी
संध्याकाळी भगवी होते
तिच्या तनूतील ओवी....

आई माझी काजळभरला रे!
मायेचा नखरा
वेणीमधली नागीण खुडते
जसा हिऱ्यांचा गजरा...

आई माझी कंचुकीतल्या
तरल स्तनांचे दूध
गोरजवेळी वाटत फिरतो
जोगी कुठला वेध ?

संध्येसाठी माझी आई
जपून उजळे वात
अश्वत्थाम्यापरी हिंडतो
जिथे भयंकर घात...

त्याहीनंतर आई निघते
कळशी घेऊन दूर
तेव्हा कळतो खुळ्या नदीला
या मादीचा सूर.....

आई माझी झुळझुळतांना
किणकिणतीही तारा
तिच्याच पदराखाली होतो..
शालीन, शिंदाळ वारा...

माझी आई सडलेल्या त्या
मोहफुलांची मदिरा
अपरंपाराच्या पुरुषाच्या ती
सोन्याच्या मोहरा

~ग्रेस

@प्रचेतस, थोडक्यात केलेले पुस्तक परिचय आवडला. बकेट लिस्ट मधे टाकून ठेवतो.

माझी आई सडलेल्या त्या
मोहफुलांची मदिरा
अपरंपाराच्या पुरुषाच्या ती
सोन्याच्या मोहरा

आई माझी गाव निरंतर
पारावरती भरवी
संध्याकाळी भगवी होते
तिच्या तनूतील ओवी....

हि कविता वाचल्यावर मनात आलं कि गारंबीचा बापू ( श्री ना पेंडसे ) मधील बापूला जेव्हा आपल्या जन्माचे रहस्य कळते तेव्हा त्याने तर लिहिली नसेल !

कर्नलतपस्वी's picture

14 Aug 2023 - 10:42 am | कर्नलतपस्वी

घणो चोख्खा प्रतिसाद.

मातृदेवो भव:,
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी....

असे आपले संस्कार पण या माणसांने त्याला सुरुंग लावलाय.

हा कुणी साधासुधा माणुस नाही. ग्रेस,जेव्हढा वाचतोय तेव्हढे दुर्बोधतेचे वलय आणखीनच गडद होत चाललंय. स्वताच कवीने दिलेले स्पष्टीकरण,
https://youtu.be/okJ_QTG73DU

प्रचेतस's picture

14 Aug 2023 - 10:54 am | प्रचेतस

पेंडश्यांनी नंतर बापूच्या आईवर 'यशोदा' ही छोटेखानी कादंबरी लिहिली.

प्रचेतस's picture

14 Aug 2023 - 9:03 am | प्रचेतस

हादरवून टाकणारी आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Aug 2023 - 11:46 pm | अमरेंद्र बाहुबली

ऊत्तम कांबळे ह्यांचे “अनिष्ट प्रथा” हे पुस्तक नेटवर मिळाले नी वाचले. त्या नंतर त्यांचेच “देवदासी व नग्नपूजा” हे पुस्तकही आप्पा बळवंत चौकातून विकत घेऊन वाचले. त्यानंतर मध्ये लाॅंग ड्राईव करण्याचा योग आला तेव्हा काहीतरी एकावं म्हणून तूनळी वर कादंबरी शोधली असता “ऊचल्या” ही लक्ष्मण गायकवाडांची कादंबरी आली. तीचा फक्त पहीला भाग वाचला नी ऊर्वरीत भाग ऐकायची गरजच पडली नाही. एकामागे एक असे सर्व वीस भाग संपवले. ऊचल्या/पारधी जातीत जन्मलेल्या लक्ष्मण गायकवाडांची ही आत्मकथा आहे. “मी गरीब होतो नी मला सहानूभूती द्या” असं काहीही कादंबरीत नाही तर फक्त काय घडलं हे ते सांगतात. चोरी करनारे कुटूंब असल्यामूळे त्या कुटूंबातील कुणाला नोकरी मिळायची नाही त्यामूळे चोरी करूनच पोट भरावे लागायचे, चोरी करन्यासाठी वापरल्या जानर्या युक्त्या तसेच भरमसाठ पैसा कमावूनही समाजातील पांढरपेशा जातीतील लोक तसेच पोलीस तेच पैसे त्यांच्याकडून कसे काढायचे ना चोरनारे गरीब झोपडीतच राहीले पण इतरांनी तीन मजली इमारती बांधल्या हे त्यांच्या लिखानातून दिसते.
अतिशय भीषण परिस्थीती दाखवनारी ही कादंबरी आहे प्रत्येकाने वाचावीच/ऐकावीच.
लिंक
https://youtu.be/Ag6DElAgDb8?si=SY_H0Z0wSxpdeac5

देवदासी व नग्नपूजा ह्यावर लेख लिहायचे मनात होते पण शब्द जास्त बसले नाहीत म्हणून ऐवढेच लिहीले. ते देतो.

काही दिवसांआधी जोगवा सिनेमा पाहीला होता. तेव्हा जोगत्या जोगतीनी, देवदासी ह्या प्रथेबद्दल माहीती पडले. कर्नाटकातील सौंदत्ती, जिल्हा बेळगाव इथे यल्ल्म्मा देवीला मूले मूली अर्पन केले जाण्याची प्रथा होती. त्यांचं लग्न देवीशी लावून देण्यात यायचं. हे मूलं मूली जोगवा मागून आपले पोट भरायचे. बर्याच मूली वंतर वेश्याव्यवसायाला लागायच्या. कर्नाटकातील सौंदत्ती, कोकटनूर, नी महाराष्ट्रात जत ला यल्लमाची मोठी मंदीरे आहेत. चंद्रगुत्ती ह्या शिमोग्गा जिल्ह्यातील ठिकाणी तर नग्नपूजा चालायची. वरदा नदीत आंघोळ करून चार किलोमीटर असलेल्या मंदीरापर्यंत स्त्री पुरूष नग्न होऊन जायचे,१९८६ साली कर्नाटक सराकरने ना दलीत संघर्ष सनीतीने ही प्रथा बंदं पाडली. ह्या विषयात ऊत्तम कांबळे ह्यांनी संशोधन करून “देवदासी व नग्नपूजा” हे पुस्तक लिहीले. ते मागच्या आठवड्यात एबीसी चौकातून विकत घेऊन वाचले. त्यात ह्या देवदासी प्रथेबरोबरच बरीच माहीती होती. गुजरात मधील मेहसाना जिल्ह्यात बहूचर माता मंदीर आहे. ही देवी किन्नरांची कूळदेवी म्हणून प्रसिध्द आहे. पुर्वी पुरूषांना ह्या देवाला अर्पून किन्नर बनवले जायचे. त्याची एक प्रोसेस होती जी इथे सांगत नाही. १८९० साली बडोद्याच्या गायकवाडांनी कायदा करून हा प्रकार बंदं केला. आज गूजरातला आलो होतो. ह्या देवीच्या मंदीरात गेलो. परिसर न्याहाळला. एका झाडाखाली बरेच किन्नर बसले होते. तिथले काही क्षणचित्रे.

