नाणेघाटातला शिलालेख –
आपल्यापैकी अनेकजण नाणे घाटात मुक्काम टाकतात. दरीतून वरती येणारे ढग कवेत घेतात, शूद्ध हवा छातीत भरून घेतात आणि त्या गुहेतल्या पवित्र आणि गुढ अशा वातावरणात निस्तब्ध होतात. त्या गुहेच्या दारात उभे राहून मग आपण खालून रस्त्याने येणार्या व्यापारांचा काफिला नजरे समोर आणू लागतो. दमलेले, तहानलेले ते जीव हळू हळू वर येत असतात आणि वर आल्यावर विश्रांतीसाठी आपली पथारी सोडतात, जेवणाचे डबे उघडतात आणि थंड पाणी पिऊन तृप्त होतात. सुखदु:खाच्या दोन गोष्टी बोलून पुढच्या मार्गाक्रमणाबद्द्ल चर्चा करतात. जकात रांजणात टाकून पुढची वाट धरतात. तेवढ्यात गार वार्याच्या स्पर्शाने आपण भानावर येतो आणि गुहेत शिरतो.
आपण त्या गुहेतल्या भिंतींवर असलेले लेखन बघून हे किती जूने आहे याबद्दल अचंबित होतो. मी जेव्हा लहानपणी, माझ्या आजोबांबरोबर (१९६५) या गुहेत मुक्काम ठोकला होता, तेव्हा या गुहेतल्या मूर्तीसुद्धा शाबूत होत्या. आपल्यातीलच कोणीतरी मग हळूच माहिती पुरवतो “ हे सातवाहन काळातील आहे” म्हणजे हे खूपच जुने आहे एवढेच आपल्याला समजते पण हे काय लिहीले आहे, याचे महत्व काय, हे आपल्याला ना त्यावेळी कोणी सांगू शकत आणि ना आपण त्याच्या मागे लागत कारण आपण परत आपल्या दैनंदिन कामात बुडून जातो. असो पण पुढच्यावेळी आपण नाणे घाटात त्या गुहेत मुक्काम ठोकलात तर आपल्याला असे वाटायची गरज नाही. आपल्यासाठी मी त्या शिलालेखाचे भाषांतर आणि थोडीफार माहीती देत आहे.
या लिखाणात एकूण २० लेख आहेत. त्यातला शेवटचा नंतर लिहीलेला आहे. अगोदर हा शिलालेख किती जुना असावा याचा उहापोह करावा लागेल. शातवाहनांना पुराणात आंध्र असेही म्हटलेले आहे. आता हा आंध्र प्रदेश म्हणजे सध्याचा आंध्र प्रदेश असावा का ? याबद्दल काही विद्वानांचे असे म्हणणे आहे की हे राजे आंध्र मावळातले होते म्हणून त्यांचे असे नामकरण झाले. त्यांची सत्ता नंतर आंध्रात पसरलीही होती. पण ते मुळचे आंध्र मावळातले म्हणून ते आंध्र. मला स्वत:ला हेच बरोबर वाटते. कारण आंध्र मावळ म्हणून जो प्रांत ओळखला जातो तो या भागाला बराच जवळचा आहे.
सातवाहनांना प्राकृताचा व वैदिक धर्माचा भयंकर आभिमाम ! त्यांना स्वत:ला संस्कृत उत्तम येत असतानासुद्धा जनतेची लिपी म्हणून त्यांनी सर्व लेख प्राकृतात कोरवले. यांच्याच कुळात एक हाल नावाचा राजा होऊन गेला त्याने त्याच्या विशाल राज्यात दवंडी पिटवली की हालराजा एक काव्यसंग्रह संपादित करत आहे त्यासाठी सर्व नागरिकांनी काव्य पाठवावे. जे प्रचंड काव्य जमा झाले त्यातून गाथासप्तशती तयार झाली. श्री जोगळेकरांनी (कानाला हात लावण्याची स्माईली) या काव्यसंग्रहातून काय काय अर्थ काढता येतात याचे अतिउत्कृष्ठ उदाहरण त्यांच्या “ हाल सातवाहनाची गाथा सप्तशती या ग्रंथात घालून दिले आहे. या ग्रंथातले काव्य सामन्यजनांनी लिहिले असल्यामुळे त्याकाळातले समाज जीवन कसे होते यावर बराच प्रकाश त्यांनी टाकला आहे. तो वाचण्यासारखा आहे. त्यातून मी ही बराच अर्थ काढून ठेवला आहे पण तो परत कधीतरी. त्यातील दोन तीन कविता येथे देतो. त्या काळात म्हणजे जवळजवळ २२०० वर्षापूर्वी गावाकडे स्त्री पुरूषांमधे संबध फारच मोकळेपणाचे असत, त्यामुळे बर्याच गाथांमधे शृंगारीक वर्णने आढळतात. त्यामुळे नंतरच्या काळात झाले काय, ही गाथा एक फालतू काहीतरी शृंगारिक काव्य आहे असे विद्वान धर्ममार्तंडांचे म्हणणे पडले. खरे तर त्या समाजाचा ही गाथा म्हणजे आरसा आहे हे त्यावेळेस उमगले नाही. असो. आपण त्यातील काही काव्य बघूया व नंतर नाणेघाटातील लेख.
