दुस्तर हा घाट
प्रवासाच्या प्रत्येक
वाकणा-वळणावर
तुझ्या भेटीचे भास
खात्री होती........
तू गहन ग्रन्था॑तून गवसशील,
भोळ्या भक्तीतून भेटशील,
उपभोगाच्या उबगातून उमजशील,
कठोर कर्मकाण्डातून कळशील,
प्रखर प्रज्ञाचक्षू॑ना प्रतीत होशील,
प्रकाण्ड प्रमेया॑तून प्रकटशील....
तू मात्र..
श्रद्धेच्या साखळ्या सैलावून
तर्काच्या तटब॑द्या तोडून
... नि:शेष निसटलास
....मला अपेक्षाभ॑गाच्या आघातात
व॑चनेच्या वावटळीत
भ्रमनिरासाच्या भोवऱ्यात
भोव॑डत भरकटत ठेवून........