चौकस२१२'s picture

14 Aug 2023 - 5:40 am | चौकस२१२

नग्नपूजा

"अंताजीची बखर" या पुस्तकात बंगाल प्रान्न्तातील अश्या काही प्रथांचा उल्लेख आहे

कॉमी's picture

17 Aug 2023 - 6:16 pm | कॉमी

अंताजी मध्ये शाक्त संप्रदायाच्या काही अघोरी पूजांचे वर्णन आहे. वर बाहुबली लिहितात आणि ती पूजा एकसारखी असते का ?

प्रचेतस's picture

14 Aug 2023 - 9:04 am | प्रचेतस

उत्तम परिचय अबा.
देवदासी आणि नग्नपूजा हे पुस्तक वाचायलाच हवे.

ह्रु. गुप्ते - गोठण्यातल्या गोष्टी वाचलं आहे. व्यक्तिचित्रं फारच लांबवली आहेत आणि आवर्तनं वाटतात. त्यांच्याकडे नावीन्य दिवाळींनंतरच्या फुटणाऱ्या फटाक्यासारखं झालंय.

कोकण - जयवंत दळवी, पेंडसे यांच्या वर्णनातला आता राहिला नाही असं वाटतं. सामाजिक बदलला तसा तो दिसण्यातही . कवी नायगावकर मुलाखतीत म्हणतात की मला बऱ्याच जणांनी सांगितलं की "निसर्गरम्य कोकण पाहा म्हणून गेलो तर झाडं आड येत होती." आता मॉल आड येतात आणि माडांच्या झावळ्यांनी डिश सिग्नल बरोबर येत नाहीत. घरांवरची कौलं फुटतात म्हणून (आणि चाकरमान्यांना परवडतो म्हणून) लोखंडी निळे पत्रे घातले (कोकणी घरपण जरा दिसावं म्हणून) पण मोबाईल रेंज घरात येत नाही. हल्लीचं कोकण विरार वसई होत आहे. असो.
खरात,पाटील,माडगुळकर यांचाही घाटावरचा सामाजिक देश बदलला आहेच.

रामायण,महाभारतातल्या पात्र आणि घटनांवर नवीन बाजूने पाहताना वगैरे कोणत्याच लेखकांचं आवडत नाही. भैरप्पा असो वा दुर्गा भागवत. त्या गोष्टी एकदा लहानपणी वाचल्यावर नंतर त्यात भर घालणे कंटाळवाणे वाटते.

किन्नरांचे जीवन एकदम हाईफाई झालं आहे. निवडणुकीत निवडून येत आहेत,आखाडे चालवत आहेत,कुंभमेळ्यात स्नानासाठी वरचा नंबर आहे,सिनेमा तसेच मालिकांत एक तरी किन्नर पात्र असला पाहिजे. त्यांचं क्रिकेट आणि कबड्डी स्पर्धाही येतील.

अशोक शहाणे लिखित नपेक्षा पुस्तकात बऱ्याच लेखकांची लेखनाची चिरफाड केली आहे. तर काहींनी आपणहून लेखन थांबवलं आहे याचं कौतुक केलं आहे.
सिलेक्टिव मेमरी - शोभा डे (इंग्रजी आणि मराठी अनुवादही आहे.)-आत्मकथन . वाचलं. भारी.
लॉर्ड्स ओफ डेक्कन - अनिरुद्ध कनिसेट्टींचं वाचलं. कामाचं.

इथे आणखी लिहीन. आता एवढंच.

कर्नलतपस्वी's picture

14 Aug 2023 - 6:51 am | कर्नलतपस्वी

त्या गोष्टी एकदा लहानपणी वाचल्यावर ....

निरीक्षण आवडले. सहमत आहे.

मी बरेच वर्ष मराठी पासून दूर असल्याने जुनी पुस्तके काढून वाचतोय. काही भावतात काही कंटाळवाणी.

लेख लिहा,समयोचित ठरेल.

प्रचेतस's picture

14 Aug 2023 - 11:06 am | प्रचेतस

त्यांच्याकडे नावीन्य दिवाळींनंतरच्या फुटणाऱ्या फटाक्यासारखं झालंय.

गुप्तेंनी मतकरींचा वारसा यथार्थपणे चालवलाय असं वाटतं. गुप्तेंच्या कादंबर्‍यांत भय गूढाबरोबरच वासनेची एक छटा कायम असते. गोठण्याच्या गोष्टी वाचायचंय पण ते केवळ व्यक्तिचित्रात्मक पुस्तक आहे त्यामुळे अजून घेतलं नाहीये.

कोकण - जयवंत दळवी, पेंडसे यांच्या वर्णनातला आता राहिला नाही असं वाटतं.

हे तर साहजिकच आहे. बदल हा जीवनातला स्थायीभावच आहे. कोकणचे अजून सुरेख वर्णन करणारे लेखक म्हणजे मधु मंगेश कर्णिक. दळवी, पेंडश्यांचा कोकण हा रत्नागिरीतला, दापोली मुरुड परिसरातला तर कर्णिक आपल्याला सिंधुदुर्गात घेऊन जातात. तळकोकण मात्र अजूनही आहे तसेच आहे. विशेषतः मोठी गावे सोडून. पर्यटनामुळे खूप बदल झालेले दिसतात.

रामायण,महाभारतातल्या पात्र आणि घटनांवर नवीन बाजूने पाहताना वगैरे कोणत्याच लेखकांचं आवडत नाही. भैरप्पा असो वा दुर्गा भागवत. त्या गोष्टी एकदा लहानपणी वाचल्यावर नंतर त्यात भर घालणे कंटाळवाणे वाटते.

अगदी खरं. हे दोन्ही महाग्रंथ मूळातूनच वाचलेले उत्तम. त्यांच्यावरच्या कादंबर्‍या तर वाचू नयेत असेच मत आहे. मात्र टीकात्मक ग्रंथ दुर्गाबाई, इरावतीबाई, कुरुंदकर यांचे उत्तम आहेत.

लॉर्ड्स ओफ डेक्कन - अनिरुद्ध कनिसेट्टींचं वाचलं. कामाचं.

हे तर अगदी जबरदस्त आहे. ज्यांना मध्ययुगीन दख्खनचा इतिहास समजावून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी उत्तम, ज्यांनी बदामी, हंपी, वेरुळ, महाबलिपुरम, राजराजेश्वरम मंदिरे बघितली आहेत त्यांना तर अगदी थेट भिडेल.

कर्नलतपस्वी's picture

14 Aug 2023 - 12:12 pm | कर्नलतपस्वी

कारुळ चा मुलगा.

गेली पंचवीस तीस वर्ष कोकणात जातोय, बदल तर आहेच पण आकर्षण कमी झाले नाही.

पहिली खेप १९७०.

राजाभाउ's picture

17 Aug 2023 - 11:54 am | राजाभाउ

अशोक शहाणे लिखित नपेक्षा पुस्तकात बऱ्याच लेखकांची लेखनाची चिरफाड केली आहे.
आत्ताच याच मलप्रुष्ठ आणि अनुक्रमाणिक पाहीली amazon वर, जबरा दिसतय लगेच मागवतो. धन्यवाद.
अशोक शहाणे यांचे "धाकटे आकाश" नावाच पुस्तक फार पुर्वी वाचल होत, फार भारी पुस्तक होत ते.

कुमार१'s picture

14 Aug 2023 - 8:21 am | कुमार१

सर्व परिचय आवडले.