१
दुईक्ज्जाअण्णण्पडिरोहं मा करेहिइ इमं ति ।
उत्थंघेइ व तुरिअं तिस्सा कण्णुप्पलं पुलओ ॥
अर्थ : निरोप सांगणार्या सखीने प्रियकराचा निरोप सांगितला तेव्हा तिची काया रोमांचित झाली. त्यामुळे तिने कानावर खोवलेले कमळ जरा हलले. जणू काही त्या निरोपाच्या आड येऊ नये म्हणून ते बाजूला झाले.
२
उवहारिआइ समां पिंडारे उअ ! कहं कुणतम्मि ।
णववहुआइ सरोसं सव्व च्चिअ वछाआ मुक्का ॥
गवळ्याच्या घरी गवळण गाईंचे दुध काढायला आली आहे. गवळीबूवा तिच्याशी गुलू गुलू बोलताना बघून त्याच्या पत्नीला एवढा राग आला की तिने बांधलेली सर्व वासरे सोडून दिली. त्यामुळे तेथे एकच गोंधळ माजला आणि गवळीबुवांना गुपचुप गप्पा आवरत्या घ्यायला लागल्या. :-)
३
पज्जालिऊण अग्गिं मुहेण पुत्तिए ! किणो समोसरसि ।
थणालसप्डिअपडिमा फुरंति ण छिवंती ते जाला ॥
हे सुंदरी तू फुंकर घातलीस आणि बघ तो अग्नी एकदम प्रज्वलित झाला. पण त्याने तुला एवढे दचकायचे कारण नाही. त्या ज्वाला जरी हालत आहेत, पण त्याने तुला काहीच अपाय होणार नाहीत. घाबरू नकोस तुझ्या उरोजावर पडली आहेत ती त्या ज्वाळांची प्रतिबिंबेच आहेत.
असो. हे थोडेसे विषयांतर झाले. यावर एकदा केव्हातरी लिहेन, पण ते फार मोठे होईल म्हणून तो विचार लांबणीवर टाकतो.
आता शिलालेख -
१
ओम् नमो प्रजापति - प्रजापतिला नमस्कार असो.
नो धंमस नमो ईदस संकंसन वासुदेवानं चंदसूतानं - नमस्कार धर्माला, इंद्राला, संकर्षण वासुदेव यांना आणि चंद्रसूर्यांना !
..मा..अतानं – महिमावतांना
चतुंनं चं लोकपालानं यमवरून कुबेर वासवा - चारही लोकपालांना म्हणजे यम, वरूण, कुबेर, वासव
नंनमो – यांना नमस्कार.
कुमार-वरस वेदिसिरिस र..ओ – कुमारवर राजा वेदिश्री याची.
२
.....ईरस सूरस अप्रतिहतचकस दखि – वीराची शूराची अप्रतिहतकाची आणि दक्षिणपथाच्या
नापठ पतिनो – पतिची
३
मा....लाय – आईचा बालेचा
महारठिनो अंगिय-कुलवधनस सगरगिरिवर – महारठिचा अंगियकुलवर्धनाचा सागर आणि गिरिश्रेष्ठ यांनी वेढा घातलेल्या पृथ्वीच्या प्रथमविरांचा. ( हे वर्णन बघा . कसा आहे हा राजा ? तर हा महारथि अंगकुलाचा आहे. आणि ज्या पृथ्वीला सागर आणि डोंगरांनी वेढा घातलेला आहे अशा या पृथ्वीचा तो प्रथमवीर ( सगळ्यात शूर) आहे.
