तो शुद्धीवर नव्हता तेव्हा
कोणीतरी त्याला नकळत जमिनीवर उतरवलं
आणि अनोळखी टापूमध्ये त्याची पावलं त्याच्या इच्छेविरूद्ध पडू लागली
आजुबाजूच्या अनोळखी लोकांनी त्याच्या रडण्याचा आनंद घेतला
तो ओळखीचा संकेत समजून
त्याने तो प्रदेश आपलाच असण्याचा समज करून घेतला
पहाटवेळच्या आश्वासक आवाजांतून आणि स्पर्शांतून
दररोजच्या सूर्योदयांच्या विभ्रमांतून
याच्याही डोळ्यांमधीळ काळ्या बाहुल्यांच्या पडद्याआडच्या मनात
काही इंद्रधनुष्यं दबा धरून बसली
सूर्य जसा जसा वर येऊ लागला
तसे पहाट स्वनांच्या इंद्रधनुष्यांमागे याची अबोध पावलं
प्रारब्धाच्या वार्याबरोबर अलगद पडू लागली आणि मोठी होऊ लागली
सूर्य माथ्यावरून जसा कलू लागला तसा
इंद्रधनुष्यांचे भासमान अर्थ समजून तो पुन्हा व्याकुळ झाला
पण तेवढ्यातच व्याकुळांच्या कळपात तो सामील झाला
आणि देशोदेशीच्या व्याकुळकथांनी मन रिझवू लागला
कलत्या सूर्यासवे गात्रे जशी बंड करून उठली
सांजवार्या सवे येणार्या झुळुकांनी आयुष्य समजल्याची जाणीव निर्माण केली
तशी एक चिरपरिचित हाक अस्पष्टपणे कानावर आली
तो पुन्हा बेशुद्ध झाला आणि नव्या आदेशाची वाट पाहत घुटमळत राहिला.