चांदणे संदीप's picture

14 Aug 2023 - 12:51 pm | चांदणे संदीप

मी नुकतीच जीएंची दोन पुस्तके (रक्तचंदन आणि रमलखुणा) वाचून संपवली आहेत. ती अजून डोक्यात ठाण मांडून बसलीयेत त्यामुळे लवकर दुसरी पुस्तके हातात येतील असं वाटत नाही. पण, काहीतरी नवीन वाचायला पाहिजेच. काय घ्याव सुचत नाहीये. :(

भयकथा/कादंबरी आवडीचा विषय नसल्याने हाकामारी कदाचित नाही आवडणार. हलकं फुलकं काही असेल तर सुचवा.

सं - दी - प

हलकं फुलकं काही असेल तर सुचवा.

हलकं फुलकं म्हणजे सुशिंची 'बरसात चांदण्यांची' एकदम मस्त. आमचा एक मिपाकर मित्र त्यातल्या गंधालीच्या प्रेमात पडला होता. गंभीर तरीही उत्तम वाचावयाचे असेल तर महाबळेश्वर सैल यांची 'तांडव' अवश्य वाचलीच पाहिजे.
चांदणे संदीप's picture

14 Aug 2023 - 6:40 pm | चांदणे संदीप

सुशी म्हणजे विषयच संपला. आता हे पुस्तक शोधणे आले. उद्याचा मुहूर्त चांगला आहे. बघूया कसं होतंय. :)

सं - दी - प

आंद्रे वडापाव's picture

14 Aug 2023 - 1:32 pm | आंद्रे वडापाव

'एकाला बोलो रे' - शिरीष काणेकर (वाचून होईल शेवटचा चॅप्टर चालू आहे )

'लॉर्ड्स ऑफ द डेक्कन' - अनिरुद्ध कणिसेत्तिं - अनुवाद मीना संभूस - सुरु करणार या विकेंडला ..

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Aug 2023 - 1:41 pm | राजेंद्र मेहेंदळे

प्रचेतस यांनी सुचवल्याने आणले आहे, पण वाचनाचा वेग फारच मंदावलाय, त्यामुळे लिंक लागत नाही. आता हायलायटर घेउन खुणा करत वाचतोय :)

हाकामारी--परीचय आवडला. मिळवुन वाचेन.

टार्गेट असद शहा-वसंत लिमये--मागवले आहे, सावकाशीने वाचीन म्हणतो

वॉकिंग ऑन द एज- प्रसाद निक्ते--मागवले आहे, सावकाशीने वाचीन म्हणतो-लेखकाने सह्याद्रीच्या माथ्यावरुन सलग ७५ दिवस उत्तर ते दक्षिण भटकंती केली त्याचा वृत्तांत

पेंडश्यांनी नंतर बापूच्या आईवर 'यशोदा' ही छोटेखानी कादंबरी लिहिली.
बापूंची आई? नाही पाहिलं. पण गारंबिची राधा वाचलंय. एकूण कोकण चांगला उभा केला आहे.
असंच पुढे न्यायचं तर किरण नगरकर (good story teller) (आवडता लेखक)यांचं जशोदा हे (इंग्रजी) पुस्तकं भारी. तसंच त्यांची इतरही पुस्तकं चांगली आहेत. त्याबद्दल @कॉमी यांनी मागे एका लेखात लिहलं आहेच. राजस्थान चांगला मांडतात.
------
गेली पंचवीस तीस वर्ष कोकणात जातोय, बदल तर आहेच पण आकर्षण कमी झाले नाही.
पर्यटन म्हणून आणि ग्रूपमध्ये किंवा आयोजित सहलीत जाऊन कुठेही पाहू नये. आणि कोकण तर नाहीच. इतर राज्यांत भाषेचा ,प्रांताचा प्रश्न असतो. पण कोकणात मराठीच्या बहिणी. आपलीच लोकं. शांतपणे कौंटुबिक (एकच) फिरल्यास कोकण वेगळाच उमगतो. हा अनुभव मला आला आहे. त्यांच्या घरांत नेतात, गप्पा मारतात,आपलंसं करतात.

---------
ज्यांना मध्ययुगीन दख्खनचा इतिहास समजावून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी उत्तम, आमचं थोडं उलट झालं. देवळं अगोदर पाहिली गेली, पुस्तक आता वाचलं. पण फोटो सर्वच काढले होते त्यामुळे बारीकसारीक शिल्पं अशी का ते समजलं.
---------------
काहीतरी नवीन वाचायला पाहिजेच. काय घ्यावं सुचत नाहीये. -चांदणे संदीप. झुंपा लाहिरीची पुस्तके पाहा. (इंग्रजी) .
----------
मनो यांचं अज्ञात पानिपत वाचून झालंय. त्यावर लिहायचं आहेच.

-----------
सुट्ट्या आहेत तर काही चांगलं वाचावं म्हणून पुस्तकं चाळली वाचनालयात आणि मंगेश राजाध्यक्ष संकलित पाच कवि सापडलं. पन्नास साठ कविता आहेतच पण माहितीही दिली आहे. कवी -केशवसूत,ना.वा.टिळक, विनायक, गोविंदाग्रज आणि बालकवी.
---------

यशोदा प्रिव्ह्यु येथे पाहा. राधा त्यांनी खूप नंतर लिहिली आहे, ती फिक्की वाटली.

चांदणे संदीप's picture

14 Aug 2023 - 6:45 pm | चांदणे संदीप

झुंपा लाहिरीची पुस्तके पाहा. (इंग्रजी)

धन्यवाद कंकाका!
थोडीशी माहिती घेतली नेटावर नेटाने. :) त्यातल्या त्यात एखाद्या अवार्ड विनींग पुस्तकाने सुरूवात करतो.

सं - दी - प

मनो's picture

15 Aug 2023 - 9:08 am | मनो

----------
मनो यांचं अज्ञात पानिपत वाचून झालंय. त्यावर लिहायचं आहेच.
-----------

लिहा काका, वाट बघतोय:-)

विकत घेण्याअगोदर ओनस्क्रीन इथे वाचता येतील.- Zumpa on archive
1) The Namesake
https://archive.org/details/namesake0000lahi/mode/1up

2)The Interpreter of Maladies

https://archive.org/details/interpreterofmal00lahi/mode/1up

दोन्ही नावाजलेली.
_________________
वैचारिक हवे असल्यास शशि थरूरची पुस्तके
Shashi tharoor books
Archive org
Shashi tharoor books
https://archive.org/details/texts?query=Shashi+tharoor+

________________
ईमेल टाकून अकाउंट करा . मग पुस्तक पूर्ण दिसेल.

कॉपीराइटेड असली तरी वाचकांसाठी खास उपलब्ध केली आहेत archive dot org वर फ्री.
डाउनलोड कॉपी नाही.

व्यंकटेश माडगूळकरांचे 'वावटळ' नावाचे गांधीहत्येनंतरेचे छोटेखानी पुस्तक आज सकाळीच वाचून संपवले.
गांधीहत्येनंतर पुण्यात दंगे, खानावळी, डबे बंद झाल्यामुळे सडेफटींग असलेले दोन ब्राह्मण मित्र सातार्‍याजवळच्या त्यांच्या गावात जातात. आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे होते. त्यांचा छोट्या खेड्यांमधून घरी पोचेपर्यंतचा प्रवास, अधेमधे येणारे अनुभव आणि शेवटी घरी पोचल्यावर झालेली बातचीत वगैरेचे परिणामकारक चित्रण आहे.