य व अलह....... सलसुर्य महतो मह......- अर्थ लागत नाही.
४
.....सिरिस भारिया देवस पुत्रदस वरदस – श्रीची भार्या देवाची पुत्रदाची, वरदाची
कामदस धनदस – कामदाची व धनदाची
वेदसिरि-मातू सतिनो सिरिमतस च मातुय – वेदसिरी आई शक्ती श्रीमान आई
सीम.....- सीम
पथमय ..... पुढे वाचता येत नाही...
५.
वरिय ......आ – अर्थ लागत नाही
नागवरद्यिनिय मासोपवासिनिय गह- - वंदनीय अशा नागश्रेष्ठ स्त्रीचे महिनाभर उपास
तापसाय चरित ब्रह्मचरियाय दिखव्रतयणं सुंडाय – गृहतापसीचे ब्रह्मचर्याचे आचरण ज्याने केले, दिक्षा, व्रत, यज्ञ यात कुशल आहे तिचे,
यणा हुता धूपनसुगंधानिय... – यज्ञात धूप सुगंध जिने हुत केले आहेत तिचे......
६
रायस यणेहि यिठं वनो – राजाचे यज्ञाने येथे ...
अगाधेय यंणो द्खिना दिना गावो बारस – अगाधेय यज्ञ. दक्षिणा दिली. गाई बारा.
असो च १ – अश्व १.
अनारभनियो यंणो दखिना धेनु – अन्वारंभणी यज्ञ दक्षिणा धेनु
७
..........दखिनायोदिना गावो १७०० हथी १० – दक्षिणेसाठी दिल्या गाई १७०० हत्ती १०
८
......स....ससतरय (ण) आसलठि २८९ – ससतरय यज्ञ आसलठि (?) २८९
कुब हियो रुपामयियो १७....भि..... – रुप्याची १७....
९
...रिको यंणो दखिनायो दिना गावो ११००० – पुंडरिक यज्ञ दक्षिणा दिली गाई ११०००
असा १००० पस.... – अश्व १००० प्रसर्पक....
१०
.....१२ गमवरो १ दखिना काहापना २४४०० – १२ गमवर १, दक्षिणा कार्षापण २४४००
पसपको काहापना ६००१ राज सूय यंणो - प्रसर्पकास काषार्पण ६००१, राजसूय यज्ञ...
.....सकट – (शकट) गाडी.
११
धंणगिरीतंसपयुतं सपटो १ असो १ असरयो – धान्यगिरी.....युक्त, वस्त्र, १ अश्व, १ अश्वरथ
१ गावीनं १०० – गाई १००
असमेधोबितियो यि ठो दखिनायो – दुसरा (पहिल्या नंतरचा) अश्वमेध येथे दक्षिणेसाठी दिले
ना असो रुपाल रो १, सुवंन....नि १२, - रुप्याचे अलंकार १, सोन्याचा नि.... १२
दखिना दिना काहापना ४००० गामो १ – दक्षिणा दिली कार्षापण ४०००, गाई १
हठि ....ना दिना – हत्ती दक्षिणा दिली.
१२
गावो... सकटं धणगिरीतम् समयुतं – गाई....शकट धान्यगिरी.....युक्त
१३
......१७ अच...न ....लय.... – १७ अच...न..
पसपको दिनो...दखिना दिना सु.. – प्रसर्पकास दिली दक्षिणा १२ सुपीनी
पीनी १२ तेस.
रूप आलं करो १ दखिना काहाप(ना) १००००.....२ – त्यास रुप्याचे दागिने १ व रुपये १००००,....२
१४
...गावो २०००० (भग)ल. – गाई २०,००० भगल.
दसरतो यज्ञ यू(इठो दखिना दि)ना गावो १०,००१ – दशरात्र यज्ञ द्क्षिणा दिली गाई १०००१.
