भूमिपुत्र आणि काळी आई
आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या
त्याच्या सुकल्या डोळ्यांनाही भिजवेल एवढं पाणी
त्याला द्यायला सरकार तयार नव्हतं
त्याला दिलेल्या अश्रूंचाही कोटा त्यानं खर्च केला होता
कधी मरणारं जित्राब पाहून
कधी सावकाराला जमीन विकून तर
कधी हातातोंडाशी आलेलं पिक अवकाळी पावसानं झोडपलेलं पाहून
अपयशाच्या पहिल्या पायरीवरच जगत
त्याच्या अनेक पिढ्या काळ्या मातीत मिसळल्या
पण त्या समिधांनीही भूदेवता प्रसन्न झाली नाही
की लक्ष्मी देवतेने भरभरूनवआशीर्वाद दिला नाही
सावकार रूपी लक्ष्मीपुत्रांच्या दावणीला मात्र त्याचं नशीब बांधलं गेलं ते कायमचंच