चौथा कोनाडा's picture

24 Aug 2023 - 5:33 pm | चौथा कोनाडा

वावटळ वाचायला हवे,

गांधी हत्येनंतरचे वातावरण डॉ आनंद यादवांच्या "नांगरणी" आत्मकथन कादंबरीत नुकतंच वाचलंय !

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

15 Aug 2023 - 3:47 am | हणमंतअण्णा शंकर...

मला रीडर्स ब्लॉक आलाय.

मराठीतलं काहीच वाचवत नाही. एकदोन पानं वाचली की बोअर होतं. नवीन काहीच हातात घेऊ वाटत नाही. सगळीकडे तेच ते रटाळ आहे. ओरिजिनल काहीच नाही.
इंग्रजी वाचनाची सवय नाही त्यामुळे तिकडेही बोंबाबोंब!

कसा मिळवायचा परत वाचनाचा आनंद?

रोजच्या कम्यूटमध्ये जवळ जवळ २० टक्के लोक चक्क हातात पुस्तकं घेऊन वाचताना रोज पाहतो. क्वचित काही मंडळी चक्क कविता बिविता लिहिताना दिसतात पेन घेऊन. विशेषतः तरुण, टीनेजर मंडळी मुद्दामहून जाडजूड पुस्तकं हातात घेऊन वाचत बसली असतात. गावची लायब्ररी नेहमी बिझी असते. लाखभर पुस्तकं आहेत. नुसतं आत गेलं तरी प्रसन्न वाटतं. हे सगळं पाहिलं की किंडल उघडून मराठी पुस्तकं शोधत बसतो. काहीच हाताला लागत नाही. खूप बंडल वाटतं.

कालच्या प्रवासात एक सत्तरीतली म्हातारी 'ए आय' असं लिहिलेलं पुस्तक वाचत बसली होती. थोडक्यात म सोशल मिडिया, ए आय यावरची माहिती देणारी पुस्तकं अस्तात तस्लं कोणतंतरी प्रायमर होतं. आयला उत्सुकतेला देखील कसली शिस्त म्हणायची ही!!

काहीतरी सुचवा राजेहो. काहीतरी चांगलं, नवं, ताजं, आणि महत्वाचं म्हणजे ओरिजिनल.

वेगवेगळ्या कोर्ट केसेसचे निकाल वाचा. अनेकदा दोनशे तीनशे पानांचे असतात. अतिशय रोचक असतात. गाजलेले एकेक खटले शोधा. लिस्ट करा. नानावटी केस(पब्लिकमध्ये अत्यंत गाजलेली), डॉ लागू (रेल्वे खून केस, ज्यात कोणताही थेट पुरावा किंवा साक्षीदार नसताना केवळ परिस्थितीजन्य पुरावे ध्यानात घेऊन कोर्टाने फाशीची शिक्षा दिली)

ज्या मुद्देसूदपणे घटनांची मांडणी, दस्तावेजीकरण आणि वॉटरटाईट युक्तिवाद करत करत शेवटी निर्णयापर्यंत आणणे ही रचना अत्यंत वाचनीय ठरू शकते. अर्थात प्रत्येकाची आवड वेगळी हे आहेच. केवळ फौजदारी खटले वाचावेत असे नाही. अत्यंत महत्वाचे दिवाणी खटले देखील रोचक असू शकतात. ऑनलाईन सर्व उपलब्ध असते.

याच जॉनरमध्ये काही घटनांवरील कमिटी रिपोर्ट्स पण वाचायला आवडू शकतात. उदा नाईन इलेव्हन घटनेवरील प्रदीर्घ रिपोर्ट. अतिशय तपशीलवार गोषवारा. नेमके काय घडले, कोण कोण , कुठे कुठे, कसे कसे, रिस्पॉन्स काय होता, किती वेळात उपाय केला गेला, काय चुकले, कुठे दिरंगाई झाली, वीक पॉईंटस्.. निष्कर्ष, सुधारणेचे उपाय असे सर्व. सहाशे पाने अंदाजे. हेच सर्व NTSB च्या विमान अपघात इंवेस्टिगेशन रिपोर्टमध्ये देखील असते.

टर्मीनेटर's picture

15 Aug 2023 - 11:59 am | टर्मीनेटर

नाईन इलेव्हन घटनेवरील प्रदीर्घ रिपोर्ट. अतिशय तपशीलवार गोषवारा. नेमके काय घडले, कोण कोण , कुठे कुठे, कसे कसे, रिस्पॉन्स काय होता, किती वेळात उपाय केला गेला, काय चुकले, कुठे दिरंगाई झाली, वीक पॉईंटस्.. निष्कर्ष, सुधारणेचे उपाय असे सर्व.

+१०००
हा रिपोर्ट वाचलाय, छान तपशिलवार माहिती आहे त्यात 👍

अवांतर:
अमेरिकेनेच निर्माण केलेला ओसामा बिन लादेन नावचा राक्षस त्यांच्यावरच उलटल्याने त्या ओसामा बद्दलही जशी कुठली सहानुभुती नाही तशीच त्या घटनेबाबत एक देश म्हणुन अमेरिकेविषयीही काडीची सहनुभुती नाही, पण हकनाक जिव गमावलेल्या आणि अपंगत्व आलेल्या हजारो निरपराध नागरिकांबद्दल मात्र विलक्षण सहानुभुती आहे!
पण काय ते नाईन इलेव्हनच्या घटनेचे प्लॅनिंग आणि काय ते प्रोफेशनली केलेले त्याचे एक्झिक्युशन, थक्क व्हायला झाले होते हा रिपोर्ट वाचुन. इतकेच नाही तर 'मोहम्मद अट्टा' ह्या त्या घटनेतली प्रमुख पात्राला केंद्रस्थानी ठेवत, त्याच्या मनोभुमिकेतुन ह्या घटनेवर एखादी पटकथा टाइप दिर्घकथा लिहावी अशा विचारानेही काहीकाळ मला पछाडले होते!

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Aug 2023 - 12:56 pm | अमरेंद्र बाहुबली

नाईन इलेव्हन घटनेवरील प्रदीर्घ रिपोर्ट. अतिशय तपशीलवार गोषवारा. नेमके काय घडले, कोण कोण , कुठे कुठे, कसे कसे, रिस्पॉन्स काय होता, किती वेळात उपाय केला गेला, काय चुकले, कुठे दिरंगाई झाली, वीक पॉईंटस्.. निष्कर्ष, सुधारणेचे उपाय असे सर्व.
+१०००
हा रिपोर्ट वाचलाय, छान तपशिलवार माहिती आहे त्यात >>>>

हा रिपोर्ट इंग्रजीत आहे की मराठीत? कूठे मिळेल वाचायला? पुस्तक आहे का? की नेटवर ऊपलब्ध आहे?