गर्गतिरात्र यंणो यिठो दखिना... पसपको पटा ३०१ – गर्गतिरात्र यज्ञ जेथे दक्षिणा....प्रसर्पकास दिलेली वस्त्रे ३०१
गवामयनं यंणो यिठो (दखिना दिना) गावो ११०१ – गवामयन यज्ञ जेथे दक्षिणा दिली गाई ११०१
गावो ११०० पसपको काहापना पटा १००, १०० अतुयामो यंणो – गाई ११००, प्रसर्पक रुपये, वस्त्रे १०० आप्तोर्याम यज्ञ.
१५
...(ग)वामयन यंणो दखिना दिना गाओ ११०१ – गवामयन यज्ञ दक्षिणा दिली गाई ११०१
अंगिरस (आ)मयनं यंणो यिठो दखिनो गावो ११०१ – अंगिरसामयन यज्ञ दक्षिणा दिली गाई ११०१
त....(दखिना ह) इना गावो ११०१ – (बहुतेक) दक्षिणायन यज्ञ गाई ११०१
सतातिरतं यंणो....१०० – सत्रातिरात्र यज्ञ....१००...
...(यं)णो दखिना ग आ नो ११०० अंगिरस (ति)रतो – यज्ञ दक्षिणा गाई ११०० अंगिरसातिरात्र.
यंणो यिठो दखि..ना.. गावो १००१ – यज्ञ दक्षिणा दिली गाई १००१.
१६
....गवो १००२ – गाई १००२
छंदोमप (व) मा (नतिरतो) दखिना गावो १००१ – छंदोमपवमान्तिरात्र दक्षिणा गाई १००१
अंग (इ) र (सतिर) तो यं (णो यि) ठो द(खिना) – अंगिरसातिरात्र यज्ञ जेथे दक्षिणा......
...रतो यिठो यंणो दखिना दिना – रात्र जेथे यज्ञ दक्षिणा.....
तो यंणा यिठो दखिना - ..त्र.. यज्ञ जेथे दक्षिणा.
यंणो यिठो दखिना दिना गावो १००१ – यज्ञ दिली दक्षिणा गाई १००१
१७
...न सयं... – अर्थ लागत नाही
दखिना दिनो गावो...त.... – दक्षिणा दिली गाई...त...
(अं)गि(रसा)मयनं छवस ...(दखि)ना दिनो गावो १००० – अंगिरसामयन उत्सवाच्या दक्षिणा दिल्या गाई १०००
....दखिना दिना गावो १००१ तेरस....अ – द्क्षिणा दिलि गाई १००१ आणि तेराशे...अ
१८
....तेरसतो स... आग दिखना दिना गावो.....- तेराशे स... आग दक्षिणा दिली गाई....
दसरतो म(दि) ना गावो १००१ उ..... – दशरात्र म(रव) दिल्या गाई १००१
.....१००१ द – १००१ द
१९
.....यंणो दखिना दि(ना)----- यज्ञ दक्षिणा दिली...
२०
.....दखिना दिना – दक्षिणा दिली
राया सिमुक-सात वाहनो सिरिमातो – राजा सिमुक शातवाहन श्रीमान याचा.
देवि नायनिकाय रणो च सिर सातकनिनो. – देवी नायनिका राजा श्री शातकर्णी इचा.
कुमारो भाय....- कुमार भाय....
महारथि त्र्यणकयिरो – महारथि त्र्यणकयिर
कुमरो हकुसिरि.- कुमार हकुसिरि
कुमारो सातवाहनो- कुमार सातवाहन.
नंतर कोरलेला –
सोपारकस गोविंददास्स्स देयधम पोढि – सोपारकर गोविंददास याचा दानधर्म असलेली ही पाणयोपी ( पाणपोयी)
त्या काळात प्रजापति हा एक महत्चाचा देव असावा असे दिसते कारण त्याला पहिल्यांदा वंदन केले आहे. नंतर धर्माला म्हणजे महाभारतातला धर्मराज का “धर्म” याला हे कळत नाही. पण वेदकालीन देवतांना म्हणजे इंद्राला, यमाला, सूर्याला, चंद्राला, महिमावतांना, वरूण, कुबेर, व महाभारतकालिन कृष्णालाही वंदन केले आहे.
सातवाहनांना दक्षिणपथाचा राजा असे संबोधले आहे. याचा अर्थ दक्षिण दिशेच्या प्रदेशाचा राजा. या राज्याला सिमारेषा नाहीत. ते अवाढव्य आहे.
