एक गाणे दूरवरुनी
एक गाणे दूरवरुनी, निशिदिनी झंकारते
पैलतीरावरुनी काही ऐलतीरी आणते
हृदयस्पंदी ताल त्याचा, राग त्याचा अनवट
भिनत जातो नाद, मग अनुनाद येतो गर्जत
लय अशी अलवार मजवर प्राणफुंकर घालते
रोमरोमातून काही तरल मग ओसंडते
मुक्तछंदी शब्द, त्यांच्या सावल्या धूसर जरी
अर्थ उलगडती नवेसे ऐकले कितिही तरी