टर्मीनेटर's picture

15 Aug 2023 - 2:31 pm | टर्मीनेटर

इंग्रजीत ५८५ पानी PDF फाइल आहे.
The 9/11 Commission Report

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Aug 2023 - 12:57 pm | अमरेंद्र बाहुबली

उदा नाईन इलेव्हन घटनेवरील प्रदीर्घ रिपोर्ट. अतिशय तपशीलवार गोषवारा. नेमके काय घडले, कोण कोण , कुठे कुठे, कसे कसे, रिस्पॉन्स काय होता, किती वेळात उपाय केला गेला, काय चुकले, कुठे दिरंगाई झाली, वीक पॉईंटस्.. निष्कर्ष, सुधारणेचे उपाय असे सर्व. सहाशे पाने अंदाजे.

>>>

हा रिपोर्ट इंग्रजीत आहे की मराठीत? कूठे मिळेल वाचायला? पुस्तक आहे का? की नेटवर ऊपलब्ध आहे?

स्वधर्म's picture

15 Aug 2023 - 3:05 pm | स्वधर्म

काही दिवसांपूर्वी अभिराम भड़कमकर यांच्या दोन कादंबर्या एकामागून एक वाचल्या.अॅट एनी कॉस्ट आणि ईन्शाअल्लाह. दोन्ही वाचत रहाव्या अशा वाटल्या आणि मराठीतील काही सघन, अस्सल वाचल्याचा अनुभव आला. मी सांगलीचा असल्यामुळे ईन्शाअल्लाह मधली कोल्हापूरी भाषेचा खास आस्वाद घेऊ शकलो.
तसेच आसाराम लोमटे यांचा आलोक हा कथासंग्रहही अलिकडेच वाचला.
वरीय शिफारशी जरूर वाचा असे सांगेन.

कंजूस's picture

15 Aug 2023 - 5:25 am | कंजूस

नवीन?
काहीतरी चांगलं, नवं, ताजं, आणि महत्वाचं म्हणजे ओरिजिनल.
Readwhere app यावर काही हिंदी,मराठी,इंग्रजी,कोकणी पेपर्स मिळतील.
Jionews app -यावर काही मासिके, साप्ताहिके आहेत. विविध विषय.प्रवासात चाळायला उत्तम.

मनो's picture

15 Aug 2023 - 9:15 am | मनो

How Prime Ministers Decide हे पुष्कळ जाहिरात झालेलं पुस्तक गेल्या आठवड्यात वाचून संपवलं. चांगलं आहे, पण गाजावाजा झालाय, तितके नाही. त्याआधी मराठीत दादा कोंडके - एकटा जीव वाचलं. शक्यतो kindle वरती घेऊन वाचतो. पुस्तकं लगेच मिळतात, कुठेही वाचता येतात आणि घरातील जागा व्यापत नाहीत.

थोडक्यात करुन दिलेला पुस्तक परिचय आवडला 👍
गेल्या काही वर्षांत कमी कमी होत आता माझे पुस्तक वाचन पुर्णपणे बंद झाले आहे, सध्या जे काही वाचन होते ते फक्त डिजिटल माध्यमापुरतेच मर्यादीत राहीले आहे. २०२० मध्ये वाचनाचा चष्मा लागल्या पासुन तर छापिल पुस्तक वाचावेसेच वाटत नाही, पण त्यामुळे काही गमावल्यासारखे देखिल वाटत नाही हे विशेष! पुस्तक वाचन थांबल्याने चित्रपट पहाण्यासाठी चांगला वेळ मिळु लागला आणि आता त्यासाठी भरपुर पर्यायही उपलब्ध असल्याने त्यातच जास्ती मजा वाटते.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Aug 2023 - 11:22 am | अमरेंद्र बाहुबली

“घे भरारी” हे ऊद्योगपती/कंत्राटदार श्री बापू कदम ह्यांचं पुस्तक विकत घेऊन वाचलं, एक मराठवाड्याच्या खेड्यातील मूलगा डिप्लोमा मॅकेनीकल करून किर्लोस्कर वगैरे कंपनीत काम करून स्वतची कंपनी काढतो नी मोठा ऊद्योग ऊभा करतो. ऊद्योग ऊभा करताना आलेल्या अडचणी, कंपनी/फर्म ऊभ्या करताना आलेल्या अडचणी, त्यावर काढलेले तोडगे नक्कीच वाचनीय आहेत. ही बापू कदम ह्यांची आत्मकथा आहे. त्यांनी फेसबूक वर मित्रांच्या आग्रहाखातर लिहायला घेतलं होतं. पण २५-३० भाग झाल्यावर त्याला चांगलीच प्रसिध्दी मिळाली व नंतर त्यांनी चेपूवरील लेख ऊडवून पुस्तक छापलं. पुस्तक अतिशय छान आहे. पुस्तकाच्या शेवटी आर्थीक व्यवहार कसे करावेत ह्यावर ऊत्तम मार्गदर्शन आहे. नेमकं आर्थीक व्यवहारात आपण कूठे फसतो हे त्यांच्या पुस्तकातून कळते. नक्की वाचावे असे आहे. हे ऐकमेव पुस्तक आहे जे मी दोन वेळा वाचलेय.

अदित्य सिंग's picture

15 Aug 2023 - 2:21 pm | अदित्य सिंग

"द विट ऑफ क्रिकेट" - बॅरी जॉन्स्टन...
क्रिकेट आवडत असेल तर वाचायला मजा येईल... अर्थात ईंग्लिश काउंटी क्रिकेटचे जास्ती संदर्भ आहेत.. तसेच ४० ते ८० दशकातील असल्याने भारताबद्दल पुर्वीचे समज वगैरे वाचायला विचित्र वाटतात...
पुस्तकात खास करुन फ्रेड ट्रुमन यांचे अन डिकी बर्ड यांचे किस्से वाचायला जास्ती मजा येते....
https://www.amazon.in/WIT-CRICKET-Barry-Johnston/dp/0340978899/ref=sr_1_...

आता "कारगिल - अनटॉल्ड स्टोरीज फ्रोम द वॉर" वाचायला सुरुवात केली आहे.. पहिलच प्रकरण वाचुन (कॅ. सौरभ कालिया यांचा पाकिस्तानी जवानांनी केलेला छळ) खूप अस्वस्थ व्ह्यायला झाले...

https://www.amazon.in/Kargil-Stories-Rachna-Bisht-Rawat/dp/0143445847/re...

प्रचेतस's picture

15 Aug 2023 - 3:13 pm | प्रचेतस

प्रख्यात कन्नड लेखक एस एल भैरप्पा यांची 'वंशवृक्ष' वाचायला सुरुवात केलीय. ह्या आधीही वंशवृक्ष वाचली होती पण त्याला सुमारे वीस पंचवीस वर्षांचा काळ उलटून गेल्याने ती जवळपास विस्मृतीत गेली होती. आता पुन:र्वाचनाने ती नव्याने गवसत आहे. भैरप्पा यांचे 'मंद्र' सोडता जवळपास सर्वच पुस्तके मजकडे आहेत. मंद्र ग्रंथालयातून आणून वाचलेले होते पण फारसे आवडले नव्हते.