महारठिचा अंगियकुलवर्धनाचा ? हे अंगकुलातील होते काय हे शोधून काड्।आवे लागेल. तसे असेल तर हे नागवंशीय कसे हे ही बघावे लागेल.
आईला श्री म्हणायची ही पद्धत कधी लोप पावली कोणास ठाऊक.
पुंडरिक यज्ञ हा मोठा असावा, ज्यात ११००० गाई आणि घोडे १००० दान दिले गेले. या यज्ञाबद्दल काही माहिती मिळत नाही.
राजसूय यज्ञामधे गाडी घोडा दान द्यायची रीत असावी. तसेच त्याकाळी सुद्धा वर काहीतरी १/२/३ असे जास्त द्यायची पद्धत होती हे समजते.
अश्वमेध यज्ञात रथ आणि घोडा दान देण्यात येई. तर गाडी भरून धान्य देण्यात येई असे दिसते. असल्या महत्वाच्या यज्ञातच सोने दान केले जाई. त्या काळात हत्तीही मुबलक होते असे दिसते.
सातवाहन हे नागकुलातील असावेत म्हणून नागश्रेष्ठ असे म्हटले असावे. हुता हा शब्द आहूती ज्यातून आला तो असावा. म्हणजे यज्ञात सुगंधित धूपाची आहूती दिली आहे. म्हणजे २२०० वर्षापूर्वी धूप होता. धूप हा तयार करावा लागतो झाडापासून.
धेनू व गाई यातील फरक काय माहीत नाही.
रूपे आणि त्याची भांडी ही मला वाटते समुद्रामार्गे येत असावीत. त्याची दानधर्मात संख्या फारच कमी आहे. ते सहज मिळत नसावेत म्हणूनच महाग असावीत.
असा अर्थ बराच काढता येतो. बघा काढून ! हा एक यज्ञ लेख आहे त्यामुळे त्यात १८ प्रकारचे यज्ञांचा उल्लेख केला आहे. तुर्तास इतकेच पूरे.
जयंत कुलकर्णी.
फोटोसाठी ट्रेकचा कुठलाही धागा बघावा......
प्रतिक्रिया
20 Aug 2011 - 12:07 am | बिपिन कार्यकर्ते
उत्सुकता वाटते आहे!
20 Aug 2011 - 12:20 am | आनंदयात्री
हेच म्हणतो. जयंतकाका म्हणजे पोटली बाबाकी आहेत, काय काय मस्त गोष्टी सांगत असतात.
धन्यवाद.
20 Aug 2011 - 12:23 am | शैलेन्द्र
अत्यंत आभारी आहे.. हे भाषांतर मी खुप दिवस शोधत होतो. गाथा सप्तशतीबद्दलही सविस्तर लेख येवुद्यात.
20 Aug 2011 - 7:15 am | ५० फक्त
नमस्कार जयंत सर, धन्यवाद अजुन एक खुप मोठा विषय सुरु केल्याबद्दल, आणि तुम्ही तो समर्थपणे सांभाळाल याची खात्री आहेच.
20 Aug 2011 - 9:41 am | प्रचेतस
हे नाणेघाटातील शिलालेख सातवाहन सम्राज्ञी राणी नयनिका (नागनिका) हिने खोदवून घेतले आहेत. ही सिमुक (श्रीमुख) सातवाहनाची सून व श्री सातकर्णीची पत्नी. सिमुक सातवाहनाला आज्ञ सातवाहन असे मानले जाते पण हे खरे नाही असे हल्लीच झालेल्या संशोधनात आढळून आलेले आहे. सिमुक सातवाहनाचा पिता सातकर्णी (याचे नाव सातकर्णी असेच होते) याची काही नाणी नुकतीच मिळाली आहेत. या सातकर्णी नावावरूनच पुढच्या पिढ्यांना सातकर्णी हे पदनाम मिळाले.
सिमुक सातकर्णी, श्री सातकर्णी आणि नयनिकेचा काळ अत्यंत वैभवशाली समजला जातो.
याचा अर्थ लेखक त्याची महती गात आहे असा होतो.
याचा अर्थ ही श्रीला (श्री सातकर्णी)यास देवपण, काम, धन, पुत्र मिळवून देणारी अशी श्रीची भार्या आहे. नागाचे तिला वरदान आहे(म्हणून नागनिका). प्रत्येक महिन्याला उपवास करणारी ही गृहतापसी आहे. ब्रह्मचर्याचे पालन करणारी ही राणी आहे जिची किर्ती धूपाच्या सुगंधाप्रमाणे दरवळत आहे.
