..आणि त्याचं विमान त्या सवयीच्या झालेल्या रन-वे वरून
पुन्हा भरारी घेत उंचच उंच आकाशी झेपावलं
विमानाच्या वेगानं मन मात्र पुढं सरकायला तयारंच नव्हतं
त्याच्या उमलत्या काळाच्या आठवणी,
त्याच्या पावलांना चालतं करणारे आश्वासक हात
त्याच्या वेगाला मूकपणे वाखाणणारे डोळे
त्याच्या वेड्या साहसांनंतरही मायेने त्याचे अपराध पोटात घेणारी मनं..
त्याच्या इंद्रधनुष्याकडे जाणार्या रस्त्यावर ढगासारखी आड येत होती
तेवढ्यात सर्रदिशी वीज लखलखून त्याला भविष्यकाळ दाखवून गेली
मग त्यानंतर समुद्रात पाऊस पडला
सोडलेला देश अंधुकसा दिसू लागला
त्याला सूर्य दिसावा म्हणून त्याच्या देशानं स्वत:ला अंधारात ठेवणं पसंत केलं.