कंजूस's picture

16 Aug 2023 - 12:02 pm | कंजूस

William Dalrymple books
White mughals
https://archive.org/details/in.ernet.dli.2015.242607/page/n9/mode/1up
--------------------

William Dalrymple books

https://archive.org/search?query=Dalrymple+William+

इथे मिळतील.
त्यापैकी The Last Mughal
https://archive.org/details/lastmughalfallof0000dalr

https://archive.org/details/lastmughalfallof0000dalr

city of Djiinns: A Year of Delhi
https://archive.org/details/cityofdjinnsyear0000dalr_f7j0

Koh-i-noor the history of the world's infamous diamond
https://archive.org/details/kohinoorhistoryo0000dalr

((अहमदशह अब्दाली कोण होता हे कोह-इ-नूर पुस्तकात वाचता येईल. Koh-i-noor the history of the world's infamous diamond
https://archive.org/details/kohinoorhistoryo0000dalr ))

टर्मीनेटर's picture

16 Aug 2023 - 2:23 pm | टर्मीनेटर

(काही दिवसांनी) हि पुस्तके वाचायला आवडतील 👍
काल गवि साहेबांनी नाईन इलेव्हनचा विषय काढुन त्यावर काहीतरी दिर्घलेखन करण्याचा माझा बासनात गुंडळला गेलेला विचार पुन्हा वर काढला आहे. ते लेखन कधी पुर्ण होइल ह्याची कुठलीही हमी नसताना निदान त्याला सुरुवात तरी करावी असा विचार आता पक्का झाला आहे आणि त्यासाठी आता प्राधान्यक्रमानुसार पुन्हा एकदा तो प्रदिर्घ रिपोर्ट वाचणे आले 😀

कंजूस's picture

16 Aug 2023 - 4:11 pm | कंजूस

अमेरिकन सिनेमे
रशियाचे पुतीन (किंवा आणखी कुणी असेल) म्हणाले होते की हॉलिवूडचे निर्माते सिनेमे काढतात,रशियन करामतींवर कसा हल्ला करून निकाल लावला हा त्यांचा आवडता विषय. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो.
पण नाइन इलेवनसाठी अतिरेकी मंडळींनी जो काही प्लान राबवला तो हॉलिवूड सिनेमांना दणका देणारी सत्य घटना होती.
पुढे २०११ मध्ये ओबामांच्या काळात पाकिस्तानमध्ये जाऊन अमेरिकी कमांडोंनी लादेनची जी मोहीम राबवली ती ही आंतरराष्ट्रीय राजकारणात आश्चर्यकारक होती. त्याबद्दल ओबामानेच त्यांच्या अ प्रॉमिस्ड लँड(२०२० नोव्हेंबर) (१/२)पुस्तकात लिहिलं आहे ते सविस्तर वाचता आलं.
इतर पुस्तकांबद्दल बोलायचं तर टीका https://observer.com/2020/11/president-obama-memoir-a-promised-land-review/ इथे. दुसरा भाग यावर्षी येईल म्हणतात. पण त्यात सगळ्या आरोपांना कठोर उत्तरं असतील.
ओबामा संसदीय वकीली शिकला आहे आणि तसेच त्यांची भाषाही ओघवती आहे. विशेष म्हणजे निरनिराळ्या देशांतील मुख्य नेत्यांच्या कुंडल्याही दिल्या आहेत. त्यात आपले राहूल गांधीही आहेत. त्या समिक्षा प्रेसिडेंट खात्याच्या आहेत का ओबामांच्या स्वतःच्या सांगता येत नाही.

Dreams from My Father
and The Audacity of Hope,
ही वाचली. छान आहेत.

आंद्रे वडापाव's picture

16 Aug 2023 - 5:38 pm | आंद्रे वडापाव

The Report (styled as The Torture Report) is a 2019 American historical political drama film written and directed by Scott Z. Burns that stars Adam Driver, Annette Bening, Ted Levine, Michael C. Hall, Tim Blake Nelson, Corey Stoll, Maura Tierney, and Jon Hamm. The plot follows staffer Daniel Jones and the Senate Intelligence Committee as they investigate the Central Intelligence Agency's use of torture following the September 11th attacks. It covers more than a decade's worth of real-life political intrigue, exploring and compacting Jones's 6,700-page report.

टर्मीनेटर's picture

16 Aug 2023 - 6:02 pm | टर्मीनेटर

इंटरेस्टींग...

कंजूस's picture

16 Aug 2023 - 8:14 pm | कंजूस

लादेन मोहिमेचं वर्णन विकिपेजवर आहेच. पण ओबामांचे पुस्तक आल्यावर त्याचे कथानक पाहून विकिपेज अद्ययावत केले किंवा ही माहिती अगोदरच बाहेर फुटली होती ते आता कळायला मार्ग नाही. सैन्याच्या (झालेल्या )योजना प्रकाशित कोण करू शकतो आणि किती वर्षांनी यांचे नियम काय. सैनिकांनी गुप्ततेची शप्पत घेतलेली असते.

राजाभाउ's picture

17 Aug 2023 - 12:10 pm | राजाभाउ

स्टीफन किंग च Shawshank Redemption ही दिर्घकथा वाचली नुकतीच, (कथेचे पुर्ण नाव Rita Hayworth and Shawshank Redemption), सिनेमा हा कथेचा जवळ जवळ जस ते तस adoption आहे.

त्यानंतर नरहर कुरुंदकरांचा "जागर" मधील एक लेख वाचला (सेक्युलिरिझम आणि इस्लाम) आणि आता "शिवरात्र" मधील "गोळवळकर गुरुजी आणि गांधिजी" हा लेख वाचत आहे. ही पुस्तकं साधारण ७० च्या आसपसची आहेत पण संदर्भ जवळ जवळ आज ही लागू आहेत.

नामवंतांनी चिरफाड करणारा लेखक म्हणून खुशवंत सिंग प्रसिद्ध होते. पंचवीस एक पुस्तकं आहेत. ट्रेन टु पाकिस्तान गाजलेलं. एखादं वाचून लेखक आवडल्यास इतर पाहता येतील. एक आत्मचरीत्रही आहे. परंतू ज्या पुस्तकांमुळे खुशवंत उदयास आले ते 'हिस्ट्री ओफ सिखिझम' दोन मोठे खंड आहेत. ते माझे वाचायचे बाकी आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Aug 2023 - 6:31 pm | अमरेंद्र बाहुबली

माझ्या पाविपत जिंकतो तर (http://misalpav.com/node/46116) धाग्या वेळी मी पानिपत युध्दाबद्दल इतर राज्यातील लोकांची मते काय हे वाचत
होतो तेव्हा खुशवंत सिंग ह्यांचं पानिपताबद्दलचं नत सापडलं. त्यांनी लिहीलं होतं की पानिपत युध्द तीन दिवसा आधीच होनार होतं पण भाऊ साहेबांना त्यांच्या ज्योतीषाने मूहूर्त चांगला नाही तीन दिवसांनी हल्ला करा असा सल्ला दिला. आधीच ऊपासमार होनार्या सैन्याची आणखी ऊपासमार झाली नी…..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Aug 2023 - 10:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>पानिपत युध्द तीन दिवसा आधीच होनार होतं पण भाऊ साहेबांना त्यांच्या ज्योतीषाने मूहूर्त चांगला नाही तीन दिवसांनी हल्ला करा असा सल्ला दिला. आधीच ऊपासमार होनार्या सैन्याची आणखी ऊपासमार झाली नी…..