येथे हे लक्षात घेतले पाहिजे की हे शिलालेख श्री सातकर्णीच्या मृत्युनंतर कित्येक वर्षांनी खोदवले आहेत. तेव्हा राज्यपदावर वेदिश्री सातकर्णी (नयनिकेचा पुत्र) हा होता. नयनिकेच्या शिलालेखांमुळे व पुढेही सातवाहनांच्या नासिकच्या पांडवलेणीतल्या गौतमी बलश्री (गौतमीपुत्राची माता) शिलालेखांमुळे सातवाहनांमध्ये मातृसत्ताक पद्धती असून स्त्रीयांना सन्मान मिळत असे हे सिद्ध होते.
जयंतरावांच्या पुढच्या ओळींमध्ये सातवाहनांच्या काही यज्ञांचे व त्यात त्यांनी दिलेल्या दानांचे वर्णन आले आहे. त्यात अश्वमेध, अग्न्याध्येय, अन्वाध्येय, राजसूय, पुंडरीक, अतिरात्र इ. व अजूनही अनेक यज्ञांचे वर्णन आले आहे. पैकी अश्वमेध व राजसूय यज्ञ हे चक्रवर्ती सम्राटांनाच करता येत असत. त्यावरून त्या काळात भरतखंडातील सर्वाधिक प्रबळ साम्राज्य हे सातवाहनांचेच होते हे लक्षात येते.
वर जयंतरावांनी उल्लेख केल्याप्रमाणे सातवाहनांना आंध्रभृत्य असे मानले जाते. त्यांनी आंध्र मावळचा जो उल्लेख केला आहे ते म्हणजे मावळातील आंध्रा नदीचे खोरे.(सध्याचे आंदर मावळ) पण या उपपत्तीला कसलाही पुरातत्विय पुरावा अजून उपलब्ध झालेला नाही. पण हे आंध्रप्रदेशातील खचितच नव्हेत. कारण सातवाहनांचे आजवर जे जे शिलालेख उपलब्ध झालेले आहेत ते सर्व ब्राह्मी प्राकृतात आहे (अगदी आंध्र प्रदेशातले सुद्धा) त्यातला एकही अपवादात्मकरित्याही तेलगूत (द्राविडी भाषांमध्ये) नाही.
जयंत राव पुढचे भाग पटापट येउ द्यात आता.
20 Aug 2011 - 12:51 pm | llपुण्याचे पेशवेll
येथे हे लक्षात घेतले पाहिजे की हे शिलालेख श्री सातकर्णीच्या मृत्युनंतर कित्येक वर्षांनी खोदवले आहेत. तेव्हा राज्यपदावर वेदिश्री सातकर्णी (नयनिकेचा पुत्र) हा होता. नयनिकेच्या शिलालेखांमुळे व पुढेही सातवाहनांच्या नासिकच्या पांडवलेणीतल्या गौतमी बलश्री (गौतमीपुत्राची माता) शिलालेखांमुळे सातवाहनांमध्ये मातृसत्ताक पद्धती असून स्त्रीयांना सन्मान मिळत असे हे सिद्ध होते.
वाचून गंमत वाटली. मातृसत्ताक पद्धती असली असे मानले जरी तर मग सर्वच राजे कसे काय झाले. कोणीच राणी शिलालेखात नाव येण्याच्या पलिकडे कशी काय गाजली नाही. स्त्रियाना मानसन्मान होता म्हणून सातकर्णी देखील गौतमीपुत्र असे बिरूद मिरवयचा व्गैरे ठी़क. मातृसत्ताक होते ना मग तरीपण राजाचीच नावे कशी काय टीकली. राण्यांची टिकायला पाहीजे होती. माझ्या बालबुद्धीला विवेचन पटले नाही. असो.
पण भाषांतराबाबत मात्र आभार मानावे तितके कमीच. :) तुमच्या अभ्यासाचे, फिरस्तीचे कौतुक आहे.