अरे देवा...! ज्योतीषशास्त्राचा अभ्यास अजूनही परफेक्ट नै असे वाटते.
ज्योतिषाकडे मुहूर्त पाहून टाकला दरोडा पण पकडल्या गेले.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

24 Aug 2023 - 5:37 pm | चौथा कोनाडा

पोलिसांणी त्याण्णा पकडायचा मुहुर्त जोतिषाकडूण आधीच काडुन ठेवलावता म्हने !

नुकतेच जेम्स सुझमन यांचे ‘Work The History of How We Spend Our Time’ हे पुस्तक वाचले. ज्यांनी युवाल हरारी यांचे सेपियन्स वाचले असेल त्यांना अधिक रस वाटेल असे पुस्तक आहे. लेखक हे सोशल आंथ्रापोलॉजिस्ट असल्याने त्यांनी अगदी उत्क्रांतीपासून माणसाच्या ‘कामा’चा उगम कसकसा होत गेला हे भरपूर पु्रावे देऊन सांगितले आहे. एवढा विस्तिर्ण कालपट जेंव्हा समोर येतो, तेव्हा आजची मानवी आव्हाने खूप तात्कालिक आणि बिनमहत्त्वाची वाटू लागतात. आपण हे जे करतो त्याला फार सिरियसली घेऊ नये असे लेखकाला सुचवायचे आहे. पुस्तकात इतके रोचक संदर्भ येतात, की तेच वाचत एक वर्ष निघून जाईल असे वाटते. लिहिण्यासारखे पुष्कळ आहे पुस्तकाबाबत, पण आवरतो.

मुक्त विहारि's picture

19 Aug 2023 - 6:35 pm | मुक्त विहारि

नुकतेच वाचले ...

टर्मीनेटर's picture

19 Aug 2023 - 9:38 pm | टर्मीनेटर

मस्त! येउद्या त्याचा पुस्तक परीचय…

मुक्त विहारि's picture

24 Aug 2023 - 5:19 pm | मुक्त विहारि

पुस्तक, सिनेमा , नाटक , कविता इत्यादी साहित्याचे रसग्रहण मी तरी करत नाही....

धागा पाहून आठवलं अश्यात काही वाचलं नाही मिपा सोडून. मग आसपास शोध घेतला तर एस एल भैरप्पा यांची गृहभंग सापडली.
कादंबरी जुनीच आहे 80-81 सालची. पण आता पुनर्मुद्रण केलं आहे. नेहमप्रमाणेच अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे. वाचाण्या सारखी आहे बाकी परिचय करून देता येणार नाही.

कंजूस's picture

22 Aug 2023 - 4:40 am | कंजूस

गृहभंग
वाचली आहे. मोठ्या होत जाणाऱ्या कुटुंबातील भांडणं याशिवाय काही नाही. कुटुंब कर्नाटकातील आहे, त्यांचे प्रश्न आणि समाज इतर ठिकाणी नसतात.

कर्नलतपस्वी's picture

22 Aug 2023 - 5:52 am | कर्नलतपस्वी

लास्ट होरायझन वाचणार आहे. शांग्रीला बद्दल उत्सुकता आहे.

अल्बर काम्युचे "परका" नुकतेच संपवले. पुन्हा एकदा शांतपणे वाचणार आहे.

https://www.amazon.in/Paraka-Albert-Camus-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%95%E0...

कंजूस's picture

23 Aug 2023 - 4:56 pm | कंजूस

छान .

पुस्तके वाचण्यासाठी एक मोठ्या स्क्रीनचा टॅब शोधत होतो. Archive org वर काही चांगली कॉपीराइट फ्री पुस्तके pdf scan copy मिळतात ती मोबाईलवर वाचता येत नाहीत. आताच वर दिलेलं Albert Camus (उच्चार अल्बेह कम् यू)चं मूळ 'The stranger ' घेतलं. टॅबवर छान वाचता येत आहे.

---------------
रीअलमी pad 2 - tab हल्लीच Flipkart वरून घेतला. Made in china.
Color UI 4 based on ANDROID 13 आहे. ( १ ऑगस्ट २०२३ ला आला). 6*+128(20k), 8*+256(23k) दोन मॉडेल्स आहेत. इन्स्पिरेशन ग्रीन कलर छान आहे.

दहा गुणीले सहा इंच दृष्य मोठी खिडकी मिळते. 450nits brightness.

इतर प्लस पॉइंटस -
Mtk g99 processor - 3'60k Antutu score. Medium gaming ok.
Android 13 ready.
Play store वरची सगळी apps मिळतात.
No bloatware, no ads. 256 gb पैकी फक्त 17 gb used for OS and imp Google apps.

---------------
Tab साठीचे यूट्यूबवर रिव्ह्यू मागच्या वर्षीपासून पाहिल्यावर लक्षात आले की प्युअर Android देणाऱ्या मोटोरोलामध्ये वाईफाई प्लस कॉलिंग आहे पण फोनचीच स्क्रीन मोठी केली आहे. Customized नाही.
Tab साठीची गूगल ने काढलेली Android 12 L अजून फक्त नेक्सस फोल्डेबल फोनलाच दिली आहे. कधी येईल माहीत नाही.

इतर काही Tab मध्ये कॉलिंग सिम सोय नाही.

______________________
या रीअलमी tab 2 मध्ये दोन विंडो, तीन tabs एकाचवेळी चालतात. फास्ट आहे. Customisation भारी आहे.

जियो न्यूज appमध्ये इंडिया टुडे साप्ताहिक मोबाईलवर वाचण्यासाठी जड जाते. शिवाय हल्लीच त्यांनी डाऊनलोड ओप्शन मोबाईल appमधून काढला आहे. म्हणजे वारंवार नेट वापरायला हवे. डाऊनलोड करून प्रवासात वाचता येणार नाही. स्क्रीनशॉटही घेता येत नव्हता.
पण रिअलमी pad 2 मध्ये डाऊनलोड ओप्शन आहे, स्क्रीनशॉटही घेता येतो. मोठं पान वाचता येतं.

माईनस पॉईंटस -
१) 3.5 mm audio socket/jack नाही.
पण ४ Dolby Atmos speaker चांगले आहेत.

२) OTG USB कनेक्ट होत नाही. पण nearby share किंवा InShare वापरून फाईल्स ट्रान्स्फर करता येत आहेत.

३) ओएस अपडेट्स Android 14?
याचा वादा केलेला नाही पण सिक्युरिटी अपडेट्स येत आहेत.एक आली.

__________________
त्यातला त्यात बरा आहे. यापुढे आणखीही चांगले (5G) येतील.
Tab (Android) आणि कंपूटर (Microsoft) या दोन स्वतंत्र वेगळ्या वस्तू आहेत. एकमेकांना बाद करून शकत नाहीत. (Acer extensa, I3 12th gen N305,8+512ssd PCIe ,३५ह कंपूटर ठीक वाटतोय.)

माहिती नेट वरची आहे, सूचना आणि दुरुस्तीचे स्वागत.

कंजूस's picture

24 Aug 2023 - 4:56 pm | कंजूस

The stranger
Albert Camus. वाचलं. लेखकाच्याकडून एक हत्या होते. खटला चालतो. वकिलांची तपासणी,उलट तपासणी. मग कोर्ट दोषी ठरवते. फाशी. इथपर्यंतचे घटना, विचार लेखक स्वतः सांगतो. साधी सोपी भाषा आणि एकूण तुरंगातले विचार. बरंय.

अहिरावण's picture

24 Aug 2023 - 8:00 pm | अहिरावण

अधिक माहिती : https://en.wikipedia.org/wiki/The_Stranger_(Camus_novel)

त्यातुन उद्धृत :

Considered a classic of 20th-century literature, The Stranger has received critical acclaim for Camus' philosophical outlook, absurdism, syntactic structure, and existentialism (despite Camus' rejection of the label), particularly within its final chapter.[3] Le Monde ranked The Stranger as number one on its 100 Books of the 20th Century.[4] The novella has twice been adapted for film: Lo Straniero (1967) and Yazgı (2001), has seen numerous references and homages in television and music (notably "Killing an Arab" by The Cure) and was retold from the perspective of the unnamed Arab man in Kamel Daoud's 2013 novel The Meursault Investigation.

तसेच

In his 1956 analysis of the novel, Carl Viggiani wrote:

On the surface, L'Étranger gives the appearance of being an extremely simple though carefully planned and written book. In reality, it is a dense and rich creation, full of undiscovered meanings and formal qualities. It would take a book at least the length of the novel to make a complete analysis of meaning and form and the correspondences of meaning and form, in L'Étranger.[5]

Victor Brombert has analysed L'Étranger and Sartre's "Explication de L'Étranger" in the philosophical context of the Absurd.[6] Louis Hudon dismissed the characterisation of L'Étranger as an existentialist novel in his 1960 analysis.[7] The 1963 study by Ignace Feuerlicht begins with an examination of the themes of alienation, in the sense of Meursault being a 'stranger' in his society.[8] In his 1970 analysis, Leo Bersani commented that L'Étranger is "mediocre" in its attempt to be a "'profound' novel", but describes the novel as an "impressive if flawed exercise in a kind of writing promoted by the New Novelists of the 1950s".[9] Paul P. Somers Jr. has compared Camus's L'Étranger and Sartre's Nausea, in light of Sartre's essay on Camus's novel.[10] Sergei Hackel has explored parallels between L'Étranger and Dostoyevsky's Crime and Punishment.[11]

आपण वेळ काढून वाचलात त्याबद्दल धन्यवाद.

कंजूस's picture

25 Aug 2023 - 1:19 am | कंजूस

बरोबर.
हे सर्व सांगायचं आहे पण लेखक ते इतक्या सहजपणे पोहोचवतो.
एक चांगलं पुस्तक सुचवल्याबद्दल धन्यवाद.

स्वधर्म's picture

24 Aug 2023 - 8:54 pm | स्वधर्म

खून दिवसांपूर्वी वाचलं होता असं वाटतं. नायकाला एक प्रेयसी असते, आईचा दूरच्या गावात मृत्यू होतो, एका शेजार्याचे कुत्रे हरवलेले इ. अशी कथा असेल तर वाचले होते, पण त्याला ग्रेट का म्हणतात ते समजले नव्हते.

कंजूस's picture

25 Aug 2023 - 1:13 am | कंजूस

हेच ते पुस्तक.

आपण,वाचक, किंवा मी पुस्तकाची रूपरेषा (gist) दहा ओळीत सांगतो पण
( १)त्यातील घटना, पात्रं ,त्यांचे संवाद "मनुष्याच्या जगण्याच्या आणि एकमेकांशी संपर्क/संबंध ठेवण्याच्या 'प्रवृत्ती' व्यक्त करतात.
(२) मनुष्य हा रूढार्थाने समाजप्रिय आहे,समाजात राहतो तरीही तो एकटाच असतो. एकटेपणा टाळण्यासाठी खटपट करतो.
(३) काही लाभासाठी तो इतरांशी संपर्क ठेवतो पण तेच लोकही याच नियमाने बांधलेले असतात व गुप्त संघर्ष सुरू असतो. मित्रप्रेमाला जागणारे ही कुणाला तरी शत्रू मानतात.
(४)प्रत्येकजण आपल्या स्वार्थापुरता घटनेपुरता विचार करत असतो.
(५)आईचं शेवटचं दर्शन घेणं टाळणे,सिगारेट पिणे,न रडणे या सर्व गोष्टींकडे पुढे हत्येच्या खटल्यात 'एक निर्ढावलेला थंड रक्ताचा गुन्हेगार' म्हणून पाहिलं जातं. तर अशा आरोपीस 'In the name of French people....' must be hanged. ( Why not German or British?)

ही आणि अशी बरीच तत्वं किंवा existansialism नावाचं लेबल जोडलेला विषय रूक्षपणे चर्चा न करता कथानकात लेखक मांडतो ते कथा वाचताना जाणवत राहातं. हेच लेखनाचं सामर्थ्य.

दुसरं एक वेगळं उदाहरण द्यायचं तर बालकवींची 'औदुंबर' नावाची छोटीशी वर वर निसर्ग कविता वाटणारी शेवटच्या दोन ओळींत,एका शब्दात ('असला') खूप मोठं तत्वज्ञान सांगून जाते. जे हजारो पानांचं विवेचन सांगू शकणार नाही. किंवा इतर लेखक,कवींना मांडता येत नाही आणि 'दुर्बोध' नावाचा शिक्का बसतो.

चौथा कोनाडा's picture

24 Aug 2023 - 5:38 pm | चौथा कोनाडा

हाकामारीचा आटोपशीर परिचय लेख आवडला !

महाभारत जालावर कुठे मिळेल. कोणते चांगलं?
मराठी
http://www.esahity.com

(या साईटवर >> धार्मिक पाहा. साईट बरीच जुनी आहे पण त्यांनी https secure केलेली नाही अजून. तरी सेफ आहे.)
इथे मराठीतले खंड आहेत.फ्री डाऊनलोड.

.........
Google search "महाभारत book pdf"
खूप साईट्स येतात. फ्री डाऊनलोड.

archive dot org वर कॉपी आहे ती ,गोरखपूर गीता प्रेस प्रकाशित आहे तीच इतर साईटवाले देतात. हिंदीत आहे.

बरीच पुस्तके आहेत पण चांगले कोणते किंवा काय हे अभ्यासूंनी सांगावे. सामान्य वाचकांस एवढा वेळ नसतो.

कंजूस's picture

28 Aug 2023 - 6:33 am | कंजूस

Sanjeev sabhlockcity यांचं डिजिटल पीडीएफ २८० पानी इंग्रजी घेतलंय. ते मोबाईल Kindle appवर वाचणं सोपं पडेल. त्या appवर डिक्शनरी असते. प्रवासात उपयोगी.

((लहानपणी मी सी. राजगोपालाचारी यांचं छोटंसं पुस्तक (महाभारत ५००पाने आणि रामायण,इंग्रजी) वाचलं होतं. तेवढं पुरेसं झालं. ))

मुक्त विहारि's picture

4 Sep 2023 - 11:51 pm | मुक्त विहारि

लेखक: विनायक पुरषोत्तम डावरे

परम मित्र पब्लिकेशन्स

--------

नेता निवडायचा असेल तर अशी पुस्तके उपयोगी पडतात