20 Aug 2011 - 3:12 pm | प्रचेतस
येथे मातृसत्ताकचा शब्दशः अर्थ न घ्यावा. मातृसत्ताक अशा अर्थाने की सातवाहनाकाळात स्त्रियांना विशेषतः मातेला मान असे. सातवाहन हे वैदिक धर्माभिमानी असल्याने स्त्रियांना राज्यहक्क नव्हताच. तत्कालीन स्त्रीजीवनाची माहिती प्रामुख्याने आपस्तंभस्मृती, हालाची गाथासप्तशती व काही शिलालेखांवरून स्पष्ट होते. अर्थात हा एका स्वतंत्र लेखाचाच विषय. पण राणी नागनिका आणि गौतमी बलश्री यांच्या हातामध्ये सत्ता मोठ्या प्रमाणावर एकवटली होती.
20 Aug 2011 - 11:40 am | जाई.
लेख आवडला. पु.भा.प्र.
20 Aug 2011 - 3:41 pm | पैसा
गाथा सप्तशती आणि सातवाहनांच्या शिलालेखाचं भाषांतर/रूपांतर दिल्याबद्दल जयंत कुलकर्णींना धन्यवाद! वल्लीची माहितीसुद्धा छान.
20 Aug 2011 - 6:35 pm | जयंत कुलकर्णी
भाग दोनचा नवीन धाग करण्यापेक्षा हा लेख येथेच पूर्ण केला आहे.
20 Aug 2011 - 8:31 pm | प्रचेतस
प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव. यज्ञाच्या सुरुवातीला प्रजापतीला वंदन करणे हे वैदिक सातवाहनांच्या दृष्टीने उचितच आहे. इथे गणेश देवतेचा उल्लेख नाही. त्यामुळे सातवाहनकाळी गणपती हे दैवत फारसे प्रचलित नसावे. किंबहुना त्याकाळी मूर्तीपूजा अस्तिवात नसल्याने गणेशपूजन नसावेच.
इथे 'धर्म' हाच यमधर्म नावानेही अभिप्रेत असावा. महाभारतातील धर्माला आजही दैवत मानले जात नाही व त्याकाळीही नसावे. यम हा लोकपालांपैकी एक असल्यानेही त्याचा परत उल्लेख आला असावा.
सातवाहनकाळी मथुरा ते पैठण असा उत्तर-दक्षिण दिशा जोडणारा प्रमुख सार्थवाहपथ होता. त्यालाच दक्षिणपथ असेही म्हणत. त्या प्रदेशावर सत्ता असणारा असाही एक समांतर अर्थ होउ शकतो.
अंगकुल किंवा अंगिरसकुल असेही असू शकेल. किंबहुना अंगिरस गोत्र आजही प्रचलित आहे. अग्नीची उपासना करणारे अर्थात यज्ञ करणारे असाही अर्थ होउ शकेल.
धेनू म्हणजे बहुधा सवत्स गाई असाव्यात.
कार्षपण म्हणजे चांदीची नाणी.
इथे सातवाहनांचे समस्त कुल उल्लेखलेले आहे.
सिमुख सातवाहन, त्याची सून नयनिका, तिचा पती श्री सातकर्णी, तिची मुले भाय(ल) (हा अल्पायुषी होता), हकुसिरी म्हणजे हकुश्री (हा स्त्रीलंपट होता आणि अल्पकाळच राज्यपदावर होता असे म्हणतात) आणि कुमार सातवाहन म्हणजे वेदिश्री सातकर्णी.
महारठि त्र्यणकयिरो म्हणजे महारथी(येथे मराठी हा शब्द अभिप्रेत नाहीये) त्रिनकवीर. हा सातवाहनांचा महाअमात्य होता आणि राणी नयनिकेचा पिता. त्यामुळेच त्रिनकवीराचा उल्लेख नाणेघाटात आला आहे.
सोपारकर म्हणजे सोपारा (शूर्पारक) अर्थात आजचा नालासोपारा येथील गोविंददास हा दाता.
बघा म्हणजे या मार्गाला फक्त राजांचाच नाही तर जनतेचाही हातभार लागलेला दिसतो. हे पाण्याचे टाके कदाचित नंतरच्या काळात (म्हणजे नयनिकेनंतरच्या) खोदले गेलेले असावे.
20 Aug 2011 - 9:02 pm | जयंत कुलकर्णी
मस्त !
आपण लिहिलेले एकदम बरोबर आहे.
या विषयावर आपण लिहावे ही विनंती.
21 Aug 2011 - 8:48 am | प्रचेतस
एकदा सविस्तर या विषयावर लिहायचे आहेच पण टंकाळा आणि विषयाच्या व्याप्तीमुळे मनाची तयारी अजून होत नाहीये. :(
22 Aug 2011 - 11:44 pm | ५० फक्त
@ वल्ली,
कंटाळा म्हणे, पोकळ बांबुचे फटके हवेत का, नाहीतर असं करा तुम्ही लेखमाला पुर्ण करा आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो थं***र्डसाठी, चालेल डील डील. पक्क्का. मग मला घेउन जा नाणेघाटात.
22 Aug 2011 - 11:47 pm | प्रभो
>>पोकळ बांबुचे फटके हवेत का
पोकळ नव्हे तर फटके द्यायला बांबू 'पोकल' हवा.. ;)
23 Aug 2011 - 9:18 am | प्रचेतस
लवकरात लवकर लिहिण्याचा प्रयत्न करतो आता. पण त्याआधीच नाणेघाटात जाउन येउयात. :)
23 Aug 2011 - 9:51 am | जयंत कुलकर्णी
चायला, मला घेउन जायला विसरू नका म्हणजे झालं
:-)
23 Aug 2011 - 8:11 pm | शैलेन्द्र
माझाही हात वर केल्या गेला आहे..
23 Aug 2011 - 10:06 am | स्पा
श्रीयुत वल्ली यांना पुरेसा मस्का मारण्यात आलेला आहे हे ओळखून .. ते आता लेखमाला लिहायला सुरुवात करतील.. असे समजून चालत आहे...
जकू लेख उत्तम...
आणि वल्ली मस्त माहिती
21 Aug 2011 - 11:25 am | मदनबाण
उपयुक्त माहिती !!!
यज्ञांची महती आपल्या ॠषी मुनींना ठावुक होती !!! १०० अश्वमेध यज्ञ केल्यास इंद्रपदाची प्राप्ती होते असा उल्लेख बर्याच पुराणात आढळुन येईल.
जाता जाता :--- आता शास्त्रज्ञ मंडळींना देखील यज्ञाचे महत्व पटु लागले आहे... ;)
संदर्भ :--- http://green.in.msn.com/greennews/article.aspx?cp-documentid=5200623
http://articles.timesofindia.indiatimes.com/2009-05-27/vadodara/28157592...
21 Aug 2011 - 11:35 am | सूड
अतिशय सुंदर लेख. वल्लीने दिलेली माहितीही आवडली.
वल्ली: लेख लिहीच रे एखादा ( लेखमालिकाही चालेल, पण ही आपली बोलण्याची पद्धत ) !!
21 Aug 2011 - 1:03 pm | पाषाणभेद
अभ्यासपुर्ण छान लेख आहे.
22 Aug 2011 - 5:38 pm | प्रचेतस
जयंतराव, गाथासप्तशतीबद्दलही लवकरच येउ द्यात.
अवांतरः गुणाढ्याची बृहत्कथाही सातवाहनकालीन आहे असे ऐकून आहे.
23 Aug 2011 - 12:40 am | धनंजय
छान.
पुन्हा काळजीपूर्वक वाचायला पाहिजे.
23 Aug 2011 - 8:35 pm | बिपिन कार्यकर्ते
+१
23 Aug 2011 - 10:42 am | सविता००१
जयंत काका तुम्ही म्हणजे वर म्हट्ल्याप्रमाणे खरच पोटली बाबा की उघडून दाखवताय. मस्त. आणि वल्ली, तुम्हीही भराभर लिहा हो! खूप माहिती मिळते आहे.
23 Aug 2011 - 11:14 pm | आशु जोग
शिलालेख कोणत्या लिपीत असतात
24 Aug 2011 - 8:53 am | प्रचेतस
सातवाहनकालीन (सातवाहनांचे) शिलालेख हे ब्राह्मी लिपीत आणि प्राकृत भाषेत आहेत तर क्षत्रपांचे शिलालेख हे ब्राह्मी संस्कृतात आहेत.
ब्राह्मीचेही प्राचीन ब्राह्मी, ब्राह्मी वगैरे प्रकार आहेत.
19 Sep 2012 - 11:08 pm | एस
कितीतरी दिवस मी या लेखांचे भाषांतर शोधत होतो. धन्यवाद!